Rainfall Measurement | चला, पाऊस मोजूया!

Rainfall Measurement |
Rainfall Measurement | चला, पाऊस मोजूया!
Published on
Updated on

मंगेश कश्यप

‘पाऊसपाणी’ तील पहिला शब्द म्हणजे आपल्या गावात पाऊस कसा पडला, किती पडला अशा अर्थाने आणि पुढचा पाणी हा शब्द पडलेला पाऊस साठवला का? मुरवला का? या अर्थाने.. आता या पाऊस पाण्याच्या निमित्ताने आपण पाऊस मोजण्याच्या जगात फेरफटका मारूया म्हणजे किती पाऊस पडला, हे आपल्याला कळेल आणि वॉटर बजेटमध्ये त्याचा उपयोग होईल. पाऊस किती पडला, हे नक्की कसे मोजतात? हा अंदाज नाही, हे एक अचूक शास्त्र आहे.

पावसाचे मोजमाप म्हणजे काय?

पाऊस मिलिमीटरमध्ये मोजला जातो. 'आज २५ मिमी पाऊस पडला' म्हणजे काय? याचा सरळ अर्थ असा : जमिनीवरून पाणी कुठेही वाहून गेले नाही, मुरले नाही आणि त्याचे बाष्पीभवन झाले नाही, तर त्या जमिनीवर २५ मिलिमीटर उंचीचा पाण्याचा थर साचेल. म्हणजे पाऊस ही एका सपाट पृष्ठभागावर साचणाऱ्या पाण्याच्या उंचीची मोजणी आहे. या पावसाच्या मापनाची विविध साधने आणि पद्धती कोणत्या आहेत, हीपण एक रंजक गोष्ट आहे.

१. साधा पर्जन्यमापक

सर्वात जुनी आणि सोपी पद्धत. एक उघडे भांडे ठेवायचे. त्यात साठलेले पाणी मोजपट्टीने मोजायचे. भारतीय हवामान विभाग (IMD) 'सिमन्स गेज' वापरतो. यात वरचा फनेलचा भाग पाणी गोळा करतो आणि खालच्या बाटलीत साठतो. दिवसातून एकदा किंवा दोनदा हे पाणी मोजपट्टीने मोजले जाते.

२. टिपिंग बकेट रेन गेज

यात दोन छोट्या बकेट (वाटी) असतात, ज्या एका तराजूवर तोलून ठेवलेल्या असतात. एक बकेट भरली की ती झुकते, पाणी सांडते आणि दुसरी बकेट त्या जागी येते. प्रत्येक झुकण्याची गणना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होते. त्यामुळे हे स्वयंचलित आहे आणि सतत डेटा देत राहते.

३. वेटिंग प्रिसिपिटेशन गेज

यात पाणी मोजण्याऐवजी वजन मोजले जाते. पाऊस किंवा बर्फ साठलेल्या भांड्याचे वजन सतत मोजले जाते आणि त्यावरून पावसाचे प्रमाण कळते. बर्फ पडणाऱ्या भागांत ही पद्धत उपयुक्त आहे.

४. रडार आणि उपग्रह तंत्रज्ञान

आधुनिक हवामान विभाग डॉप्लर रडार वापरतो. हे रडार ढगांमधील पाण्याचे थेंब आणि बर्फाचे कण ओळखून संपूर्ण प्रदेशावरील पावसाचा अंदाज देते. एका जागी न जाता! ISRO चे INSAT आणि इतर हवामान उपग्रह संपूर्ण देशावरील ढगांची हालचाल टिपतात. आता आपण पाऊस मोजण्याच्या जगातील वेगवेगळ्या पद्धतींच्या जगात फेरफटका मारूयात.

एका छोट्या भांड्यापासून अवकाशातील उपग्रहांपर्यंत

पाऊस मोजणे ही फक्त भारतापुरती गोष्ट नाही. हे जागतिक शास्त्र आहे आणि प्रत्येक देशाने आपल्या भूगोलाला अनुसरून वेगळी तंत्रे विकसित केली आहेत. एक रंजक गोष्ट सांगतो, कोरियामध्ये जोसेऑन काळात 'च्युगुगी' (Cheugugi) नावाचे लोहाचे एक उपकरण वापरले जात होते, जे आजच्या पर्जन्यमापकांसारखेच काम करायचे. तब्बल ३२ सेंटिमीटर खोल आणि ठरावीक व्यासाचे हे उपकरण पाऊस मोजण्यासाठी वापरले जायचे. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीच मानवाने या शास्त्राचा पाया घातला होता.

ड्युअल पोलरायझेशन रेडार : पावसाचा अचूक अंदाज

विकसित देशांत आता पारंपरिक रेडारपेक्षा अधिक प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते. ड्युअल पोलरायझेशन रेडार (Dual-Polarization Radar). गेल्या काही दशकांत सिंगल पोलरायझेशनवरून ड्युअल पोलरायझेशनकडे झालेल्या स्थलांतरामुळे रडार तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली आहे, ज्यामुळे अडथळे दूर करणे आणि पावसाच्या अंदाजाची अचूकता लक्षणीयरीत्या सुधारली आहे. या तंत्रामुळे पावसाचे थेंब आणि बर्फाचे कण यांच्यात फरक ओळखता येतो. साधा रेडार हे करू शकत नाही. या प्रगतीमुळेच आता शहरी भागांत पुराचा अंदाज घेण्यासाठी लहान, स्वस्त आणि उच्च रिझोल्यूशन असलेले X-बँड पोलरायमेट्रिक रडार विकसित झाले आहेत . अमेरिकेत तर असे १६० हून अधिक रडार स्टेशन्सचे जाळे (NEXRAD नेटवर्क) देशभर पसरलेले आहे.

अवकाशातून पाऊस मोजणे उपग्रहांची किमया

ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. आता पाऊस अवकाशातूनही मोजला जातो. NASA आणि जपानच्या JAXA या संस्थांनी मिळून तयार केलेली GPM (Global Precipitation Measurement) मोहीम जगभरातील पाऊस आणि बर्फाचे निरीक्षण करणाऱ्या उपग्रहांचे आंतरराष्ट्रीय जाळे आहे. यातील मुख्य उपग्रहावर बसवलेला ड्युअल फ्रिक्वेन्सी रडार पावसाचे आणि बर्फाच्या थेंब कणांचे त्रिमितीय (3D) मापन करतो. या उपग्रहाची खासियत म्हणजे तो जमिनीपासून सुमारे २० किलोमीटर उंचीपर्यंत पाऊस आणि बर्फाचे उभे प्रोफाईल देऊ शकतो आणि अगदी तासी ०.७ मिलिमीटर इतका हलकाही पाऊस ओळखू शकतो इतकी प्रगत तंत्रज्ञानाची किमया!

IoT आणि सेन्सर नेटवर्क : भविष्यातील दिशा

आता जगात एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. Internet of Things (IoT) आधारित सेन्सर नेटवर्क. इटलीतील जेनोवा शहरात झालेल्या एका प्रयोगात पारंपरिक रडार आणि पर्जन्यमापक न पोहोचणाऱ्या धोकादायक भागांतही कमी संख्येच्या सेन्सर्सने पाऊस मोजता येतो. हे तंत्रज्ञान विशेषतः दुर्गम आणि डोंगराळ भागांसाठी उपयुक्त ठरत आहे, जिथे मोठे रेडार बसवणे अवघड असते.

विकसित देश आणि भारत यांतील फरक

विकसित देश रडार नेटवर्क, उपग्रह आणि AI यांचा एकत्रित वापर करून जवळजवळ प्रत्येक चौरस किलोमीटरचा पावसाचा डेटा मिळवतात. भारतात असे जाळे अजूनही विस्तारत आहे; पण ISRO आणि IMD यांनी मिळून केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. फरक एवढाच आहे की, विकसित देश या संदर्भातील बारीक तपशील मोजण्यावर भर देतात, तर विकसित होत असलेले देश आधी 'संपूर्ण भौगोलिक कव्हरेज' मिळवण्यावर भर देतात. कुणीतरी विचारेल आता ही झाली तंत्रज्ञानांची दुनियादारी; पण मी माझ्या घरी पाऊस मोजू शकतो का?

हो, नक्कीच! आणि हे करणे खूप सोपे आणि मजेशीर आहे.

पाऊस मोजण्यासाठी लागणारी साधने

- एक सरळ बाजूंचा पारदर्शक डबा किंवा बाटली (वरचा आणि खालचा भाग समान रुंदीचा असावा)

- मिलिमीटर मापपट्टी (स्केल)

- समतल आणि उघडी जागा (झाडाखाली किंवा भिंतीजवळ नको)

सोपी पद्धत:

१. डबा जमिनीपासून थोड्या उंचीवर (स्टँडवर) ठेवा, जेणेकरून आसपासच्या पाण्याचे शिंतोडे त्यात जमा होणार नाहीत

२. पाऊस थांबल्यावर किंवा ठरावीक वेळी (उदा. सकाळी ८ वाजता) डब्यातील पाण्याची उंची मोजा

३. ही उंची मिलिमीटरमध्ये नोंदवा. हाच तुमचा पाऊस

४. मोजल्यानंतर डबा रिकामा करा, पुढच्या मोजणीसाठी तयार ठेवा

आजकाल बाजारात स्वस्त घरगुती रेन गेज सहज मिळतात. काही ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहेत. आपापल्या गावातील पाऊस मोजण्याचे तंत्र आपण शिकून घेतले पाहिजे, तरच वॉटर बजेट करून पाण्याचा संयमित जबाबदारीने वापर करू शकू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news