Electronic Skin | यंत्रमानवालाही होणार वेदना!

Electronic Skin
Electronic Skin | यंत्रमानवालाही होणार वेदना!Pudhari File Photo
Published on
Updated on

शहाजी शिंदे, संगणक अभ्यासक

हाँगकाँग सिटी युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी विकसित केलेली नवी ‘इलेक्ट्रॉनिक स्किन’ (ई-स्किन) तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी क्रांती मानली जात आहे. हे तंत्रज्ञान केवळ स्पर्शाची जाणीव करून देणारे नसून, ते रोबोला ‘वेदना’ अनुभवण्यास आणि त्यावरील प्रतिक्षिप्त क्रिया (रिफ्लेक्स) करण्यास सक्षम बनवते. तंत्रज्ञानाचे हे मानवीकरण जेवढे सुखद वाटते, तेवढेच ते ‘धोक्याची घंटा’ देणारेदेखील आहे.

हाँगकाँगच्या शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणली असून त्यांनी मानवी त्वचेप्रमाणेच संवेदना असणारी ‘ई-स्किन’ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक त्वचा विकसित केली आहे. मानवी मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून तयार केलेली ही कृत्रिम त्वचा आता रोबोना स्पर्शाची जाणीव करून देणार आहेच; पण या जोडीला त्यांना वेदनाही समजू शकणार आहेत. सिटी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग येथील संशोधक युयू गाओ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे संशोधन ‘पीएनएएस’ या जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध केले आहे. यामुळे भविष्यातील ह्युमनॉईड रोबोविषयीची चर्चा सुरू झाली आहे.

या नव्या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिट्य म्हणजे हे मानवी मज्जासंस्थेचे हुबेहूब अनुकरण करते. आजवरच्या रोबोमध्ये बसवण्यात येणारी त्वचा ही केवळ दाब किंवा स्पर्श मोजण्यासाठी वापरली जात असे; मात्र या नव्या ‘न्यूरोमॉर्फिक’ त्वचेमध्ये स्पर्श आणि वेदना यांमधील फरक ओळखण्याची क्षमता आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीराला एखादी गरम वस्तू किंवा तीक्ष्ण धार लागल्यास मेंदूला सूचना मिळण्यापूर्वीच आपला हात मागे घेतला जातो, अगदी तशाच प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया करण्याची क्षमता या कृत्रिम त्वचेमुळे रोबोंमध्ये येणार आहे. ही यंत्रणा चार वेगवेगळ्या थरांनी बनलेली असून, प्रत्येक थराची भूमिका एखाद्या जैविक मज्जापेशीसारखी आहे. जेव्हा रोबोला हलका स्पर्श होतो, तेव्हा त्याचे संकेत मुख्य प्रोसेसरकडे पाठवले जातात, ज्यामुळे रोबोला वस्तू हाताळणे किंवा लोकांशी संवाद साधणे सोपे होते; परंतु जेव्हा स्पर्शाचा हा दाब एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जातो, तेव्हा ही यंत्रणा ‘पेन मोड’मध्ये जाते.

वेदनांची ही जाणीव रोबोच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जेव्हा या त्वचेवर तीव्र दाब पडतो, तेव्हा सिस्टीम ही माहिती मुख्य संगणकाकडे न पाठवता थेट रोबोच्या मोटर्सना हायव्होल्टेज संदेश पाठवते. यामुळे रोबो कोणत्याही विलंबाशिवाय आपला हात किंवा पाय धोक्याच्या ठिकाणाहून मागे घेऊ शकतो. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘रिफ्लेक्स अ‍ॅक्शन’ किंवा प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणतात. या थेट मार्गामुळे प्रतिक्रिया देण्याचा वेळ कमालीचा कमी होतो. यामुळे रोबोचे स्वतःचे होणारे नुकसान टाळता येते आणि आजूबाजूच्या माणसांनाही इजा होण्याचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे, या त्वचेला स्वतःच्या नुकसानीची जाणीव होण्याचीदेखील सोय करण्यात आली आहे. यातील प्रत्येक सेन्सर युनिट सतत एक लहान संकेत उत्सर्जित करत असतो, ज्यावरून त्वचा सुस्थितीत असल्याचे समजते. चुकून या त्वचेचा काही भाग फाटला किंवा कापला गेला, तर तो विशिष्ट संकेत बंद होतो. यामुळे रोबोला तत्काळ समजते की, त्याच्या शरीराच्या कोणत्या भागात बिघाड झाला आहे.

या संशोधनाचे व्यावहारिक स्वरूपही अत्यंत सुटसुटीत ठेवण्यात आले आहे. ही त्वचा जरी स्वतःहून बरी होऊ शकत नसली, तरी तिची रचना ‘मॉड्युलर’ म्हणजे सुट्या भागांची मिळून बनलेली आहे. ही त्वचा चुंबकीय ब्लॉक्सप्रमाणे जोडलेली असते. त्यामुळे एखादा भाग खराब झाला, तर संपूर्ण रोबो उघडण्याची गरज भासत नाही. केवळ तो खराब झालेला तुकडा काढून काही सेकंदांत तिथे नवीन तुकडा बसवता येतो. या सोयीमुळे रोबोची देखभाल करणे अत्यंत स्वस्त आणि सोपे होणार आहे. आजच्या काळात जेव्हा एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससारख्या कंपन्या आणि अनेक तंत्रज्ञान संस्था अधिक प्रगत ह्युमनॉईड रोबो बनवण्यावर भर देत आहेत, तेव्हा अशा प्रकारची मानवी संवेदना असणारी त्वचा या क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे.

विज्ञानाच्या या प्रगतीमुळे आता माणूस आणि यंत्र यांच्यातील भिंत अधिक पुसट होत चालली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तंत्रज्ञानाचे हे मानवीकरण जेवढे सुखद वाटते, तेवढेच ते ‘धोक्याची घंटा’ देणारेदेखील आहे. जेव्हा यंत्रांना मानवाप्रमाणे संवेदना प्राप्त होतात, तेव्हा केवळ तांत्रिकच नव्हे, तर नैतिक आणि सामाजिक स्तरावरही अनेक गंभीर प्रश्न उभे राहू शकतात. रोबोंमध्ये ‘प्रतिक्षिप्त क्रिया’ निर्माण करणे हे सुरक्षेच्या द़ृष्टीने स्वागतार्ह असले, तरी यामुळे रोबो अधिक स्वायत्त होत आहेत. आजवर ते केवळ मानवाने दिलेल्या आज्ञांचे पालन करणारी यंत्रे होती; मात्र जेव्हा त्यांना स्वतःला होणार्‍या वेदना समजू लागतील, तेव्हा त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा ‘स्वसंरक्षण’ भाव निर्माण होईल. संशोधकांच्या मते, रोबोला स्वतःच्या अस्तित्वाची आणि त्याला होणार्‍या इजांची जाणीव झाली, तर भविष्यात तो स्वतःचा बचाव करण्यासाठी मानवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करू शकतो किंवा स्वतःला वाचवण्यासाठी मानवावरच उलट वार करू शकतो. दुसरे म्हणजे, इलेक्ट्रॉनिक त्वचा आणि त्यातील सेन्सर्स हे सर्वस्वी इंटरनेट आणि डेटावर आधारित आहेत. ही संवेदनांची यंत्रणा एखाद्या हॅकरच्या ताब्यात गेली, तर तो रोबोच्या संवेदनांमध्ये फेरफार करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या रोबोला सतत ‘कृत्रिम वेदना’ दिल्या गेल्या, तर तो संतापून हिंसा करू शकतो. संवेदनांची ही माहिती क्लाऊडवर साठवली जात असल्याने गोपनीयतेचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. रोबो घराघरात पोहोचल्यावर त्यांच्या प्रत्येक स्पर्शाची आणि संवादाची नोंद ठेवली जाईल, जी जाहिरात कंपन्या किंवा गुन्हेगारांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

ह्युमनॉइड रोबो अधिक मानवी दिसू लागल्याने आणि वागू लागल्याने मानवी नात्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. याला विज्ञानात ‘अनकॅनी व्हॅली’ म्हणतात. एखादे यंत्र जेव्हा माणसासारखे दिसते; पण पूर्णपणे माणूस नसते, तेव्हा माणसाच्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण होते. तसेच रोबो मानवापेक्षा अधिक हळवे किंवा संवेदनशील वाटू लागले, तर लोक मानवी नात्यांपेक्षा यंत्रांशी अधिक भावनिकरीत्या जोडले जातील. यामुळे समाजात एकाकीपणा आणि सामाजिक विरक्ती वाढण्याचा धोका आहे. प्रगत रोबोंच्या निर्मितीमुळे केवळ श्रमाधारीतच नव्हे, तर कौशल्याधिष्ठित नोकर्‍यांवरही गदा येत चालली आहे. अशा काळात संवेदना असणारे रोबो अवतरल्यास नर्सिंग, केअरटेकिंग आणि शिक्षण क्षेत्रात ते मानवाची जागा घेऊ शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होऊ शकते. शिवाय हे महागडे तंत्रज्ञान केवळ श्रीमंत देशांकडे किंवा भांडवलदारांकडे असल्याने आर्थिक विषमता अधिक तीव्र होण्याची भीती आहे. परिणामी, भविष्यात ज्यांच्याकडे प्रगत रोबो असतील, तेच भविष्यातील सत्तेचे केंद्र बनण्याचा धोकाही आहे. विज्ञानाचा कोणताही शोध हा सुरुवातीला मानवाच्या कल्याणासाठीच असतो; मात्र त्याचा अतिवापर किंवा चुकीच्या दिशेने झालेली प्रगती विनाशाकडे नेणारी ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news