

ब्रिगेडियर हेमंत महाजन
जगभरामध्ये वाढत चाललेल्या अस्थिरतेमध्ये अलीकडेच थायलंड आणि कम्बोडिया या आसियान सदस्य देशांमध्ये उफाळून आलेल्या संघर्षाने नवी भर पडली होती. अनेक दिवसांपासून शिव मंदिराच्या वादावरून थायलंडसोबत संघर्ष सुरू होता. परंतु कम्बोडियाच्या पंतप्रधानांनी शस्त्रसंधी जाहीर केली आहे. ही घोषणा करताना त्यांनी जो आशावाद व्यक्त केला, त्यामागे दीर्घ संघर्षाचा इतिहास आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे गुंतागुंतीचे धागेदोरे आहेत.
एकविसावे शतक हे आधुनिक तंत्रज्ञानाचे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणून जसे ओळखले जाईल, तसेच ते राष्ट्राराष्ट्रांमध्ये वाढत चाललेल्या संघर्षाचे म्हणूनही ओळखले जाणार आहे. विशेषतः गेल्या 5-7 वर्षांमध्ये राष्ट्रांची आक्रमकता वाढत चालल्याचे अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. सध्या रशिया-युक्रेन, हमास-इस्रायल यांच्या संघर्षाने जगाची पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना अलीकडेच थायलंड आणि कम्बोडियातील द्वंद्वामुळे जागतिक शांतता प्रस्थापित होण्याच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा धक्का बसला होता. थायलंड आणि कम्बोडिया यांच्या सीमेवर उद्भवलेल्या संघर्षाने जगाचे लक्ष वेधून घेतले. दोन्ही देशांत सत्ताधार्यांची नवीन पिढी विराजमान होत असताना एक फोन कॉल सार्वजनिक केल्याने तणाव निर्माण झाला. यातही सीमेवरील मंदिर परिसराच्या वादाने आगीत तेल ओतले गेले.
‘आसियान’ या शक्तिशाली आर्थिक संघटनेमधील दोन सदस्य देश थायलंड आणि कम्बोडिया यांच्यात आठवडाभरापासून तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांतील 95 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या बौद्ध समुदायातील आहे. दोघांचे हित एकच आहे. तरीही उभय देशांच्या सीमेवर सातत्याने गोळीबार सुरू झाल्याने 30 हून अधिक जणांचे जीव गेले. त्यात 21 सर्वसामान्य नागरिक आणि उर्वरित सैनिकांचा समावेश आहे. सध्या आसियान संघटनेचे अध्यक्षपद भूषविणार्या मलेशियाने पुढाकार घेत दोन्ही देशांतील पंतप्रधानपदादरम्यान शस्त्रसंधीसाठी प्रारंभिक पातळीवरची चर्चा घडवून आणली आणि ती तूर्त तरी सफल झाल्याचे दिसत असले, तरी चिरकाळासाठी ती कितपत उपयुक्त राहील, हे आगामी काळच सांगू शकेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीचे श्रेय घेताना म्हटले, की दोन्ही देशाच्या पंतप्रधानांशी शस्त्रसंधीसंदर्भात फोनवरील चर्चा संपण्याच्या आतच दोघांनी शस्त्रसंधीवर सहमती दर्शविल्याचे निवेदन जारी केले. ट्रम्प यांच्या मते, शस्त्रसंधी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यापार थांबविण्यासंदर्भात दिलेली धमकी होय. प्रत्यक्षात या दोन्ही पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती; पण त्याच्या दुसर्या दिवशीही प्रचंड बॉम्बवर्षाव सुरू होता. यापूर्वी ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान तसेच इराण-इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबविल्याचे श्रेयदेखील स्वत:कडे घेत जागतिक शांततेचे आपण पुरस्कर्ते असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघर्षात सहभागी पक्षांनी या दाव्याला दुजोरा दिलेला असो किंवा नसो, ट्रम्प मात्र सतत या भूमिकांचा पुनरुच्चार करत आहेत. पण मूळ मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा आहे तो या दोन देशांमध्ये अचानक संघर्ष उफाळून येण्यामागचे कारण काय?
थायलंड आणि कम्बोडिया यांच्यातील सीमावादाची मुळे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात खिळलेली आहेत. जेव्हा फ्रेंच साम्राज्य कम्बोडियावर ताबा मिळवत होते, तेव्हा त्यांनी तत्कालीन भूगोलानुसार सीमारेषांचे नकाशे तयार केले. परंतु, या नकाशांमध्ये अनेक ठिकाणी स्पष्टता नव्हती. विशेषतः जंगल भागात जिथे प्रेअ विहेअर नावाचे 11व्या शतकातील प्राचीन मंदिर वसलेले आहे त्याबाबत संदिग्धता होती. 1962 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हे मंदिर कम्बोडियाच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट करत एक निर्णय दिला. मात्र, मंदिराच्या सभोवतालचा भूभाग कोणत्या देशाच्या अखत्यारीत आहे, यावर सुस्पष्टता नव्हती. 2008 साली जेव्हा कम्बोडियाने या मंदिराला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्ज केला, तेव्हा थायलंडमध्ये संताप उसळला. ही नोंदणी म्हणजे या भूभागावर कम्बोडियाचा दावा अधिकृतरीत्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे राष्ट्रीय अस्मिता आणि भूमीवरचा दावा या दोन्ही गोष्टी एकवटल्या आणि तेथूनच संघर्षाची नांदी झाली. या संघर्षाचा सर्वात मोठा बळी ठरतो तो म्हणजे सीमारेषेवर राहणारा सामान्य नागरिक. 2011 मधील संघर्षात 15 लोक मृत्युमुखी पडले होते आणि हजारो लोकांना आपले गाव सोडून आश्रयशिबिरांत राहावे लागले होते. मंदिराच्या आसपासची गावे, तेथील शाळा, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था सगळे काही एकदम ठप्प होते. मुलांचे शिक्षण खंडित झाले. शेतकर्यांची जमिनी राखीव क्षेत्र म्हणून घेतली गेली.
वास्तविक पाहता, या दोन्ही देशांत दोन घराण्यांचे राज्य आहे. थायलंड (जुने नाव सियाम) आणि कम्बोडिया (जुने नाव कंबोज) यांच्यावर शासन करणार्या राज्यकर्त्यांत पूर्वापार संघर्ष चालत आला आहे. त्याचवेळी लोकशाही पातळीवर दोन्ही देशांमध्ये पंतप्रधानपदीदेखील तीस ते चाळीस वर्षांपासून वंशपरांपरगत व्यक्ती विराजमान होत आले आहेत. विशेष म्हणजे उभय देशांत बहुतांश वेळा मित्रत्वाच्या संबंधावरच चर्चा राहिेलेली आहे. थायलंडच्या लोकशाही राजकारणावर गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून ताक्सिन शिनवात्र नावाच्या एका श्रीमंत राजकीय नेत्याचा दबदबा आहे. अधूनमधून जेव्हा विरोधाचे स्वर तीव्र होतात, तेव्हा त्यांना गादी सोडावी लागते. परंतु, ते पुन्हा पदावर बसतात. यावेळी 2023 मध्ये त्यांची वापसी झाली आणि त्यांनी नवीन डाव खेळत कन्या पैतोगतार्न शिनावात्रासाठी देशाचे पंतप्रधानपद पुढे केले. दुसरीकडे कम्बोडियातील कम्युनिस्ट क्रांतीचा खेळ संपल्यानंतर चार दशकांपासून हुन सेन नावाचे गृहस्थ पंतप्रधानपद सांभाळत आहेत. आता त्यांनी सत्ता कायम ठेवण्याच्या दृष्टीने अलीकडेच आपला मुलगा हुन मानेत यांना पंतप्रधानपदी बसविले.
यंदा या उभय देशांत वाद पेटण्याचे कारण सोशल मीडियावरची एक पोस्ट ठरली. हुन सेन यांनी थायलंडच्या पंतप्रधान पैतोगतार्न शिनावात्रा यांच्यासमवेत झालेल्या एक टेलिफोन कॉलचे विवरण जुलैच्या प्रारंभी काळात फेसबुक पेजवर पोस्ट केले. यात थायलंडची शासक त्यांना ‘अंकल’ म्हणताना दिसते आणि त्यांच्या देशांकडून कोणतीही समस्या असेल तर तुम्ही सांगा, काही क्षणात तो मुद्दा निकाली काढू, असे ती म्हणते. या संवादाची पोस्ट फेसबुकवर पोस्ट झाल्यानंतर थायलंडमध्ये खळबळ उडाली. थायलंडच्या माध्यमांनी या कॉलला एका देशद्रोहाप्रमाणे सादर केले. हे प्रकरण न्यायालयात गेले आणि त्यामुळे पंतप्रधान पैतोगतार्न शिनावात्रा यांना पंतप्रधानपदावरून तत्काळ हटविण्यात आले. ताक्सिन शिनावात्रा यांनी आपल्या मुलीचे दुर्दैव असल्याचे सांगत हुन सेन यांचा हा डाव असल्याचा आरोप केला.
थायलंडच्या मते, हुन सेन हे कम्बोडियात राष्ट्रवादी विचाराची लाट निर्माण करू इच्छित असून, या माध्यमातून ते आपल्या मुलासाठी सिंहासनाचा मार्ग सुकर करत आहेत. दुसरीकडे शिनावात्रा कुटुंबाला राष्ट्रवादी विचाराच्या आघाडीवर कमकुवत करून त्यांनी मार्गातील एक काटा काढला, असेही म्हटले जात आहे. यात सत्य असेल तर बाहेरून हा संघर्ष थांबविण्याचा कितीही प्रयत्न झाला, तरी तणाव कायम ठेवण्यासाठी कोणते ना कोणते मुद्दे उकरून काढले जातीलच. थायलंडची सैन्य शक्ती ही कम्बोडियाच्या तुलनेत अधिक आहे. परंतु शांततेसाठी एवढे पुरेसे नाही.
या प्रकरणात थायलंडची राजकीय समज कमी पडत असल्याने कम्बोडिया सीमेवर थायलंडच्या आक्रमतेला बळी पडत आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर जुन्या मंदिरांची संख्या अधिक आहे. ही मंदिरे पूर्वी शैव धर्माचे केंद्रे होती. नंतर त्यात महायानी बोधिसत्वांची प्रतिष्ठापना झाली आणि आता दोन्ही देशांत थेरवादी (हनियानी) परंपरा प्रचलित झाली आहे. साहजिकच त्यानंतर या मंदिराला एकप्रकारे पुरातत्त्वाचा भाग किंवा पर्यटनापुरतेच महत्त्व राहिल्याचे दिसून येते. थायलंड-कम्बोडिया यांच्या सीमेवर होणार्या गोळीबाराने प्रसात प्रीह व्येहारचे (प्रसाद प्रिय विहार) नुकसान झाल्यास ते केवळ कम्बोडियाचेच नाही तर जगाची हानी असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे दोन्ही देश अमेरिका, चीन आणि आसियान संघटनेत वेगवेगळ्या प्रकारे गुंतलेले आहेत. त्यामुळे हा वाद केवळ स्थानिक स्तरावर नाही तर भौगोलिक राजकारणातही एक ‘पॉवर पॉईंट’ बनतो.
ताजी शस्त्रसंधी कायमस्वरूपी राहील का? की हा केवळ एक अल्पकालीन राजकीय युक्तिवाद आहे, हे येणारा काळच ठरवेल. याचे कारण याआधीही अनेक वेळा शस्त्रसंधी जाहीर करण्यात आल्या, पण त्या फार काळ टिकल्या नाहीत. अर्थात यावेळी मात्र एका वेगळ्या पातळीवर चर्चा झाली आहे. मलेशियाच्या माध्यमातून एक नवा संवादाचा पर्याय समोर आला आहे. अनेक आशियाई देशांनी शांतता स्थापनेसाठी पाठबळ दिले आहे. त्यामुळे संकेत सकारात्मक आहेत. पण तरीही जर दोन्ही देशांनी सीमारेषेवर संयुक्त गस्त, सांस्कृतिक देवाणघेवाण, शैक्षणिक व व्यापार सहकार्य सुरू केले नाही, तर संघर्ष संपणार नाही.
थायलंड-कम्बोडिया सीमावाद आणि त्यावरील सध्याची शस्त्रसंधी ही भारतासारख्या देशासाठी अनेक अर्थांनी विचार करण्यासारखी आहे. आपल्याही सीमेवर अनेक शेजारी देशांशी जुनाट वाद आहेत. कधी सीमारेषा, कधी नद्या, तर कधी धार्मिक स्थळे संघर्षाची कारणे अनेक असतात. त्यातही सीमाभागातील नागरिकांचे जीवनमान, स्थलांतर, संरक्षण व्यवस्थेचा खर्च आणि समाजमाध्यमांवर उसळणारा राष्ट्रवाद हे सर्व घटक युद्धाचा धोका सतत वाढवतात. त्यामुळे आपणही या संघर्षातून धडा घेणे गरजेचे आहे.