Lake Conservation | विकासाच्या नावाखाली आपण तलावांना विसरलो का?

Lake Conservation |
Lake Conservation | विकासाच्या नावाखाली आपण तलावांना विसरलो का?
Published on: 
Updated on: 

डॉ. मंगेश कश्यप

एकेकाळी भारतीय शहरांची ओळख त्यांच्या मंदिरांइतकीच त्यांच्या तलावांमुळेही होती. गावाच्या मध्यभागी असलेला तलाव, त्याला जोडलेले पावसाचे नैसर्गिक प्रवाह, सभोवतालची झाडे आणि त्यावर अवलंबून असलेले स्थानिक जीवन हे भारतीय वस्ती नियोजनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. तलाव केवळ पाणी साठविण्याचे साधन नव्हते, तर ते भूजल पुनर्भरण, शेती, पशुपालन, जैवविविधता आणि सामाजिक जीवनाचे केंद्र होते. मात्र आधुनिक विकासाच्या वेगात आपण या पारंपरिक जलव्यवस्थेचे महत्त्व हळूहळू विसरत गेलो आहोत.

आज शहरांचा विस्तार होत असताना तलावांच्या जागी निवासी संकुले, व्यावसायिक इमारती, रस्ते आणि इतर बांधकामे उभी राहात आहेत. नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडवले जात आहेत, तलावांमध्ये सांडपाणी सोडले जात आहे आणि अनेक जलसाठे कचऱ्याचे ठिकाण बनत आहेत. काही ठिकाणी तलावांचे अस्तित्व नष्ट झाले आहे, तर काही ठिकाणी त्यांचे क्षेत्रफळ आणि पाणी साठविण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. विडंबना अशी की, पावसाळ्यात शहरे पाण्याखाली जातात आणि उन्हाळ्यात त्याच शहरांना पाण्याची टंचाई जाणवते. या दोन्ही समस्यांच्या मुळाशी अनेकदा विस्मृतीत गेलेली तलावव्यवस्था असते.

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पहिल्या जलस्रोत गणनेनुसार देशात एकूण २४,२४,५४० जलस्रोतांची नोंद झाली आहे. त्यापैकी ६९,४८५ जलस्रोत शहरी भागात आहेत. या गणनेत शहरी भागातील १,७६० जलस्रोतांवर अतिक्रमण झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात ७१९ शहरी जलस्रोतांची नोंद करण्यात आली आहे. ही गणना २०१७-१८ या संदर्भवर्षावर आधारित आहे. त्यामुळे हे आकडे आजच्या प्रत्यक्ष स्थितीचे मोजमाप नसले, तरी शहरी जलसंपत्तीची व्याप्ती आणि तिच्यासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत.

तलावांचे महत्त्व समजून घेताना त्यांना केवळ जलसाठे म्हणून पाहणे पुरेसे नाही. प्रत्येक तलाव हा एका स्वतंत्र परिसंस्थेचा भाग असतो. त्यामध्ये जलचर, पक्षी, सूक्ष्मजीव, वनस्पती आणि आसपासची जैवविविधता यांचे परस्परावलंबी नाते असते. तलाव पावसाचे अतिरिक्त पाणी सामावून घेतात, भूजल पातळी टिकविण्यास मदत करतात आणि शहरातील तापमान नियंत्रित करण्यासाठीही योगदान देतात. पाणथळ जागा नैसर्गिक पद्धतीने काही प्रदूषक गाळून पाण्याच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम करू शकतात. त्यामुळे तलाव नष्ट होणे म्हणजे केवळ पाण्याचा साठा कमी होणे नव्हे, तर संपूर्ण पर्यावरणीय संतुलन धोक्यात येणे होय.

या समस्येची दखल घेऊन केंद्र सरकारने ‘AMRUT 2.0’ अभियानांतर्गत शहरी जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनाला महत्त्व दिले आहे. तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०२४ मध्ये National Plan for Conservation of Aquatic Ecosystems (NPCA) साठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये तलाव आणि पाणथळ परिसंस्थांचे वैज्ञानिक व्यवस्थापन, जैवविविधता संरक्षण आणि स्थानिक परिस्थितीनुसार एकात्मिक व्यवस्थापन आराखडे तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र तलाव पुनरुज्जीवन करताना एक महत्त्वाची चूक टाळणे आवश्यक आहे. अनेकदा तलावाचा गाळ काढणे, काठावर संरक्षक भिंती बांधणे, विद्युत रोषणाई करणे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे यांनाच पुनरुज्जीवन समजले जाते. प्रत्यक्षात तलावाला पाणी कुठून येते, त्याचे नैसर्गिक जलग्रहण क्षेत्र किती आहे, पावसाचे प्रवाह तलावापर्यंत पोहोचतात का, भूजलाशी त्याचा संबंध कसा आहे आणि त्यात कोणत्या प्रकारचे प्रदूषण मिसळते, या प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय पुनरुज्जीवन टिकाऊ होऊ शकत नाही. तलावाच्या सभोवतालच्या संपूर्ण जलग्रहण क्षेत्राचे संरक्षण करणे तितकेच आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर यांसारख्या शहरांसाठी हा विचार विशेष महत्त्वाचा आहे. शहरांच्या विस्तारात समाविष्ट झालेल्या जुन्या गावांमधील तलाव, बारव, विहिरी आणि पारंपरिक जलसाठ्यांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद शहर विकास आराखड्यात करणे आवश्यक आहे. प्रत्येक तलावाचे भौगोलिक क्षेत्र, पाणी साठविण्याची क्षमता, जलग्रहण क्षेत्र, पाण्याची गुणवत्ता आणि जैवविविधता यांची माहिती जीआयएस तंत्रज्ञानाच्या मदतीने उपलब्ध करून देता येईल. त्याचबरोबर स्थानिक नागरिक, पर्यावरणतज्ज्ञ, जलतज्ज्ञ आणि महानगरपालिका यांचा सहभाग असलेली तलाव व्यवस्थापन समिती स्थापन करणेही गरजेचे आहे.

यासाठी तलावांकडे केवळ सरकारी मालमत्ता म्हणून नव्हे, तर सामुदायिक नैसर्गिक संपत्ती म्हणून पाहण्याची मानसिकता विकसित करावी लागेल. तलावांचे संरक्षण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही. स्थानिक नागरिकांनीही कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे आणि जलस्रोतांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करणे याविरोधात सजग राहिले पाहिजे. शेवटी विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष निर्माण करण्याची गरज नाही. योग्य नियोजन केले, तर तलावांचे संरक्षण हे शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकासाला हातभार लावू शकते. भविष्यातील शहरांना अधिक पाणी मिळविण्यासाठी दूरवरच्या धरणांवर अवलंबून राहण्याबरोबरच स्वतःच्या स्थानिक जलसंपत्तीचे पुनरुज्जीवन करण्याचीही गरज आहे. कारण एखाद्या शहराची खरी प्रगती त्याने किती तलावांच्या जागी इमारती उभ्या केल्या यावर नव्हे, तर विकास करताना किती तलाव जिवंत ठेवले यावर मोजली गेली पाहिजे. तलाव वाचविणे म्हणजे शहराच्या पाण्याचे भविष्य, पर्यावरणाचे आरोग्य आणि पुढील पिढ्यांचा नैसर्गिक वारसा सुरक्षित ठेवणे होय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.