

महेश कोळी, संगणक अभियंता
केंद्र सरकारने सुरू केलेले ‘ज्ञान भारतम् मिशन’ हे भारताच्या विशाल हस्तलिखित वारशाचे जतन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठीचा एक राष्ट्रीय उपक्रम असून तो आपल्या समृद्धशाली परंपरेला नवे आयाम देणारा आहे. ‘ज्ञान भारतम्’ पोर्टल ही योजना भारताच्या बौद्धिक वारशाचे पुनरुज्जीवन आहे. हा उपक्रम भारताला पुन्हा एकदा जागतिक पातळीवर ज्ञानगुरू म्हणून ओळख मिळवून देईल.
भारताला विश्वगुरू म्हणण्यामागे केवळ सांस्कृतिक वैभव किंवा आध्यात्मिक परंपरेचा गौरव नव्हता, तर ज्ञान व विज्ञानाच्या अनन्यसाधारण योगदानाची ठोस पायाभूत कारणे होती. वेद, उपनिषदे, स्मृतिग्रंथ, आरण्यके, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, ज्योतिष, संगीत आणि कलेशी संबंधित असंख्य ग्रंथांनी भारतीय संस्कृतीला जगात अद्वितीय स्थान दिले. या ज्ञान परंपरेची साक्ष देणारी साधने म्हणजेच पांडुलिपी.
आज भारताकडे जगातील सर्वांत मोठे पांडुलिपी संकलन आहे. अंदाजे एक कोटीहून अधिक पांडुलिपी विविध स्वरूपांत आणि ठिकाणी उपलब्ध आहेत; पण यातील मोठा भाग अजूनही असंघटित, असुरक्षित आणि संशोधकांच्या आवाक्याबाहेर आहे. काळ, हवामान, कीड, उपेक्षा आणि साधनसामग्रीच्या अभावामुळे या पांडुलिपी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने सुरू केलेली ‘ज्ञान भारतम्’ योजना आणि त्याअंतर्गत उभारण्यात आलेले ‘ज्ञान भारतम् पोर्टल’ हे भारतीय वारसा व ज्ञान परंपरेच्या जतनाच्या द़ृष्टीने ऐतिहासिक पाऊल ठरते. भारतीय पांडुलिपी म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथ नाहीत. आयुर्वेदातील चरक संहिता, गणितातील लीलावती, खगोलशास्त्रातील सिद्धांत शिरोमणी, राज्यशास्त्रातील अर्थशास्त्र, संगीतविषयक नाट्यशास्त्र, तसेच प्रादेशिक भाषांमधील साहित्यकृती, शिलालेख, ताडपत्री ग्रंथ यांचा या वारशात समावेश आहे. या पांडुलिपी केवळ भारताच्या ज्ञान परंपरेची ओळख नाही, तर मानवजातीच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा पुरावा आहेत. औषधशास्त्र, गणितीय सूत्रे, खगोल गणना, कृषी तंत्रे, सामाजिक व्यवस्था यांचे नोंदही या पांडुलिपींमध्ये आहे. अशा ज्ञानसंपदेचे संवर्धन म्हणजे केवळ सांस्कृतिक अभिमान नव्हे, तर आधुनिक समाजाला शाश्वत विकासाचे मार्गदर्शन आहे.
‘ज्ञान भारतम्’ ही केवळ संग्रहित करण्याची योजना नाही. ती एक त्रिसूत्री योजना आहे. यामध्ये पांडुलिपी कीड, आर्द्रता, हवामान किंवा मानवी उपेक्षेमुळे नष्ट होऊ नयेत, यासाठी तिचे शास्त्रीय पद्धतीने जतन करणे, पांडुलिपीचे उच्च-गुणवत्तेचे स्कॅनिंग करून त्यांना डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवणे आणि नागरिक, विद्यार्थी आणि संशोधकांना ऑनलाईन माध्यमातून या वारशाचा मुक्त वापर करता येणे या तीन प्रमुख उद्दिष्टांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मेटाडेटा मानके यांचा वापर केला जाणार आहे. शिवाय संरक्षण, कायदेशीर चौकट, सांस्कृतिक कूटनीती, लिपी विश्लेषण यांसाठी विशेष कार्यगट नियुक्त झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ज्ञान भारतम्’वरील परिषदेत भाषण करताना म्हटले आहे की, भारताची ज्ञान परंपरा संरक्षण, नवोन्मेष, संवर्धन आणि अनुकूलन या चार स्तंभांवर उभी आहे. इतिहासातील आघातांनी लाखो पांडुलिपी जळाल्या, नष्ट झाल्या, तरी जे काही उरले ते आजही आपल्या पूर्वजांच्या ज्ञाननिष्ठेचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या मते, हा प्रकल्प केवळ सरकारी किंवा शैक्षणिक उपक्रम नाही, तर भारताच्या संस्कृतीचे, साहित्याचे समृद्धशाली प्रतीक आहे. हा प्रकल्प भारताला पुन्हा ‘ज्ञानगुरू’ म्हणून जगापुढे नेईल.
भारतातील पांडुलिपीचे विखुरलेले स्वरूप विचारात घेतल्यास या योजनेची गरज स्पष्ट होते. मंदिरे, मठ, वाचनालये, विद्यापीठे आणि खासगी संग्रह यांत असंख्य पांडुलिपी आहेत. त्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक संसाधनांचा अभाव आहे. परिणामी, अनेक ठिकाणी या पांडुलिपी धुळीत पडून नामशेष होत आहेत. संशोधक आणि विद्यार्थ्यांना या ग्रंथांचा अभ्यास करायचा झाल्यास त्यांना मूळ पांडुलिपी हाताळावी लागते; पण यामुळे त्या अधिक खराब होतात. डिजिटलीकरणामुळे हा धोका टळणार आहे. मूळ ग्रंथ सुरक्षित ठेवून त्याची डिजिटल प्रत जगभर उपलब्ध करून देणे हेच ‘ज्ञान भारतम्’चे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पांडुलिपीचा केंद्रिकृत डेटाबेस तयार होईल. भाषा, लिपी, साहित्य, लेखक, विषय, काळ, भौगोलिक क्षेत्र यांचा तपशीलवार नोंदवही तयार होईल. हे संशोधकांसाठी अमूल्य साधन ठरेल. इंटरनेटद्वारे देशातील आणि परदेशातील विद्यार्थी, संशोधक आणि सामान्य नागरिक यांना सहज प्रवेश मिळेल. यामुळे ज्ञानाचा प्रसार अधिक व्यापक होईल. या अभ्यासातून आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र, कला, वास्तू, कृषी, राज्यनीती, संगीत यांसारख्या क्षेत्रांत संशोधनाला नवी दिशा मिळेल. या ग्रंथांतील माहिती आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून नवे संशोधन मार्ग खुले होतील. या सर्वांतून जगात ज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात भारताची भूमिका पुन्हा अधोरेखित होईल. सांस्कृतिक कूटनीतीतही या उपक्रमाचा उपयोग होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारताला ज्ञानगुरू म्हणून जागतिक मंचावर पुनः प्रतिष्ठा मिळेल.
बहुविध लाभ असले, तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर पांडुलिपींचे संकलन आणि डिजिटलीकरण करताना अनेक अडचणी येणार आहेत. संस्कृत, पाली, प्राकृत, तमिळ, अरबी, फारसी अशा विविध भाषांतील पांडुलिपीचे अनुवाद व संगणकीकरण कठीण आहे. जुन्या लिपी ओळखणे आणि डिजिटली वाचनीय बनवणे आव्हानात्मक आहे. अनेक पांडुलिपी इतक्या जुजबी अवस्थेत आहेत की, त्यांना हाताळणेही धोक्याचे ठरते. त्यांचे आधी संरक्षण करून नंतर डिजिटलीकरण करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेदरम्यान तंत्रज्ञान, मनुष्यबळ, निधी आणि वेळ या सर्वांचा प्रचंड वापर होणार आहे. त्याद़ृष्टीने सातत्याने गुंतवणूक करावी लागेल. तसेच खासगी संग्रहांतील पांडुलिप्या सरकारकडे आणताना मालकी हक्क आणि वापर हक्क यांवर वाद होऊ शकतात. यासाठी स्पष्ट कायदेशीर चौकट गरजेची आहे. या पांडुलिपी केवळ संशोधकांपुरत्या मर्यादित न ठेवता जनतेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी लोकप्रिय माध्यमांतून प्रसार महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थात, या आव्हानांवर योजनाबद्धरीत्या मार्ग काढला जाऊ शकतो; पण ‘ज्ञान भारतम्’ उपक्रमामुळे भारताची सांस्कृतिक व बौद्धिक कूटनीती मजबूत होईल. जगभरातील विद्यापीठे, संशोधन संस्था भारतीय पांडुलिपींवर आधारित अभ्यास व संशोधन करण्यास प्रवृत्त होतील. युरोप व अमेरिका येथे आधीच भारतीय ग्रंथांचा अभ्यास सुरू आहे; पण डिजिटलीकरणामुळे हा अभ्यास अधिक सोपा व पारदर्शक बनेल. आयुर्वेद, योग, भारतीय गणित व खगोलशास्त्र या क्षेत्रांत जागतिक पातळीवर वाढता रस लक्षात घेतल्यास हे पोर्टल भारताची भूमिका ज्ञान व नवोपक्रमाचा मार्गदर्शक म्हणून अधोरेखित करेल. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम. एआय, उच्च गुणवत्तेचे स्कॅनिंग, क्लाऊड स्टोरेज, मेटाडेटा मानके या आधुनिक साधनांचा वापर करून हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रंथांचा वारसा सुरक्षित केला जाणार आहे.