Gudi Padwa: मांगल्यदायी गुढीपाडव्याचा भावार्थ

चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा हा हिंदू मुहूर्तशास्त्रात वर्णिलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा सण प्रामुख्याने सृजनाचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून महत्त्वाचा मानला गेला आहे
Gudi Padwa
Gudi PadwaPudhari
Published on
Updated on
सुनील हिंगणे, अध्यात्म अभ्यासक

चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा हा हिंदू मुहूर्तशास्त्रात वर्णिलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा सण प्रामुख्याने सृजनाचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून महत्त्वाचा मानला गेला आहे. लंकाधिपती रावणाचा वध करून परतलेल्या लाडक्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्यावासीयांनी गुढी उभारल्याचा संदर्भ पौराणिक कथांमध्ये आढळतो.

वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच सृष्टी नवचैतन्याने न्हाऊन निघते. कोकिळेचे मंजूळ कूजन आणि आम्रवृक्षांना आलेला मोहोर मनाला प्रसन्न करतो. या चैतन्यमयी वातावरणात घरासमोर उभारलेली उंच गुढी समृद्ध संस्कृतीची साक्ष देऊन जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा हा हिंदू मुहूर्तशास्त्रात वर्णिलेल्या साडेतीन मुहुर्तांपैकी एक. संस्कृतीचे जतन आणि विजयाचे प्रतीक असणारा गुढीपाडवा अनादी काळापासून साजरा होत आला आहे. महाराष्ट्राच्या मातीत या सणाला विशेष स्थान आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून घराघरांच्या प्रवेशद्वारी किंवा गॅलरीत सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारण्याची परंपरा आहे. यासाठी एक उंच बांबूची काठी घेऊन तिला उष्णोदक स्नान घातले जाते. त्यावर भरजरी रेशमी वस्त्र (साडी किंवा खण) बांधले जाते. त्यावर कडुनिंबाची पाने, आंब्याची डहाळी आणि फुलांचा हार अर्पण केला जातो. काठीच्या टोकावर चांदीचा तांब्या किंवा धातूचा कलश उपडा ठेवला जातो. यानंतर गंध, अक्षता, फुले आणि हळद-कुंकू वाहून तिची षोडशोपचार पूजा केली जाते. त्यानंतर निरांजन ओवाळून आणि गुळाचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून नवीन वर्ष कल्याणकारी जावे, यासाठी प्रार्थना केली जाते. ही प्रार्थना केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात होते, अशी धारणा आहे.

गुढीपाडव्याच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. ब्रह्मपुराणानुसार, याच दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली आणि कालगणनेला सुरुवात झाली, असे मानले जाते. म्हणूनच याला सृष्टीनिर्मितीचा दिन असेही म्हटले जाते. या दिवशी गुढी उभारताना तिला ब्रह्मध्वज म्हणून पूजा केली जाते. ‌‘ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद| प्राप्तेऽस्मिन्‌‍ वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु॥‌’ हा मंत्र म्हणून ब्रह्मदेवांकडे मांगल्यदायी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते.

रामायणातील संदर्भांनुसार, प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि लंकापती रावणाचा वध करून अयोध्येला परतले, तो हाच दिवस होता. अयोध्येतील प्रजेने आपल्या लाडक्या रामरायाच्या आगमनाप्रीत्यर्थ विजयाची गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला होता. ही गुढी ‌‘विजयध्वज‌’ म्हणून ओळखली जाते. गुढी उभारण्यामागे घरामध्ये सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा यावी, असा उदात्त हेतू असतो.

या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, कडुनिंबाच्या पानांचे सेवन. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने, जिरे, हिंग, गूळ आणि मीठ यांचे मिश्रण करून त्याचे प्राशन केले जाते. रूपकार्थाने हे मिश्रण जीवनातील सुख-दुःखाच्या समतोलाचे प्रतीक मानले जाते; पण आयुर्वेदानुसार, चैत्राच्या दिवसांत कडुनिंबाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ऋतूबदलाच्या काळात शरीराला व्याधींपासून वाचवण्यासाठीची एक प्राचीन आरोग्यदायी परंपरा म्हणून याला एक वेगळे महत्त्व आहे.

भारतीय परंपरेतील सणांमध्ये मिष्टान्न भोजनाला एक वेगळे स्थान आहे. यानिमित्ताने गोडाधोडाचे पदार्थ खाऊन आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली गेली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रीयन घरांमध्ये पुरणपोळीचा बेत आवर्जून केला जातो. सोबतीला कटाची आमटी केली जाते. याशिवाय श्रीखंड-पुरी, बटाट्याची भाजी, मसाले भात आणि बासुंदी यांसारख्या पदार्थांची रेलचेल असते. दक्षिण भारतात याच दिवशी ‌‘पचडी‌’ नावाचा विशेष पदार्थ बनवला जातो, जो आंबट, गोड आणि कडू अशा विविध चवींचे मिश्रण असतो.

गुढीपाडवा हा सण कृषी संस्कृतीशीदेखील निगडीत आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि मोहरी यांसारख्या पिकांची काढणी या काळात पूर्ण होते. शेतकरी आपल्या कष्टाचे फळ मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीमध्ये जे बदल होतात, त्याचे प्रतिबिंब या उत्सवात उमटलेले दिसते.

भारतात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात याला ‌‘युगादी‌’ म्हणतात, तर सिंधी समाजात ‌‘चेटीचंड‌’ म्हणून हा दिवस साजरा केला जातो. काश्मीरमध्ये ‌‘नवरह‌’ आणि पंजाबमध्ये ‌‘बैसाखी‌’ या स्वरूपात नवीन वर्षाचे स्वागत होते. नावे वेगळी असली, तरी त्यामागील भावना आणि आनंद एकच असतो.

गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. यंदाच्या गुढीपाडव्यापासून शालिवाहन शके 1948 प्रारंभ होत आहे. पैठणचे राजा शालिवाहन यांनी अत्यंत पराक्रमाने शकांचा पराभव केला होता. असे म्हटले जाते की, शालिवाहन राजाकडे सुरुवातीला मोठे सैन्य नव्हते; परंतु त्यांनी मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार करून त्यात प्राण फुंकले आणि त्यांच्या मदतीने बलाढ्य शक सैन्याचा पराभव केला. या अभूतपूर्व विजयामुळे जनसामान्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आणि त्या दिवसापासूनच ‌‘शालिवाहन शक‌’ ही नवीन कालगणना सुरू झाली. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी आपापल्या घरांवर विजयाची प्रतीके उभारली. आजही महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक भागांत शालिवाहन कालगणना अधिकृतरीत्या पाळली जाते. सामान्य जनतेच्या प्रबळ इच्छाशक्तीचे आणि अन्यायाविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून याकडे पाहिले जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन पंचांगाची पूजा केली जाते आणि त्याचे श्रवण केले जाते. पंचांग हे केवळ काळाचे मोजमाप नसून ते ग्रहांच्या स्थितीचे आणि निसर्गातील बदलांचे मार्गदर्शक मानले जाते. पंचांग श्रवणामध्ये प्रामुख्याने तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच गोष्टींचे वाचन केले जाते. या पाच अंगांमुळेच याला ‌‘पंचांग‌’ असे म्हटले जाते. नवीन वर्षाचे नाव (संवत्सर), वर्षाचा राजा, मंत्री, पावसाचे प्रमाण, धान्याची स्थिती आणि राशिभविष्य यांविषयी माहिती दिली जाते. पंचांग श्रवणाचे धार्मिक महत्त्व सांगताना असे म्हटले जाते की, यामुळे दुष्ट स्वप्नांचे निवारण होते, गंगा स्नानाचे पुण्य मिळते आणि आयुर्मान वाढते. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले, तर यामुळे येणाऱ्या काळातील नैसर्गिक बदलांची आणि सण-उत्सवांची पूर्वकल्पना मिळते. विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या समाजात पावसाचा अंदाज आणि पिकांची स्थिती जाणून घेण्यासाठी पंचांग श्रवण हे अत्यंत उपयुक्त ठरते. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे हवामान अंदाजांची अचूकता वाढत आहे; पण पंचांगांमध्ये वर्षभराच्या हवामानाविषयी, पाऊसमानाविषयी माहिती दिली जाते आणि आजवरचा इतिहास पाहिला असता हे अंदाज बहुतेकदा तंतोतंत खरे ठरले आहेत.

आजच्या धकाधकीच्या जीवनातही गुढीपाडव्याचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. शहरांमध्ये आता शोभायात्रांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. पारंपरिक वेशभूषेत, लेझमीच्या तालावर आणि ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या या यात्रा संस्कृतीचे दर्शन घडवतात. तरुण पिढीदेखील मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी होत आहे. नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी, नवीन उद्योगाची सुरुवात करण्यासाठी किंवा गृहप्रवेशासाठी हा एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. अनेक व्यापारी आपले जुने हिशेब पूर्ण करून या दिवशी नवीन वह्यांची पूजा करतात.

आज मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. अमेरिका, युरोप असो वा ऑस्ट्रेलिया, तिथले मराठी बांधव मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा साजरा करतात. परदेशात आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत छोटीशी गुढी उभारून ते आपल्या संस्कृतीचे जतन करतात. तंत्रज्ञानामुळे आता अंतरे कमी झाली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाणघेवाण होते आणि व्हिडीओ कॉलद्वारे परदेशात असलेले नातेवाईक घरच्या पूजेत सहभागी होतात.

एकंदरीतच, हा सण आपल्याला भूतकाळातील विजयाची आठवण करून देतो आणि भविष्यकाळातील प्रगतीसाठी नवी उमेद देतो. कडू आणि गोड अशा दोन्ही अनुभवांना सोबत घेऊन जीवनाची वाटचाल आनंदाने कशी करावी, ही शिकवण देणारा हा सण आहे. मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्याचा हा दिवस आहे. झाडाला फुटणाऱ्या नव्या पालवीप्रमाणेच मानवी मनही नवसकारात्मक विचारांनी आणि आकांक्षांनी बहरून जावे, हा यामागचा उद्देश आहे. तणावग्रस्त बनत चाललेल्या जीवनात तणावमुक्त राहून कुटुंबासोबत आनंदाने राहण्याचे महत्त्व हा सण अधोरेखित करतो. उंच उभारलेली गुढी आपल्याला ध्येयाकडे पाहण्याची आणि प्रगतीची शिखरे सर करण्याची प्रेरणा देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news