

चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू सुरू होतो. वसंत ऋतू म्हणजे झाडांना नवी पालवी फुटते, मोहोर येतो. एका अर्थाने सृष्टीतल्या नवसर्जनाचा हा काळ असतो. नवसर्जनाचा काळ असल्यामुळे त्याला वर्षारंभ असं म्हटलं जातं. एका अर्थाने तो नवजीवनाचा प्रारंभ असतो. आज (दि. 30 मार्च) गुढीपाडवा. त्यानिमित्ताने...
चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा म्हणून आपण भारतातली काही मंडळी या दिवशी वर्षारंभ साजरा करत असतो. सर्वसामान्यपणे असा समज आहे की, गुढीपाडव्यापासून सर्व भारतीयांचं नववर्ष सुरू होतं. पण हा गैरसमज आहे. महाराष्ट्रातल्या फक्त काही भागांमध्ये शालिवाहन शक किंवा गुढीपाडवा हा नववर्षारंभ म्हणून मानला जातो. महाराष्ट्रामध्येसुद्धा सगळीकडे नाही.
शालिवाहन शकाचा आरंभ कसा झाला असावा याच्याबद्दल दोन-चार कथा पुराणांमध्ये किंवा इतिहासामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी एक कथा अशी आहे किंवा समज असा आहे की, शालिवाहन नावाचं एक घराणं होतं. ते फार पराक्रमी होतं आणि त्याच्यातला एक राजा दिग्विजयी होता आणि त्यांनी हा शक सुरू केला. शक म्हणजे स्वत:च्या नावाने स्वतंत्र कालगणना सुरू करणं. त्यामुळे त्या शालिवाहनाने हा शक सुरू केला आणि ती कालगणना सुरू केली. तेव्हापासून चैत्र प्रतिपदेपासून नवीन वर्ष मानायला सुरुवात झाली. दुसरी अशी समजूत आहे की, पुराणांमध्ये अशी नोंदवलेली आहे की, शालिवाहन नावाचा एक कुंभारपुत्र होता. त्या कुंभारपुत्राने मातीचे सैन्य बनवलेलं होतं. आणि शक नावाचे आक्रमक लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्या मातीच्या सैन्यामध्ये कुंभारपुत्राने प्राण फुंकले आणि ते सैन्य सजीव झालं. त्यांनी शकांचा पराभव केला. तेव्हापासून शालिवाहन हा जो कुंभारपुत्र होता, त्याच्या नावाने शक सुरू झाला म्हणून त्याला शालिवाहन शक असं म्हणतात.
जगाच्या पाठीवर कालगणना करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी की, महिना किंवा वर्ष सुरू कसं करायचं याच्या निसर्गत: दोन पद्धती आहेत. एक चंद्राच्या उदयास्तावरून कालगणना केली जाते. त्याला चांद्र कालगणना असं म्हटलं जातं. दुसरी सूर्याच्या उदयास्तावरून कालगणना सुरू केली जाते. तिला सौरकालगणना असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये शालिवाहन शकाची कालगणना आहे ते दोन्हीचं मिश्रण आहे. म्हणजे महिना आपण चांद्रमासाप्रमाणे मानतो. चंद्राच्या उदयास्तानुसार मानतो म्हणजे चंद्राच्या उदयास्तानुसार आपण दिवस मानतो. पंधरा पंधरा दिवसाचे दोन भाग करतो. त्याला आपण शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणतो. हे दोन पक्ष मिळून एक महिना बनतो. ही चांद्र कालगणना आपण करतो. परंतु वर्ष मोजत असताना त्याच्यामध्ये थोडीशी अडचण येते. कारण सौरवर्ष जे आहे त्यामध्ये सूर्याच्या गतीप्रमाणे कालगणना केली जाते. वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचं असतं. परंतु ही कालगणना करताना ती तीनशेसाठ दिवसांच्या आसपास भरते. त्यामुळे दर तीन वर्षांनी आपल्याकडे एक अधिक मास म्हणून अधिक महिना मानला जातो. त्याला मल मास असंही म्हटलं जातं. त्यामुळे ही कालगणना सौरगणनेच्या जवळ येते. चांद्र कालगणना आणि सौर कालगणना यातील समतोल अधिक मासाच्या निमित्ताने साधला जातो. हे जे गुढीपाडव्याचे वर्ष आहे, जे चैत्र प्रतिपदेपासून सुरू होते त्याला तिसरे एक महत्त्वाचे कारण आहे ते जास्त महत्त्वाचे आहे. कारण ते निसर्गाच्या ऋतुचक्राशी संबंधित आहे. जगाच्या पाठीवरच्या बहुतेक कालगणना यांचा ऋतुचक्राशी संबंध आहे. चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू सुरू होतो. वसंत ऋतू म्हणजे झाडांना नवी पालवी फुटते, मोहोर येतो. एका अर्थाने सृष्टीतल्या नवसर्जनाचा हा काळ असतो.
नवसर्जनाचा काळ असल्यामुळे त्याला वर्षारंभ असं म्हटलं जातं. एका अर्थाने तो नवजीवनाचा प्रारंभ असतो. हिवाळा संपलेला असतो, उन्हाळा सुरू होत असतो. यावेळी नवीन धान्य पेरण्याची वेळ येते. जमीन तापलेली असते. पावसाळ्याची प्रतीक्षा असते. त्यावेळेला शेतकरी नवीन बियांची टोकणी करतात. जमिनीची मशागत करतात. आणि सृष्टीच्या नवसर्जनाची तयारी यावेळेस सुरू होते. तोच काळ पशू-पक्ष्यांच्या विणीचा काळ असतो. प्राणीसृष्टीतल्या वंशसातत्य सुरू ठेवण्याच्याद़ृष्टीने हा काळ महत्त्वाचा असतो. माणसांमध्ये देखील विशेषत: उत्तर प्रदेशात, उत्तरेच्या सगळ्याच भागात गुजरात, सौराष्ट्र वगैरे भागात याला वसंतोत्सव असं म्हटलं जातं. रती-मदनाचा हा उत्सव मानला जातो. मदन हा कामदेव आहे. मानवी वंशसातत्यासाठी असलेल्या कामभावनेचा देव आहे आणि रती ही त्याची सखी आहे. रती आणि मदन एकत्र येऊन मानव वंशसातत्य टिकवण्याचा उत्सव म्हणून हा वसंतोत्सव मानला जातो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर हा व्हॅलेंटाईन पीरियड असतो. प्रेमिकांनी एकत्र येण्याचा आणि नवसर्जनाचा हा काळ आहे. एकीकडे सृष्टीमध्ये नवसर्जन होत असतं. वृक्षांमध्ये, पीकपाण्यामध्ये आणि दुसरीकडे जीवसृष्टीमध्येही नवसर्जनाची तयारी चाललेली असते. म्हणून अनेक ठिकाणी त्याला दोलोत्सव असंही म्हटलं जातं. विशेषत: गुजरातमध्ये. दोल म्हणजे पाळणा, झोपाळा. झोपाळ्यावर बसून तरुण-तरुणी गाणी म्हणतात. प्रेमिकांच्या क्रीडा चालतात. म्हणून त्याला दोलोत्सव असं म्हणतात. याला धार्मिक अधिष्ठान असं दिलं जातं की, चैत्र संपताना, चैत्र शुद्ध तृतीयेला देवीची उपासना काही घरांमध्ये होते. फक्त महाराष्ट्रात आणि दक्षिणेच्या काही भागात होते. उत्तरेकडे होत नाही. देव्हार्यामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती ठेवतात. तिची रोज पूजा करतात. बर्याच वेळेला छोट्याशा पाळण्यामध्ये ठेवून पूजा करतात. हळदी-कुंकू समारंभ करून शीतपेय, शीतपदार्थ, काकडी, टरबूज वगैरे देऊन आपल्या इष्ट मित्र-मैत्रिणींना बोलावून हा उत्सव साजरा केला जातो. याला महाराष्ट्रामध्ये हळदी-कुंकू सोहळा म्हणतात. शीतपदार्थ, शीतपेयाच्या ग्रहणाचा हा सोहळा. रसरंग असं त्याला छान नाव आहे. हळदी-कुंकू, रसरंग उत्सव केला जातो. अन्नपूर्णा हे त्यातलं महत्त्वाचं प्रतीक. पुन्हा नवीन अन्न निर्माण होणार म्हणून तिची उपासना करायची.
गुढीपाडव्याच्या दिवशी आनंद साजरा करायचा. त्याचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्याला गुढीपाडवा हे नाव ज्यामुळे पडलं, ते गुढी उभारणं. गुढी म्हणजे एका उंच काठीवर सुंदर जरीचं वस्त्र गुंडाळणं. त्यावर कलश पालथा घालणं हे सगळ्यांना माहिती आहे. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कडुलिंबाचा नवा पाला त्याला घातला जातो. त्याच्यावर पुष्पमाला घातली जाते. साखरेची माळ घातली जाते, जिला गाठी असं म्हटलं जातं. अशा या गुढ्या आपल्या घराच्या भागामध्ये सर्वांना दिसतात रस्त्यांवर उभारलेल्या. तो एक आनंदाचा आणि सौंदर्याचा भाग असतो. त्याच्यासाठी पुन्हा एक कथा सांगितली जाते. प्रभू रामचंद्र बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास संपवून परत आले तो दिवस त्यांच्या घरी परत येण्याचा, तो गुढीपाडव्याचा दिवस होता. आनंद साजरा करण्यासाठी गुढी उभारणं हे एक प्रतीक असते. यातही निरनिराळ्या अनेक कलांचा संगम होत असतो. म्हणजे ती गुढी सुंदर दिसावी यासाठी कलात्मकता दिसते. सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. स्त्री-पुरुष नवीन वस्त्र-अलंकार घालून नटतात. मिष्टान्न करतात. असा निरनिराळ्या कलांचाही तिथे संगम होतो. गाणी म्हणतात, क्रीडा करतात, मिरवणुका काढतात तो एक आनंदाचा भाग असतो. वाद्ये वाजवतात, सजावट करतात. हा हस्तकलेचा भाग असतो. अनेक चांगली मिष्टान्ने करतात. हा पाककलेचा भाग असतो. विविध प्रकारच्या कलांचा हा मेळावा असतो. तो घेऊन माणसांनी आनंद साजरा करावा. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यामधली कटुता नाहीशी व्हावी आणि माधुर्य निर्माण व्हावं ही अपेक्षा असते. त्यासाठी आणखी एक प्रथा आपल्याकडे आहे ती म्हणजे सकाळी कडुलिंबाचा पाला गूळ घालून वाटून खायचा. काही ठिकाणी त्याच्यात आणखी हिंग, जिरे पूड वगैरे घातली जाते. ते अर्थात शरीरशुद्धीसाठी असतं. आयुर्वेदाच्या द़ृष्टीने वर्षभर शरीर निरोगी राहावं यासाठी कडुलिंब उपयोगी आहे. उष्ण हवा सर्वत्र आलेली आहे. शरीर शीतल राहण्याच्यादृष्टीने हे खाण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.
कालगणना दरवर्षी कणाकणांनी बदलत असते आणि ते बदल सगळीकडे सारख्या प्रमाणात होतात असे नाही. म्हणून शेकडो वर्षांनी ऋतुपरत्वे त्याच्यात बदल होत असतात. कालगणना आणि ऋतुचक्र बदलतंय हे आपण आजही अनुभवतो आहोत. निसर्गामध्ये अनेक बदल होतायत. पूर्वीच्या काळात पाऊस सुरू व्हायचा त्यावेळेत आता उन्हाळा असतो असं काही काही होत असतं. तर हा संबंध निसर्गचक्राशी बांधलेला हा भाग आहे. गुढीपाडव्याचा हा जो उत्सव आहे, तो महाराष्ट्रामध्ये आहे. आपण गुजरात किंवा सौराष्ट्रात गेलो तर तिथे कार्तिकामध्ये नवीन वर्ष सुरू होतं. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला. का तर तिथे व्यापारी जमात अधिक आहे. व्यापारी जमात नवीन पावसाळा सुरू होतो तेव्हा वहीपूजन करून नवीन वर्षाची सुरुवात करते. तिथे गुढी नाही उभारत. गुढी केवळ महाराष्ट्रात उभारली जाते. त्यामुळे आपला हा जो काही समज आहे की, गुढीपाडवा सबंध भारतभर आणि सगळे हिंदू एका पद्धतीने करतात असं नाही. सगळीकडे निरनिराळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या वेळी नवीन वर्षारंभ होतो. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग एकच असतो तो म्हणजे इष्ट मित्र-मैत्रिणींनी, नातेवाईकांनी एकत्र यावं, मिष्टान्न भोजन करावं, मनातली कटुता नाहीशी करावी, निरनिराळ्या कलांचा आस्वाद घ्यावा, नवीन कलांची निर्मिती करावी आणि त्यातून जीवनातला आनंद घ्यावा आणि मला असं वाटतं, हे कायम टिकणारं आहे. पुराणकथा या माणसांनी आपल्या सोयीसाठी रचलेल्या असतात. ज्यांचा त्याच्यावर विश्वास आहे, त्यांनी जरूर त्याच्यावर लक्ष द्यावं. त्यासंदर्भात जी कर्मकांडं असतील ती करावीत. परंतु माणसांनी वैरभाव विसरून आनंदानं एकमेकांच्याबरोबर नांदावं आणि कलांची उपासना करत त्यातून आपला आनंद शोधावा हे कुठल्याही सणाचं उद्दिष्ट आहे. वर्ष प्रतिपदेचाही हाच महत्त्वाचा संदेश आहे.
(शब्दांकन ः मृणाल वष्ट )
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा जरी आपण वर्षारंभ मानत असलो, शालिवाहन शक म्हणत असलो तरी प्रत्यक्ष व्यवहारात आपण इंग्रजांनी चालू केलेलं पंचांगच वापरतो. आपल्या सर्व राष्ट्रीय व्यवहारांत, आर्थिक व्यवहारामध्ये ग्रेगरियन पंचांग ज्याला कॅलेंडर म्हणतात, तेच आपण इंग्रजी पद्धतीने वापरतो. जानेवारी ते डिसेंबर असं वर्ष असतं. आपलं आर्थिक वर्षही त्याचप्रमाणं मानलं जातं. नोकर्या-चाकर्या, जन्मतारखा, पेन्शन या सगळ्यासाठी बॅँका सर्व व्यवहारासाठी जवळजवळ जगभर हे ग्रेगरियन पंचांग म्हणजे पाश्चिमात्य पंचांगच आपण वापरतो. इंग्रजीत याला कॅलेंडर म्हणतात, मराठीमध्ये साधा शब्द पंचांग वापरला जातो. त्यामुळे आपण याही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की, जागतिक पातळीवर स्वीकारलं आहे ते आपणही स्वीकारलं पाहिजे. इसवी सन आणि शालिवाहन शक याच्यामध्ये अंतर आहे. इसवी सन आधी सुरू झालेलं आहे. शालिवाहन शक त्यानंतर 78 वर्षांनी सुरू झालेला आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी करत असताना जर शक लिहिलेलं असेल तर इसवी सन कसा काढायचा तर 78 त्यामध्ये मिळवायचे आणि 78 त्यातून वजा केले तर शक निघतो. दोन्हीत 78 चा फरक आहे. इसवी सन आधी सुरू झालेलं आहे. त्यानंतर 78 वर्षांनी शालिवाहन शक सुरू झालेले आहे. त्याच्यानंतर सहाशे वर्षांनी मुसलमानांचा हिजरी वर्षारंभ सुरू झालेलं आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर निरनिराळ्या पद्धतीनं कालगणना आहेत, याचं भान आपण ठेवलं तर अधिक सोयीचं होईल.