

जागतिक पातळीवर 2030 पर्यंत 17 कोटी नवीन कौशल्यप्राप्त रोजगारांची निर्मिती होईल आणि त्याचवेळी 9.2 कोटी पारंपरिक नोकर्या इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणजे 7.8 कोटी जादा नोकर्या तयार होतील, असे सध्याचे चित्र आहे. उच्च प्रतीचे तंत्रज्ञान, लोकसंख्येतील बदल, भू-आर्थिक तणाव आदी कारणांमुळे नवीन उच्च प्रशिक्षित कौशल्यप्राप्त नोकर्यांना चालना मिळेल आणि त्यामुळे जगभरातील उद्योग-व्यवसायांना एक नवे रूप मिळताना दिसून येईल.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (डब्ल्यूईएफ) आपल्या एका अहवालात भविष्यातील रोजगारासंबंधी काही मुद्दे मांडले आहेत. त्यानुसार, जागतिक पातळीवर 2030 पर्यंत 17 कोटी नवीन कौशल्यप्राप्त रोजगारांची निर्मिती होईल आणि त्याचवेळी 9.2 कोटी पारंपरिक नोकर्या इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणजे 7.8 कोटी जादा नोकर्या तयार होतील, असे चित्र आहे. उच्च प्रतीचे तंत्रज्ञान, लोकसंख्येतील बदल, भू-आर्थिक तणाव आणि आर्थिक तणाव आदी कारणांमुळे नवीन उच्च प्रशिक्षित कौशल्यप्राप्त नोकर्यांना चालना मिळेल आणि त्यामुळे जगभरातील उद्योग-व्यवसायांना एक नवे रूप मिळताना दिसून येईल. भारतातील कंपन्यांच्या मते, सेमीकंडक्टर आणि कम्प्युटिंग तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्याने त्यांच्या व्यवस्थापनात बदल होईल. जागतिक पातळीवर एआय कौशल्यप्राप्त तरुणांच्या मागणीत वाढ झाली आहे आणि त्यात भारत आणि अमेरिका आघाडीवर असल्याचे दिसून येते. अशावेळी रोजगारांच्या वाढत्या संधी पाहता त्यात एआय, बिग डेटा, मशिन लर्निंग, सायबर सुरक्षा व्यवस्थापन तज्ज्ञ यांचा समावेश करता येईल. या सर्व नोकर्या जागतिक ट्रेंडशी मेळ खाणार्या आहेत.
या पार्श्वभूमीवर भारत जगातील सर्वात मोठे कुशल मनुष्यबळ तयार करणार्या देशांत सामील झाला आहे. पुढील काळात भारत हा जगाच्या एकचतुर्थांश एवढ्या संख्येसह उच्च प्रशिक्षित मनुष्यबळाचे हब म्हणून नावारूपास येताना दिसू शकतो. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्यासमवेत पॅरिस येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषदेत सह अध्यक्षपद भूषविताना म्हटले की, एआयमुळे नोकर्या संकटात सापडल्याची भीती जगाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण, तंत्रज्ञानामुळे नोकर्यांवर गंडांतर येत नाही, तर त्याच्या स्वरूपात बदल होतो आणि नव्या प्रकारच्या नोकर्या अस्तित्वात येतात आणि हे आपण इतिहासातही पाहिले आहे. एआययुक्त भविष्यासाठी लोकांना प्रशिक्षण देत त्यांना नव्या पद्धतीने काम करण्यासाठी तयार करायला हवे.
भारताची नवीन पिढी डिजिटल युगात कौशल्य कामात योगदान वाढवत आहे. ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांच्या मते, एआयसाठी भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा बाजार आहे. गुगलचे सुंदर पिचाई यांच्या मते, भारत आगामी काळात एआयच्या क्षेत्रात नेतृत्व करू शकतो. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्या मते, भारतातील गणितात निपुण असलेल्या नव्या पिढीला एआयच्या क्षेत्रात विपुल संधी आहे. सध्या एकीकडे प्रतिभासंपन्न उच्च प्रशिक्षित नवीन पिढी देशाच्या विकासात मोठे योगदान देत आहे. भारतीय कौशल्यप्राप्त तरुण मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून जागतिक पातळीवर अभूतपूर्व योगदान देत आहेत. उच्च प्रतीची कौशल्यप्राप्त पिढी ही सेवा निर्यातीच्या माध्यमातून परकी चलन कमावणार्या मोठ्या आर्थिक शक्तीच्या रूपातून विकसित झाली आहे. तसेच, एआय क्षेत्राला उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ सहजपणे उपलब्ध होत असल्याने भारतात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरची (जीसीसी) वेगाने स्थापना करत असून, त्यामुळे सेवा निर्यात वेगाने वाढत आहे. ‘जीसीसी’ हा जॉब मार्केटचा नवा ट्रेंड आहे. ‘जीसीसी’ व्यवस्था ही आयटी सपोर्ट, कस्टमर सर्व्हिस, फायनान्स, एचआर, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करते. अलीकडेच नॅसकॉम आणि जिनोवने जारी केलेल्या अहवालानुसार, ‘जीसीसी’साठी भारत हा जगातील सर्वात मोठा हब म्हणून समोर येत आहे.
जगाची आणि देशाची गरज पाहून भारत आपल्या तरुणांत कौशल्य विकास आणि अपग्रेडेशन करत आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भारतासाठी उच्च प्रशिक्षित सेवा निर्यातीची संधी वाढत आहे. सेवा निर्यातीत कॉम्प्युटर नेटवर्कचा वापर एआय, आयटी, बँकिंग, फायनान्स, इन्श्युरन्स, पर्यटन, आतिथ्य, शिक्षण, वैद्यकीय, मेडिकल ट्रान्सस्क्रिप्शन, गेमिंग, मनोरंजन आदीसंबंधित सेवेचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात देशातील तरुणांना उच्च प्रशिक्षित करण्यासाठी आणि भारताला जागतिक कौशल्याचे केंद्र करण्याच्या द़ृष्टीने मोठे पाऊल टाकले आहे. तीन नवीन कौशल्य विकास योजनांची घोषणा करण्यात आली असून, यात एआयसाठी 8,800 कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश आहे. या योजनेनुसार प्रामुख्याने एआय, आयटी, सायबर सिक्युरिटी आणि मशिन लर्निंगसारख्या नवीन तंत्रज्ञानात सुमारे पाच लाख तरुणांना हायटेक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘इंडिया एआय मिशन’चा उद्देश हा देश आणि विदेशात एआयसह उच्च प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी पूर्ण करणारा आहे. या मिशनच्या केंद्रस्थानी भारतातील तरुण पिढी आहे आणि यावरून त्याचे महत्त्व अधोरेखित होते. विशेष म्हणजे, युरोप, जपानसह अन्य विकसित आणि विकसनशील देशांतील लोकसंख्या ज्येष्ठत्वाकडे वाटचाल करत आहे. अशावेळी भारतातील उच्च प्रशिक्षित तरुणांना परदेशातील रोजगाराची मोठी संधी मानता येईल. भारताने अलीकडेच 20 हून अधिक देशांशी इमिग्रेशन आणि रोजगारांशी संबंधित करार केले. यानुसार भारत हा जपान, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, सौदी अरब, फ्रान्स, जर्मनी, रशिया, मॉरिशस, यूके, यूएई, रुमानिया आणि इटलीसारख्या देशांत कुशल तरुणांना पाठवेल.
उच्च कौशल्यप्राप्त तरुणांना देशात, जगात मागणी वाढत आहे. अशावेळी आपल्या नवीन पिढीला उच्च प्रशिक्षित विकासात प्रावीण्य मिळवण्यासाठी अधिक प्रोत्साहन द्यावे लागेल. या द़ृष्टीने नवीन रणनीतीने वाटचाल करावी लागेल. देशाच्या कानाकोपर्यात प्रामुख्याने ग्रामीण आणि मागास भागातील तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, व्हर्च्युअल रिअॅलिटी, रोबोटिक प्रोसेस, ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा अॅनालिसिस, क्लाऊड कम्प्युटिंग, ब्लॉक चेन आणि सायबर सुरक्षा यासारख्या उच्च कौशल्यांच्या गर्दीत कुशल करण्यासाठी अनेक पटीने प्रयत्न करावे लागतील. यासाठी भारताला आपल्या धोरणात आर्थिक चित्र बदलून टाकणार्या रणनीतीचा समावेश करावा लागेल आणि त्यातही प्रामुख्याने उच्च डिजिटल गुणवत्ता कौशल्यप्राप्त तरुणांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात आघाडीची भूमिका असेल.