

आज ओला, उबरपासून वैयक्तिक स्तरावर प्रवास करताना गुगल मॅप्सचा वापर केला जातो; पण ही विदेशी कंपनी आहे. प्रतिभावंतांची खाण असणार्या भारतात आजवर गुगलच्या या मक्तेदारीला शह देण्याचा यशस्वी प्रयत्न कधी झालाच नाही; पण आता मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारतातच ‘गुगल मॅप्स’ला पर्याय निर्माण झाला आहे. जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन (जेआयसी) या भारतीय कंपनीने एक बहुस्तरीय नकाशा अॅप तयार केले असून त्याची अचूकता आणि कार्यक्षमता गुगल मॅप्सपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे.
सध्याच्या स्मार्ट फोन युगामध्ये एखादे ठिकाण, जागा, पत्ता, हॉटेल, रेस्टॉरंट शोधायचं असेल किंवा एखाद्या स्थानाची माहिती हवी असेल किंवा शहरातील सर्वोत्तम रेस्टॉरंट शोधायचं असेल, तर आपण गुगल मॅप्सचा आधार घेतो; पण गुगल मॅप्स ही विदेशी कंपनी आहे. त्यामुळे भारतासाठी तिच्या वापरावर काही मर्यादा आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मेक इन इंडिया’ किंवा ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत गुगल मॅप्सपेक्षा अधिक अचूक आणि देशाच्या सर्व गरजा पूर्ण करणारा जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन नावाचा भारतीय खेळाडू या क्षेत्रात उदयास आला आहे. या कंपनीने एक बहुस्तरीय नकाशा असलेले अॅप विकसित केले असून त्याचा आवाका व अचूकता आणि विश्वसनीयता गुगल मॅप्सवर सामान्यतः दिसणार्या गोष्टींपेक्षा कैकपटींनी वरचढ आहे. यामध्ये मानक मॅपिंग डेटा, नकाशा व प्रत्यक्षात (ऑनग्राऊंड) केवळ पाच मीटर अंतर असणारी अत्यंत अचूक थ्रीडी प्रतिकृती आणि मेटाव्हर्सअंतर्गत जवळपास सर्व भारतीय शहरांचे वास्तविक जगातील डिजिटल जुळे तयार केले आहेत. या अॅपमध्ये गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूप्रमाणेच; पण त्यापेक्षा खूप मोठा स्ट्रीट लेव्हल व्ह्यू मिळतो. अॅपच्या स्ट्रीट इमेजरीमध्ये भारतातील आघाडीच्या 1,800 शहरांच्या अद्वितीय प्रतिमा आहेत. या प्रतिमा इलेक्ट्रिक वाहन नेव्हिगेशन मॉडेल (इव्हीएनएम) अंतर्भूत असणार्या डिजिटल एलिव्हेशन मॉडेलच्या (डीइएम) माध्यमातून तयार करण्यात आल्या आहेत. या अॅपमुळे बिंदू ‘ए’ पासून बिंदू ‘बी’पर्यंत जाताना इव्हीएनएमच्या अचूकतेचा अंदाज घेता येईल आणि प्रवासादरम्यान ते अंतर व्यापणार्या जमिनीच्या उंचीतील बदलांचा विचारही करता येईल. कारण, चढ आणि उतार हे इव्हीएनएमच्या बॅटरी डिस्चार्ज दरांवर परिणाम करतात. या अॅप्सद्वारे पाणी जमा होणे किंवा पूर येण्याच्या शक्यताही ओळखता येऊ शकतील. उदाहरणार्थ, हे अॅप प्रत्येक पावसाळ्यात, शहराच्या सखल भागात पाणी साठण्याची समस्या असलेली किंवा वारंवार पूर येणारी किंवा आसाममधील ब्रह्मपुत्रा वा बिहारमधील नद्यांच्या प्रवाहाजवळील असुरक्षित ठिकाणे शोधून काढू शकण्यास सक्षम असणार आहे.
हे सर्व तपशीलवार नकाशे तयार करण्यासाठी कंपनीने सेन्सर्सचे भारतातील सर्वात मोठे संकलन तयार केले आहे. कंपनीकडे अशा विविध डेटा संकलन साधनांचा प्रचंड मोठा संच आहे. प्रत्येक संचामध्ये वाहन, ड्रोन्स, लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग सिस्टीम असलेली विमाने आणि बॅकपॅक माऊंटेड लिडर सिस्टीम्सचा समावेश असून त्यात हाय रिझोल्यूशन डेटा कॅप्चर करण्याची अतुलनीय क्षमता आहे. नजीकच्या भविष्यात ही कंपनी एका आठवड्यात हैदराबाद-लखनऊ यासारख्या शहरांचा पाच सेंटिमीटर अचूकतेचा नकाशा तयार करेल.
अशा प्रकारचा कुठलाही नकाशा तयार करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अतिअरुंद, वाकड्यातिकड्या गल्ल्या, रस्ते, एकाच गल्लीतील कमी-अधिक उंचीची, आकारमानात प्रचंड तफावत असलेली घरे यांचे मॅपिंग आव्हानात्मक असते. यासाठी पारंपरिक मॅपिंग पद्धत न वापरता कंपनी बॅकपॅक माऊंटेड लिडर पद्धतीचा वापर करते. मॅपिंग हे फक्त पहिले पाऊल असते. एकदा असा डेटा कॅप्चर केला की, त्याचे व्यवस्थित संग्रहण आणि त्यावर योग्य ती प्रक्रिया करण्यात येते. यासाठी मॅपिंगच्या दहापट पेटाबाईटस् इतकी मोठी माहिती हाताळावी लागते. यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि ते वापरणार्याचे कौशल्य पणाला लागते. यासाठी प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक आणि डेटा संकलनापासून ते अनुप्रयोग विकासापर्यंतच्या संपूर्ण कार्यप्रवाहात प्रभुत्व मिळविण्यासाठी वर्षानुवर्षांचा अनुभव लागतो.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता भू स्थानिक नवोपक्रमाचा अविभाज्य भाग बनली आहे. कंपनीच्या स्ट्रीट व्ह्यू डेटासेटमधे 15 लाख रेषीय किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांच्या प्रतिमांचा समावेश आहे. कंपनीचे मशिन लर्निंग अल्गोरिदम या अतिविशाल डेटा साठ्यातून आपल्या मौल्यवान अंतद़ृष्टीने एका क्षणात कुठलेही ठिकाण शोधून काढते. एआयमुळे मॅपिंग माहितीचे विश्लेषण, वर्गीकरण आणि वाढ करणे सोपे होते. त्यामुळे एआय शहरी नियोजन, नेव्हिगेशन आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापनाला अधिक कृतिशील करत आहे. या जटिल तंत्रज्ञानातील भूस्थानिक डेटाच्या शाश्वत विश्लेषणामुळे झाडांचे प्रकार व खोडांची रुंदी मोजून, झाडाच्या कार्बन कॅप्चरच्या क्षमतेचा अंदाज घेऊन शहरी हिरवळीचे मूल्यांकन करता येते. साहजिकच या माहितीच्या आधारे शहर नियोजकांना आणि पर्यावरण संस्थांना शहरासाठी हिरव्या पायाभूत सुविधा धोरण (बेसिक कन्सेप्ट ऑफ ग्रीन कव्हर) विकसित करण्यास मदत होईल. या कंपनीचे मॉडेल स्टॉर्मवॉटर ड्रेनेज, स्ट्रीटलाईटस् आणि शहर नियोजनासाठी आवश्यक असलेली इतर वैशिष्ट्ये शोधता येतील. त्यांचे स्वयंचलित वर्गीकरण, करेक्ट झोनिंग, वाहतूक व्यवस्थापन आणि उपयुक्तता नियोजनही यामुळे करता येईल.
दुसरीकडे आवाजावर आधारित नेव्हिगेशन सिस्टीमद्वारे कारची सुरक्षा वृद्धिंगत होईल. एप्रिल 2025 च्या पहिल्या आठवड्यात गुगल मॅप्सने चुकीच्या मार्गाने नेल्यामुळे एकाच कुटुंबातील चार लोकांनी आपला जीव गमावला होता. तसा प्रकार या अॅपमध्ये होण्याची शक्यता नाही. गंतव्य स्थानांमध्ये मॅन्युअली प्रवेश करण्याऐवजी वाहनचालक या अॅपमधील व्हॉईस कमांड वापरू शकतात. कंपनीने विकसित केलेले व्यापक नकाशे डेटावर आधारित, लार्ज लँग्वेज मॉडेल व व्हॉईस कमांडद्वारे जटिल प्रश्नांवर प्रक्रिया करून अचूक प्रतिसाद देणारे आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे, तर नाव न सांगता तुम्ही शहरातील सर्वोत्तम मटण रेस्टॉरंटचा पत्ता विचारला, तर एआय तुम्हाला अशा प्रसिद्ध रेस्टॉरंटचे नावही सांगेल आणि तिथपर्यंत नेऊनही सोडेल. तुम्ही काही संदर्भ पाहण्यासाठी लायब्ररीचा ठावठिकाणा विचारला, तर एआय सिस्टीम शहरातील प्रख्यात लायब्ररी शोधून तेथे जाण्याचा मार्ग तयार करेल.
विशाल डेटा संकलनामुळे अधिक गोपनीयता आणि डेटाच्या संभाव्य गैरवापराचा धोका लक्षात घेता कठोर, अधिकृत सरकारी धोरण अंगीकारणे अपरिहार्य ठरते. काही वर्षांपूर्वी उपग्रह प्रतिमा बनवून जागतिक वापरासाठी प्रदान करणे ही गुगल अर्थ या अॅपची मक्तेदारी होती; पण त्यामुळे देशातील संवेदनशील ठिकाणांची माहितीही त्यावर उपलब्ध होत असे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने अशा प्रकारच्या डेटाचे फायदे, तोटे आणि जोखमींचे काळजीपूर्वक मूल्यांकन करून नवीन धोरण तयार केले. या धोरणामुळे सुरक्षा आणि सुलभता या दोन्हीमधे संतुलन निर्माण झाले. यापुढे नव्या धोरणांतर्गत फक्त भारतीय संस्थाच एक मीटर अचूकतेचे नकाशे तयार करू शकतील आणि त्यांची प्रतिमा बनवतील. यामुळे तपशीलवार संकलन केलेला भौगोलिक डेटा देशातच राहून शहरी नियोजन, संरक्षण आणि इतर विविध अनुप्रयोगांसाठी त्याचा वापर करता येईल. या देशांतर्गत डेटामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि महत्त्वाच्या भूस्थानिक मालमत्तेवर सार्वभौमत्व सुनिश्चित होईल.
भारतात बनलेल्या या नव्या अॅपच्या अनुप्रयोगाचा प्रमुख केंद्रबिंदू शाश्वतता नियोजन आहे. या तंत्रज्ञानाने कुठल्याही शहराच्या सौर क्षमतेचे विश्लेषण एका बटणाच्या क्लिकवर होईल. या अॅपच्या माध्यमातून कुठल्याही घराच्या छताची सौर क्षमता निश्चित करता येईल. यामुळे सौर पॅनल स्थापनेचे ऑप्टिमायझेशन आणि ऊर्जा कार्यक्षमता वृद्धिंगत होईल. या अॅपमधील मॅपिंग तंत्रज्ञानाने बनलेल्या अचूक नकाशांमुळे फायबर ऑप्टिक केबल व ऑप्टिक नेटवर्कचे योग्य नियोजन करता येणे शक्य होईल. त्याचप्रमाणे टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगदेखील सुलभ होईल. उदाहरणार्थ, इमारतीवर 80 फूट उंच रिले टॉवर बसवल्यावर त्याच्या नेटवर्क कव्हरेजचे मूल्यांकन करून ते वाढवण्यासाठी टॉवरच्या उंचीचे समायोजन करता येईल.
आजमितीला पुणे-सातारा महामार्गाचा प्रस्तावित नकाशा शिरवळ शहरात असलेल्या एकुलत्या मोठ्या हॉस्पिटलला छेदून जातो आहे. असे होऊ नये याबद्दलची केस सरकारकडे प्रलंबित आहे. हे कदाचित अनावधानाने झाले असण्याची शक्यता आहे; पण भविष्यात असे परत होऊ नये यासाठी या अॅपमधील तंत्रज्ञानाचा वापर शहरी नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अपरिहार्य असेल. यातील विशाल डेटा बेसद्वारे नागरी संस्थांना, सीवेज लाईन्स, रस्ते, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज इत्यादींचे नियोजन करता येईल. डॉ. अनिरुद्ध रॉय आणि समीर लांखे या टेक्नोसॅव्ही द्वयीची मुंबईस्थित जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन ही भारतीय कंपनी गुगलपेक्षाही शक्तिशाली नकाशा काहीही गाजावाजा न करता तयार करत आहे. गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूप्रमाणेच ती एक व्यापक स्ट्रीट लेव्हल व्ह्यू प्रदान करेल. आजपर्यंत भारतातील आयटीतज्ज्ञ, आयटी कंपन्या बाह्य देशांसाठी काम करत होत्या. आता त्या भारतासाठी काही प्रयत्न करताहेत, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. विश्लेषण, अनुकरण आणि अनुकूलन करण्याची ही क्षमता सरकारी आणि खासगी क्षेत्रातील भागधारकांसाठी जेनेसिसला मौल्यवान बनवते. अनेकांना नकळत आयटी क्षेत्रात देशाचा झेंडा उंचावणार्या या अॅपचे करावे कौतुक तेवढे कमीच आहे.