

प्रा. सतीश कुमार, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक
गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड युद्धाने धगधगणार्या गाझापट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षविरामाने शांततेची पहाट उदयास आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मध्यपूर्वेतील काही राष्ट्रांच्या दबावामुळे हा संघर्षविराम साध्य झाला; पण हा किती काळ टिकेल, हे सांगणे कठीण आहे. कारण, संघर्षविराम झाल्यानंतरही इस्रायलने गाझाच्या काही भागांत हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्षविराम फक्त गाझाच्या लोकांना न्याय देण्यासाठी साधला की, त्यांच्या प्रयत्नामागे नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याचा उद्देश होता, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचे कारण शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा आणि युद्धविरामाची घोषणा जवळजवळ एकाच काळात झाली होती. ट्रम्प यांच्या आक्रमक प्रयत्नामुळे जगातील महाशक्तीच्या नेत्याची प्रतिमा काहीशी हास्यास्पदही बनली होती; पण गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या या प्रयत्नाचे स्वागत करायला हरकत नाही. या संघर्षविरामासाठी ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास या दोघांवरही दबाव टाकला. हा दबाव किती दिवस टिकेल, हे भविष्यात दिसून येईल. इस्रायलच्या हल्ल्यांनंतर हमास युद्धविरामाच्या अटींवर किती काळ कायम राहील, हेही येणारा काळ सांगेल. युद्धविरामात हमासला निशस्त्रीकरण करणे आणि गाझाच्या प्रशासनातील त्याचा हस्तक्षेप थांबवणे या अटी आहेत; मात्र अरब देशांच्या दबावाखाली चर्चेच्या टेबलवर आलेला हमास या अटी किती काळ पाळेल, हे सांगणे कठीण आहे.
हमासला युद्धविरामाच्या टेबलवर येण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली धमकी कारणीभूत ठरली, हे निश्चित! संघर्षविराम झाला नाही, तर हमासचा गट नष्ट केला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष दोन वर्षांपासून सुरू होता आणि त्याच दरम्यान अमेरिका एक शांतता योजना तयार करत होती. इजिप्तमध्ये आयोजित चर्चेत या योजनेंतर्गत सर्व संबंधित पक्षांनी अंतिम रूप दिले आणि अशांत क्षेत्रात शांततेची अपेक्षा निर्माण झाली. हा संघर्ष केवळ गाझापुरताच मर्यादित नव्हता, तर लेबनान, येमेन आणि ईराणपर्यंत पसरला होता. या युद्धाची सुरुवात दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी झाली, जेव्हा हमासच्या नृशंस दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून प्रचंड नरसंहार घडवून आणला. त्या हल्ल्यात सुमारे 1,200 इस्रायली आणि काही विदेशी नागरिक ठार झाले, तर 250 लोक बंधक बनवून गाझात नेले गेले होते. यानंतर इस्राईलने हमासचा खात्मा करण्याची शपथ घेतली आणि त्यांच्या तुफानी बॉम्बहल्ल्यांमध्ये तसेच लष्करी कारवायांमध्ये 65 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. भौतिक साधनसंपत्तीचा किती चुराडा झाला, याची तर गणतीच करता येणार नाही. लाखो लोकांना या युद्धामुळे आपले घरदार सोडून पलायन करावे लागले आहे. या युद्धात मुख्यपणे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात बरेच बालक आणि महिला समाविष्ट आहेत. गाझाच्या रुग्णालयांपासून सर्व सार्वजनिक सेवा उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्रायलने मदतीच्या सामग्रीचे सर्व मार्ग बंद केल्याने गाझापट्टीत उपासमारीचे संकट उद्भवले आहे. कालांतराने हा संघर्ष इस्रायल आणि लेबनानपर्यंत पसरला. हुती बंडखोरांशी युद्धानंतर हा संघर्ष ईराणपर्यंत पोहोचला. हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे समुद्री मार्गाने होणारा जागतिक व्यापार बिघडला. या सर्व परिस्थितीत गाझा युद्धविराम हा दिलासादायक ठरणारा आहे.
इस्रायलने आणि हमासने युद्धविरामाची अंमलबजावणी सुरू केली आहे; परंतु भविष्यात इस्रायल पुन्हा आक्रमक होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. हमासने 20 ओलीस आणि मृत इस्रायली नागरिकांचे मृतदेह परत करण्यास सहमती दिली आहे, तर इस्रायलने काही हमासचे लष्करी बंदी आणि हजारो पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्याचे आश्वासन दिले आहे. आजघडीला डोनाल्ड ट्रम्प गाझा युद्ध संपले आहे, असा उद्घोष करत असले, तरी प्रत्यक्षात एक छोटीशी ठिणगी हे युद्ध पुन्हा सुरू करू शकते. गाझा पूर्णपणे नष्ट झाले असूनही हमासचे लष्कर अद्याप मागे हटत नाही. ट्रम्प यांच्या दबावामुळे त्यांना शांती करार स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. इस्रायली सैन्यदेखील दोन वर्षांच्या युद्धानंतर थकले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्यावरही युद्ध थांबवण्याबाबत आंतरराष्ट्रीय दबाव होता, तरीही हा युद्धविराम नाजुक आहे. त्याची खरी परीक्षा येणार्या काही आठवड्यांतच होईल. गाझामध्ये पुन्हा सुरक्षित वातावरणनिर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्यातील अटींची अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. यात बंदिवान आणि कैद्यांची मुक्तता, गाझामध्ये मानवी मदत सुरू ठेवणे, इस्रायली सैन्य काही प्रमाणात माघारी जाणे यांचा समावेश आहे. या अटींची पूर्तता झाल्यानंतर दुसर्या टप्प्यातील चर्चा सुरू केली जाऊ शकते, जी अत्यंत कठीण आणि संवेदनशील असेल.
भविष्यात दाट लोकसंख्या असलेल्या भागात प्रशासन कसे चालेल? हमासची प्रशासनातील भूमिका पूर्णपणे समाप्त होईल का? हमास खरंच शस्त्रसामग्री सोडेल का? 2006 नंतर गाझामध्ये मिळालेली सत्ता हमास सोडेल का, या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार हमास निशस्त्रीकरण अटींचे पालन करेल; परंतु पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता मिळण्याआधी या अटी पूर्ण होतील की नाही, हे देखील संशयास्पद आहे. डोनाल्ड ट्रम्प गाझाच्या प्रशासनासाठी एक आंतरराष्ट्रीय आणि तटस्थ समिती तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण त्या समितीवर ट्रम्प यांचा अंकुश असणार आहे. त्यामुळे अमेरिकेची नेमकी याबाबतची रणनीती काय आहे, हेही पाहावे लागणार आहे.
या गुंतागुंतीच्या प्रश्नाचे निराकरण करताना प्रचंड राजकीय कौशल्याची गरज आहे. युद्ध समाप्तीच्या प्रक्रियेत द्विराष्ट्र संकल्पनेसाठी स्पष्ट वेळापत्रक नसणे ही एक मोठी अडचण राहील. त्यामुळे दोन दशकांपासून चालत आलेल्या इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचे समाधान इतके सोपे नाही. यासाठी सर्व संबंधित पक्षांनी गंभीर प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये इस्रायलने सहिष्णू भूमिका घेण्याची, तर हमासनेही हिंसेपासून दूर राहण्याची गरज आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायलला एका प्रकारे बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्रायल खरोखरच मध्यपूर्वेत शांततेसाठी काम करू शकतो. तसेच तो संपूर्ण पश्चिम आशियाच्या मानव विकासामध्ये सहायक ठरू शकतो; पण इस्रायलला शत्रू मानणार्या संघटनांनाही आपल्या भूमिका बदलाव्या लागतील. अन्यथा इस्रायलचे धोरण स्पष्ट आहे, तो आपल्या संरक्षणासाठी तीव्र आक्रमकता दाखवत राहिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दहशतवाद आणि हिंसेचा मार्ग कायमचे सोडण्याचे आवाहन केले आहे. अशाप्रकारच्या आवाहनाची आवश्यकता जगभरातील अनेक देशांमध्ये आहे. ट्रम्प यांच्या वळचणीला आलेला पाकिस्तान हा तर जगातील दहशतवादाची फॅक्टरी आहे. त्यामुळे दहशतवादाविरुद्धचा प्रामाणिकपणे लढा फक्त गाझापुरता मर्यादित नसून पाकिस्तानमध्येही रुजवायला हवा. जे देश आतंकवादाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पाठिंबा देतात, त्यांनी स्वतःत सुधारणा करायला हव्यात; पण अमेरिकेसारख्या महासत्ताच त्यांना खतपाणी घालत आल्या आहेत. त्यामुळे आज गाझामध्ये शांतता नांदावी, यासाठी प्रयत्न करणार्या ट्रम्प यांनी आणि अमेरिकेने या संघर्षविरामानंतर आत्मचिंतन करायला हवे; तरच जागतिक शांततेसाठीच्या नोबेलसाठी त्यांचा विचार केला जाईल.