खो-खो खेळाला जगमान्यता

खो-खो हा कबड्डीनंतरचा सर्वात लोकप्रिय, पारंपरिक देशी खेळ
game of Kho-Kho needs to reach every corner of the world more vigorously
खो-खो खेळाला जगमान्यताPuhdari File Photo
Published on
Updated on
विवेक कुलकर्णी

खो-खो आपल्या देशात कित्येक ठिकाणी रुजला आहे. त्यामुळे, आपल्या दोन्ही संघांनी त्यात जेतेपद पटकावणे अर्थातच स्वाभाविक होते. पण, विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने खो-खोचा जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसार करण्यासाठी भारताने घेतलेला पुढाकार अधिक स्पृहणीय आहे. 2036 च्या ऑलिम्पिकसाठी टी-20 क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळासह खो-खोचादेखील समावेश केला जावा, असा प्रस्ताव आहे आणि कालांतराने त्यावर निर्णय होईलही. पण, तोवर हा खो-खोचा खेळ जगातील कानाकोपर्‍यात आणखी जोमाने पोहोचणे आवश्यक आहे.

तसे पाहता खो-खो हा कबड्डीनंतरचा सर्वात लोकप्रिय, पारंपरिक देशी खेळ. इनडोअर व आऊटडोअर अशा दोन्ही प्रकारांत याचे आयोजन केले जाऊ शकते. 1914 मध्ये प्रथमच एखाद्या खो-खो स्पर्धेचे आयोजन केले गेल्यानंतर 1959 मध्ये या खेळात विजयवाडा येथे पहिली राष्ट्रीय स्पर्धा भरवली गेली आणि त्यानंतर या खेळाने आतापर्यंतच्या मजल-दरमजल प्रवासात अनेक उड्डाणे वेळोवेळी घेतली आहेत. 1956 मधील बर्लिन ऑलिम्पिकमध्येही खो-खोचा प्रायोगिक स्तरावर समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ऐंशीचे दशक संपता संपता या खेळातील आशियाई फेडरेशनची स्थापना झाली आणि त्यानंतर हा खेळ बहरत गेला. याच प्रवासात 30 जून हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खो-खो दिवस असेल, अशीही घोषणा केली गेली. 1955 मध्ये स्थापित भारतीय खो-खो संघटनेने देखील खो-खो रुजवण्यासाठी बरेच कष्ट घेतले. खरे तर खो-खोसारख्या खेळात विश्वचषक भरवण्याची ही पहिलीच वेळ. मग तो पुरुष गट असो किंवा महिला गट. पण, ज्या स्वयंप्रेरणेने जगाच्या कानाकोपर्‍यातील संघ यात हिरीरीने सहभागी झाले, ते कौतुकास्पद आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पुढाकाराने आयोजित केल्या गेलेल्या या विश्वचषकात पुरुष गटात 20 तर महिला गटात 19 संघ सहभागी झाले होते.

आश्चर्य म्हणजे भारताचे दोन्ही गटातील संघ पूर्ण स्पर्धेत अपराजित राहिले. भारतीय पुरुष संघाने साखळी फेरीतील सर्व सामने एकहाती जिंकल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंका तर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आणि अंतिम फेरीत नेपाळचा फडशा पाडला. दुसरीकडे, महिला गटातील अंतिम फेरीत नेपाळने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला प्रथम आक्रमणाची संधी दिली आणि भारताने 34-0 अशी बेधडक आघाडी घेतली. इथेच जणू हा सामना फिरला. त्यानंतर पूर्ण सामन्यात नेपाळच्या संघाला याची कसर अजिबात भरून काढता आली नाही. या गटात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकतर्फी विजय मिळवत दणकेबाज सुरुवात केली आणि नंतर अंतिम लढतीत नेपाळसारख्या किंचित तगडे आव्हान देऊ शकेल, अशा संघाविरुद्ध देखील विजयी घोडदौड कायम राखत अतिशय थाटात विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, त्यांनी साखळी फेरीतील सर्व सामने जिंकल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बांगला देश तर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकन संघाचे आव्हान संपुष्टात आणले होते.

पुरुष एकेरीतही फारसे वेगळे चित्र असण्याचे कारण नव्हते. पुरुषांच्या या गटात 20 संघांनी सहभाग घेतला आणि भारताचा नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतानसह अ गटात समावेश होता. भारताने आपला लौकिक जपत या सर्वच संघांना पराभूत करत आपली हुकूमत अधोरेखित केली आणि तोच धडाका अंतिम फेरीत नेपाळविरुद्धही कायम राखला. इथे आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शेजारी राष्ट्र नेपाळने या खेळात केलेली प्रगती. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत नेपाळचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि यावरूनच त्यांची खेळावरील पकड अधोरेखित होते. महिला गटात भारताच्या अंशु कुमारी, चैत्रा, नेपाळची मनमती धानी तर पुरुष गटात भारताचे सुयश गरगटे, मेहूल, तसेच नेपाळचा रोहित बर्मा यांनी नेत्रदीपक खेळ साकारला. खेळाडूंना पुरेसा राज्याश्रय मिळणेही यात तितकेच महत्त्वाचे असते. मंड्या जिल्ह्यातील एमके गौतम आणि म्हैसूर जिल्ह्यातील चैत्र असे कर्नाटकातील दोन खेळाडू भारताच्या पुरुष संघात होते. अर्थातच त्यांचा भारतीय संघाच्या विजयात तोलामोलाचा वाटा राहिला. पण, कर्नाटक राज्य शासनाने आपला यथोचित गौरव केला नाही, याबद्दलची त्यांची तक्रार याच अनास्थेवर प्रकाश टाकणारी ठरते.

अगदी सांघिक स्तरावर देखील फारसे वेगळे चित्र नव्हते. कारण, विजेत्यांनाही रोख बक्षीस रकमेची तरतूद नव्हती. विजेत्यांना स्मृतिचिन्हे व चषक असेच बक्षिसाचे किरकोळ स्वरूप होते. अगदी देशांतर्गत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतही विजेत्यांना तीन लाख रुपये व चषक तसेच उपविजेत्यांना दोन लाख रुपये व चषक अशी बक्षिसे दिली जात असताना हा विरोधाभास धक्कादायक ठरत होता. पण, भारतीय संघाने पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत विजेतेपद मिळवले आणि त्यानंतर काहीच कालावधीत महाराष्ट्रातील खेळाडूंना तरी प्रत्येकी सव्वादोन कोटी रुपये व क्लास वन नोकरी असे इनाम जाहीर करण्यात आले. या विजेतेपदामुळे एरवी बरेच दुर्लक्षित राहिलेले खो-खोपटू देखील खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आले. भारतीय महिला संघाला जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी झालेली प्रियंका इंगळे ही युवा खो-खोपटू मूळची बीडची. तिच्या गौरवाप्रीत्यर्थ तर स्टेडियममध्ये फलक झळकले. त्यात म्हटले होते, ‘बीडची खरी ओळख प्रियंका इंगळे!’ खो-खोचे लक्ष्य आता ऑलिम्पिक अशा आशयाचे फलकही या स्पर्धेला हजेरी लावणार्‍या काही कोल्हापूरकरांनी झळकवले. एकूणच या स्पर्धेच्या निमित्ताने खो-खो खेळाला एक नवी झळाळी मिळाली, हेच खरे.

गतवर्षी एप्रिलमध्ये खो-खोमधील राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाली. त्यावेळीही महाराष्ट्राने पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत दर्जेदार कामगिरीसह सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर अवघ्या सात-आठ महिन्यांच्या कालावधीत झालेल्या या विश्वचषकातही महाराष्ट्राच्या क्रीडापटूंचे योगदान अनन्यसाधारण असेच राहिले. यंदाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश व ओडिशा या राज्यांनीही पुढाकार घेतला. या स्पर्धेच्या निमित्ताने हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात झळकू लागेल, याचीही बर्‍याच प्रमाणात प्रचिती आली. तूर्तास 2036 ऑलिम्पिकसाठी टी-20 क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळासह खो-खोचा देखील समावेश केला जावा, असे प्रस्ताव आहेत आणि कालांतराने त्यावर निर्णय होईलही. पण, तोवर हा खेळ जगातील कानाकोपर्‍यात आणखी जोमाने पोहोचणे आवश्यक आहे. ‘खुदी को कर बुलंद इतना की हर तहरीर से खुदा खुद बंदे से पूछे, बता तेरी रजा क्या है’, असे म्हटले जाते. तेच खो-खोकडूनही अपेक्षित आहे. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांतील या विश्वचषकाच्या निमित्ताने खो-खोने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहेच. आता यानंतर मजल-दरमजल प्रवासात या खेळाने जागतिक स्तरावर गरुडझेप घ्यावी, ही एकमेव सदिच्छा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news