

सोज्वळ, सोशिक प्रतिमा, सात्त्विक सौंदर्य, सहजसुंदर अभिनय, नृत्य निपुणता लाभलेल्या आशा काळे यांनी सुमारे पाच दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. नुकताच त्यांना प्रतिष्ठेचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने...
एक सहजसुंदर नायिका, अभिनेत्री म्हणून मराठी दर्शकांना आशा काळे सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथे 23 नोव्हेंबर 1948 रोजी झाला. उपजतच सौंदर्य लाभलेल्या आशाताईंना निरागसता अन् सात्त्विकतेचा एक आयाम होता. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कोल्हापूर आणि पुणे येथे झाले. नृत्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक लयबद्धता अंगी असल्याने कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले. नृत्यात पारंगत असलेल्या आशा यांना बालवयातच नाटक आणि सिनेमांमध्ये आपली अभिनय क्षमता दाखविण्याची संधी लाभली. ‘सीमेवरून परत जा’ या बाळ कोल्हटकर लिखित नाटकात आणि ‘तांबडी माती’ या, भालजी पेंढारकरांच्या सिनेमात त्यांनी आपली घरंदाज अभिनय क्षमता सिद्ध केली. पुढे आशाताईंनी नाट्यसृष्टी अन् सिनेसृष्टी हाच आपला प्रांत म्हणून निवडला. सोज्वळ, सोशिक प्रतिमा, सात्त्विक सौंदर्य, सहजसुंदर अभिनय, नृत्य निपुणता ही जमेची बाजू लाभलेल्या आशा काळे यांनी, सुलोचनाबाई (लाटकर), जयश्रीताई (गडकर) यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून वाटचाल सुरू केली. त्यांनी सुमारे पाच दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.
नशीबवान, बाळा गाऊ कशी मी अंगाई, देवता, आई पाहिजे, माहेरची माणसे, कुलस्वामिनी अंबाबाई, चुडा तुझा सावित्रीचा, सावित्री, जोतिबाचा नवस, हा खेळ सावल्यांचा, इंदुमती, सतीची पुण्याई, थोरली जाऊ, अष्टविनायक, पुत्रवती, चांदणे शिंपीत जाशी, बंदिवान मी या संसारी आदी अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आणि अभिनय प्रशंसनीय होता. तसेच, एक रूप अनेक रंग, एखादी तरी स्मित रेषा, गहिरे रंग, गुंतता हृदय हे, घर श्रीमंतांचे, देव दिना घरी धावला, नळ दमयंती, पाऊलखुणा, फक्त एकच कारण, बेईमान इत्यादी अनेक नाटकांतून अनेक व्यक्तिरेखा साकार केल्या. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतूनसुद्धा विचारणा केली. परंतु, मराठीतच इतकी व्यस्तता होती की, त्यांना नाकारावी लागली. तरीही अपवादात्मक दोन हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. ‘अन्नपूर्णा’मध्ये नूतन बरोबर अभिनय केला आणि एका पौराणिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. माझा त्यांचा परिचय एक सिनेरसिक वा एक नाट्यरसिक म्हणून नाही, तर एक बँकर आणि ग्राहक या नात्याने त्यांचा माझा परिचय झाला. पुढे तो वृद्धिंगत होत गेला. एवढी मोठी अभिनेत्री, एवढा मोठा व्यासंग, एवढे मोठे यश मिळूनदेखील त्यांचे पाय जमिनीवरच! त्या माझ्या ज्येष्ठ भगिनी, मैत्रीण, फिलॉसॉफर आणि गाईड झाल्या. एक अनोखे मैत्र जुळून आले.
आशाताईंची स्मरणशक्तीदेखील विस्मयित करणारी आहे. सिनेमांची नावे, प्रसंग, सहकलाकार, एवढेच नव्हे तर त्या अनुषंगाने घडलेल्या घटनादेखील त्यांना तपशीलवार लक्षात आहेत. मध्यंतरी मी स. गो. बर्वे यांचे चरित्र लिहीत होतो, तेव्हादेखील काही काही घटना अगदी काटेकोरपणे त्यांनी सांगितल्या. एवढेच नव्हे, तर सांगलीहून प्रकाशित झालेली ‘दीपशिखा’ ही कादंबरी मला उपयुक्त ठरू शकेल, हे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले. आशाताई आज तृप्त मनाने, जीवनाची सार्थकता अनुभवत आहेत; पण त्यात पती विरहाची दुःखद किनार आहे. हे मला जाणवते. माझ्या सासुबाईंना त्यांची व्यक्तिरेखा प्रचंड आवडायची. आशाताईंची भूमिका असलेला कुठलाही सिनेमा त्यांनी बघितला नाही, असे घडले नव्हते. मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आशाताईंना निमंत्रण दिले, ते त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता स्वीकारले. ‘मिलिंद, तुमच्या घरी बोलावणार असला तरच मी येते,’ असे त्यांनी सांगितल्यानंतर आम्हा सर्वांना कोण आनंद झाला. सुहास्य वदनाने आशाताई घरी आल्या आणि सर्वांना आपलेसे करून गेल्या. सासुबाईंना केवढा आनंद झाला. येत्या 14 डिसेंबरला आशाताईंना गदिमा पुरस्कार प्रदान होतोय, याचा आनंद सर्वांनाच होत आहे.