

काश्मीरमध्ये सुमारे 5 लाख टॅक्सी सेवा, हॉटेल, मार्गदर्शक, हस्तकला व पर्यटनाशी संबंधित इतर व्यवसाय हे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. तथापि, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये विक्रमी संख्येने येणार्या पर्यटकांची संख्या आता घटताना दिसत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक काश्मिरी लोकांवर आणि तिथल्या पर्यटन उद्योगावर व व्यवसायावर दिसू लागला आहे.
काश्मीरच्या सर्वात नयनरम्य भागांपैकी एक आणि ‘भारताचे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणार्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी 26 पर्यटकांची क्रूरपणे हत्या केली. या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आकार आणि भरारी घेत असलेल्या पर्यटन क्षेत्राला जबरदस्त धक्का दिला आहे. याचबरोबर या हल्ल्याने पर्यटनावर अवलंबून असलेल्या लाखो काश्मिरींच्या जीवनावर निराशेची काळी छाया पसरवली आहे. काश्मीरमध्ये सुमारे 5 लाख लोक पर्यटनाशी निगडीत व्यवसायात गुंतलेले आहेत. टॅक्सी सेवा, हॉटेल व्यवसाय, मार्गदर्शन, हस्तकला आणि पर्यटनाशी संबंधित विविध कामे हीच त्यांची उपजीविका आहे. तथापि, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये विक्रमी पातळीवर वाढलेली पर्यटकांची संख्या ओसरताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक हॉटेल आणि विमान प्रवासाचे बुकिंग रद्द करत आहेत. याचा थेट फटका स्थानिक काश्मिरी लोकांना, पर्यटन उद्योगाला आणि काश्मीरच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसत आहे.
1990 च्या दशकात जेव्हा काश्मीरमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला होता आणि काश्मिरी पंडित काश्मीर सोडून जात होते, त्या काळात काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या नगण्य झाली होती; मात्र केंद्र सरकारने 2019 मध्ये एक धाडसी पाऊल उचलत कलम 370 आणि कलम 35 अ हटवले आणि तेव्हापासून काश्मीरमध्ये नव्याने शांततेचे वारे वाहू लागले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काश्मीर अधिक सुरक्षित मानले जाऊ लागल्याने देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ पुन्हा वाढू लागला. पर्यटनाच्या जोरावर जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था वेगाने उभी राहत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये काश्मीरचा विकास दर 7 टक्क्यांहून अधिक आहे.
काश्मीरचे एसजीडीपी आता सुमारे 2.65 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. येथील लोकांचे दरडोई उत्पन्नही सुमारे 11 टक्क्यांनी वाढून दीड लाख रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. बेरोजगारीचा दरही घटला आहे. आपण पर्यटकांच्या संख्येवर नजर टाकली, तर 2020 मध्ये ही संख्या सुमारे 34 लाख होती. 2023 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 2.11 कोटी पर्यटक आले, तर 2024 मध्ये ही संख्या विक्रमी म्हणजे 2.36 कोटींवर पोहोचली. आज काश्मीरमधील पर्यटन उद्योगाची उलाढाल सुमारे 12 हजार कोटींची आहे. आर्थिक हालचालींचा परीघ वाढल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा वाटा सुमारे 61 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय पातळीवर हा आकडा सुमारे 55 टक्के आहे. काश्मीरच्या बिगर कर उत्पन्नात (एनटीआर) पर्यटन क्षेत्राचा वाटा वेगाने वाढून 25 टक्क्यांहून अधिक झाला आहे; पण आता या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनाला अचानक ब्रेक लागल्याचे दिसत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याने 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याची आठवण करून दिली आहे. त्यावेळी काश्मीरच्या पर्यटनाला मोठा फटका बसला होता आणि त्या वर्षी पर्यटकांची संख्या जवळपास निम्म्यावर आली होती. आताही पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला काश्मीरसमोरील अनेक आर्थिक आव्हाने बिकट करणारा आहे. काश्मीरचा वाढता पर्यटन उद्योग ही काश्मीरची उदयोन्मुख आर्थिक ताकद आहे. आपण एक दशकापूर्वीच्या काश्मीरच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले, तर असे दिसते की, येथील अर्थव्यवस्था ही जवळपास पूर्णतः केंद्र सरकारच्या मदतीवर अवलंबून होती. जम्मू-काश्मीरमधील बहुसंख्य लोक पारंपरिक शेतीत गुंतलेले होते. आजही तेथील अनेक जण पारंपरिक साधनांचाच वापर करून शेती करतात. काश्मीरमध्ये भात, मका, गहू, ज्वारी, डाळी, तेलबिया आणि तंबाखू यांचे उत्पादन होते. यासोबतच काश्मीरमध्ये मोठ्या बागांमध्ये सफरचंद, नाशपती, पीच, शहतूत, आक्रोड आणि बदाम यांची शेती केली जाते; मात्र त्यांची उत्पादकता कमी आहे.
गेल्या पाच वर्षांत देशी आणि विदेशी पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येमुळे जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था सुधारू लागली आहे, हे मान्यच करावे लागेल. काश्मीरच्या हस्तकला व लघुउद्योगांमध्ये वाढ दिसू लागली आहे. येथील प्रमुख हस्तकला उत्पादने म्हणजे कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या वस्तू, लाकडी कोरीवकाम, गालिचे, शाली आणि कशिदाकारीयुक्त वस्त्र. प्रसिद्ध पश्मीना लोकर येथेच पालन केल्या जाणार्या मेंढ्यांपासून मिळते. रेशीम उद्योगही येथे लोकप्रिय आहे. या हस्तकला उद्योगातून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळते. याशिवाय, अचूकता मोजणारी उपकरणे, धातूची भांडी, खेळणी, फर्निचर, मॅच बॉक्स, राळ आणि टर्पेंटाईन ही जम्मू-काश्मीरची महत्त्वाचे औद्योगिक उत्पादने आहेत. कलम 370 हटवल्यानंतर देशाच्या इतर भागांतील गुंतवणूक काश्मीरमधील लघुउद्योग व हस्तकला क्षेत्रात येऊ लागल्याने हे उद्योग वाढीस लागले आहेत. याचा थेट फायदा येथे राहणार्या लोकांना रोजगाराच्या संधीच्या स्वरूपात मिळतो आहे. त्यामुळे इतर राज्यांत नोकरीसाठी स्थलांतर करणार्या काश्मिरी युवकांची संख्या कमी होत आहे. लोकांचे उत्पन्न व जीवनमान सुधारत आहे. नव्या देशी-विदेशी गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यामध्ये वाढ होऊन जम्मू-काश्मीरमध्ये आर्थिक आणि सामाजिक समृद्धीचा आलेख उंचावत आहे. काश्मीरमधील मालमत्तेच्या किमती वाढल्याने स्थानिक नागरिकांना त्याचा लाभ होतो आहे.
या पार्श्वभूमीवर झालेला पहलगाममधील दहशतवादी हल्ला केवळ काश्मीरच्या पर्यटन उद्योगावरचा आघात नसून त्याचा परिणाम संपूर्ण भारताच्या पर्यटन क्षेत्रावर आणि वाढत्या विदेशी पर्यटकांच्या संख्येवरही होऊ शकतो. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेचा सुमारे 7 टक्के हिस्सा पर्यटन क्षेत्रातून येतो. 2024 मध्ये भारतातील पर्यटन उद्योगाचे मूल्य सुमारे 256 अब्ज डॉलर इतके होते. हा उद्योग भारतात सुमारे 4.5 कोटी लोकांना रोजगार देतो. झपाट्याने वाढणारा भारताचा पर्यटन उद्योग पुढील 10 वर्षांत 523 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. या पार्श्वभूमीवर समस्त देशवासीयांची अपेक्षा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला कठोर उत्तर देऊन दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला असा धडा शिकवेल की, भविष्यात अशा प्रकारचे दुष्कृत्य करण्याची हिंमत कुणालाच होणार नाही. भारत आता सॉफ्ट स्टेट राहिलेला नाही, तर वैचारिक पातळीवरही दहशतवादाच्या मुळावर घाव घालण्याच्या दिशेने पावले उचलतो आहे, हे सरकारने पाकिस्तानसह संपूर्ण जगाला दाखवून दिले पाहिजे. काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढल्यास भारत 2030 पर्यंत 56 अब्ज डॉलर विदेशी चलन पर्यटनातून मिळवू शकतो आणि 2047 पर्यंत देशाची पर्यटन अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या दिशेने मोठी झेप घेऊ शकतो.