

डॉ. मंगेश कष्यप
निर्माल्यापासून निर्मितीकडे हा केवळ एका उत्सवाचा संदेश नाही. तो श्रद्धेला पर्यावरणाशी, पर्यावरणाला अर्थव्यवस्थेशी आणि अर्थव्यवस्थेला मानवी कल्याणाशी जोडणारा नवा विचार आहे.
गणपती उत्सव संपल्यानंतर घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उरते ते निर्माल्य. फुले, हार, दुर्वा, पत्री, पाने, नारळाचे अवशेष आणि पूजेसाठी वापरलेल्या अनेक जैविक वस्तूंचा त्यात समावेश असतो. आजपर्यंत आपण या निर्माल्याकडे प्रामुख्याने कचरा म्हणून पाहिले आहे आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न मानला आहे; पण दृष्टिकोन थोडा बदलला, तर हाच निर्माल्य कचरा न राहता एक जैविक संसाधन (Biological Resource) बनू शकतो आणि त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी एक छोटी परिपत्र अर्थव्यवस्था (Circular Economy) उभी राहू शकते. परिपत्र अर्थव्यवस्थेची मूलभूत कल्पना अत्यंत साधी आहे. वस्तू वापरून फेकून देण्याऐवजी त्यातून पुन्हा मूल्य निर्माण करायचे. निसर्गातून घेतलेले संसाधन शक्य तितक्या काळ अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात ठेवायचे आणि जैविक पदार्थ शेवटी पुन्हा निसर्गाच्या चक्रात परतवायचे. निर्माल्य या संकल्पनेसाठी अत्यंत योग्य उदाहरण आहे. गणपतीला अर्पण केलेले फूल काही दिवसांत कचरा होत नाही. योग्य व्यवस्थापन केले, तर ते कंपोस्ट बनू शकते, मातीला सुपीक करू शकते आणि पुन्हा नव्या वनस्पतींच्या वाढीस हातभार लावू शकते.
याची सुरुवात घरापासून झाली पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने निर्माल्य स्वतंत्रपणे जमा केले, तर त्यात प्लास्टिक, थर्माकोल आणि इतर अजैविक कचरा मिसळणार नाही. गणेशोत्सव मंडळानी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी हे संकलन नियमितपणे करून पुढील प्रक्रियेसाठी स्थानिक महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, सामाजिक उद्योजक किंवा अधिकृत प्रक्रिया केंद्रांशी जोडले, तर निर्माल्याची एक व्यवस्थित मूल्यसाखळी (Value Chain) तयार होऊ शकते.
या मूल्यसाखळीतील पहिला टप्पा म्हणजे संकलन आणि वर्गीकरण. त्यानंतर निर्माल्यातील जैविक पदार्थांची योग्य प्रक्रिया करता येते. काही निर्माल्यापासून कंपोस्ट आणि गांडूळ खत तयार करता येते. काही फुलांपासून नैसर्गिक रंग मिळवता येतात. वाळलेल्या फुलांचा वापर अगरबत्ती, धूप किंवा सुगंधी वस्तू तयार करण्यासाठी करता येतो. काही जैविक अवशेषांचे इतर जैविक प्रक्रियांमध्ये रूपांतर करता येते. अर्थात, प्रत्येक उत्पादनासाठी स्थानिक पातळीवरील तांत्रिक क्षमता, बाजारपेठ, गुणवत्ता आणि सुरक्षितता यांचा विचार करणे आवश्यक आहे. निर्माल्यापासून काहीही तयार करता येते असा अवास्तव दावा न करता जिथे प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार्यता आहे तिथेच मूल्यवर्धन (Value Addition) करणे महत्त्वाचे आहे.
इथेच रोजगाराची मोठी शक्यता निर्माण होते. निर्माल्य गोळा करण्यापासून त्याचे वर्गीकरण, वाहतूक, वाळवणे, प्रक्रिया, उत्पादन, पॅकेजिंग आणि विक्रीपर्यंत अनेक लहान रोजगार निर्माण होऊ शकतात. विशेषतः महिला बचत गट आणि युवकांसाठी ही एक स्थानिक हरित रोजगाराची (Green Jobs) संधी ठरू शकते. एखाद्या शहरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम, मंदिरांमधील पुष्पकचरा आणि गणेशोत्सवासारखे सण मोठ्या प्रमाणावर होत असतील, तर त्यातून सातत्यपूर्ण कच्चा माल उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे ही केवळ गणेशोत्सवापुरती मोहीम न राहता वर्षभर चालणाऱ्या सूक्ष्म उद्योगात रूपांतरित होऊ शकते. यामध्ये गणेश मंडळे अथवा स्थानिक स्वराज्य संस्था संकलनाची जबाबदारी घेऊ शकतात. स्वयंसेवी संस्था जनजागृती आणि प्रशिक्षण देऊ शकतात. महिला बचत गट प्रक्रिया आणि उत्पादन करू शकतात. स्थानिक उद्योजक विक्री आणि विपणनाची जबाबदारी घेऊ शकतात. अशाप्रकारे एकाच समस्येभोवती अनेक घटक एकत्र आले, तर स्थानिक अर्थव्यवस्थेची नवी साखळी तयार होऊ शकते.
या प्रक्रियेचा सर्वांत सुंदर भाग असा आहे की, त्यातून पैसा निर्माण होतानाच पर्यावरणीय मूल्यही निर्माण होते. नदीत जाणारा जैविक कचरा कमी होतो. कचरा व्यवस्थापनावरील काही भार कमी होतो. रासायनिक खतांवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी करण्यासाठी जैविक खत उपलब्ध होते. स्थानिक रोजगार वाढतो. महिलांना उत्पन्नाचे साधन मिळते. युवकांना सामाजिक उद्योजकतेची संधी मिळते आणि नागरिकांना आपल्या उत्सवाचा पर्यावरणीय ठसा कमी करण्याचा मार्ग मिळतो. म्हणजेच आजचे निर्माल्य उद्याच्या स्थानिक संसाधन व्यवस्थापनाचा पाया बनू शकतो.
महाराष्ट्राने जलसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण याबरोबरच अशा परिपत्र अर्थव्यवस्थेच्या प्रयोगांमध्येही नेतृत्व करण्याची क्षमता दाखवली पाहिजे. गणपती उत्सव हा केवळ श्रद्धेचा आणि संस्कृतीचा उत्सव नाही, तर सामूहिक कृतीची प्रचंड क्षमता असलेला सामाजिक मंच आहे. या मंचाचा उपयोग आपण नदी स्वच्छ ठेवण्यासाठी, कचरा कमी करण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी करू शकतो. निर्माल्याची खरी किंमत त्याच्या वजनात नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या मूल्यामध्ये आहे. कालपर्यंत देवाच्या चरणी अर्पण केलेले फूल आपण वापरून संपलेली वस्तू मानत होतो. उद्या तेच फूल एखाद्या शेताच्या मातीत परतू शकते, एखाद्या महिलेच्या छोट्या उद्योगाचे उत्पन्न बनू शकते, एखाद्या युवकाच्या सामाजिक उद्यमाची सुरुवात करू शकते आणि एखाद्या नदीला प्रदूषणापासून वाचवू शकते.
म्हणून यंदाच्या गणेशोत्सवात आपण एक छोटा पण महत्त्वाचा बदल करूया. निर्माल्याची विल्हेवाट लावू नका. त्याचे मूल्य ओळखा. कारण, निर्माल्याचा शेवट कचऱ्यात होणे आवश्यक नाही. योग्य विचार, योग्य व्यवस्था आणि सामूहिक सहभाग असेल, तर त्याचा प्रवास निर्मितीकडे होऊ शकतो. निर्माल्यापासून निर्मितीकडे हा केवळ एका उत्सवाचा संदेश नाही. तो श्रद्धेला पर्यावरणाशी, पर्यावरणाला अर्थव्यवस्थेशी आणि अर्थव्यवस्थेला मानवी कल्याणाशी जोडणारा नवा विचार आहे आणि हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण स्वतः नदीशी, जलस्रोतांशी मनापासून जोडले जाऊ. आपले जलस्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी निर्माल्यापासून निर्मितीकडे जावेच लागेल.