

चंद्रशेखर गोखले
मैत्री ही परमेश्वरानं माणसाला दिलेली अतिशय अलौकिक देणगी आहे. ज्याला मैत्रीची किंमत कळली, अर्थ कळला तो खरा भाग्यवान! आयुष्यातील बहुतांश नाती आपल्याला जन्मापासूनच मिळत असतात; परंतु मैत्रीचं नातं निवडायला, मित्र निवडायला आपल्याला पूर्ण वाव मिळतो. आज काळ बदलला आहे. नव्या पिढीतील तरुण-तरुणींच्या मैत्रीच्या नात्यामध्ये खूप मोकळेपणा आला आहे. ही चांगली बाब आहे.
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार जगभरात फ्रेंडशिप डे किंवा मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. मैत्री ही अतिशय प्रामाणिक आणि तरल भावना आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय त्याचं अस्तित्व नाही. मैत्री ही परमेश्वरानं माणसाला दिलेली अतिशय अलौकिक देणगी आहे. ज्याला मैत्रीची किंमत कळली, अर्थ कळला तो खरा भाग्यवान! आयुष्यातील बहुतांश नाती आपल्याला जन्मापासूनच मिळत असतात. रक्ताच्या नात्यांमध्ये आपल्याला पर्याय नसतो; परंतु मैत्री मात्र त्याला अपवाद आहे. मैत्रीचं नातं निवडायला, मित्र निवडायला आपल्याला पूर्ण वाव मिळतो. त्यामुळंच मित्रांचं स्थान आपल्या आयुष्यात महत्त्वाचं असतं. आपल्या सुख-दुःखात सोबत राहणारे, काहीही करायला तयार होणारे मित्र म्हणजेच आयुष्याचा खरा आधार. खरी मैत्री ही निरपेक्ष, निःस्वार्थी असते. त्यामध्ये नफ्या-तोट्याचं गणित नसतं. असतो तो केवळ मैतरभाव. तो नसेल, तर त्या नात्याला मैत्री म्हणता येणार नाही.
‘नुसतंच बरोबर चाललं, तर
ती सोबत होत नाही
आणि कर्तव्य म्हणून केलं, तर
ती मदत होत नाही’
मैत्री ही अशीच असते. ती करावी तर अगदी मनापासून. अनेकदा ‘सुख के सब साथी...’ असं चित्र आपल्याला सभोवताली दिसतं; पण ते ‘साथी’ हे मित्र या व्याख्येत बसणारे नसतात. सुखाच्या क्षणी मित्रासोबत राहतानाच संकट काळात, दुःखामध्येही त्याचा आधार बनून राहायला हवं. मला कॉलेजमधले दिवस आजही आठवताहेत. कॉलेजमध्ये असताना ‘झुकझुक गाडी’ म्हणून आमचा ग्रुप होता. एका टाळीने आम्ही सगळ्या मित्र-मैत्रिणींना गोळा करायचो आणि एकमेकांना धरून झुकझुक गाडीप्रमाणे पळायचो. खूप धमाल असायची. अभ्यास, नोटस् यासाठी आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी एकमेकांवर अवलंबून असायचो. कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही. म्हणूनच आमच्यामध्ये सशक्त बंध निर्माण झाले.
आज काळ बदलला आहे. नव्या पिढीची नवी भाषा रूढ होत आहे. नात्यांची परिमाणं बदलत आहेत. त्याकडे पाहताना मला अनेक सकारात्मक बाबी दिसतात. विशेषतः मैत्रीबाबत. आजच्या मुला-मुलींमध्ये मोकळेपणा दिसून येतो. आमच्या वेळी समाजाचं एक प्रकारचं अनामिक दडपण असायचं. खुलेपणानं बोलता यायचं नाही. मुलींशी बोलताना संकोच वाटायचा; पण आताच्या पिढीमध्ये तो दिसत नाही, ही निश्चितच चांगली बाब आहे. आज मैत्रीच्या नात्यामध्ये लिंगभेदाचा अडसर राहिलेला नाही. त्यामध्ये निखळपणा आला आहे. हल्लीचे तरुण-तरुणी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बिनधास्तपणानं बोलताना-वागताना दिसतात. त्या सगळ्यामध्ये स्वच्छ मोकळेपणा असतो. माझ्या मते, ढोंगी सभ्यतेपेक्षा हे मोकळेपण अधिक महत्त्वाचं आहे आणि मैत्रीच्या नात्यात तेच महत्त्वाचं आहे.
पूर्वीच्या काळी संपर्क माध्यमांचा बोलबाला नव्हता. त्यामुळं मैत्रीचं नातं विस्तारायला मर्यादा होत्या. आजचा काळ इंटरनेटचा, सोशल मीडियाचा आहे. फेसबुक, व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांमुळं केवळ भौगोलिक अंतर आणि सीमारेषाच पुसून टाकल्या आहेत. या इंटरनेट युगामध्ये मैत्री विस्तारताना दिसतेय. जगाच्या एका कोपर्यातील व्यक्तीची दुसर्या कोपर्यातील व्यक्तीशी मैत्री घडवून आणण्याचं काम या समाजमाध्यमांनी केलं आहे. मी स्वतः हा अनुभव घेत आहे. ‘फेसबुक’मुळे मला महाराष्ट्रभरच नव्हे, तर सबंध भारतभर मित्र मिळाले आहेत. कुठल्याही शहरामध्ये गेलो, तरी तिथं माझे हक्काचे चार-पाच मित्र असतात. त्यांच्याकडून मी तेथील माहिती घेऊ शकतो आणि हे मी अनुभवलं आहे. मी कळवल्यानंतर अक्षरशः हे मित्र धावून येतात. नागपूरचा तुषार जोशी, पुण्याचा प्रसाद जोशी, मुंबईचा सचिन मोरे यांच्याशी माझी फेसबुकवरून मैत्री झाली; पण आश्चर्य म्हणजे या मित्रांनी माझ्याकडून 100-100 पुस्तकं स्वतःच्या जबाबदारीवर, आगाऊ पैसे देऊन खरेदी केली आणि ती विकली. ही मैत्रीची भावना जगात सर्वत्र आढळते. माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. त्यामुळं मी सुरुवातीपासूनच जीवश्च कंठश्च मैत्री काय असते, हे पाहिलं आहे, तरीही आजच्या पिढीची जी मैत्री आहे त्याची बातच काही और आहे.
इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण होणारं मैत्रीचं नातं चिरकाल टिकणारं नसतं, असं काही जण म्हणतात; पण माझ्या मते हे व्यक्तीसापेक्ष आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला किती वाव देता, त्याला किती समजून घेता यावर त्या मैत्रीचं अस्तित्वात येणं आणि टिकणं अवलंबून असतं. त्याचबरोबर तुम्हाला मैत्रीची गरज किती आहे, हेदेखील महत्त्वाचं असतं. शेवटी मैत्री ही आंतरिक गरज आहे. आपण दीर्घकाळ एकटं एकटं राहू शकत नाही. ज्या व्यक्ती एकटेपणानं राहतात, त्याही मनातल्या मनात कुणाशी तरी बोलतच असतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेळा फसवले गेल्याची उदाहरणंही ऐकायला मिळतात; परंतु त्या नात्याची वाट सुरुवातीपासूनच वाकडी असते. मुळात मैत्री ही निरपेक्ष भावना आहे. त्यामुळं त्यामध्ये काही तरी मागणं ही भावना असता कामा नये. ती निर्व्याज असली पाहिजे. कदाचित म्हणूनच जे दिलखुलास असतात, सरळ मनानं मैत्री करतात त्यांच्या नात्यामध्ये फसगतीची शक्यताच नसते. शेवटी हा दोष नातं जोडणार्यांचा आहे. त्यामध्ये माध्यमाला दोष देता कामा नये. उलट या नव्या संवाद-संपर्क माध्यमांमुळं आपण एकमेकांच्या जवळ आलो आहोत. मुळातच मैत्रीच्या नात्यामध्ये वय, जात-धर्म ही सर्व बंधनं नसतातच. या नव्या माध्यमांमुळं ही बाब अधिक स्पष्ट होऊ लागली आहे. आज लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत कुणाशीही घट्ट मैत्री जमण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम आणि सुलभ व्यासपीठ बनलं आहे आणि त्यातून हे मैत्रबंध अधिकाधिक विस्तारत आहेत, द़ृढ होत आहेत. पूर्वी मित्रांशी भेट कट्ट्यावर, टपरीवर व्हायची. आता ती फेसबुक, व्हॉटस्अॅपवर होते इतकेच!