

सीए संतोष घारे
काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला ‘डेड इकॉनॉमी’ असे म्हटले होते; पण यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमधील आर्थिक उलाढालीची आकडेवारी ही बाब स्पष्ट करणारी आहे की, भारताची अर्थव्यवस्था मृत तर नाहीच नाही. उलट, भारतीय लोक दिवाळीवर इतका खर्च करतात की, तो नेपाळच्या जेडीपीपेक्षा आणि पाकिस्तानच्या संरक्षण बजेटपेक्षाही अधिक आहे. 2021 मध्ये दिवाळीतील विक्री 1.25 लाख कोटींच्या आसपास होती. त्यातुलनेत विचार केल्यास यंदाच्या दिवाळीने उलाढालींमध्ये चौपट वाढ नोंदवली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचे हे प्रचंड मोठे यश आहे.
भारतामध्ये सर्वात आनंदात आणि उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी. या सणाच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि लोकसांस्कृतिक महत्त्वापलीकडे अर्थकारणाचाही एक पैलू असून, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दीपावली पाडवा, त्याआधी पार पडणारे लक्ष्मीपूजन, भाऊबीज या दिवाळीतील प्रत्येक दिवसाशी जुळलेल्या परंपरा, यानिमित्ताने केले जाणारे गोडधोड पदार्थ, नव्या वस्तूंची खरेदी, घराची रंगरंगोटी, कपडे खरेदी, सजावटीच्या वस्तू, सुट्ट्यांच्या निमित्ताने होणारा प्रवास, धार्मिक कार्ये, दानधर्म, सोन्या-चांदीची खरेदी या सर्व गोष्टींमुळे दिवाळीच्या काळात देशाचे अर्थकारणही दिव्यांच्या प्रकाशामुळे उजळून निघते. बांधकाम क्षेत्र आणि वाहन क्षेत्रातील आकडेवारी पाहिल्यास, वर्षभरामध्ये होणार्या एकूण विक्रीपेक्षा नवरात्रीपासून ते नववर्षारंभापर्यंतच्या काळात होणारी विक्री अधिक असल्याचे दिसून येते.
यंदाचा दिवाळी फेस्टिव्हल अनेकार्थांनी वेगळा होता आणि तो केवळ पारंपरिक उत्साहामुळे नव्हे, तर आर्थिक आणि कर धोरणातील बदलांमुळे ‘ब्लॉकबस्टर’ ठरला. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दर कपातीने बाजारात स्वस्ताईचे पर्व सुरू झाले आहे. त्यामुळे दिवाळीचे निमित्त साधून ग्राहकांनी असंख्य वस्तूंची लयलूट केली. जीएसटी सुधारणांपूर्वी देण्यात आलेल्या आयकर सवलती, रिझर्व्ह बँकेकडून झालेली व्याज दर कपात आणि नीचांकी पातळीवर आलेली महागाई यांनी ग्राहकांच्या क्रयशक्तीला नवा बूस्टर दिला आणि बाजारपेठ तेजाळून निघाली. किरकोळ विक्रेत्यांसाठी हा हंगाम गेल्या दहा वर्षांतील सर्वात वेगवान वाढ घेऊन आला. वाहन, हस्तकला, वस्त्रोद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेटस्, घरगुती सजावटीच्या वस्तू आणि फॅशन या सर्व क्षेत्रांमध्ये विक्रीत कमालीची आणि झपाटलेली वाढ यंदाच्या दीपोत्सवात नोंदवली गेली आहे. उत्तराखंडसारख्या छोट्या राज्यामध्ये एकट्या वाहन विक्रीच्या क्षेत्रात मागील वर्षांच्या तुलनेत 20 टक्क्यांची वाढ यंदा दिसून आली आहे. विशेष म्हणजे, मान्सूनच्या काळातील आपत्तींनी या राज्याला मोठा तडाखा दिलेला असतानाही ही वृद्धी नोंदवली गेली आहे. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत या राज्याच्या तिजोरीत एसजीएसटीच्या माध्यमातून जमा होणार्या महसुलात 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.
‘इन्फोमेरिक्स रेटिंग्ज’च्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या काळात कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्र, ज्वेलरी, हस्तकला आणि सजावटी सामान या क्षेत्रांमध्ये वाढलेली मागणी उल्लेखनीय आहे. हा बदल ग्राहकांच्या मानसिकतेतील नव्या आशावादाचे द्योतक आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले असून, ‘व्होेकल फॉर लोकल’ या संकल्पनेला व्यवहार्य बळ मिळाले आहे. जीएसटी सुधारणांमुळे आणि प्राप्तिकरातील सवलतींमुळे दीपावलीच्या हंगामात 4.5 लाख कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता; परंतु हे अंदाज मोडीत काढत यंदा जवळपास 5.4 लाख कोटी रुपयांच्या वस्तूंचा व्यापार झाल्याचे प्राथमिक आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. एकट्या मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) 70,000 कोटींपेक्षा जास्त व्यापार नोंदवण्यात आला. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, वाहन उद्योगातही एवढीच वाढ नोंदली गेली आहे.
अखिल भारतीय व्यापारी परिसंघ (कॅट) च्या आकडेवारीनुसार, नवरात्रीपासून दीपावलीपर्यंत चालणार्या या उत्सवी हंगामात ग्राहकांनी सुमारे 65 हजार कोटी रुपयांच्या सेवांचीही खरेदी केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत झालेली एकूण विक्री सुमारे 4.25 लाख कोटी रुपये होती. त्याच्या तुलनेत यंदाची विक्री तब्बल 25 टक्क्यांनी अधिक आहे. एका सर्वेक्षणानुसार, एकूण विक्रीपैकी 85 टक्के हिस्सा किरकोळ (रिटेल) बाजाराचा राहिला आहे, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. ऑफलाईन बाजारपेठांमध्येही खरेदीचा उत्साह कायम राहिला. कन्फेक्शनरी, गृहसजावट, पादत्राणे, रेडीमेड वस्त्रे, टिकाऊ उपभोग्य वस्तू आणि दैनंदिन वापराच्या उत्पादनांवर जीएसटी दरात झालेल्या कपातीमुळे किमतींच्या स्पर्धेत सुधारणा झाली. त्याचा थेट परिणाम खरेदीवाढीवर झाला असून, ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले. ग्राहकांचा आत्मविश्वास, उत्पन्नवाढ, जीएसटी सुधारणांमुळे झालेला सवलतींचा फायदा आणि देशी उत्पादनांकडे वाढता कल, या सर्व घटकांनी एकत्र येऊन भारतीय बाजारपेठेला नवसंजीवनी दिली आहे. दीपावलीच्या प्रकाशासोबतच देशाच्या आर्थिक गतीलाही उजळवणारा हा सण ठरला आहे.
‘क्रिसिल रेटिंग्ज’च्या अहवालानुसार, 40 संघटित वस्त्र विक्रेत्यांवर आधारित विश्लेषण दर्शवते की, जीएसटी पुनर्रचनेमुळे या क्षेत्राच्या वाढीमध्ये सुमारे 200 बेसिस पॉईंटस्ची भर पडू शकते. यामुळे संघटित वस्त्र विक्री क्षेत्र सलग दुसर्या वर्षी 13 ते 14 टक्के वाढ नोंदवण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकीने 22 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर (धनत्रयोदशी) या कालावधीत 3,25,000 वाहने वितरित केली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 50 टक्क्यांनी अधिक आहे. यंदा या काळात 4,50,000 बुकिंग नोंदवले गेले असून, त्यापैकी 94,000 बुकिंक केवळ छोट्या कारसाठी होते. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातही विक्रीत झपाटलेली वाढ दिसून आली. बहुतांश ग्राहकांनी मोठ्या टेलिव्हिजन संचांकडे वळून प्रीमियम कॅटेगरीला प्राधान्य दिले. अॅमेझॉन इंडियाने यंदाच्या वार्षिक सणासुदीच्या विक्रीदरम्यान 276 कोटी ग्राहक भेटी नोंदवल्या आहेत. त्यानुसार 30,000 पेक्षा जास्त किमतीच्या स्मार्टफोन विक्रीत 30 टक्के वाढ झाली आहे. तिकडे प्रीमियम हिर्यांच्या विक्रीत 40 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये दिवाळी 31 तारखेला होती, तेव्हा किरकोळ महागाईचा दर 14 महिन्यांच्या उच्चांकावर म्हणजेच 6.2 टक्के होता. सप्टेंबर 2025 मध्ये तो घसरून थेट दीड टक्क्यांवर आला. गेल्या आठ वर्षांतील हा नीचांकी स्तर आहे. यामुळे ग्राहकांच्या खरेदीशक्तीवर सकारात्मक परिणाम झाला. जागतिक पुरवठ्यातील अस्थिरतेमुळे काही वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली; पण एकूण महागाई नियंत्रणात आहे. यामुळे ग्राहकांना करकपातीचा थेट फायदा घेण्याची संधी मिळाली. विशेषतः, मध्यमवर्गीय ग्राहक आता फक्त गरजेच्या वस्तूंवर खर्च करीत नाहीत, तर प्रीमियम, डिझाईन-केंद्रित आणि टिकाऊ उत्पादनांमध्येदेखील गुंतवणूक करीत आहेत, हा ग्राहकांच्या बदललेल्या मानसिकतेचा कल आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीने भारतीय किरकोळ विक्रीला एक नवा आयाम दिला आहे. गेल्यावर्षीच्या काहीशा मंदीसद़ृश वातावरणातून बाहेर पडून अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढण्यास यंदाचा दीपोत्सव साहाय्यभूत ठरणार आहे.
यंदाच्या दिवाळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 87 टक्के ग्राहकांनी परदेशी वस्तूंपेक्षा भारतीय वस्तूंना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. गेल्यावर्षीच्या तुलनेत भारतीय बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीत 25 टक्के वाढ झाली. यामुळे चिनी उत्पादनांच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. ग्राहकांच्या मानसिकतेतील हा बदल लक्षणीय आणि आशादायक आहे. पंतप्रधानांकडून केल्या जाणार्या आवाहनाला देशातील जनतेने दिलेला हा प्रतिसाद सरकारवरचा विश्वास वृद्धिंगत होत असल्याचे द्योतक तर आहेच; पण त्याहीपेक्षा भारतीय ग्राहक आता अधिक सुजाण बनला आहे. बहुराष्ट्रीय विदेशी कंपन्यांसाठी ही बाब मोठे आव्हान ठरणारी आहे; तर देशांतर्गत उत्पादकांसाठी ती उत्साहवर्धक आहे.
काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला ‘डेड इकॉनॉमी’ असे म्हटले होते; पण यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमधील आर्थिक उलाढालीची आकडेवारी ही बाब स्पष्ट करणारी आहे की, भारताची अर्थव्यवस्था मृत तर नाहीच नाही. उलट, भारतीय लोक दिवाळीवर इतका खर्च करतात की, तो नेपाळच्या जेडीपीपेक्षा आणि पाकिस्तानच्या संरक्षण बजेटपेक्षाही अधिक आहे. 2021 मध्ये दिवाळीतील विक्री 1.25 लाख कोटींच्या आसपास होती. त्यातुलनेत विचार केल्यास यंदाच्या दिवाळीने उलाढालींमध्ये चौपट वाढ नोंदवली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचे हे प्रचंड मोठे यश आहे. आज जगभरातील अनेक अर्थव्यवस्था मागणी अभावी, क्रयशक्ती अभावी बिकट संकटाचा सामना करत आहेत. अशावेळी केंद्र सरकारच्या सुनियोजित अर्थधोरणांमध्ये भारतीयांमध्ये वाढलेली क्रयशक्ती जगाला चोख संदेश देणारी आहे. 144 कोटींचा देश ही जगातील प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारताला जगाची जितकी गरज आहे, त्याहून जगाला भारताची गरज आहे, हे भारतीय अर्थव्यवस्थेची हेटाळणी करणार्यांनी लक्षात घ्यायला हवे.