

डॉ. दिलीप उरकुडे
आनंद ही केवळ वैयक्तिक भावना नाही. ती समाज, व्यवस्था आणि आपल्या मनाच्या संतुलनाचा एकत्रित परिणाम आहे. जग आनंदी होण्याचा प्रयत्न करत आहे. अहवाल मार्ग दाखवत आहेत; पण अंतिम उत्तर प्रत्येकाच्या मनात दडलेलं आहे. कारण, आनंद ही शोधण्याची गोष्ट नाही, ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे.
फिनलँड पुन्हा अव्वल; भारत 116 व्या स्थानावर. सुखाच्या जागतिक मोजपट्टीत आपली खरी स्थिती काय सांगते?
आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर सगळं आहे. सुविधा, पैसा, तंत्रज्ञान; पण मन मात्र शांत आहे का? समृद्धी वाढत आहे; पण समाधान हरवत आहे, हीच आजच्या जगाची खरी शोकांतिका आहे.
जग वेगाने पुढे जात आहे. अर्थव्यवस्था वाढत आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे आणि जीवन अधिक सुलभ होत आहे. आज आपल्या हातात स्मार्ट फोन, घरात एसी, ऑनलाईन खरेदीची सुविधा, पूर्वीपेक्षा जीवन खूप सोपं झालं आहे, तरीही अनेकांना ताण, अस्वस्थता आणि असंतोष जाणवतो.
या सर्व प्रगतीच्या पार्श्वभूमीवर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो, माणूस खरंच अधिक आनंदी झाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारा जागतिक आनंद अहवाल 2026 नुकताच प्रसिद्ध झाला आणि त्यातून समोर आलेलं चित्र विचार करायला भाग पाडणारं आहे. Finland हा देश सलग नवव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरतो, तर भारत 147 देशांपैकी 116 व्या स्थानावर आहे. समृद्धीच्या शर्यतीत पुढे असतानाही आनंदाच्या शर्यतीत आपण मागे का? याचा शोध घेणं आज अधिक महत्त्वाचं ठरत आहे.
एकीकडे फिनलँडमध्ये सुरक्षितता, सामाजिक विश्वास आणि शासनावरील विश्वासामुळे लोक निर्धास्त जगतात, तर भारतात संधी असूनही असुरक्षिततेची भावना का वाढते, हा प्रश्न अधिक गंभीर ठरतो. याच विरोधाभासातून एक गोष्ट स्पष्ट होते, समृद्धीपेक्षा विश्वास आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची ठरते.
आनंद ही संकल्पना नवीन नाही. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानी अॅरिस्टोटल यांनी अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवन, यालाच खर्या आनंदाची व्याख्या दिली. भारतीय संस्कृतीत संतोष आणि आनंद या संकल्पना जीवनाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांसारख्या संतांनीही बाह्य वैभवापेक्षा अंतर्मनातील समाधानाला अधिक महत्त्व दिलं. त्यामुळे भारतीय विचारसरणीत आनंद हा ‘असण्याचा’ विषय आहे, ‘मिळवण्याचा’ नाही.
मात्र, आधुनिक काळात आनंद मोजण्याचा शास्त्रीय प्रयत्न 1970 नंतर सुरू झाला, जेव्हा अर्थतज्ज्ञांनी GDP हीच प्रगतीची एकमेव मोजपट्टी असू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. याच विचारातून 2012 मध्ये United Nations Sustainable Development Solutions Network च्या पुढाकारातून हा जागतिक अहवाल सुरू झाला आणि आज तो जागतिक धोरणनिर्मितीसाठी एक महत्त्वाचा संदर्भ ठरला आहे.
या अहवालाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तो केवळ आकड्यांवर आधारित नाही, तर लोकांच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे. Gallup या संस्थेच्या सर्वेक्षणाद्वारे हजारो लोकांना त्यांच्या जीवनाविषयी समाधानाची पातळी विचारली जाते. त्यावर आधारित सहा महत्त्वाचे घटक निश्चित करण्यात आले आहेत. दरडोई उत्पन्न, आयुर्मान, सामाजिक आधार, स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराबद्दलची धारणा.
एखाद्या व्यक्तीकडे चांगली नोकरी, चांगलं आरोग्य, संकटात मदत करणारे मित्र, स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि शासनावर विश्वास असेल, तर तो माणूस अधिक आनंदी असतो. या सहा घटकांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, आनंद हा केवळ पैशावर अवलंबून नसून विश्वास, सुरक्षितता आणि नातेसंबंधांवर अधिक आधारलेला आहे.
यंदाच्या अहवालातही उत्तर युरोपातील देशांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. Finland, Iceland, Denmark, Costa Rica आणि Sweden हे देश पहिल्या पाचमध्ये आहेत. या देशांचं वैशिष्ट्य केवळ आर्थिक संपन्नता नसून सामाजिक समानता, मजबूत कल्याणकारी व्यवस्था आणि शासनावरील विश्वास आहे. नागरिकांना सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मान मिळतो आणि तेच त्यांच्या आनंदाचं मूळ ठरतं.
फिनलँडमध्ये नोकरी गेली, तरी सरकारकडून मदत मिळते, आरोग्य सेवा सहज उपलब्ध असते म्हणून लोकांना भविष्यातील भीती कमी असते. म्हणूनच तिथे लोक केवळ जगत नाहीत, ते समाधानाने जगतात.
भारताचा विचार केला, तर 2025 च्या 118 व्या स्थानावरून थोडी सुधारणा करत तो 116 व्या स्थानावर आला आहे; मात्र ही सुधारणा पुरेशी नाही. भारताकडे तरुण लोकसंख्या, वाढती अर्थव्यवस्था आणि तांत्रिक प्रगती असूनही आनंदाच्या बाबतीत आपण मागे का आहोत, हा प्रश्न अधिक तीव्र होतो.
आर्थिक विषमता हे त्यामागचं एक मोठं कारण आहे. वाढती अर्थव्यवस्था असली, तरी तिचा लाभ सर्वांपर्यंत समानपणे पोहोचत नाही. शहरांमध्ये उंच इमारती आणि आधुनिक जीवनशैली दिसते; पण त्याच शहरांमध्ये ताण, एकटेपणा आणि असुरक्षितता वाढताना दिसते. म्हणजेच विकास सर्वांना स्पर्श करत नाही आणि इथेच आनंद हरवतो.
एका बाजूला मोठे मॉल्स आणि आलिशान गाड्या दिसतात, तर दुसर्या बाजूला अनेकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. ही दरी लोकांच्या समाधानावर परिणाम करते.
महानगरात काम करणारा एक तरुण उच्च पगार मिळवत असतो; पण त्याचवेळी त्याला कामाचा ताण, वेळेचा अभाव आणि नातेसंबंधांमध्ये अंतर जाणवतं. दुसरीकडे, ग्रामीण भागात राहणारा एक शेतकरी आर्थिकद़ृष्ट्या सक्षम नसला, तरी कुटुंब, निसर्ग आणि समुदाय यांच्याशी जोडलेला असल्यामुळे तो अधिक समाधान अनुभवतो. या दोन जीवनशैलींच्या तुलनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, आनंद हा उत्पन्नाच्या आकड्यांमध्ये नसून जीवनाच्या अनुभवांमध्ये दडलेला असतो.
आनंदाचा खरा शत्रू : तुलना आणि डिजिटल जग
मानसशास्त्राच्या द़ृष्टीने पाहिलं, तर आजचा माणूस तुलना या सापळ्यात अडकला आहे. इतरांच्या यशाशी, जीवनशैलीशी आणि बाह्य दिखाव्याशी स्वतःची तुलना करताना तो स्वतःचं समाधान हरवतो. माझ्याकडे काय नाही याकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे माझ्याकडे काय आहे, याची जाणीव कमी होत जाते.
नवीन मोबाईल घेतल्यानंतरही एखाद्याला आनंद वाटत नाही. कारण, दुसर्याकडे त्याहून महाग मोबाईल असतो. म्हणजेच तुलना जितकी वाढते, तितका आनंद कमी होत जातो.
या अहवालात एक तीव्र विरोधाभासही दिसतो. एका बाजूला फिनलँडसारखा स्थिर, सुरक्षित आणि विश्वासार्ह देश आहे, तर दुसर्या बाजूला Afganistan सारखा अस्थिरतेचा सामना करणारा देश आहे. या दोन टोकांच्या तुलनेतून एक स्पष्ट धडा मिळतो, शांतता, स्थिरता आणि विश्वास हीच आनंदाची खरी पायाभूत तत्त्वं आहेत. जिथे दररोज भीतीचं वातावरण असतं, तिथे आनंद टिकवणं खूप कठीण होतं.
आजचा माणूस अधिक सक्षम, अधिक शिक्षित आणि अधिक संधींनी भरलेला आहे, तरीही तो अधिक अस्वस्थ का आहे, याचा विचार करावा लागेल. कारण, बाह्य प्रगती आणि अंतर्गत समाधान यामध्ये तफावत वाढत चालली आहे. म्हणजेच आपण प्रगतीत पुढे जात आहोत; पण मनाने मागे पडत आहोत.
भारतीय संस्कृतीत संतोषी सुखी ही संकल्पना खूप पूर्वीपासून सांगितली गेली आहे. कमी साधनांमध्येही समाधान मिळवण्याची क्षमता हीच खरी संपत्ती मानली गेली. आजच्या वेगवान जीवनात हीच गोष्ट आपण विसरत चाललो आहोत. अधिक मिळवण्याच्या धडपडीत आपण जे आहे त्याचं महत्त्व कमी करत आहोत.
भारताने आनंदाच्या शर्यतीत पुढे जायचं असेल, तर काही मूलभूत बदल आवश्यक आहेत. मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं, समावेशक विकासाला चालना देणं, काम जीवन संतुलन राखणं, सामाजिक विश्वास वाढवणं आणि डिजिटल वापरावर संयम ठेवणं. विकासाची व्याख्या बदलून त्यात मानवी समाधानाचा समावेश करणं, ही काळाची गरज आहे.
शेवटी, आनंद ही केवळ वैयक्तिक भावना नाही. ती समाज, व्यवस्था आणि आपल्या मनाच्या संतुलनाचा एकत्रित परिणाम आहे. जग आनंदी होण्याचा प्रयत्न करत आहे, अहवाल मार्ग दाखवत आहेत; पण अंतिम उत्तर प्रत्येकाच्या मनात दडलेलं आहे. कारण, आनंद ही
शोधण्याची गोष्ट नाही. ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे.
समृद्धी माणसाला सुविधा देते; पण आनंद देण्यासाठी मनाची तयारी आवश्यक असते.
आज प्रश्न जगासमोर नाही, तर प्रत्येक व्यक्तीसमोर आहे. आपण खरोखर आनंदी आहोत का की फक्त समृद्ध आहोत?