

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचा अखेरचा टप्पा आता सुरू आहे. प्रत्यक्ष निवडणूक 5 नोव्हेंबरला असली, तरी काही कोटी मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन किंवा टपाल यंत्रणेमार्फत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणुकीचा निकाल प्रामुख्याने 7 स्विंग राज्यांच्या मतदानावर अवलंबून असेल. एकूण मतचाचण्या लक्षात घेता, ही लढाई अतिशय चुरशीची आणि अटीतटीची होईल, हे मात्र स्पष्ट दिसते. त्यामुळे कोणतेच अंदाज बांधणे आजच्या घडीला तरी अशक्य आहे.
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीला अवघा जेमतेम एक आठवडा उरला असतानाही यात कोण विजयी होणार, याचा अंदाज बांधायला कोणीही तयार नाही. निवडणूक मतदान चाचण्या ही शर्यत अटीतटीची आणि चुरशीची होणार, असेच संकेत देत आहेत. मात्र, ‘हिल’ या अमेरिकन वृत्तपत्राने कमला हॅरिस यांच्या हातातून ही निवडणूक जाण्याची वाढती चिंता डेमोक्रॅटिक गोटात असल्याची बातमी दिली असली, तरी त्याला ठोस आधार नाही. त्यांच्या अंदाजानुसार, बॅटलग्राऊंड राज्यांपैकी ब्ल्यू वॉल म्हणून ओळखली जाणारी पेनसिल्व्हानिया, मिशिगन आणि व्हिसकॉन्सिन ही राज्ये हॅरिस अल्प मतांनी गमावण्याची शक्यता आहे. मिशिगन येथील अरब अमेरिकन मतदारही या पक्षाची चिंता वाढवत आहेत. या पक्षाच्या प्रचार डावपेच ठरविणार्या गटातील एका सूत्राचा हवाला या बातमीत देण्यात आला आहे. ब्ल्यू वॉल राज्यांतील 3 पैकी पेनसिल्व्हानिया जिंकून इतर 2 राज्ये हॅरिस यांनी गमावली, तर त्या नॉर्थ कॅरोलिना आणि नेव्हाडा ही दुसरी राज्ये जिंकून विजयी होऊ शकतात; पण ही राज्ये तसेच अरिझोना आणि जॉर्जियावर त्यांची पकड नाही. तरीही हॅरिस यांनी ज्या शिस्तबद्ध पद्धतीने जोरदार प्रचार चालविला आहे, त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता अध्यक्षपद त्या मिळवतील, असा विश्वास त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही उमेदवारांपुढे मोठमोठी आव्हाने असून, त्यामुळे निकाल कोणाच्याही बाजूने लागू शकतो, असे शेवटी त्यात सूचित केले गेलेले दिसते.
उलटसुलट चर्चेच्या वातावरणात डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक न पक्षांतील प्रचाराला वेग आला असून, वैयक्तिक चिखलफेक करण्याचीही चढाओढ सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात कटुता वाढली असल्यास नवल नाही. मुळात दोन परस्पर भिन्न विचारांची ही लढाई आहे. ट्रम्प सत्तेवर आल्यास लोकशाहीला धोका असून, हुकूमशाही पद्धतीचा कारभार सुरू होईल. देशात अनागोंदी माजेल, अशी भीती डेमोक्रॅटिक पक्ष व्यक्त करीत आहे; तर ट्रम्प सत्तेवर आल्याने अमेरिका पुन्हा एकदा समर्थ, संपन्न आणि महान होईल, बेकायदेशीर स्थलांतर रोखून अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी ग्वाही रिपब्लिकन पक्ष देत आहे. कमालीचे ध्रुवीकरण असलेल्या या देशातील मतदारांची यात कसोटी लागणार आहे. मतदारांना दोन्हीही पक्षांकडून महागाई कमी करण्याची, कर कमी करण्याची, मध्यमवर्गीयांचे जीवन अधिक सुसह्य क रण्याची वारेमाप आश्वासने दिली जात आहेत. अमेरिकेवर कर्जाचा बोजा वाढत असताना ही आश्वासने प्रत्यक्षात आली तर आणखी किती बोजा वाढेल, याची आकडेवारीही येथील वृत्तपत्रे देत आहेत. एकूण मतदारांना खूश करण्याच्या राजकीय नेत्यांच्या क्लृप्त्या कोणत्याही देशात थोड्या फार फरकाने सारख्याच असतात. ही महासत्ताही त्याला अपवाद नाही.
अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हानियामधील मॅकडोनाल्डच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथे अॅप्रन घालून फ्रेंच फ्राईज तळल्या आणि ‘टेक अवे‘साठीच्या छोट्या खिडकीतून डोके वर काढत रांगेत उभे असलेल्या मोटारातील ग्राहकांना त्याचे पार्सल देऊन त्यांच्याशी संवाद साधला. कमला हॅरिस यांनी महाविद्यालयीन जीवनात मॅकडोनाल्ड रेस्टॉरंंटमध्ये काम करून त्या काळात अर्थार्जन केले होते. याची आठवण त्या प्रचारात करून देत असल्याच्या पार्श्वभूमीवर असा प्रसिद्धीसाठीचा स्टंट क रण्याची खुमखुमी ट्रम्प यांना झाली असावी. ठरवून घडवून आणलेल्या या नाट्यात त्यांनी हॅरिस या असे काम केल्याचे खोटे सांगत आहेत, असा आरोपही करायला ते विसरले नाहीत. ट्रम्प यांच्या प्रचारात जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि त्यांचे खंदे पाठीराखे एलॉन मस्क काही ना काही वादग्रस्त विधाने आणि धक्कादायक कृती करीत असल्याचेही सध्या पाहायला मिळत आहे. त्यांच्या प्रचारासाठी त्यांनी साडेसात कोटी डॉलर दिले असून, स्विंग स्टेटस्मधील एका नोंदणीकृत मतदाराला 5 नोव्हेंबरपर्यंत रोज 10 लाख डॉलर लॉटरी पद्धतीने काढून देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. ही कृती येथील निवडणूक कायद्याचा भंग करणारी असली, तरी त्याची पर्वा त्यांना नाही. अमेरिकेच्या पहिल्या आणि दुसर्या घटनादुरुस्तीला (भाषण आणि बंदूक बाळगण्याचे स्वातंत्र्य) पाठिंबा असणार्या निवेदनावर स्वाक्षरी करणार्याला ही भली मोठी रक्कम दिली जात आहे. हे दोन्ही रिपब्लिकन पक्षाचे मुद्दे असून, ट्रम्प यांना अधिकाधिक मते मिळवून देण्याची ही खेळी आहे.
ट्रम्प यांच्याविरोधात त्यांच्याच बरोबर काम केलेल्या अनेकांनी त्यांच्याविरोधात जी जाहीर वक्त्यव्ये केली, त्यातील 91 जणांची यादी त्यांच्या मतांसह ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ‘द डेंजर्स ऑफ डोनाल्ड ट्रम्प, फ्रॉम दोज हू नो हिम’ या शीर्षकाखाली अलीकडेच प्रसिद्ध केली असून, ती विचारात घेण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. या वृत्तपत्राच्या संपादकीय मंडळाने, ट्रम्प देशाचे नेतृत्व करण्याच्या पात्रतेचे नाहीत, असे मत यापूर्वीच नोंदविले आहे. त्यातच व्हाईट हाऊसमधील माजी चीफ ऑफ स्टाफ निवृत्त मरीन जनरल जॉन केली यांनी ट्रम्प पुन्हा निवडून आले तर ते हुकूमशहासारखे वागतील, असा इशारा दिला आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या राजवटीत हे पद सांभाळले होते. ट्रम्प यांना हिटलर कसे प्रिय आहेत, हे सांगताना हिटलर यांच्याकडे जसे जनरल होते तसे जनरल असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती, असेही केली म्हणाले. कमला हॅरिस यांनी त्याची दखल घेऊन या धोक्याची जाणीव करून दिली. ‘देशाच्या घटनेशी निष्ठा असणारे लष्कर ट्रम्प यांना नको आहे, तर व्यक्तिगतरीत्या आपल्याशी निष्ठा असणारे लष्कर त्यांना हवे आहे. आपल्या अंतर्गत शत्रूंना अटकाव करण्यासाठी त्यांनी लष्कराची मदत घेण्याची धमकीही दिली आहे,’ असे त्या म्हणाल्या. निवडणुकीच्या तोंडावर कुंपणावर असलेल्या काही मतदारांना (अनडिसायडेड व्होटर्स) आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न यामागे असावा.
ट्रम्प आपल्या प्रचारात मूळ मुद्द्यांपासून भरकटत जाऊ नयेत, असे त्यांच्या प्रचार यंत्रणेचे प्रयत्न असले तरी ते ऐनवेळी भलत्याच दिशेने जात असल्याचा अनुभव सध्या त्यांच्या सभांमधून वारंवार येत आहे. पेनसिल्व्हानियाच्या सभेत त्यांनी अरनॉल्ड पामर या दिवंगत गोल्फरला श्रद्धांजली वाहण्यासाठी तब्बल 12 मिनिटे खर्च केली. त्यातही त्याच्या पौरुषात्वाचे कौतुक ते काहीशा असभ्य भाषेत करत राहिले. प्रचाराशी त्याचा काहीही संबंध नव्हता. फिलाडेल्फियाच्या एका सभेत दोघांना भोवळ आल्यावर ट्रम्प यांनी चक्क अर्धा तास उपस्थितांसमवेत संगीतात घालविणे पसंद केले. दुसर्या एका सभेत त्यांच्या एका समर्थक महिलेच्या पतीचा उल्लेख ‘फॅट पिग’ (गलेलठ्ठ डुक्कर) असा करून त्याला कोचावरून उठवा आणि मतदानाला न्या. वाटल्यास त्याच्या थोबाडीतही त्यासाठी मारा, असे जाहीरपणे सांगितले. त्याविषयी केवळ हॅरिस यांनीच नव्हे, तर अनेकांनी समाजमाध्यमांवर चीड व्यक्त केली आहे. इतरांपेक्षा वेगळा धक्कादायक नाट्यपूर्ण पवित्रा घेत कधी विनोदी अंगाने तर कधी भडक पद्धतीने मतदारांपुढे जाणे हे तंत्र ट्रम्प यांनी शेवटच्या प्रचाराच्या दिवसांत अवलंबिल्याचे यावरून दिसते. अर्थात, काहीही झाले तरी ट्रम्प यांचा मतदार त्यांना कोणत्याही स्थितीत मतांचे पाठबळ देणार, हेही स्पष्ट आहे. यात कडवे कॉन्झर्वेटिव्ह (31 टक्के), अमेरिकन प्रिझव्हेशनिस्टस् (20 टक्के), खुल्या बाजारपेठेचे समर्थक (25 टक्के), समाजातील उच्चभ्रू (इलिट) विरोधी गट (19 टक्के) आणि डिसएंगेज्ड वर्ग (5 टक्के) इत्यादींचा समावेश होतो. शिवाय, अलीकडील काही दिवसांत खास डेमोक्रॅटिक पक्षाची व्होट बँक समजल्या जाणार्या कृष्णवर्णीय, लॅटिनो आणि ज्यू मतदारांपैकी काहींना आपल्याकडे वळविण्यात ट्रम्प यांना यश आले आहे. बायडेन उभे असताना 2020 मध्ये त्यांना 90 टक्के कृष्णवर्णीयांचा पाठिंबा होता, आता हॅरिस यांना असलेला त्यांचा पाठिंबा कमी होत तो 75 टक्क्यांवर आला आहे, अशी मत चाचणीतील आकडेवारी दर्शविते. याचा फटका एकतृतीयांश कृष्णवर्णीय लोकसंख्या असलेल्या जॉर्जिया या बॅटलग्राऊंड राज्यात बसू शकतो. लॅटिनो मतदारांबाबतही हीच स्थिती आहे. 2020 मध्ये या वर्गातील मतदारांमध्ये 26 पॉईंटस्ची आघाडी बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर घेतली होती; पण न्यूयॉर्क टाइम्स/सिएना कॉलेजच्या पाहणीनुसार, आता ही आघाडी घटून 19 पॉईंटस्वर आली आहे. ज्यू समाजही दुरावत आहे की काय, असेही चित्र आहे. डेमोक्रॅटिक पक्षाला 2016 मध्ये हिलरी क्लिटंन उमेदवार असताना 71 टक्के ज्यूंचा पाठिंबा होता. 2020 मध्ये बायडेन यांना 68 टक्क्यांचा, तर आता हॅरिस यांना 67 टक्क्यांचा पाठिंबा असल्याचे आढळून आले आहे. अँटी सेमीटिझम म्हणजे इस्रायल-ज्यू विरोधातील भूमिका, तसेच गाझातील घटना याचे कारण सांगितले जाते. अरब अमेरिकनही हॅरिस यांच्यामागे पूर्णपणे उभे असल्याचे चित्र नाही. मिशिगनसारख्या स्विंग राज्यात त्याचा प्रतिकूल परिणाम हॅरिस यांच्यावर होऊ शकतो. बेकायदेशीर स्थलांतर, महागाई, गुन्हेगारी रोखणे यासारख्या विषयांवर ऑक्टोबर 2024 च्या हार्वर्ड कॅप्स/हॅरिस पोलमध्ये कमला हॅरिस यांच्या तुलनेत ट्रम्प यांनी अनुक्रमे 12 आणि 4 पॉईंटस्ची आघाडी घेतली आहे. युद्ध आणि शांतता प्रश्नावर ट्रम्प अधिक कार्यक्षम ठरतील, अशीही ही पाहणी सांगते, गर्भपातबंदीबाबत मात्र त्यांच्या भूमिकेला विरोध होत आहे. त्यांच्या पत्नी मेलोनिया ट्रम्प यांनीही तो जाहीरपणे नोंदवला,
हे विशेष. या परिस्थितीतही ट्रम्प यांच्यावर फिदा असणारा, त्यांच्या मर्दानगीची, काहीशा धच्चोट स्वभावाची तारीफ क रणारा, ख्रिश्चॅनिटीवर श्रध्दा असणारा, मेक ग्रेट अमेरिका अगेनचे स्वप्ने पाहणारा, त्यांच्या झगमगाटावर भाळणारा, अर्थव्यवस्था सुधारुन आपल्याला दिलासा मिळेल, अशी आशा बाळगणारा त्यांचा मतदार हा त्यांच्या पाठीमागे काहीही झाले तरी उभा राहणार आहे. हीच मोठी भीती हॅरिस यांच्या पक्षापुढे आहे.
त्यामुळेच या अखेरच्या टप्प्यात कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले लक्ष प्रामुख्याने स्विंग किंवा बॅटलग्राऊंड स्टेट्स म्हणून ओळखल्या जाणार्या 8 ते 9 राज्यांवर केंद्रित केले आहे. कारण येथील मतेच अखेर उमेदवाराला 270 इलेक्टोरल कॉलेजच्या मतांचा आकडा गाठण्यास मदत करणार आहेत. अमेरिकेत सर्वसामान्य मतदार हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराला आपले मत देत असला तरी अमेरिकेच्या प्रत्येक राज्यांनी निवडून दिलेल्या 538 इलेक्टर्सचा समूह (इलेक्टोरल कॉलेज )हा शेवटी ही निवड करत असतो. अमेरिकेतील प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही इलेक्टोरल क़ॉलेज मते देण्यात आली आहेत. अशी एकूण 538 इलेक्टोरल कॉलेज मते संपूर्ण अमेरिकेत आहेत. ज्या उमेदवाराला 270 पेक्षा जास्त इलेक्ट्रोरल मते मिळतात, तो विजयी होतो. शिवाय इथे‘ विनर्स टेक इट ऑल’ हे सूत्र स्विकारले असल्याने संबधित उमेदवाराला ‘पॉप्युलर व्होट्स’ प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त मिळाली तर त्याला त्या राज्याला असलेली सर्व इलेक़्टोरल मते दिली जातात. त्यामुळे देशभरातून सर्वात जास्त पॉप्युलर व्होटस मिळविणारा उमेदवार विजयी होईलच, याची खात्री नाही. उदाहरणार्थ 2016 मध्ये हिलरी क्लिटंन यांना अशी ’पॉप्युलर व्होट्स डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त मिळूनही विजयासाठी आवश्यक असलेली 270 इलेक्टोरल मते मिळू न शकल्याने त्या पराभूत झाल्या होत्या.
त्यामुळेच हे इलेक्टोरल कॉलेजचे गणित आपल्याला अनुकूल व्हावे म्हणून आता कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अख्खी प्रचार यंत्रणा आपले सारे लक्ष ज्याला स्विंग किंवा बॅटलग्राऊंड स्टेट्स म्हणतात त्या 7 राज्यांवर शेवटच्या टप्प्यांवर केंद्रित करीत असल्यास आश्चर्य नाही .
अमेरिकेतील अनेक राज्ये पारंपारिकरीत्या ब्लू ( डेमोक्रॅटिक) किंवा रेड (रिपब्लिकन) राज्ये म्हणून ओळखली जातात. त्यांचा कल एका पक्षाकडे साधारणत: असतो. पण ज्या राज्यांचा कल कोणत्याही उमेदवाराकडे जाण्याची शक्यता असते, त्या स्विंग स्टेट्सच्या मतदारांची मनधरणी करण्याचे आटोकाट प्रयत्न दोन्ही पक्षांकडून म्हणूनच सुरु आहेत. पण त्यांचा कल अजूनही नेमका कोणाकडे आहे, हे निवडणूक पूर्व मतदान चाचण्यांचे दर दिवशी बदलणारे आक़डे पाहता समजणे अशक्य झाले आहे. जो कोणी यात विजयी होईल, तो इथे अगदी कमी मताधिक्याने ही शर्यत जिंकणार, हे मात्र निश्चित एकूण 250 वर्षापुर्वीचे अमेरिकेचे संविधान आहे. त्यात अगदी किरकोळ बदल केलेल्या या घटनेची परंपरा आम्ही अजूनही पाळत आहोत, असे इथे अभिमानाने सांगितले जाते. हे म्हणजे आमच्याकडील कित्येक वर्षांची जुनी कार आम्ही अजूनही वापरत आहोत, असे सांगण्यासारखे आहे. अशी कार व्हिंटेज रॅलीमध्ये मिरवण्यासारखी असेलही. पण सद्यस्थितीत ती कितपत उपयुक्त आहे, हा प्रश्नही आहेच. तथापि ही सदोष पध्दत ट्रम्प यांना 2016 मध्ये लाभदायक ठरली तशीच ती यावेळी ठरणार का,याची भीती डेमोक्रॅटिक गोटात आहे. त्यामुळे राष्ट्रीय मतचाचण्यांमध्ये हॅरिस थोड्या पुढे असल्या तरी ट्रम्प यांच्या पक्षाला त्याची फारशी चिंता नाही. वस्तुत: 1988 नंतर रिपब्लिकन अध्यक्षीय उमेदवाराला 2004 चा अपवाद वगळता एकदाही प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त पॉप्युलर व्होट्स मिळालेली नाहीत. या लोकशाही पूर्व काळातील पध्दतीचा फायदा त्यांचे उमेदवार घेत आहेत. याखेरीज येथील वृत्तपत्रे आणि प्रमुख टेलिव्हिजन वृत्त वाहिन्याही उघडउघड एका विशिष्ठ पक्षाच्या झाल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने सीएनएन सारखे टीव्ही चॅनेल आणि वॉशिंग़्टन पोस्ट तसेच न्युयॉर्क टाईम्स सारखी वृत्तपत्रे आणि रिपब्लिकन पक्षाची तळी उचलायला फॉक्स सारखे टीव्ही चॅनेल आणि वॉल स्ट्रीट जर्नल सारखे दैनिक आहे. एक्स हे एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचाराचे व्यासपीठच करुन टाकले आहे. समाजमाध्यमेही अशी पक्षपाती असल्याने निकाल कोणाच्या बाजूने लागणार, हे सांगता येणे अधिक अवघड होत चालले आहे. वॉशिंग्टन पोस्टने अलिकडेच प्रसिध्द केलेल्या त्यांच्या पाहणी अहवालानुसार प्रमुख 7 स्विंग स्टेट्समध्ये हॅरिस आणि ट्रम्प यापैकी एकही 2 पॉईंटस पेक्षा पुढे नाही. याचा अर्थ शेवटच्या दिवसापर्यंत चित्र बदलण्याची चिन्हे आहेत.
तरीही या टप्प्यांवर या स्विंग स्टेट्सच्या प्रचाराचे चित्र काय आहे, हे समजावून घेणे महत्वाचे. गंमतीची बाब म्हणज़े ही स्विंग राज्ये आणि त्यांचा कल कधीकधी बदलतही असतो. उदाहरणार्थ ओहायओ आणि फ्लोरिडा पुर्वी डेमोक्रॅटिक होती आता पूर्ण रिपब्लिकन झाली आहेत. सध्या या स्विंग राज्यांमध्ये पेनसिल्व्हानिया, ज़ॉर्जिया, नेव्हाडा, मिशिगन, विस्कॉन्सिन, अरिझोना, ओहायओ, फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना, नेब्रास्का, न्यु हॅम्पशायर आदींचा उल्लेख करता येईल. यापैकी सात राज्यांवर सध्या टीव्ही जाहिरातींचा पाऊस पाडला जात आहे. पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदानाची आठवण करुन देत आहेत. काही राज्यात मतदानाला यापुवीच सुरुवात झाली आहे.
या पैकी पेनसिल्हानिया राज्याची 19 इलेक्टोरल मते मिळविण्यासाठी मोठी अहमहमिका सुरु आहे. येथील फिलाडेल्फिया या एका शहरात दोन्ही पक्षाने गेल्या 2 महिन्यात टीव्ही जाहिरातींवर सुमारे15 कोटी डॉलर खर्च केला आहे. पण त्याच्या जवळच्या न्यु जर्सी या मोठ्या लोकसंख्येच्या डेमोक्रॅटिककडे झुकलेल्या राज्यात प्रचारावर फारसा खर्च केल्याचे दिसणार नाही. ट्रम्प यांच्या अनुयायाला आपल्या परिसरात साधा प्रचार फलक लावायचा असेल तर त्याला तो खर्च उचलावा लागेल. टेक्सास या रिपब्लिकन प्रभावाखालील राज्यातही हीच स्थिती आहे.
पेनसिल्वानिया राज्यात दोन्ही पक्षाचे अध्यक्षीय आणि उपाध्यक्षीय उमेदवारांपैकी किमान 1 तरी प्रचाराला येत असल्याचे अलिकडे आढळून आले आहे. ट्रम्प यांनी हे राज्य 2016 च्या निवडणुकीत सुमारे 44 हजार मतांनी म्हणजे एक टक्क्यापेक्षाही कमी मताधिक्याने हिलरी क्लिटंन यांच्याविरोधातील लढतीत जिंकून घेतले होते. तर 2020 मध्ये जो बायडेन यांनी ते सुमारे 81 हजार मतांनी म्हणजे 1. 2 टक्के मताधिक्यांनी आपल्याकडे खेचून आणले होते. वॉशिंग्टन पोस्टच्या पाहणीनुसार गेल्या आठवड्यात इथे 2 टक्क्यांनी हॅरिस पुढे आहेत.
याही स्विंग स्टेट्सची विभागणी रस्ट बेल्ट आणि सन बेल्ट अशी केली जाते. रस्ट बेल्टसमध्ये पेनसिल्वानिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिनचा समावेश होतो. एकेकाळी अमेरिकेचा हा औद्योगिक क्षेत्राचा पाया होता. पेनसिल्वानियात फिलाडेल्फिया आणि पिट्सबर्ग ही दोन मोठी शहरे डेमोक्रॅटिकच्या बाजूला झुकलेली आहेत, फिलाडेल्फियाच्या बाहेरचा उपनगरी भाग हा रिपब्लिकन उमेदवाराला निवडून देणारा होता पण अलिकडे तो डेमोक्रॅटिकला अनुकूल दिसतो. पिट्सबर्गच्या अवतीभवतीच्या काऊंटीज या मात्र रिपब्लिकन आहेत. या राज्याचा उर्वरित भागही रेड म्हणजे रिपब्लिकन प्रभावाचाच म्हणता येईल.
ट्रम्प यांचा लहरी, बेभरवशाचा स्वभाव, 2020 मध्ये निवडणूक निकाल उलथवून लावण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न, आपल्या विरोधकांचा सूड घेण्याची त्यांची भाषा याची त्यांच्या काही समर्थकांना जाणीव असली तरी बेकायदेशीर स्थलांतरितांचा लोंढा, महागाई आणि त्याचे संभाव्य नकारात्मक परिणाम यामुळे कमला हॅरिस यांना निवडून देण्याची त्यांची तयारी नाही, हे ट्रम्प या राज्यात विजयी झाले तर स्पष्ट होईल. हॅरिस यांनी उपनगरी भागातून महिला मतदारांना मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी प्रवृत्त केले तसेच तरुण त्यातही कृष्णवर्णीय यांनाही मतदान केंद्रावर आणले. तसेच ट्रम्प हे पुन्हा सत्तेवर येणे हे देशाच्या दृष्टीने धोक्याचे आहे, अशी भीती असणार्यांना एकत्र आणले तर त्यांचा विजय त्यामुळे झाला, असे म्हणता येईल.
पेनसिल्वानियात स्टील, डेट्रॉईट, मिशिगन इथे कार्सचे उत्पादन होत होते. आता चित्र बदलले असून एकेकाळी भरभराटीला आलेला वर्ग नाराज आणि संतप्त आहे.
़कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक्स मतदारवर्गही इथे मोठ्या प्रमाणावर आहे. तो डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूचा असला तरी मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर पडलेला नाही. त्यांना त्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम हॅरिस यांच्या प्रचार यंत्रणेला करावे लागेल. अलिकडील काळात पिट्सबर्ग येथील दक्षिण अशियाई तर मिशिगन येथील पूर्व अफ्रिक न हा स्थलांतरितांचा गटही मतदार म्हणून महत्वाचा होऊ पाहत आहे. रस्ट बेल्ट राज्ये हे पारंपारिकरीत्या डेमोक्रॅटिक पक्षाकडे कल असलेली आहेत. येथील स्थानिक राजकारणावर कामगार संघटनांचा प्रभाव आहे. सन बेल्टमधील स्विंग राज्यात ज़ॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, अरिझोना आणि नेव्हाडाचा समावेश होतो. ही राज्ये पारंपारिकरीत्या रिपब्लिकन पक्षाच्या बाजुची आहेत. तथापि गेल्या दोन दशकात येथील कमी खर्चाचे जीवन आणि राहणीमान तसेच कमी कर, उत्तम हवामान यामुळे उत्तरेकडील राज्यांमधून अनेक जणांनी इथे स्थलांतर केले आहे. त्यामुळे या राज्यांचा यापुर्वीचा राजकीय समतोल आता ढळलेला दिसतो. या राज्यांमधील तरुण, अधिक पुरोगामी विचारांचे अधिकाधिक मतदार मतदानाला बाहेर काढण्याचा डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रयत्न आहे, तर उतार वयातील गोर्या मतदारांवर रिपब्लिकन पक्षाची भिस्त आहे. मतदानाच्या नियमांवरुनही दोन्ही पक्षात युध्द सुरु आहे. रिपब्लिकन सत्ता असलेल्या राज्यांच्या विधीमंडळांनी मतदान करणे अधिकाधिक कठीण कसे होईल, असे नियम केले आहेत तर डेमोक्रॅटिक राज्ये मतदान सोपे कसे होईल, या दृष्टीने कायदे करीत आहेत.
निवडणुकीच्या रात्री सार्यांचे लक्ष मिशिगन, पेनसिल्वानिया आणि विस्कॉन्सिन या रस्ट बेल्ट च्या राज्या़ंकडे असेल. या राज्यांचे वर्णन ’ब्लू वॉल’ असे केले जाते. डेमोक्रॅटिक उमेदवार हॅरिस यांनी ही तिन्ही राज्ये जिंकून घेतली तर विजय त्यांचाच होईल, अशी खात्रीने सांगता येते. त्यानंतर उर्वरित स्विंग राज्ये ट्रम्प यांनी जिंकून घेतली तरी त्यांना विजयासाठी आवश्यक असलेली इलेक्टोरल मते मिळण्याची शक्यता नाही. गेल्या आठवड्याच्या स्थितीनुसार हॅरिस यांना या 3 राज्यात अल्प आघाडी असल्याचे मत चाचण्यातून आढळून आले. म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कमी राज्ये आणि त्यामधील अगदी कमी मतदार नवा अध्यक्ष ठरविणार आहेत. खरे तर, दीड ते दोन कोटींहून अधिक मतदारांनी आधीच मतदान केले आहे. हॅरिस यांनी प्रचाराच्या शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून ट्रम्प यांच्यावर याबाबत आघाडी घेतली. तिसर्या तिमाहीत त्यांनी सुमारे 100 कोटी डॉलरपेक्षा अधिक निधी जमा केला. सप्टेंबरमध्ये त्यांनी 22 कोटी 18 लाख डॉलरहून अधिक अर्थिक मदत प्रचारासाठी गोळा केली. तर ट्रम्प सप्टेंबरमध्ये सुमारे 6 कोटी 70 लाख एवढीच रक्कम गोळा करु शकले, तथापि जास्त निधी जमा करुनही 2016 मध्ये हिलरी क्लिटंन ट्रम्प यांना पराभूत करु शकल्या नव्ह्त्या. त्यामुळे 7 स्विंग राज्यांची लढाई ही सोपी नाही, याची खूणगाठ बांधूनच निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.