FIFA World Cup 2026 | फुटबॉलचा महासंग्राम आणि अब्जावधींचा थरार!

FIFA World Cup 2026 |
FIFA World Cup 2026 | फुटबॉलचा महासंग्राम आणि अब्जावधींचा थरार!
Published on
Updated on

विवेक कुलकर्णी

तीन बलाढ्य यजमान देश, ३९ दिवसांचा प्रदीर्घ कालावधी, तब्बल ४८ देशांचा सहभाग आणि तब्बल १०४ सामन्यांचा महासंग्राम... फुटबॉल इतिहासातील सर्वात भव्य आणि महाकाय अशा 'फिफा विश्वचषक स्पर्धेला अगदी दणक्‍यात सुरुवात झाली आणि अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन महासत्तांच्या भूमीवर रंगणार्‍या या महाक्रांतीने अवघ्‍या जगाचे लक्ष वेधून घेतले. या महाकुंभमेळ्यात अब्‍जावधींचा थरार कसा रंगतो, यासह स्‍पर्धेतील विविध पैलूंची ही छोटीशी झलक...!

फुटबॉलचा महाकुंभमेळा ही केवळ एका खेळातील स्पर्धा राहिलेली नाही, तर तो मानवी जिद्दीचा, अफाट कौशल्याचा आणि जागतिक अर्थकारणाचा एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. आजवरचे विश्वचषक आपण ३२ संघांच्या एका ठरावीक चौकटीत पाहिले; पण यंदा फिफाने या स्पर्धेचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले आहे. जगातील तीन मोठे देश एकत्र येऊन १६ अत्याधुनिक स्टेडियम्समध्ये या सामन्यांचे आयोजन करत आहेत. तसे पाहता, हा विश्वचषक मैदानावर जितका खेळला जाईल, तितकाच तो बँकांच्या तिजोऱ्यांमध्येही खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे व्यावसायिक मॉडेल प्रामुख्याने तीन स्तंभांवर उभे असते. फिफाची विक्रमी कमाई, यजमान देशांचा खर्च व लाभांश आणि पुरस्‍कारांची खैरात व क्‍लबची भरपाई, असे हे तीन मुख्‍य स्‍तंभ. तिकीट विक्री, जागतिक प्रायोजकत्व आणि डिजिटल व टीव्ही प्रसारण हक्कांच्या माध्यमातून फिफाला तब्बल ११ ते १४ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. आदिदास, कोका-कोला यांसारखे जागतिक ब्रँडस्‌ यासाठी अब्जावधींची गुंतवणूक करतात. सामन्यांची संख्या १०४ वर गेल्याने तिकीट विक्रीतून फिफाला अभूतपूर्व नफा होणार आहे.

यजमान देशांचा खर्च आणि लाभांश हे समीकरणही तितकेच महत्त्वाचे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांनी पायाभूत सुविधा, स्टेडियम्सचे आधुनिकीकरण आणि सुरक्षेवर कोट्यवधी डॉलर्स खर्च केले आहेत; मात्र लाखो परदेशी चाहत्यांच्या आगमनामुळे येथील स्थानिक हॉटेलिंग, विमान वाहतूक, रेस्टॉरंटस्‌ आणि पर्यटन क्षेत्राला सोन्याचे दिवस आले असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली आहे. पुरस्कारांची खैरात आणि क्लब्जना भरपाईचा विचार करता यंदा फिफाने विजेत्या संघासाठी सुमारे ५० ते ६० दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ४०० ते ५०० कोटी रुपये) इतकी घसघशीत रक्कम ठेवली आहे. केवळ साखळी फेरीत खेळणाऱ्या संघांनाही कोट्यवधींचा निधी मिळेल. विशेष म्हणजे, विश्वचषकादरम्यान खेळाडूंचा वेळ आणि त्यांच्या दुखापतींची भरपाई म्हणून फिफा खेळाडूंच्या मूळ व्यावसायिक क्लबना (उदा. रिअल माद्रिद, मँचेस्टर युनायटेड) कोट्यवधी डॉलर्सची नुकसान भरपाई देते.

प्रत्‍यक्ष मैदानात विविध दिग्‍गज खेळाडू व त्‍यांचे संघ कसा परिणामकारक खेळ साकारू शकतात, हा तर या खेळाचा आत्‍माच जणू! मेस्‍सी व अर्जेंटिनाचा विचार करता ३८ वर्षांचा फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सी आपल्या कारकिर्दीतील कदाचित शेवटचा विश्वचषक खेळत आहे. मेस्सीचा गेम प्ले आणि त्याला मिळणारी तरुण मिडफिल्डर्सची साथ यामुळे अर्जेंटिना पुन्हा एकदा ट्रॉफी राखण्यासाठी सज्ज आहे. फ्रान्स आणि किलियन एम्बापे हेदेखील आणखी एक उत्तम मिलाफ असलेले रसायन. फ्रान्सकडे खेळाडूंची अफाट फळी आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. हा संघ यंदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. याशिवाय, सांबा फुटबॉलची अस्सल जादू घेऊन उतरणाऱ्या ब्राझीलच्या आक्रमणाची धुरा यावेळी व्‍हिनिसियस जुनिअर या तरुण स्टारवर असेल. कोट्यवधी ब्राझिलियन चाहत्यांच्या स्वप्नांचे ओझे त्याच्या खांद्यावर असेल.

आधुनिक फुटबॉलचा नवा राजा ज्युड बेलिंगहॅम हा इंग्लंडच्या रणनीतीचा केंद्रबिंदू असेल. हॅरी केनचा अनुभव आणि बेलिंगहॅमची मिडफिल्डमधील आक्रमकता इंग्लंडला जगज्जेतेपद मिळवून देऊ शकते. 'ग्रुप ऑफ डेथ' हा तर कोणत्‍याही फुटबॉल विश्‍वचषकातील अतिशय कळीचा मुद्दा. ४८ संघांच्या समावेशामुळे स्पर्धेत 'अंडरडॉग्ज' संघांची संख्या वाढली आहे. काही ग्रुप इतके कठीण आहेत की, तिथे एखादा बलाढ्य संघ साखळी फेरीतच बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. लहान संघांकडे गमावण्यासारखे काहीच नसल्याने बलाढ्य संघांना प्रत्येक सामन्यात कमालीची सतर्कता बाळगावी लागेल. पंचांचे निर्णय निर्दोष व्हावेत, यासाठी यंदा 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) आणि प्रगत ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर केला जात आहे. यामुळे ऑफसाईड आणि गोललाईनचे वाद कमी होण्‍यास मदत होऊ शकते.

एकंदरीत यंदाचा फुटबॉल विश्‍वचषक ही एका नव्या इतिहासाची नांदीच होय. जागतिक फुटबॉल आता एका अशा वळणावर उभा आहे, जिथे जुन्याजाणत्‍या दिग्‍गजांची सत्ता अबाधित राहणार की नव्या दमाचे तरुण रक्त फुटबॉलच्या सिंहासनावर ताबा मिळवणार, याचा फैसला होणार आहे. एका बाजूला फुटबॉल जगतावर प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्या लिओनेल मेस्सी, रोनाल्डोसारख्‍या दिग्‍गज खेळाडूंच्‍या कारकिर्दीचा हा भावनिक उत्तरार्ध आहे, तर दुसऱ्या बाजूला नव्या युगाची पहाट रचण्यासाठी सज्ज असलेले एम्बापे आणि बेलिंगहॅमसारखे योद्धे आहेत. एव्‍हाना सुरू झालेला हा ऐतिहासिक महासंग्राम केवळ एका नव्या विजेत्याची निवड करणार नाही, तर आगामी दशकातील फुटबॉलची दिशा आणि दशा दोन्ही निश्चित करेल. इतिहास घडण्यासाठी अत्‍याधुनिक स्‍टेडियम्‍स प्रेक्षकांनी खचाखच भरू लागली आहेत. आता प्रतीक्षा आहे ती ही स्‍पर्धा हळूहळू पुढे सरकण्‍याची!

वर्ल्डकपचे आर्थिक गणित...

विक्रमी एकूण महसूल

अंदाजित एकूण महसूल : २०२३ ते २०२६ च्या पूर्ण आर्थिक चक्रात तब्बल १३ अब्ज डॉलर (सुमारे १.०८ लाख कोटी रुपये) महसूल गोळा होत आहे.

फिफाची निव्वळ कमाई : केवळ या एकाच वर्षात (२०२६ मध्ये) फिफाला ८.९ अब्ज डॉलरचा थेट महसूल मिळत आहे.

ऐतिहासिक वाढ : कतार येथे झालेल्या २०२२ च्या विश्वचषकाच्या तुलनेत फिफाच्या महसुलात जवळपास 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

कमाईचे प्रमुख 3 स्रोत

ब्रॉडकास्टिंग, टिकिटिंग अन् स्पॉन्सरशिप टीव्ही व स्ट्रीमिंग हक्क : एकूण कमाईमध्ये सर्वाधिक ४४ टक्के वाटा टीव्ही आणि डिजिटल ब्रॉडकास्टिंगचा. तब्बल ३.९ अब्ज ते ४.३ अब्ज डॉलर कमाई .

तिकीट आणि हॉस्पिटॅलिटी : सामन्यांची संख्या १०४ वर गेल्यामुळे तिकिटांच्या विक्रीतून ३ अब्ज डॉलरची बंपर कमाई होत आहे.

मार्केटिंग आणि स्पॉन्सरशिप : नामांकित कंपन्यांच्या प्रायोजकत्वातून फिफाच्या खात्यात १.८ अब्ज ते २.८ अब्ज डॉलर जमा होत आहेत.

बक्षिसांचा वर्षाव

खेळाडू आणि संघांवर पैशांचा पाऊस

एकूण बक्षीस रक्कम : या स्पर्धेसाठी फिफाने ६५५ दशलक्ष ते ८७१ दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ५,५०० ते ७,२०० कोटी रुपये) इतके रेकॉर्डब्रेक एकूण बजेट ठेवले आहे.

विजेत्याला मिळणारी रक्कम : अंतिम सामना जिंकणार्‍या महाविजेत्या संघाला ५० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त (सुमारे ४१६ कोटी रुपयांहून अधिक) रोकड मिळणार आहे.

सहभागाचा फायदा : स्पर्धेत केवळ पात्र ठरलेल्या प्रत्येक संघाला किमान १२.५ दशलक्ष डॉलर (सुमारे १०४ कोटी रुपये) घरबसल्या मिळणार आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news