FIFA World Cup 2026 Final | ऐतिहासिक महासंग्राम

FIFA World Cup 2026 Final |
FIFA World Cup 2026 Final | ऐतिहासिक महासंग्राम
Published on
Updated on

नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

फिफा विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघाला सुमारे ५० दशलक्ष डॉलर्स (भारतीय रुपयांत सुमारे ४१५ कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळते. विजेता संघ पुढील चार वर्षांसाठी अधिकृत 'वर्ल्ड चॅम्पियन' म्हणून ओळखला जातो. या संघाला आपल्या जर्सीवर एक ‘गोल्डन स्टार’ लावण्याचा मान मिळतो, जो त्यांच्या विजयाचे प्रतीक असतो. याहून अधिक मोलाची असते ती सोन्याची फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी.

न्यूयॉर्क-न्यू जर्सीच्या स्टेडियमवर आज रविवारी, १९ जुलै २०२६ रोजी फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात एका बाजूला बलाढ्य स्पेनचा संघ आहे, तर दुसर्‍या बाजूला गतविजेता आणि लिओनेल मेस्सीच्या जादुई खेळीने नटलेला अर्जेंटिना. हा सामना दोन पिढ्यांमधील संघर्षाचे प्रतीक म्हणून महत्त्वाचा असणार आहे. या स्पर्धेच्या ९६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जगातील अव्वल क्रमांकाचे संघ फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत. त्यामुळे जगभरातील फुटबॉलप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महाअंतिम फेरीतील या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे लॅमिने यामल आणि लिओनेल मेस्सी यांच्यातील समोरासमोर होणारी लढत.

जवळपास २० वर्षांपूर्वी डियारिओ स्पोर्ट आणि युनिसेफच्या एका चॅरिटी रॅफलमध्ये लॅमिने यामलच्या कुटुंबाला लिओनेल मेस्सीसोबत फोटोशूटची संधी मिळाली होती. त्यावेळी चिमुकला असलेला लॅमिने आणि फुटबॉलचा जादूगार मेस्सी यांचा तो फोटो आजही सोशल मीडियावर फिरत आहे. नियतीचा खेळ बघा, ज्या बालकाने मेस्सीसोबत फोटो काढला होता, आज तोच बालक आपल्या कौशल्याने फुटबॉलच्या सर्वोच्च व्यासपीठावर मेस्सीच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस दाखवणार आहे. ही एकप्रकारे वर्तुळपूर्ती म्हणायला हवी. फिफाच्या क्रमवारीत मेस्सीचा अर्जेंटिनाचा संघ अव्वल स्थानी आहे, तर बलाढ्य स्पेनचा संघ या क्रमवारीत दुसर्‍या स्थानी आहे; पण स्पेनच्या संघाने या स्पर्धेत केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. फ्रान्ससारख्या बलाढ्य संघाला उपांत्य सामन्यात २-० ने पराभूत करून स्पेनने आपण विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले आहे. २०००८ नंतर प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेला हा संघ आता इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्पर्धेची सुरुवात केप वर्देविरुद्ध बरोबरीने केल्यानंतर स्पेनने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतरच्या सहा सामन्यांत त्यांनी सातत्यपूर्ण विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रियाला ३-० ने धूळ चारल्यानंतर पोर्तुगालसारख्या तगड्या संघाला १-० ने पराभूत करून ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. मायकेल मारिनोच्या दोन महत्त्वाच्या गोलमुळे बेल्जियमविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये २-१ ने विजय मिळवून स्पेनने आपला दबदबा निर्माण केला. उपांत्य फेरीत फ्रान्ससारख्या बलाढ्य संघाला २-० ने हरवून त्यांनी अंतिम फेरी गाठली. स्पेनची ताकद त्यांच्या तरुण खेळाडूंमध्ये आणि आक्रमक रणनीतीमध्ये आहे. नॉकआऊट सामन्यांमध्ये त्यांनी केवळ एकच गोल स्वीकारला असून ही बाब त्यांच्या अभेद्य बचावाची ताकद दाखवणारी आहे.

दुसरीकडे गतविजेत्या अर्जेंटिनाचा प्रवास मात्र खूप खडतर राहिला आहे. गट साखळीत अल्जेरिया आणि ऑस्ट्रियावर मोठ्या विजयांची नोंद केल्यानंतर नॉकआउट फेरीत त्यांना प्रत्येक पाऊल जिद्दीने टाकावे लागले आहे. केप वर्देविरुद्ध ३-२, इजिप्तविरुद्ध ३-२ आणि स्वित्झर्लंडविरुद्ध ३-१ अशा विजयांसाठी त्यांना एक्स्ट्रा टाईमपर्यंत झुंजावे लागले. मेस्सी सहाव्यांदा विश्वचषकात खेळत असून त्याने आपली जादू कायम ठेवली आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत ८ गोल केले असून त्याचे विश्वचषकातील एकूण गोल २१ वर पोहोचले आहेत. १२ असिस्टसह तो या स्पर्धेचा निर्विवाद राजा ठरला आहे. अर्जेंटिनाचा संघ कितीही संकटात असला, तरी मेस्सीच्या उपस्थितीमुळे तो कधीही हरणार नाही, असा विश्वास चाहत्यांना वाटतो. मेस्सीचा अनुभव आणि त्याचे कौशल्य हे अर्जेंटिनासाठी सर्वात मोठे शस्त्र आहे. गोल करण्याची आणि गोलसाठी संधी निर्माण करण्याची मेस्सीची क्षमता आजही जगातील कोणत्याही डिफेंडरसाठी आव्हान आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १-० ने पिछाडीवर असताना एन्झो फर्नांडिस आणि लाउतारो मार्टिनेझ यांनी केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

मेस्सीची जादू कायम असली, तरी लॅमिने यामल हा या स्पर्धेचा ‘सुपरस्टार’ म्हणून उदयाला आला आहे. सुरुवातीच्या सामन्यांत गोल करण्यात त्याला अपयश आले असले, तरी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने दाखवलेला खेळ पाहून फुटबॉलतज्ज्ञही थक्क झाले आहेत. लॅन्डन डोनोवन यांच्या मते, जेव्हा यामलच्या पायात चेंडू असतो, तेव्हा फ्रान्सच्या बचावपटूंमध्ये भीतीचे वातावरण पसरते. महाअंतिम सामन्यात यामलची तरलता आणि मेस्सीची अचूकता यांच्यात कोण बाजी मारते, यावरच विश्वविजेतेपदाचे भवितव्य अवलंबून आहे. न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर होणार्‍या या ग्रँड फिनालेकडे जगातील कोट्यवधी प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. केवळ युरोप किंवा दक्षिण अमेरिकाच नाही, तर आशिया आणि आफ्रिकेतही या सामन्याची मोठी चर्चा आहे. स्पेनने हा विश्वचषक पटकावला, तर तो त्यांच्या फुटबॉल संस्कृतीतील सुवर्णपान ठरेल. दुसरीकडे अर्जेंटिनाने हा किताब राखला, तर मेस्सीच्या नावावर अतूट विश्वविक्रमाचा साज चढेल.

लुईस दे ला फुएन्टे यांच्या मार्गदर्शनाखालील स्पेनचा खेळ हा त्यांच्या ‘पासिंग गेम’वर अवलंबून आहे. ते चेंडूवर ताबा मिळवून प्रतिस्पर्ध्याला थकवतात. २००८ नंतर प्रथमच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा स्पेनचा संघ या स्पर्धेत अत्यंत शिस्तबद्ध खेळला आहे. मायकेल मेरिनोचे नॉकआऊट सामन्यांमधील गोल स्पेनसाठी निर्णायक ठरले आहेत. याउलट अर्जेंटिनाचा खेळ हा ‘काऊंटर अटॅक’ आणि मेस्सीच्या वैयक्तिक कौशल्यावर जास्त भर देणारा आहे. अर्जेंटिनाच्या बचावपटूंना यामलला रोखण्याचे मोठे आव्हान असेल, तर स्पेनच्या बचावफळीला मेस्सीला रोखण्यासाठी आपल्या क्षमतेच्या पलीकडे जावे लागेल. दोन्ही संघांचे प्रशिक्षक या सामन्यासाठी काही विशेष रणनीती आखत आहेत, ज्याचे परिणाम सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांतच दिसून येतील. यापूर्वी १९६६ च्या विश्वचषकात हे दोन संघ आमनेसामने आले होते, तेव्हा अर्जेंटिनाने २-१ ने विजय मिळवला होता.

फिफा विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघाला सुमारे ५० दशलक्ष डॉलर्स (भारतीय रुपयांत सुमारे ४१५ कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळते. विजेता संघ पुढील चार वर्षांसाठी अधिकृत 'वर्ल्ड चॅम्पियन' म्हणून ओळखला जातो. या संघाला आपल्या जर्सीवर एक ‘गोल्डन स्टार’ लावण्याचा मान मिळतो, जो त्यांच्या विजयाचे प्रतीक असतो. याहून अधिक मोलाची असते ती सोन्याची फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी. ही मूळ ट्रॉफी फिफाच्या संग्रहालयात सुरक्षित ठेवली जाते; मात्र विजेत्या संघाला गोल्ड प्लेटेड अधिकृत प्रतिकृती कायमस्वरूपी दिली जाते. विजेता संघ आगामी ‘फिफा कॉन्फेडरेशन्स कप’ किंवा त्या स्वरूपाच्या महत्त्वाच्या जागतिक स्पर्धांसाठी थेट पात्र ठरतो. ‘फिफा’ला आजच्या काळात लाभलेले ग्लॅमर आणि स्टारडम प्रचंड मोठे आहे. त्यामुळे रविवारचा हा सामना कोण जिंकणार, याकडे समस्त जगभरातील तरुणाईचे लक्ष आहे.

या महामुकाबल्याचे एक रंजक वैशिष्ट्य म्हणजे, मैदानात उतरणारे दोन्ही संघ हे स्पॅनिश भाषेशी आणि संस्कृतीशी जोडलेले आहेत. म्हणूनच कोणतीही टीम हरली, तरी स्पॅनिश भाषा आणि संस्कृतीचाच विजय होणार आहे, हे या सामन्याचे वेगळेपण आहे. मैदानावर जेव्हा स्पेन आणि अर्जेंटिनाचे खेळाडू एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा तो संवाद स्पॅनिश भाषेतूनच होतो. जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांपैकी एक असलेल्या स्पॅनिश भाषेशी जोडलेल्या या दोन देशांपैकी जगज्जेता कोण ठरतो, हे पाहायचे.

स्पॅनिश फुटबॉलमध्ये शिस्तबद्धता आणि टीम वर्कला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. स्पेनच्या खेळाची ‘टिकी-टाका’ ही शैली जगप्रसिद्ध आहे, ज्यामध्ये लहान आणि अचूक पासेसद्वारे चेंडूवर ताबा मिळवून प्रतिस्पर्ध्याला थकवले जाते. म्हणजेच यामध्ये चेंडू स्वतःच्या ताब्यात जास्तीत जास्त वेळ कसा ठेवता येईल, यावर भर दिला जातो. जेव्हा एखादा संघ चेंडू स्वतःच्या ताब्यात ठेवतो, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला चेंडू मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते, ज्यामुळे ते थकतात आणि त्यांच्या बचावात चुका होण्याची शक्यता वाढते. संपूर्ण सामन्यात ७० टक्क्यांहून अधिक वेळ चेंडू आपल्याकडे ठेवण्याचे स्पेनचे उद्दिष्ट असते. चेंडू प्रतिस्पर्ध्याने हिसकावून घेतलाच, तर सर्व खेळाडू मिळून लगेचच त्याच्यावर दबाव आणतात आणि काही सेकंदांत चेंडू परत मिळवण्याचा प्रयत्न करतात. स्पेनच्या राष्ट्रीय संघाने २००८ ते २०१२ या काळात याच शैलीच्या जोरावर युरोपियन चॅम्पियनशिप (२००८, २०१२) आणि विश्वचषक (२०१०) जिंकून जागतिक फुटबॉलवर वर्चस्व गाजवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news