Beed Khurd Caves | बोरघाटातली बीड खुर्द लेणी

Beed Khurd Caves |
Beed Khurd Caves | बोरघाटातली बीड खुर्द लेणी
Published on: 
Updated on: 

नीती मेहेंदळे

रायगड जिल्ह्यात पुणे-मुंबई बोरघाटाच्या आसपास असलेल्या डोंगरसमूहात अमाप लयनआश्चर्ये आहेत. संपूर्ण बोरघाट परिसर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असून तिथे अनेक पुरातत्त्वीय स्थळं आहेत. एरवी डोंगर, दऱ्या, किल्ले आणि धबधबे यांनी भरलेला हा प्रदेश लेणी म्हटलं की, सर्वात प्राचीनतम होऊन जातो असं वाटतं. बोरघाट मार्गावर मोठ्या संख्येने बौद्ध लेणी असल्याचं दिसून येतं. या लेण्यांपैकी भिड किंवा बीड खुर्द गावाजवळ असाच एक लेणीसमूह आहे.

बोरघाट ज्याला 'खंडाळा घाट' असेही म्हणतात. हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध पर्वतीय घाट मार्ग आहे. हा एक प्राचीन व्यापारी मार्ग होता, जो सातवाहन काळापासून कोकण किनारपट्टीला (कल्याण, सोपारासारख्या बंदरांसह) दख्खनच्या पठाराशी, जुन्नर, पैठण, तेर शहरांना जोडण्यासाठी वापरला जात असे. बोरघाट मार्गावर मोठ्या संख्येने बौद्ध लेणी असल्याचं दिसून येतं. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी कोंढाणे, तसेच आंबीवले, हाल, वरणे आणि गंभीरनाथ लेणं असलेलं जांब्रुंग ही स्थळं सह्याद्री पर्वताच्या खालच्या भागात, कर्जत-खालापूरपासून काही मैलांच्या अंतरावर स्थित आहेत. कोंढाणे लेण्यांच्या आसपासच्या डोंगराळ भागात अनेक लहान लेणी आढळतात. या लेण्यांपैकी भिड किंवा बीड खुर्द गावाजवळ असाच एक लेणीसमूह आहे. हे गाव अगदीच लहानसं आहे. गावाच्या बाजूला असलेल्या पूर्वेकडील टेकडीवर 'बीड खुर्द लेणी' आहेत. हे गाव खालापूर या तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर, तर मध्य रेल्वेच्या केळवली आणि डोलवली या स्थानकांपासून सुमारे ३ किमी. अंतरावर वसलेलं आहे आणि मुख्य बोरघाटाच्या उतारावर स्थित आहे.

तर, या गावाच्या डोंगररांगांमध्ये एक पुरातत्त्वीय ठेवा दडलेला आहे, तो म्हणजे लेणी. या बौद्ध लेण्यांना स्थानिक लोक ज्यांना 'पांडव घळई' (म्हणजेच पांडवांच्या गुहा) असं संबोधतात. प्राथमिक संशोधनाअंती असं दिसून येतं की, हे अवशेष सुरुवातीच्या काळातील बौद्ध मठाधिष्ठित जीवनाचे महत्त्वपूर्ण पुरावे आहेत. गावातून लेण्यांकडे जाणारा रस्ता असून ही एक कच्ची पायवाट आहे. डोंगरापाशी गेल्यावर मात्र कातळटप्पा थोडा अवघड आहे. येथे प्रामुख्याने दोन स्वतंत्र लेण्यांची रचना असून त्यातून सुरुवातीच्या काळातील बौद्ध भिख्खूंच्या जीवनशैलीची झलक पाहायला मिळते. येथील गुहा विशेष महत्त्वाच्या आहेत. कारण, येथे दोन छोटे शिलालेख सापडले आहेत, ज्यांच्या आधारे या ठिकाणचा काळ निश्चित करण्यास मदत होते. लेणी क्रमांक १ हे पश्चिमाभिमुख साधं विहार (भिक्कूंचे निवासस्थान) लेणं अर्धवर्तुळाकार खोदलं आहे. ही गुंफा सुमारे २० x १५ फूट रुंद आहे. तिच्या सुरुवातीच्या भागात बाकासारखी रचना आढळते. तसेच, गुहेच्या आतल्या भागातही उत्खननाच्या खुणा दिसून येतात.

लेणी क्र. २ देखील पश्चिमाभिमुख असून पहिल्या गुहेपासून आग्नेय दिशेला जवळच स्थित आहे. यात भिक्कूंच्या निवासासाठी नैऋत्य दिशेला एक स्वतंत्र कक्ष आहे. त्यात कोरलेली एक 'पाणपोढी' आहे. त्याचप्रमाणे या गुहेत 'आसनपोढी' (ओटा) कोरण्याचाही प्रयत्न केलेला दिसतो, ज्याचा वापर येथे राहणारे भिक्कू बसण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी करत असावेत. या बाकावर काही लहान गोलाकार छिद्रे दिसतात. तसेच, कक्षाच्या आतील जमिनीवर एक खाचदेखील आहे. लेण्याच्या डाव्या बाजूस भिक्कूंसाठी ७ x ४ फूट स्वतंत्र कक्ष आहे, जो नैऋत्य दिशेला तोंड करून आहे. या कक्षाला पूर्वी एक दरवाजा असावा. कारण, दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या आणि खालच्या बाजूला त्याचे अवशेष (खाचा) दिसून येतात. या लेण्यात एक ६.५ फूट लांब व अरुंद असा भिक्कूंना बसण्यासाठी आणि ध्यानासाठी दगडी बाक आहे. या बाकाच्या पृष्ठभागावरही लहान गोलाकार छिद्रं आहेत. सुरुवातीच्या काळातील बौद्ध गुहांमधील इतर सर्व विहार कक्षांमध्ये असतं तसं सपाट छत या विहारातही आहे. छताच्या मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण घुमटाकार रचना आढळते. या रचनेवर छिन्नीच्या खुणा स्पष्टपणे दिसतात. या ठिकाणी एकेकाळी दगड, विटा आणि मातीपासून बनवलेला स्तूप असावा, जो कालांतराने नष्ट झाला असावा याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या स्थानिक लोकांच्या सहभागातून या दुसऱ्या लेण्यात एक भव्य बौद्ध स्तूप उभारण्यातही आला आहे.

या मुख्य खोलीच्या उजव्या बाजूला दोन अपूर्ण उत्खननं दिसून येतात. यावरून असे सूचित होतं की, मठाचा विस्तार करण्याची (कदाचित अधिक खोल्या किंवा प्रार्थनागृह जोडण्याची) एक मोठी योजना असावी, जी कधीही पूर्ण होऊ शकली नाही. हे लेणं सुरुवातीच्या थेरवाद कालखंडाचं वैशिष्ट्य दाखवतं. कक्षाच्या बाहेरच्या बाजूला, उजव्या भिंतीला लागून एक लहान बाक आहे. या बाकावर एक खाच आहे. त्याच उजव्या भिंतीवर, वरच्या भागात एक ब्राह्मी लिपीत प्राकृत भाषेत शिलालेख आहे आणि खालच्या भागात प्राण्यांच्या आकृत्यांची काही शैलचित्रं दिसून येतात. हा शिलालेख एका ओळीचा दानविषयक लेख असून, यात सुमारे पंधरा-सोळा अक्षरं असावीत. लेण्यातील कक्षाच्या उजव्या भिंतीच्या दर्शनी भागावर हा अस्पष्ट लेख खडबडीत पृष्ठभागावर कोरलेला आहे. लेख काही प्रमाणात खराब झाला असला, तरी त्यात "...मा ला.. गि रा नम के नम पु ता दा.." एवढं वाचता येतं. मात्र, शिलालेखाची सुरुवातीची काही अक्षरं नष्ट झाल्यामुळे त्या वाक्यात उल्लेखलेल्या पर्वताचे नेमके नाव जाणून घेणं शक्य नाही.

या शिलालेखाचा अनुवाद असा आहे: ''...गिरी (टेकडी) येथे राहणाऱ्या केझका यांच्या पुत्राकडून (दिलेली एक पुण्यप्रद भेट)''.

दोन्ही शिलालेख अपूर्ण वाटतात. काय दान केलं त्याचा नीट उल्लेख दिसत नाही. शिलालेख लेण्याचं काम पूर्ण होण्यापूर्वीच कोरलेले असावेत, हे सुरुवातीच्या काळातील गुहा-शिलालेखांचं लक्षण आहे. दुसऱ्या लेण्यातील कक्षाच्या उजव्या बाजूला दोन उत्खनन प्रयत्न दिसतात. कदाचित तिथे एखादी जागा (भिक्कूंचा कक्ष किंवा प्रार्थनागृह) खोदण्याचा प्रयत्न केला असावा. एक व्यक्ती झोपू शकेल इतकी अरुंद ही गोलाकार गुहा आहे. या गुहेच्या आतील बाजूला एक शिलालेखही कोरलेला आहे. हा दुसरा शिलालेख लेणी क्रमांक २ च्या बाजूच्या एका अपूर्ण उत्खननाच्या ठिकाणी सापडलेला असून छोटा आहे. हा शिलालेख गुहेच्या उजव्या बाजूला असलेल्या एका लहान कोनाड्यात कोरलेला आहे. पाहताक्षणी हा एक अपूर्ण शिलालेख वाटतो. ज्यात प्राकृत-सिहपभक (सिहपभकर) असं कोरलं आहे. त्याचा अर्थ संस्कृतमध्ये सिंहप्रभाक (सिंहप्रभाकर) असा होतो. 'सिहपभकर' किंवा 'सिंहप्रभाकर' यांसारखं एखादं वैयक्तिक नाव असू शकतं.

या शिलालेखांमधील अक्षरवाटिकेवरून मौर्यकालीन आणि सुरुवातीच्या सातवाहनकालीन वैशिष्ट्यांचं मिश्रण दिसून येतं. यावरून असं सूचित होतं की, हे शिलालेख मौर्योत्तर काळात म्हणजेच ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकाच्या सुमारास कोरले गेले असावेत.

या लेण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भिंतींवर असलेली शैलकला. शैलकलेमध्ये प्रागैतिहासिक काळापासून ते सुरुवातीच्या ऐतिहासिक काळापर्यंत मानवांनी खडकांवर किंवा गुहांमध्ये कोरलेली चित्रं आणि शिल्पं यांचा समावेश होतो. यापैकी उजव्या भिंतीवर, शिलालेखाच्या खाली, घोडे, हरिण किंवा गाढव यांसारखे चार पाय असलेले प्राणी कोरलेले आहेत. या भिंतीवरील प्राण्यांपैकी मधला प्राणी विशेष आहे. कारण, त्याचे पाय तुलनेने आखूड आहेत आणि शरीराची लांबी अधिक आहे. त्याचबरोबर डाव्या भिंतीवर स्वस्तिक, देठासह कमळाचे फूल आणि काही अनाकलनीय चिन्हं कोरलेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.