

सोनम परब
रणवीर सिंगसह सहकलाकारांचा दमदार अभिनय, आदित्य धरचे कसलेले दिग्दर्शन आणि ऐतिहासिक घटनांची गुंतलेली गुंफण यांमुळे ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. ‘धुरंधर’ ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या बदलत्या प्रवाहाची नांदी आहे. आशयघन मांडणीला तांत्रिक भव्यतेची जोड मिळते, तेव्हा बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडीत निघतात, हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीसाठी यंदाचे वर्ष कसे ठरले, याचा आढावा घेताना काही आठवड्यांपूर्वीपर्यंत ‘सैयारा’ या जेन-झेडसह लाखो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या चित्रपटाची चर्चा प्राधान्याने होत होती; परंतु तीन आठवड्यांपूर्वी आलेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने सारा माहोलच बदलून टाकला आहे. गुप्तहेरांचे विश्व किंवा हेरगिरीच्या सुरस कथा यांविषयीची अनामिक उत्सुकता हा नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. प्रेक्षकांमध्ये असणारे हे कुतूहल शमवण्याचा प्रयत्न साहित्यविश्वाने जसा केला, तशाच प्रकारे रूपेरी पडद्यावरही गुप्तहेरांवर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले; पण ‘धुरंधर’ हा त्या पारंपरिक धाटणीत किंवा पठडीत बसणारा नसून त्या चौकटीपलीकडेही त्याला विविध पैलू आहेत आणि या पैलूंमुळेच चित्रपटाने तुफान यश मिळवले आहे. सुरुवातीला समाधानकारक ओपनिंग घेणार्या या चित्रपटाची घोडदौड अपेक्षेपलीकडे गेल्याने निर्माते-दिग्दर्शक आणि एकूणच चित्रपटाच्या टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे. नऊ दिवसांत 400 कोटी रुपयांची कमाई करेल, असे कुणालाही वाटले नव्हते; पण चित्रपटाची लोकप्रियता वाढतच चालली आहे. त्यामुळे यंदा सलग दुसर्यांदा मंगळवारी दिली जाणारी 99 रुपयांची तिकीट सवलत ‘धुरंधर’साठी लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजवरच्या इतिहासात असे करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. मंगळवारच्या सवलतीची योजना दि. 22 एप्रिल 2025 पासून सुरू झाली. त्यानंतर आतापर्यंत ‘रेड 2’ आणि ‘सितारे जमीन पर’ या केवळ दोन चित्रपटांनी पहिल्या आठवड्यात ही सवलत स्वीकारली नव्हती; मात्र या दोन्ही चित्रपटांनी दुसर्या आठवड्यात सवलत लागू केली होती. त्या तुलनेत ‘धुरंधर’ने सलग दोन आठवडे ही सवलत नाकारत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
‘धुरंधर’च्या या अफाट लोकप्रियतेची मीमांसा करताना चित्रपटाचे कथानक, सादरीकरण, कलाकारांचा सशक्त अभिनय, व्हिज्युअल इफेक्टस् यांच्या बरोबरीने दिग्दर्शकांनी वर्तमानातील लोकमानसिकतेचा अचूक वेध घेतल्याचे स्पष्ट जाणवते. भारतीय चित्रपटसृष्टीत काही चित्रपट केवळ मनोरंजनासाठी येतात, तर काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवण्यासाठी. दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ हा चित्रपट दुसर्या श्रेेणीत मोडतो. प्रेक्षकांनी या कलाकृतीला केवळ चित्रपट म्हणून न स्वीकारता एका राष्ट्रीय भावनेच्या रूपात स्वीकारल्याचे दिसून येते. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि आपल्या देशाच्या इतिहासातील काळ्या कालखंडाचा अत्यंत टोकदार धांडोळा घेतो. चित्रपटाचा सर्वात मोठा कणा म्हणजे त्याची पटकथा. ही कथा केवळ मनोरंजनप्रधान नसून भारतीय लोकशाहीवर झालेल्या आघातांच्या जखमांना पुन्हा एकदा अधोरेखित करणारी आहे. संसदेवरील हल्ला, मुंबईतील पहिला दहशतवादी हल्ला आणि कंदाहार विमान अपहरण यांसारख्या राष्ट्रीय शोकांतिकांभोवती या चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे. या घटनांचा वापर करताना दिग्दर्शकाने कोठेही अतिरंजित नाट्याचा किंवा मेलोड्रामाचा आधार घेतलेला नाही, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य! वास्तवाचा पाया आणि त्यावर उभारलेली काल्पनिक पात्रांची इमारत इतकी भक्कम आहे की, प्रेक्षक चित्रपट पाहताना त्या काळातील दहशतीचा अनुभव घेतात. इतिहास आणि कल्पनाशक्तीचा असा सुवर्णमध्य साधला जातो, तेव्हा तो प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडतो. हेच या चित्रपटाच्या पहिल्या यशाचे गमक आहे.
दुसरे म्हणजे, आजचा प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘चॅप्टर-बेस्ड’ (प्रकरणानुसार) मांडणीला सरावलेला आहे. आदित्य धर यांनी हीच बाब ओळखून एका धाडसी प्रयोगाची आखणी केली. 3 तास 34 मिनिटांचा हा चित्रपट असूनही तो कोठेही रेंगाळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, त्याची प्रकरणांमध्ये केलेली विभागणी. एका मोठ्या कॅनव्हासवर वेब सीरिजच्या धाटणीने कथा सांगणे, हा भारतीय सिनेमातील एक नवा प्रवाह असून येणार्या काळात त्याचे लाटेत रूपांतर झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. कारण, तरुणाईला ही शैली विशेष भावली आहे. चित्रपट तांत्रिकद़ृष्ट्या इतका प्रगत आणि वेगवान आहे की, लांबी जास्त असूनही प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतात. यात रणवीर सिंगची ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा या मांडणीला अधिक उंचीवर नेऊन ठेवते. अर्थात, केवळ एका नायकाच्या बळावर चित्रपट चालवण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. ‘धुरंधर’च्या यशात रणवीर सिंगइतकाच वाटा त्याच्या सहकलाकारांचाही आहे. राकेश बेदी यांनी साकारलेला पाकिस्तानी राजकारणी प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. आर. माधवनचा संयत पण प्रभावी अभिनय असो किंवा अक्षय खन्नाच्या शब्दांतील धारदारपणा आणि डोळ्यांतील चमक असो किंवा संजय दत्त आणि अर्जुन रामपाल या दिग्गज कलाकारांनी आपापल्या पात्रांना पूर्ण न्याय देताना कथानकात अपेक्षित असलेला तणाव कायम ठेवण्यासाठी घेतलेली मेहनत असो, या सर्वांच्या सशक्त अभिनयामुळे चित्रपट कोणत्याही क्षणी प्रेक्षकांच्या मनावर घेतलेली पकड सोडत नाही. प्रत्येक पात्राची मांडणी स्वतंत्र ट्रॅकवर करण्यात आली असली, तरी शेवटी त्या सर्व तारा एकाच बिंदूवर येऊन मिळतात. कलाकारांच्या केमिस्ट्रीमुळे पडद्यावर जे नाट्य उभं राहतं, ते प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतं.
आदित्य धर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’नंतर त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. ‘धुरंधर’च्या माध्यमातून त्यांनी हे सिद्ध केले आहे की, ते केवळ योगायोगाने यशस्वी झालेले दिग्दर्शक नाहीत. संवादांची फेक, भावनिक प्रसंगांतील जिवंतपणा आणि वेगवानपणा टिकवतानाही नाट्यमयता कमी होऊ न देण्याची हातोटी या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम एका निश्चित उद्दिष्टाने रचलेली दिसते. चित्रपट मोठा असूनही त्याचे एडिटिंग इतके चपखल आहे की, प्रेक्षकांचे लक्ष विचलित होत नाही. दिग्दर्शकाने कथेतील सत्यता आणि प्रेक्षकांचे मनोरंजन यांचा जो समतोल राखला आहे, तो वाखाणण्याजोगा आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे, चित्रपटातील अॅक्शन सीन्स हे केवळ टाळ्या मिळवण्यासाठी घातलेले नसून ते कथेची गरज म्हणून येतात. अंगावर काटा आणणारे स्टंटस्, रॉ आणि रिअल वाटणारी मारामारी आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर यामुळे हा चित्रपट जागतिक दर्जाचा वाटतो. रणवीर सिंगची पडद्यावरील ऊर्जा या अॅक्शन सीन्सना एका वेगळ्याच स्तरावर नेते. त्याच्या देहबोलीतून दिसणारा आवेश आणि शत्रूवर तुटून पडण्याची जिद्द प्रेक्षकांना रोमांचित करते.
थोडक्यात सांगायचे, तर ‘धुरंधर’ ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या बदलत्या प्रवाहाची नांदी आहे. आशयघन मांडणीला तांत्रिक भव्यतेची जोड मिळते, तेव्हा बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडीत निघतात, हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. राष्ट्रवाद, इतिहास आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असल्याने हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हा चित्रपट रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरणार, यात शंका नाही. वास्तवाचा आधार घेतलेल्या या गुप्तचर थरारपटाने बॉलीवूडमध्ये आशयघन चित्रपटांची गरज अधोरेखित केली आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग अद्याप यायचा असल्याने ‘धुरंधर’चा हा प्रवास सध्या तरी थांबणारा दिसत नाही.