

प्रा. प्रवीण दवणे, ज्येष्ठ कवी, गीतकार
प्राजक्ताची तरलता घेऊन आलेल्या सुमनताई कल्याणपूर यांच्या स्वरात एक तरी गाणे ध्वनिमुद्रित व्हावे हे माझे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाले ते माझे संगीतकार मित्र शांक-नील यांच्यामुळे. 'शब्दांचा मोर भिजे', 'चल झेलूया गाणे', 'ही वाट कुणी मंतरली' ही तीन मी लिहिलेली भावगीते त्यांनी गायिली, हे लेखणीचे भाग्य! गाण्यातील कविता समजून घेण्याचा त्यांचा आग्रह आणि वय पुसून भावगीताच्या कथेत स्वतःला पूर्ण भिजवून अचूक गाण्याची त्यांची प्रतिभा अलौकिक होती. लतादीदी, आशाताई आणि आता सुमनताई! सहा दशके रूपेरी पडदा सुरेल करणार्या या तीन सर्वश्रेष्ठ गायिका! सुमनताईंच्या निघून जाण्याने एका सुवर्णपर्वाची मूर्तिमंत अखेर झाली.
प्राजक्ताची तरलता घेऊन आलेल्या सुमनताई कल्याणपूर यांच्या स्वरात एक तरी गाणे ध्वनिमुद्रित व्हावे, हे माझे स्वप्न होते. त्यापूर्वी लता मंगेशकर, आशा भोसले यांनी माझी गाणी गायिली होती. आता ओढ होती ती सुमनताई माझे गाणे केव्हा गातील याची; पण तोपर्यंत सुमन कल्याणपूर यांनी ध्वनिमुद्रणासाठी गाणे, नुसते कमी नव्हे, तर जवळजवळ बंद केले होते. त्यामुळे आता त्या माझे गाणे गातील की नाही, याविषयी माझ्या मनात अर्थातच थोडी उदासीनतेचे भावना होती. इतकी वर्षं गीतलेखन करून, या क्षेत्रात वावरूनही त्यांचे मला दुरूनही दर्शने झाले नव्हते. त्यांना बघण्याची इतकी ओढ असण्याचं कारण म्हणजे, अगदी बालपणी ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील त्यांनी गायिलेले ‘कसे करू स्वागता?’ हे गाणे. ग. दि. माडगूळकर यांचे यातील शब्द म्हणून अर्थातच मला आवडले होते; परंतु सुरेखा या अभिनेत्रीवर चित्रीत झालेले हे गाणे इतके भावपूर्ण होते, त्या स्वरांत इतका उत्कट अभिनय होता की, इतर दोन गाणी आशाताईंची असूनही त्याचबरोबरीने सुमन कल्याणपूर यांचे ते गाणे माझ्या लक्षात राहिले. त्याच वेळी थोडे आधी ‘एकटी’ नावाचा चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटात सुलोचनाबाईंवर चित्रित झालेले ‘लिंबलोण उतरू कशी, असशी दूर लांब तू’ हे वात्सल्य गीत डोळ्यांत पाणी आणणारे होते.
‘अरे संसार संसार.. जसा तवा चुल्ह्यावर’ हे बहिणाबाई चौधरी यांचे काव्य त्यांनी अजरामर केले होते. नंतर अशोक पत्की यांच्या संगीतातील गीतांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ‘नाविका रे वारा वाहे रे!’, ‘वाट इथे स्वप्नांची संपली जणू’, ‘केतकीच्या बनी तेथे नाचला गं मोर’ अशा अनेक गीतांतून सुमनताईंच्या स्वरांनी बालपणी नि तरुणपणी वेड लावले होते. अनेक मराठी गीतांप्रमाणे हिंदी गाण्यांतून सुमनस्वर रुंजी घालत होता. ‘जहां प्यार मिले’ या चित्रपटातील ‘चले जा, चले जा, चले जा, जहाँ प्यार मिले’ हे गाणे बिनाका गीतमालेत अनेकदा ऐकून मनावर कोरले गेले होते. सुमनताईंना प्रत्यक्ष पाहणे, भेटणे हे म्हणूनच माझे एक भावुक स्वप्न होते. त्यांनी माझी गीतरचना गाणे ही तर पुढची गोष्ट; परंतु त्यांना प्रत्यक्ष पाहणे हाही माझ्या श्रद्धेचा विषय होता. त्या कुठल्याही समारंभात उपस्थित राहत नव्हत्या. त्या कुठे राहतात, हे मला माहीत नव्हते. अशावेळी चमत्कार व्हावा तसा एक फोन आला. माझे संगीतकार मित्र पंडित शशांक कट्टी यांचा. त्यांचे बंधू सुनील कट्टी हे एसएनडीटीमध्ये संगीत प्राध्यापक होते. हे दोन बंधू एकत्र येऊन ‘शांकनील’ या नावाने संगीतजगात परिचित झाले होते. त्यातील शशांक कट्टी यांचा अचानक फोन आला. व्हिनस ही कंपनी आठ गाण्यांची एक दीर्घ ध्वनिमुद्रिका काढत आहे आणि ही सर्व गाणी सुमनताई कल्याणपूर गाणार आहेत. त्यातील एक गाणे तू लिहावे, असे मला वाटते. माझा माझ्या कानावर विश्वास बसेना. ज्यांना पाहणे हे स्वप्न होते, त्या सुमनताई प्रत्यक्ष माझे गीत गातील याचा त्या उमेदीच्या वयात एक ताजातवाना आनंद होता. मी विचारले, गाणे कधीपर्यंत पाहिजे? शशांकजी म्हणाले, उद्याच पाहिजे! इतक्या लगेच गाणे आणि तेही सुमनताईंसाठी..? हे एक आव्हान होते आणि आव्हान स्वीकारून ते पूर्ण करणे हा माझा स्वभाव होता. त्याच रात्री मी स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे मुखडे लिहून बाजूला ठेवले. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास मला स्वतःला योग्य वाटणारे नवीन शब्द सुचले.
'शब्दांचा मोर भिजे श्रावणात झुरताना!
येशील.. तू येशील..
सांगेन मी श्वासाना!'
आणि पुढे गाणे पहाटे पाचपर्यंत पूर्ण झाले. ते गाणे दुसर्या दिवशी फोनवरच शशांक यांना सांगून लिहून दिले. त्यांनी ते सुमनताईंकडे दिले. आम्हाला तर शब्द आवडले आहेत, आता सुमनताई काय ठरवतील त्याप्रमाणे पुढे जाईल. रचलेली सात गाणी इतर कवींनी लिहून, चाल लावून पूर्ण होत आली होती. आता एकच गीत लेखनाची मला ही संधी होती. मी तणावात होतो. सुमनताईंना शब्द आवडतील का? त्या काय म्हणतील, याची उत्सुकता आणि पुढे टेन्शनच होते. दुसर्या दिवशी रात्री पुन्हा संगीतकाराचा फोन आला. ते म्हणाले, सुमनताईंना तुझे गाणे अतिशय आवडले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी तुला त्यांच्या घरी बोलावले आहे. पुढे ते म्हणाले, इतर कवींची दोन गाणी बाजूला ठेवून आणखी दोन गाणी तू लिहावीस असेही त्यांनी सुचवले आहे. एखाद्या भुकेल्या माणसाला चटणी भाकरी मिळाली, तरीही पंचपक्वान्न वाटते. इथे तर मला पंचपक्वान्न मिळाले. आता दुसरे काय हवे?
वांद्रे येथील त्यांच्या घरी मी अगदी वेळेत गेलो. अतिशय रसिकतेने सजवलेला हॉल, भरतकाम आणि विणलेले पडदे, सारे वातावरण प्रसन्न. घरातील सेवकाने दिलेले स्वच्छ काचेच्या ग्लासमधील पाणी, ते घेत असतानाच मोतिया रंगाची साडी, त्यावर फुलांची नक्षी आणि अतिशय हसतमुख अशा सुमनताई हॉलमध्ये आल्या. मी ईश्वराच्या मूर्तीकडे पाहत राहावे तसा पाहत राहिलो. ज्यांनी लता आणि आशा या उत्तुंग युगात स्वतःचे स्थान निर्माण केले, अतिशय अवघड गोष्ट होती ती! ते स्थान कर्तृत्वाने निश्चित करणारा सात्विक चेहरा मी पाहत होतो. या एका भेटीत त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू मला कळले. माझ्याकडून काव्य त्यांनी पूर्ण वाचून घेतले. त्यातून कवी म्हणून मला काय म्हणायचे आहे, ते आग्रहपूर्वक विचारले. समजावून सांगायला सांगितले. त्यावरही त्यांनी थोडी चर्चा केली. त्यांच्याशी बोलताना गाण्यापूर्वी कवितेचा आशय समजून घेण्याची त्याही वयात असलेली त्यांची उत्सुकता मला थक्क करणारी होती. आणखी नवीन दोन गाणी त्यांच्या हाती दिली. तीही त्यांना आवडली. नंतरच्या अनौपचारिक गप्पांमध्ये काही गाण्यांच्या आठवणी विचारल्या. ओघाने त्या ओळी सुमनताई गुणगुणून दाखवू लागल्या. त्या क्षणीचा त्यांचा स्वर मी अनुभवला. अंगावर अक्षरशः रोमांच येत होते. अजूनही साठ-सत्तरच्या दशकातील वाटावा असा ताजा स्वर होता तो. सत्तरीच्या वयातही एक उत्कट विशीची युवती त्या स्वरांतून मला जाणवत होती. अतिशय आनंदाचे असे क्षण होते ते. 'शब्दांचा मोर भिजे', 'चल झेलूया गाणे', 'ही वाट कुणी मंतरली?' ही तीन मी लिहिलेली भावगीते त्यांनी गायिली, हे लेखणीचे भाग्य!