Ramayana stories | रामकथांची मोहिनी

आज पुन्हा एकदा ही कथा आधुनिक रूपड्यात प्रेक्षकांसमोर
enchantment-of-ramayana-stories
Ramayana stories | रामकथांची मोहिनीPudhari File Photo
Published on
Updated on

सोनम परब

प्रभू श्रीराम हे केवळ देवता म्हणून नव्हे, तर मर्यादा, धर्मपालन, आदर्श, कर्तव्यनिष्ठा यांचे प्रतीक मानले जातात आणि त्यांना भारतीय समाजात विशेष स्थान आहे. त्यामुळेच सिनेमाच्या आरंभीच्या काळापासून आजपर्यंत जवळजवळ प्रत्येक दशकात रामायणावर आधारित चित्रपट किंवा दूरदर्शन मालिका प्रेक्षकांसमोर आली आणि लोकांनी त्याचे भरभरून स्वागत केले. आज पुन्हा एकदा ही कथा आधुनिक रूपड्यात प्रेक्षकांसमोर येत आहे.

हिंदी सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर तो भारतीय समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचाही एक महत्त्वाचा घटक आहे. गेल्या सव्वाशे वर्षांच्या या प्रवासात अनेक विषय, कथानके, व्यक्तिरेखा पडद्यावर आल्या; पण त्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले विषय म्हणजे रामायण व महाभारतासारख्या पौराणिक कथा. यातही रामकथा ही प्रेक्षकांच्या भावविश्वात खोलवर रुजलेली कथा आहे. कारण, प्रभू श्रीराम हे केवळ देवता म्हणून नव्हे, तर मर्यादा, धर्मपालन, आदर्श, कर्तव्यनिष्ठा यांचे प्रतीक मानले जातात आणि त्यांना भारतीय समाजात विशेष स्थान आहे. त्यामुळेच सिनेमाच्या आरंभीच्या काळापासून आजपर्यंत जवळजवळ प्रत्येक दशकात रामायणावर आधारित चित्रपट किंवा दूरदर्शन मालिका प्रेक्षकांसमोर आली आणि लोकांनी त्याचे भरभरून स्वागत केले.

दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपट तयार केल्यानंतर त्यांनी निवडलेला विषय होता ‘लंका दहन’ (1917). हीच रामकथेला पडद्यावर आणणारी पहिली मोठी कलाकृती ठरली. आवाज नसलेल्या त्या मूकपटांच्या काळातही या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मुंबईतील चित्रपटगृहांबाहेर हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. लंका दहनमध्ये अण्णा साळुंके यांनी राम व सीता ही दोन्ही पात्रे साकारली. म्हणजेच भारतीय सिनेमाच्या इतिहासातील पहिले डबल रोल या चित्रपटात झाले. त्या काळात स्त्रियांची भूमिका पुरुषच साकारत असत, याचे हे उदाहरण ठरते.

रामायणासारख्या पौराणिक कथा पडद्यावर आणणे ही दिग्दर्शकांसाठी एक प्रकारची दिव्य जबाबदारी होती. कारण, या कथा लोकांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्याबद्दल समाजात संवेदनशीलता आहे. दादासाहेब फाळके यांना ‘द लाईफ ऑफ क्राईस्ट’ हा परदेशी चित्रपट पाहून जेव्हा प्रेरणा मिळाली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर भारतीय देवतांची रूपे उभी राहिली. येशू ख्रिस्तांचे चमत्कार पडद्यावर दाखवले जात असतील, तर राम-कृष्णासारख्या भारतीय देवतांच्या कथा का नाही, असा विचार करून त्यांनी आपला प्रवास सुरू केला.

1920 मध्ये जी. व्ही. साने यांनी रामजन्म या चित्रपटातून या परंपरेला पुढे नेले. 1932 मध्ये व्ही. शांताराम यांनी ‘अयोध्येचा राजा’ आणला. 1942 मध्ये विजय भट्ट यांच्या भरत मिलाप व 1943 मध्ये आलेल्या ‘रामराज्य’ने प्रेक्षकांच्या मनात रामकथेची गोडी आणखी घट्ट केली. ‘राम राज्य’मध्ये प्रभू रामांची भूमिका प्रेम अदीब यांनी केली होती. त्यांच्या छायाचित्रांवर लोक पुष्पमाला चढवून पूजेसाठी ठेवत असत. म्हणजेच पडद्यावरील कलाकार थेट देवतेच्या रूपात पूजले जाऊ लागले.

1961 मध्ये बाबुभाई मिस्त्री यांनी बनवलेला ‘संपूर्ण रामायण’ हा चित्रपट रामकथेच्या चित्रपट प्रवासातील पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटात रावण व हनुमानाला आकाशात उडताना दाखवण्यात आले, तर राम-रावण युद्धाचे द़ृश्य विशेष परिणामांसह उभे केले गेले. त्या काळातली तांत्रिक साधने मर्यादित असूनही प्रेक्षकांना या नव्या द़ृश्यभाषेने मोहित केले. या चित्रपटात बी. एम. व्यास यांनी रावणाची भूमिका साकारली होती. नंतरच्या दशकातही रामकथा वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी पडद्यावर आणली.

1980 आणि 1990 च्या दशकात दूरदर्शनवर रामानंद सागर यांनी साकारलेली ‘रामायण’ ही मालिका एक प्रकारची सांस्कृतिक चळवळ ठरली. घरोघरी फारसे दूरदर्शन संच नसलेल्या त्या काळात रविवार सकाळी मालिका सुरू झाली की, रस्ते ओस पडत असत. त्या मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारली की, देशभरात त्यांना प्रत्यक्षात राम मानले जाऊ लागले. त्याच मालिकेत दीपिका चिखलिया सीता, सुनील लहरी लक्ष्मण आणि अरविंद त्रिवेदी रावण या भूमिकांत लोकप्रिय झाले. मालिकेच्या प्रसारणानंतर त्यांच्या छायाचित्रांनाही लोक देवघरात स्थान देऊ लागले होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या मालिकेने समाजावर परिणाम घडवणे, हे अनोखेच होते. याच काळात दक्षिणेकडील सिनेमातही रामायणाच्या विविध आवृत्त्या आल्या. तेलुगू भाषेत, तर सर्वाधिक चित्रपट रामकथेशी संबंधित आहेत. एकुणात, भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर 50 पेक्षा अधिक चित्रपट आणि 18 दूरदर्शन मालिका रामायणावर आधारित बनल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक पिढीने आपल्या काळात रामकथेची नवी आवृत्ती पडद्यावर पाहिली आहे.

आज पुन्हा एकदा ही कथा आधुनिक रूपड्यात प्रेक्षकांसमोर येत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण हा 4000 कोटी रुपयांचा प्रकल्प याच परंपरेला नव्या भव्यतेने पुढे नेतो आहे. रणबीर कपूर ‘राम’, यश ‘रावण’ आणि सनी देओल ‘हनुमान’ या भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग 2026 मध्ये प्रदर्शित होणार असून त्यानंतर दुसरा भाग येईल. या दोन्ही भागांना मिळून 8000 कोटींची कमाई करावी लागणार आहे, तेव्हाच ते हिट मानले जाईल. भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक म्हणून त्याची चर्चा सुरू आहे.

यात गंमत अशी की, कथानक कुणालाही नवीन नाही. देशातील जवळपास सर्वच बालके राम-रावण युद्धाची गोष्ट ऐकूनच मोठी होतात. मग, इतक्या मोठ्या बजेटमध्ये ती कथा पुन्हा का सादर केली जात आहे? याचे उत्तर म्हणजे, श्रद्धा आणि सांस्कृतिक प्रभाव व आकर्षण. प्रभू श्रीराम हे भारतीय समाजाच्या चेतनेचे प्रतीक आहेत. धर्म, नैतिकता, कर्तव्यपालन यांचा मूर्तिमंत आदर्श म्हणून त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, दिग्दर्शक बदलले, तरीही प्रेक्षकांचा उत्साह मात्र तसाच टिकून आहे. 1917 मध्ये ‘लंका दहन’ पाहायला लोक रांगेत उभे राहिले होते. 1987 मध्ये ‘रामायण’ मालिकेसाठी रस्ते ओस पडले होते आणि आता 2026 मध्ये लोक आधुनिक तंत्रज्ञानात रंगवलेली तीच कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणजेच शतक उलटलं, तरी रामाची कथा अजूनही तितकीच जिवंत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news