

प्रसाद पाटील
‘टेस्ला’ या जगद्विख्यात कारचे निर्माते, जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि कधीकाळी डोनाल्ड ट्रम्प यांचे निष्ठावान समर्थक असलेल्या एलॉन मस्क यांनी नुकताच अधिकृतपणे एक नवीन अमेरिकन राजकीय पक्ष सुरू केल्याची घोषणा केली. मधल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याची प्रतिज्ञा करत त्यांनी या पक्षाचे नाव ‘अमेरिका पार्टी’ असे ठेवले आहे; पण तिसर्या पक्षासंदर्भातील अमेरिकेचा राजकीय इतिहास पाहता आपले प्रचंड वैभव व ऑनलाईन प्रभाव राजकीय ताकदीत रूपांतरित करण्याचा मस्क यांचा प्रयत्न यशस्वी होईल का, हा प्रश्नच आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर ही जागतिक महासत्ता येणार्या काळात नव्या वळणांवर जाणार, हे स्पष्ट झाले होते. ट्रम्प यांनी ‘रिसिप्रोकल टॅरिफ’ धोरणाचे अजबगजब अस्त्र काढून जगाला अमेरिकेपुढे झुकवण्याचा आणि द युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका ही जागतिक महासत्ता असल्याचा शंखनाद केला. या टॅरिफ अस्त्राचा वरवंटा अजूनही ट्रम्प यांनी आपल्या हाती ठेवला आहे. यादरम्यान ट्रम्प यांचे ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ हे महत्त्वाकांक्षी विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर झाले आहे. वास्तविक, या विधेयकाला ट्रम्प यांचे खंदे पाठीराखे म्हणून आजवर ओळखले जात असलेल्या एलॉन मस्क यांनी विरोध दर्शवला होता; पण मध्यंतरीच्या काळात हा राजकीय शहंशाह आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भांडवलशहा यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आणि यथावकाश मस्क यांनी आपला ट्रम्पविरोधी अजेंडाही जाहीर करून टाकला. त्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ हा नवीन राजकीय पक्ष स्थापन करून आपल्या अधिकृत राजकीय प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
मस्क यांच्या मते, हा पक्ष अमेरिकेतील 80 टक्के सामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेचे प्रतिनिधित्व करेल. म्हणजेच अमेरिकेतील पूर्णपणे डाव्या विचारसरणीचेही नाहीत आणि अतिउजवेही नाहीत अशा लोकांचे समर्थन आपल्याला लाभेल, असा मस्क यांचा दावा आहे. वरकरणी हा दावा प्रभावशाली वाटत असला, तरी तितकाच तो प्रश्न निर्माण करणारादेखील आहे. ट्रम्प यांचे ‘कर आणि खर्च विधेयक’ मंजूर झाल्यानंतर ‘तुमचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी या पक्षाची स्थापना झाली आहे,’ असे मस्क यांनी त्यांच्या स्वतःच्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर म्हटले आहे. एलॉन मस्क यांचा हा राजकीय प्रवेश केवळ भावनांवर आधारलेला नसून, त्यामागे राजकीय सामर्थ्य, आर्थिक बळ आणि डिजिटल प्रभाव यांचे सूक्ष्म गणित आहे.
असे असले, तरीही अमेरिकन राजकारणाच्या पारंपरिक चौकटीमध्ये तिसर्या पक्षाला संधी देणारी जागा फारच कमी असते. कारण, अमेरिकेतील ‘विनर टेक्स ऑल’ (जो सर्वाधिक मते मिळवतो तो सर्व काही जिंकतो.) प्रणालीमुळे लहान पक्ष कायमच अडचणीत येतात. संसदीय लोकशाहीसारखी बहुमत नसतानाही सामर्थ्य मिळवण्याची संधी अमेरिकेत नाही. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात काहीही मिळवायचं असेल, तर पूर्ण मताधिक्य मिळवणे अपरिहार्य ठरते. याचा अर्थ असा की, मस्क यांच्या पक्षाला राष्ट्रीय पातळीवर परिणाम साधायचे असतील, तर त्याला सर्वच राज्यांमध्ये निवडणूक लढवावी लागेल. उमेदवार उभे करावे लागतील आणि प्रचंड प्रमाणात यंत्रणा उभी करावी लागेल.
यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे मतदार यादी प्रवेशाचा. प्रत्येक अमेरिकन राज्याची नियमावली वेगळी आहे. यामधील अर्ज प्रक्रिया, नागरिकत्व अटी, मतदार यादीतील नोंदणी आणि हजारोंच्या संख्येने स्वाक्षरी गोळा करणे या सर्व बाबी क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या आहेत; परंतु मस्क आपल्याकडील धनशक्तीच्या जोरावर आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतात, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. मस्क यांच्या या निर्णयामुळे केवळ एक नवा पक्ष निर्माण झालेला नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांच्या संबंधात एक निर्णायक वळण आले आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत मस्क हे ट्रम्प यांच्या प्रचारासाठी सर्वात मोठे आर्थिक देणगीदार होते; परंतु आता ते ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणांचे तीव्र टीकाकार बनले आहेत.
इतिहासात डोकावले असता अमेरिकेमध्ये तिसर्या पक्षाचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. जवळपास सगळ्याच प्रयत्नांना अपयश आले. 1992 मध्ये टेक्सासचे अब्जाधीश व्यावसायिक रॉस पेरॉट यांनी रिफॉर्म पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रपती पदासाठी स्वतंत्र उमेदवारी जाहीर केली. त्यांनी सुमारे 19 टक्के राष्ट्रीय मते मिळवली. ही आजवरच्या कोणत्याही तृतीय पक्षासाठी मोठी कामगिरी होती; मात्र तो एकाही राज्यात विजय मिळवू शकला नाही. त्यामुळे शून्य इलेक्टोरल व्होटस् मिळाले. 2000 मध्ये ग्रीन पार्टीचे उमेदवार राल्फ नेडर यांनी पर्यावरण आणि सामाजिक न्याय यांसाठी प्रचार केला. त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत थोडीशी मते मिळवली (2.7 टक्के); पण ही मते अल गोर यांच्याकडून फुटून गेली असे मानले गेले आणि त्यामुळे जॉर्ज डब्ल्यू. बुश यांना निवडून येण्यास मदत झाली. 1968 मध्ये जॉर्ज वॉलेस यांनी अमेरिकन इंडेपेंडंट पार्टीच्या माध्यमातून दक्षिणेकडील राज्यांमध्ये वंशवाद आणि विभाजनवादी धोरणांच्या जोरावर 5 राज्ये जिंकली आणि 46 इलेक्टोरल व्होटस् मिळवले होते.
यानंतर कोणत्याही तिसर्या पक्षाच्या उमेदवाराला एकही निवडणूक ‘महाव्होट’ मिळाले नाही. रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनिअर, कॉर्नेल वेस्ट किंवा लिबर्टेरियन पक्ष यांसारखे प्रयत्न केले गेले; पण सर्वांना 50 राज्यांमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. अमेरिकन लोकशाहीत स्वतंत्र पक्ष बनवणे जवळजवळ अशक्यच असल्यामुळे बर्नी सँडर्ससारखे स्वतंत्र बाण्याचे राजकारणीदेखील दोन पक्षांपैकीच एका पक्षात सामील होताना दिसतात.
अमेरिकन अब्जाधीश मस्क यांना ही बाब ज्ञात नसेल का? मस्क यांचा द़ृष्टिकोन मात्र वेगळा आहे. त्यांनी पूर्ण देश व्यापण्याऐवजी काही ठरावीक जिल्ह्यांतील हायप्रोफाईल निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार व्यक्त केला आहे. म्हणजेच, जिथे थोड्याशा मतांनी निर्णायक फरक पडतो, अशा मतदारसंघांमध्ये अमेरिका पार्टीचे उमेदवार उभे राहतील आणि काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्विंग व्होटस्द्वारे मस्क प्रभाव प्रस्थापित करतील. तथापि, धोरण कितीही चांगले असले, तरी यंत्रणा आणि जनाधार नसेल, तर अशा पक्षाचे अस्तित्व अल्पायुषी ठरते.
राजकारणात उडी घेतल्यानंतर मस्क यांचे काही साथीदार त्यांच्यापासून दूर जाऊ लागले आहेत. ट्रम्प यांचे अनेक रिपब्लिकन समर्थक आता मस्कना ‘धोकादायक विभाजक’ मानत आहेत. मस्क यांच्या पक्षाचे उमेदवार ठिकठिकाणी उभे राहिले, तर ते मतांचे विभाजन करतील आणि त्यातून रिपब्लिकन उमेदवारांचा पराभव होऊ शकतो.
आजघडीला मस्क यांच्याकडे असणार्या जमेच्या बाजू म्हणजे पैसा आणि सोशल मीडियावरील प्रभाव. त्यांच्याकडे अब्जावधी डॉलर्सची संपत्ती असून ते ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सोशल मीडियाच्या क्षेत्रातील आघाडीच्या मंचाचे मालक आहेत. त्यामुळे प्रचारासाठी त्यांना बाह्य माध्यमांवर अवलंबून राहावं लागणार नाही. त्यांचा ‘टेक वर्ल्ड’मधील करिष्मा आणि मुक्त विचारांची प्रतिमा अनेक तरुणांना आकर्षित करू शकते. तथापि, हे आकर्षण प्रत्यक्ष मतदानात आणि प्रचार यंत्रणेत रूपांतरित करणे हे अत्यंत कठीण काम आहे.
केवळ प्रसिद्धी, पैसा किंवा संतोषजनक घोषणांनी राजकीय क्रांती घडत नाही, असे इतिहास सांगतो. राजकीय पक्षाला यश मिळवण्यासाठी दशकानुदशकांची निष्ठा, नेतृत्व आणि कार्यप्रवण कार्यकर्त्यांची फळी लागते. मस्क यांच्याकडे याचा पूर्णतः अभाव आहे. याआधी त्यांनी विस्कॉन्सिनमध्ये एका न्यायिक निवडणुकीत 20 दशलक्ष डॉलर्स खर्च करून हार पत्करली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणावर आता कमी खर्च करेन असं जाहीर केले होते; पण काही आठवड्यांतच पुन्हा राजकारणात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या गांभीर्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे मस्क यांचा पक्ष ही खरोखर दीर्घकालीन राजकीय चळवळ आहे की ट्रम्प यांच्यावर वैयक्तिक बदला घेण्याचे एक माध्यम, असा प्रश्न उपस्थित केला जात असून तो अनाठायी म्हणता येणार नाही.
परिणामी, मस्क यांचा ‘अमेरिका पार्टी’ हा प्रयोग राजकीय परिवर्तनाची सुरुवात ठरण्याची शक्यता आजमितीला तरी दिसत नाहीत. त्यामुळे अमेरिकन राजकारणाला एक अनपेक्षित कलाटणी देणारी ही घडामोड असल्याचे म्हटले जात असले, तरी तिचा ट्रम्प यांच्या राजकीय भविष्यावर आणि बहुपक्षीय प्रणालीच्या शक्यतांवर काय परिणाम होणार, हे येणारा काळच ठरवेल.