Durgeshwar Caves | मावळातली दुर्गेश्वर आणि शेजारी लेणी

Durgeshwar Caves |
Durgeshwar Caves | मावळातली दुर्गेश्वर आणि शेजारी लेणी
Published on
Updated on

नीती मेहेंदळे

चहूबाजूंनी सह्याद्रीचं कवच असलेला हा सगळा परिसर अतिशय रम्य आहे. त्यामुळे लेणी शोधताना होणारी पायपीट सुखावह होते. ही लेणी फारशी प्रचलित नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग काहीसा साहसी आहे.

मावळ म्हणजे पुणे जिल्ह्यातला डोंगरदऱ्यांनी नटलेला प्रांत. कोकणाला जोडणारा भाग असल्याने प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून त्याचे महत्त्व वादातीत होते. किल्ले, लेणी, इथे योजणे अत्यंत साहजिक आहे. कोकणातून येणारा व्यापारी मार्ग मावळातूनच जात असल्याने इथे कार्ले, भाजे, बेडसे, नाणेघाट इत्यादी लेणी खोदली गेली; पण इतकीच असतील का? अजूनही शक्य असतील आणि ती चक्क आहेतच. आंदर मावळ भागात काम्बरे गावाजवळ काम्बरे लेणी डोंगरात दडलेली आहेत. चहूबाजूंनी सह्याद्रीचं कवच असलेला हा सगळा परिसर अतिशय रम्य आहे. त्यामुळे लेणी शोधताना होणारी पायपीट सुखावह होते. ही लेणी फारशी प्रचलित नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग काहीसा साहसी आहे. गावातूनच लेण्यांना जाणारे दिशादर्शक फलक दिसू लागतात. थोडी गावातली मळलेली वाट सोडली की, रस्ता आपल्याला जंगलाकडे घेऊन जातो. या जंगलातल्या रस्त्यात करवंदाच्या जाळ्या, अनेक पक्षी अशी सोबत लाभते. काही अंतरावर चढून गेल्यावर सपाटी लागते. इथे लेण्याची थोडक्यात माहिती देणारा फलक दिसतो. इथे बेडसेप्रमाणेच डोंगर अंगावर आल्यासारखा समोर ठाकलेला दिसतो. त्याच्या पोटात लेण्यांची माळ दृष्टिपथात येते. लेणी पूर्वाभिमुख आहेत.

डोंगराच्या बरोबर मध्यभागी काम्बरे लेणी खोदण्यात आली असून शेवटचा टप्पा पायऱ्या नसल्याने काहीसा अवघड आहे. अर्ध्या तासाच्या कठीण टप्प्यानंतर आपण लेणी गाठू शकतो. पहिलं लेणं हा एक मोठा विहार असून त्यांचे खांब विस्कळीत झाले आहेत. आजूबाजूला तीन पाण्याची मोठाली टाकी खोदलेली दिसतात. काही अंतरावर पुन्हा एक मोठं जोडटाकं खोदलेलं सापडतं. डोंगराच्या कड्याला खेटून कपारीत खोदलेल्या या लेण्यांचा शेवट एका लांबलचक बोगद्यातून होतो. या बोगद्याच्या शेवटी व्यवस्थित पायऱ्या केलेल्या असून त्या चढून गेल्यावर एक अजून भव्य लेणं दिसतं. या लेण्याबाहेर दोन मोठी आयताकृती पाण्याची टाकी असून खांब रोवायला जमिनीत खोदलेले गोल खड्डे दिसतात. जमिनीवर सहसा लेण्यांमध्ये दिसून येणारे प्राचीन पटखेळ कोरलेलेसुद्धा आढळतात. लेण्यांमधील जलव्यवस्थापन आणि पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन इथेही पाहायला मिळते. या लेण्याच्या बाहेर असलेल्या एका टाकीतले पाणी टाकी भरल्यावर शेजारच्या टाक्यांमध्ये जाते. यातून केवळ टाक्यांच्या उंचीचा उपयोग करून केलेला दिसतो. जास्तीचे पाणी वाहून नेण्यासाठी जमिनीत चॅनल खोदलेलेसुद्धा आढळतात. या लेण्याच्या बाहेरच्या मंडपात दोन खांबांच्या जागी दगडात हात घालून लोंबकळता येईल अशा पकड असलेल्या खोबणी केल्या आहेत. याशिवायही काही ठिकाणी अशा खोबणी दिसतात. जागोजागी या सगळ्या लेण्यांना जोडणाऱ्या चिंचोळ्या मार्गावर दगडात पणती ठेवता येईल, अशा बेताचे अनेक कोनाडे केलेले दिसतात, हे वैशिष्ट्यपूर्ण!

एकंदर ही लेणी अर्धवट अवस्थेत दिसतात. इथे कोणताही स्तूप, चैत्य नाही. कमानी नाहीत; पण विहार लेणी आहेत. पाण्याची उत्तम टाकी आहे. भिक्षूंच्या वर्षावासात राहण्याच्या सोयीसाठी बांधलेली ही लेणी आहेत. इथून खालच्या काम्बरे गावाजवळचं ठोकरवाडी धरणाचं दृश्य सुरेख दिसतं. त्यापलीकडचे दुर्गेश्वर, पद्मावती आणि कलहाट लेण्यांचे डोंगर स्पष्ट दिसतात आणि आपल्याला खुणावत असतात.

पैकी पद्मावती आणि दुर्गेश्वर लेण्यांमध्ये आता लहान मंदिरे केली आहेत; पण ती हल्लीच्या काळात. प्रथम ती बौद्ध लेणीच आहेत. पद्मावती लेणी निगडे गावाच्या बाजूच्या डोंगरात, तर दुर्गेश्वर लेणी गडद गावाच्या डोंगरात खोदली आहेत. दुर्गेश्वर लेण्यात एक सर्वात मोठं लेणं आहे, ज्यात सहसा विहारात न आढळणारी गोष्ट दिसते, ते म्हणजे लेण्याच्या अगदी मधोमध दोन भाग करू शकेल अशा बेताने खोदलेलं पाण्याचं टाकं. हे टाकं आयताकृती असून खूप खोल आहे. या लेण्यात शिरायला एक-दोन पायऱ्या उतरून जावं लागतं. आत विस्तीर्ण चौकोनी गुंफा असून मधोमध ते टाकं आहे. आणि त्या टाक्याला वळसा घालून डाव्या बाजूला आत एक निवासी कक्ष आहे. तोसुद्धा आतून खूप मोठा आहे. म्हणजे इथे पूर्वी मोठ्या प्रमाणावर भिक्षू वस्ती करत असावेत. इथे आसपास फिरत असताना अनेक लहान मोठी लेणी बांधायचा प्रयत्न झालेला दिसतो. कधी अर्धवट टाकी, तर कधी अर्धवट बसायला कक्षासने. दुर्गेश्वर मंदिर म्हणून आज जे लेणं दिसतं त्यात काही मूर्ती आणून ठेवलेल्या आहेत; पण ते हल्लीचं काम आहे हे समजतं. त्या लेण्याच्या पुढ्यातदेखील एक भव्य आयताकृती पाण्याचं टाकं आहे. दुर्गेश्वर लेण्यांना जाण्याची वाट अतिशय खडतर असून शेवटाला संपूर्ण दगडातल्या खोदीव पण लहान पायऱ्या लागतात. आजूबाजूस आधार नाही आणि मार्ग अरुंद असल्यामुळे त्या पायऱ्या धरूनच चढावे लागते. चढताना हरिहर किंवा कलावंतीण दुर्गाच्या पायऱ्यांची हमखास आठवण येते. खाली गडद गावात भैरवनाथाचं मंदिर आहे. मंदिरात मारुती आणि भैरवाची प्रतिमा असून मंदिराबाहेर अनेक वीर मूर्ती मांडून ठेवलेल्या दिसतात. या मंदिराच्या मागच्या बाजूनेच दुर्गेश्वर लेण्यांकडे जाणारी पायवाट आहे.

गडद गावाजवळच निगडे गावातून पद्मावती लेण्यांकडे जाणारा मार्ग दाट जंगलातून जातो. ही अजून एक लेण्यांची माळ. नेहमीप्रमाणे गाव-शेत-मग अर्धा तास जंगल सफर झाल्यावर अचानक समोर ७० अंशांत उभी कातळाची खडी चढण लागते. कातळात खोदलेल्या पायऱ्या चढून वर आल्यावर एका अरुंद वाटेवर पद्मावती लेण्याची माळ लागते. दर्शनी मोठं भव्य लेणं असून त्यात सुरुवातीला डाव्या बाजूला बसायला मोठं कक्षासन केलेलं दिसतं; पण ते अर्धवट बांधलं आहे. गुंफा आत खूप खोलवर खोदलेली असून बऱ्याच भिक्षूंची राहायची सोय होत असावी असं दिसतं. पाण्याचा साठाही लेण्यांमध्ये भरपूर असल्यामुळे या अंदाजाला पुष्टी मिळते. पद्मावती लेण्याच्या रांगेच्या शेवटी एका लहानशा लेण्यात पद्मावतीदेवीचा तांदळा दिसतो. शेजारी एक-दोन शरभाची शिल्पंही दिसतात. अर्थात दुर्गेश्वरप्रमाणे इथेही मंदिर नंतरच्या काळात आलं असावं.

कलहाट लेणी मात्र कलहाट गावाजवळच्या टेकडीवर आहेत. या लेण्यांना जायचा मार्गही दुस्तर असून कलहाट लेण्यांमध्ये एकाला लागून एका अशी तीन व पुन्हा पुढे दोन, खालच्या बाजूस एक मोठी अशी सहा पाण्याची प्रचंड मोठ्या आयताकृती टाक्या आहेत. एका अवाढव्य लेण्यात एक मोठा मंडप असून दर्शनी बाजूस तीन लहान खोल्या किंवा कक्ष दिसतात. हे भिक्षूंच्या निवासासाठी केले असावेत, हे निश्चित. कलहाट काय किंवा इतर मावळातील पद्मावती, दुर्गेश्वर, काम्बरे लेण्यांना भेट देताना काही सामायिक निरीक्षण मांडता येतात. ते म्हणजे, लेण्यांची अपूर्णावस्था. दुसरं म्हणजे लेण्यांची व्याप्ती, क्षमता. तसंच भव्यतासुद्धा अधोरेखित करण्याजोगी आहे; पण मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये ही सर्व लेणी जवळजवळ गाडली गेली आहेत. खरी लेणी आत बरीच उंच असावीत; पण काळाच्या ओघात किंवा निव्वळ दुर्लक्षामुळे त्यांमध्ये माती साठून ती बुटकी झाली आहेत. त्यांत आजमितीला तरी कोणतेही लेख दिसत नाहीत. खांब आज नाहीत; पण पूर्वी असावेत. कारण, छतात आणि जमिनीत खोबणी दिसतात. भिंती खचल्या आहेत; पण या सर्व लेण्यांचं संवर्धन व्हायला हवं आहे. अभ्यास व्हायला हवा आहे. न जाणो काही दस्तावेज हाताशी लागेल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news