

आधुनिक काळातील युद्धे अद्ययावत शस्त्रास्त्रांनी कशा प्रकारे लढली जाताहेत, याची झलक अलीकडेच भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पाहायला मिळाली. या संघर्षामध्ये एस-400 ही क्षेपणास्त्र भेदक प्रणाली जितकी मोलाची ठरली, तितकेच भारताच्या ड्रोन्सनीही पाकिस्तानला जराजर्जर केले. अलीकडच्या काळात अझहरबैजान आणि आर्मेनिया युद्धामध्ये ड्रोन वॉरफेअरचा वापर पहिल्यांदा झाला. यामुळे जगाचे याकडे नव्याने लक्ष वेधले गेले.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात घनघोर संघर्ष पहायला मिळाला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय जवानांनी दिलेल्या तडाखेबंद प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी लष्कराला गुडघे टेकणे भाग पडले आहे. या संघर्षादरम्यान भारतीय लष्कराने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आणि इस्त्रायलकडून मिळालेल्या अत्याधुनिक हार्पी ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानच्या एअर डिफेन्स यंत्रणांवर अचूक आणि घातक हल्ले केले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी रडार प्रणालींचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला आणि अनेक शहरांमधील महत्त्वाच्या लष्करी संरचना उद्ध्वस्त झाल्या. लाहोर, कराची यासारख्या मोठ्या शहरांमध्येही हवाई हल्ल्यांचा परिणाम दिसून आला.
एकविसाव्या शतकातील युद्ध तंत्रामध्ये अनेक आमूलाग्र बदल झाले आहेत. यातील सर्वात क्रांतिकारी बदल म्हणजे ड्रोन म्हणजेच मानवरहित यंत्रमानवांचा वापर. हे लढाऊ, टेहळणी व हल्लेखोर ड्रोन पारंपरिक युद्ध तंत्राच्या मर्यादा ओलांडून युद्धाच्या संकल्पनाच बदलून टाकत आहेत. यामुळे युद्ध आता केवळ रणांगणावर नाही, तर आकाशातून, दूरस्थ ठिकाणाहूनही लढले जाऊ लागले आहे. शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी किंवा टेहळणीसाठी मानवाच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ड्रोन वापरण्यात येतात. हे ड्रोन सेटेलाईट नेव्हिगेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, थर्मल सेन्सर्स आणि उच्च दर्जाच्या कॅमेर्यांनी सज्ज असतात. ड्रोन युद्धामुळे युद्धाची धारणा लो-कोस्ट, लो-रिस्क (कमी खर्च, कमी धोका) अशी बनली आहे. अमेरिका, चीन, रशिया, इस्रायल आणि तुर्कस्तान यासारख्या राष्ट्रांनी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे.
अलीकडच्या काळात अझहरबैजान आणि आर्मेनिया युद्धामध्ये ड्रोन वॉरफेअरचा वापर पहिल्यांदा झाला. यामुळे जगाचे याकडे नव्याने लक्ष वेधले गेले. ड्रोनचे सर्वांत मोठे दोन फायदे आहेत. पारंपरिक लढाऊ विमानांपेक्षा यासाठीचा खर्च कमी आहे. दुसरा मोठा फायदा म्हणजे, हे मानवरहित असल्याने जीवितहानी शून्य आहे. याखेरीज आकाराने अत्यंत लहान असल्याने ते कुठेही जाऊन शत्रूचा मागोवाही घेऊ शकतात आणि प्रसंगी त्याचा खात्माही करू शकतात. भारतानेदेखील ड्रोन युद्ध तंत्राचा अभ्यास व वापर सुरू केला आहे. डीआरडीओकडून स्वदेशी ड्रोन प्रणाली विकसित केली जात आहे. पाकिस्तानसह सीमावर्ती भागांमध्ये दहशतवादी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर वाढवण्यात आला आहे. 2021 मध्ये जम्मूमधील लष्करी तळावर ड्रोनद्वारे झालेला स्फोट हा भारतातील पहिला ड्रोन हल्ला होता, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक जागरूक झाल्या.
हार्पी ड्रोन हे एक अत्याधुनिक, आत्मघातकी ड्रोन असून त्याची निर्मिती इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने केली आहे. हे ड्रोन लॉइटरिंग म्युनिशन प्रकारातील आहे. याचा अर्थ ते हवाई क्षेत्रात दीर्घकाळ घिरट्या घालू शकते आणि योग्य संधी मिळाल्यावर अचूक हल्ला करून स्वतःला स्फोटात उडवते. या ड्रोनमध्ये अँटिरेडिएशन सीकर असतो, जो शत्रूच्या रडार किंवा अन्य रेडिएशन उत्सर्जित करणार्या यंत्रणांचा मागोवा घेतो आणि लक्ष्य निश्चित झाल्यावर थेट त्यावर झेप घेतो. हे अत्यंत हुशार आणि अचूकतेने काम करणारे ड्रोन असल्याने ते शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टीमवर अचूक प्रहार करते.
भारताने हार्पी ड्रोन प्रथम 2009 मध्ये इस्रायलकडून विकत घेतले होते. त्या वेळी भारताने 10 हार्पी ड्रोनसाठी 100 दशलक्ष डॉलरचा (सुमारे 850 कोटी रुपयांचा) करार केला होता. एका ड्रोनची किंमत सुमारे 10 दशलक्ष डॉलर म्हणजे सध्याच्या विनिमय दरानुसार सुमारे 85 कोटी रुपये इतकी आहे. नंतर 2019 मध्ये भारताने याच श्रेणीतील अधिक ड्रोन खरेदी केले. हार्पीचा एक उन्नत प्रकार म्हणजे हारोप ड्रोन. हे ड्रोन अधिक सुसज्ज आणि लांब पल्ल्याचे आहेत. हारोपमध्ये अधिक सुधारित सेन्सर, दीर्घकाळ हवेत टिकून राहण्याची क्षमता आणि मानव नियंत्रित किंवा पूर्णपणे स्वयंचलित ऑपरेशन करण्याची व्यवस्था आहे.
हार्पी आणि हारोप या दोन्ही ड्रोनची कमाल गती सुमारे 185 कि.मी. प्रतितास आहे आणि ते सुमारे 6 ते 9 तास हवेत राहू शकतात. त्यांच्यामध्ये 32 किलोंपर्यंत स्फोटक सामग्री वाहून नेण्याची क्षमता असते. हे ड्रोन एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये पाठवले गेले की, ते शत्रूच्या रडार सिग्नलचा मागोवा घेतात, टार्गेट मिळाल्यावर थेट त्यावर झेप घेतात आणि स्वतःसह लक्ष्याला नष्ट करतात. विशेष म्हणजे, सॅटेलाईट नेव्हिगेशन नसेल, तरी हे ड्रोन लक्ष्यभेदन करू शकतात. यामुळे हे अधिक विश्वासार्ह बनते.
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने मंगळवारी रात्री पाकिस्तानच्या हद्दीत 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानने 7 मेच्या रात्री उत्तरेतील आणि पश्चिमेकडील भारतातील अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जम्मू, पठाणकोट, अमृतसर, श्रीनगर, कपूरथला, भटिंडा, चंदीगड, लुधियाना, जालंधर, आदमपूर, नाल, फलोदी या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर म्हणून भारताने हार्पी आणि हारोप ड्रोन वापरून कराची, लाहोर यासारख्या शहरांतील एअर डिफेन्स संरचनांवर जबरदस्त हल्ले केले. हार्पी आणि हारोप ड्रोनच्या वापरामुळे भारताने आपल्या लष्करी ताकदीचा प्रत्यय पुन्हा एकदा जगाला दाखवून दिला आहे. हे ड्रोन सीलबंद कॅनिस्टरमधून लॉन्च केले जातात, ज्यामुळे त्यांची तैनाती आणि हल्ले करण्यास वेळ लागत नाही.
लष्करी ड्रोनच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या तुलनेत बरेच पुढे आहे. याच पार्श्वभूमीवर भारताला लवकरच अमेरिकेकडून 31 एमक्यू- 9 बी प्रीडेटर ड्रोन मिळणार आहेत. हे ड्रोन शत्रूसाठी मृत्युदूत ठरू शकतात. हे ड्रोन भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचाही भाग असतील. या कराराचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत तयार केला होता. जनरल अॅटोमिक्स अॅरॉनॉटिकल सिस्टीम्सने एमक्यू 9 बी प्रीडेटर ड्रोन तयार केला आहे. हे एमक्यू-9 ‘रीपर’ ड्रोनचेच एक आधुनिक रूप आहे. याला हाय-ऑल्टिट्यूड, लॉन्ग-एंड्युरन्स म्हणजेच उच्च उंचीवर आणि दीर्घकाळ उड्डाण करणारे मानवविरहित हवाई वाहन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हा ड्रोन खूप उंच उडतो आणि अनेक तास हवेत राहू शकतो. एकावेळी सुमारे 40 तास हे ड्रोन सतत उडू शकतात. तसेच तब्बल 50,000 फुटांपेक्षा अधिक उंचीवर उडण्याची क्षमता यामध्ये आहे. प्रीडेटर ड्रोनमध्ये चार हेलफायर क्षेपणास्त्रे आणि सुमारे 450 किलो वजनाचे बॉम्ब नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा ड्रोन शत्रूसाठी अत्यंत घातक ठरेल, यात शंकाच नाही. भारतीय नौदलाला 15 ‘सी गार्डियन’ ड्रोन मिळतील, तर भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराला प्रत्येकी 8 ‘स्काय गार्डियन’ ड्रोन मिळतील.
ड्रोन तंत्रज्ञान ही केवळ एक सुविधा नसून, आधुनिक युगातील सामरिक आत्मनिर्भरतेचा कणा बनत आहे. भारत या क्षेत्रात स्वदेशी विकासावर भर देत असून जागतिक मंचावर एक बलाढ्य ड्रोन शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. पुढील दोन ते चार वर्षांत सुमारे भारताकडे 5,000 लष्करी ड्रोन असतील. पाकिस्तानकडे भारताच्या तुलनेत खूपच कमी ड्रोन आहेत. पाकिस्तानकडे सध्या 10 ते 11 वेगवेगळ्या डिझाईनचे ड्रोन आहेत. भारतीय लष्कराकडे सध्या सुमारे 50 मिडियम अल्टिट्युड लाँग एंड्युरन्स ड्रोन असून ते देखरेख आणि लक्ष्य निर्धारणासाठी वापरले जातात. 31 प्रीडेटर ड्रोन व्यतिरिक्त भारताने 10,000 कोटी रुपये खर्चून 97 स्वदेशी ड्रोनही बनवले असून ते सीमारेषेवरील देखरेखीसाठी वापरले जातात.
2019 मध्ये ‘सप्तशक्ती’ आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेमिनार हरियाणातील हिसार येथील लष्करी तळावर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते की, भारतीय लष्कर तीन वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) पूर्णपणे आत्मसात करेल. आज त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत. लष्कर आणि सुरक्षा दलांनी एआयला अनेक प्रकारे बिग ब्रदर बनवले आहे. लडाखमधील चीनच्या सीमेजवळील वास्तविक नियंत्रण रेषा आणि काश्मीरमधील पाकिस्तानच्या सीमेजवळील नियंत्रण रेषेची देखरेख आता एआयवर आधारित ड्रोन, विमाने आणि रोबोटिक डॉगद्वारे केली जाते.