

सीए संतोष घारे, अर्थतज्ज्ञ
सोन्याच्या भावात दिवसागणिक होत चाललेली वाढ सर्वसामान्यांबरोबरच अनेक अभ्यासकांनाही बुचकळ्यात टाकणारी ठरत आहे. सोन्याची गुंतवणूक ही अन्य आर्थिक साधनांच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि परतावा देणारी मानली जाते. यासाठी गोल्ड किंवा गोल्ड इटीएफ हा चांगला परतावा मानला जातो. गुंतवणूक ई-गोल्डच्या नावावर होत असली, तरी अजूनही त्यासाठी 70 ते 80 टक्के मालमत्ता भौतिक रूपातूनच ठेवावी लागते. अमेरिकी अर्थव्यवस्थादेखील अनिश्चिततेच्या काळातून जात आहे.
जगातील अनेक अर्थव्यवस्था डी-डॉलरायजेशनच्या मार्गावर असून लोकांचा गुंतवणूक प्रणाली आणि चलनावरचा विश्वास कमी होत आहे. ही सर्व स्थिती पाहता सोन्याच्या किमतीत खूप मोठी घसरण होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते. जगात चीन आणि भारत सोन्याचे सर्वात मोठे खरेदीदार देश आहेत आणि सध्याची सोन्याची वाढती किंमत पाहता आगामी काळातही त्याच्या किमतीत अजूनही वाढ होणार, हे निश्चित! म्हणूनच सोने खरेदीसाठी सराफा बाजारात झुंबड उडत आहे. भौतिक मागणीदेखील सोन्याच्या किमतीचा ग्राफ वाढवत आहे. अर्थात, सोन्यातील गुंतवणूक ही अन्य गुंतवणुकीच्या तुलनेत सुरक्षित मानली जाते आणि परतावाही दमदार मिळतो.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत असामान्य वाढ पाहावयास मिळत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढलेली आहे. सध्या सोन्याची किंमत पाहता त्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, पाटण्यातील सराफा बाजारात सोमवारी चोवीस कॅरेटचे सोने 1320 रुपयांनी वाढत ते दोन आठवड्यांतील उच्चांकी पातळीवर 1,25, 530 रुपये प्रती दहा ग्रॅमवर पोहोचले. बुधवार, गुरुवारपर्यंत त्याची किंमत 1,30,000 रुपयाच्या पुढे प्रतिग्रॅमवर पोहोचली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील अनेक वर्षांपासून सोन्याच्या किमतीत असामान्य वाढ पाहावयास मिळत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2020 मध्ये सोन्याची किंमत सुमारे 1420 डॉलर प्रतिऔंस होती आणि ती 2024 मध्ये वाढत 1988 डॉलरवर पोहोचली. 2025 मध्ये त्याच्या किमतीने उसळी घेतली आणि ती वाढत 2594 डॉलर प्रतिऔंसवर पोहोचली. चालू वर्षात म्हणजे 2025 मध्ये त्याने सरासरी 3465 डॉलर प्रतिऔंसचा टप्पा ओलांडला आहे. अलीकडच्या काळात तर विक्रमी पातळी गाठत आहे. एप्रिल 2025 मध्ये सुमारे 3207 डॉलर प्रतिऔंस होती आणि ती ऑक्टोबर महिन्यात वाढत 4053 डॉलर प्रतिऔंसपर्यंत पोहोचली.
सोन्याच्या वाढत्या किमती या सर्वसामान्यांवर खर्चाचे ओझे वाढवतात, तर त्याचवेळी महागाईचे गणितदेखील बिघडून टाकतात. किमतीतील चढ-उतारामुळे मूल्य निर्देशांकावरही परिणाम होतो आणि कधी कधी मूल्य पातळीदेखील बिघडते. अर्थात, ग्राहक मूल्य निर्देशाकांच्या गणनेत सोन्याच्या किमतीला फार महत्त्व दिलेले नाही. निर्देशांकांत सोन्याचा वाटा 1.08 टक्के आहे; मात्र किमतीत चढउतारामुळे निर्देशांकांवर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. उदा. मागील वर्षाच्या सुरुवातीला या धातूचा महागाई दरातील वाटा 0.10 टक्क्यांच्या आसपास होता आणि आताच्या महागाईच्या ताज्या आकडेवारीत त्याचे योगदान 0.90 टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत सोन्याचा वाटा नऊ पटीने वाढला आहे. या कारणांमुळेच ढोबळ चलनवाढीच्या गणनेवर त्याचा परिणाम झाला आहे. परिणामी, धोरण आणि आर्थिक निर्णयाला जबाबदार असलेल्या मूल्य निर्देशांकावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ ही पत धोरणात रेपो रेट निश्चित करताना काहीवेळा संभ्रमाची स्थिती निर्माण करतात.
अर्थात, भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने प्रसिद्ध केलेला अहवाल ‘कमिंग ऑफ ए ट्रबलंट एज : द ग्रेट ग्लोबल गोल्ड रश’च्या मते, भारतात सोन्याच्या मागणीचे प्रमाण 802.8 टक्के आहे. हे प्रमाण जागतिक मागणीच्या 26 टक्के आहे. त्यामुळे भारत 815.4 टनांच्या मागणीसह चीनपाठोपाठ दुसर्या स्थानावर आला आहे. भारतात सोन्याचा देशांतर्गत होणारा पुरवठा हा अपुरा पडतो आणि त्यामुळे अन्य गरज आयातीतून पूर्ण केली जाते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका अंदाजानुसार, 2024 मध्ये एकूण पुरवठ्यात आयातीचे योगदान सुमारे 86 टक्के आहे. कौन्सिलच्या अंदाजानुसार, 2025 पर्यंत एकूण मागणी 600 ते 700 टन राहू शकते. वाढत्या किमतीचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर होतो. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीत भारतात सोन्याची मागणी 209.4 टन होती आणि ती मागील वर्षाच्या तुलनेत 16 टक्के कमी असून यामागे दागिन्याच्या मागणीत 31 टक्के झालेली घसरण कारणीभूत आहे. याच कार्यकाळात म्हणजे तिसर्या तिमाहीत आयात ही 37 टक्क्यांनी कमी होत ती 194.6 टन राहिली. 2024 च्या आर्थिक वर्षात एकूण आयात 712.1 टन नोंदली गेली होती. आता सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सोन्याची आयात वाढण्याची शक्यता आहे. गेल्या सात महिन्यांत एकूण आयातीच्या वस्तूंत आयात सोन्याचा वाटा सुमारे 9 टक्के राहिला आहे.
सोन्याच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार होय. सध्या भूराजनीतीच्या वातावरणात सक्षम डॉलरवरही परिणाम होत आहे. युक्रेन युद्धानंतर मात्र डॉलर अधिक अस्थिर राहिलेला दिसतो. सोने आणि डॉलरची स्थिती परस्परविरोधी प्रभाव पाडतात. डॉलर कमजोर असताना सोने मात्र सक्षम होते. सध्याच्या काळात अमेरिकी फेडरलने व्याजदर कमी केले, तर डॉलर आणखी कमकुवत होईल आणि त्यामुळे सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होईल; मात्र फेडरलने व्याजदर कमी करण्यात नरमाई दाखविली, तर डॉलर अधिक मजबूत होईल आणि सोने स्थिर राहील. आंतरराष्ट्रीय बाजारातही डॉलरदेखील एखाद्या व्यापार्याप्रमाणे वावरत आहे. सोने वायदे बाजाराचादेखील घटक असून त्यात गुंतवणूकदार पैसे ओततात. सध्याच्या काळात गुंतवणूकदार आणि सट्टेबाजांनी कमकुवत डॉलरच्या आधारावर फ्युचर्स मार्केटमध्ये निश्चित केलेली स्थिती ही सोन्याच्या किमती वाढवणारी ठरू शकतात.
गुंतवणूकदार वायदे बाजारात वास्तविक ‘डिलिव्हरी’ घेत नसतील आणि ‘स्क्वायर ऑफ’ केले असेल, तरीही किमतीत वेग येऊ शकतो. सध्याच्या जागतिक द़ृष्टिकोनातून आर्थिक गुंतवणुकीच्या पद्धती आणि चलनावरचा लोकांचा विश्वास ढळत आहे. त्याचवेळी जगभरातील केंद्रीय बँकांनीदेखील जोखमीत वैविध्यपणा आणला आहे. ते आपल्या परकी चलनसाठ्याचे एकाच चलनावरचे असणारे अवलंबित्व कमी करण्याच्या द़ृष्टीने वाटचाल करत आहेत. त्यास ‘डी-डॉलरायजेशन’ असे म्हटले जाते. केंद्रीय बँकांकडून सोने अधिक खरेदी केले जात असून त्यामुळे सोन्याच्या भावात तेजी आली आहे.
सोन्याची गुंतवणूक ही अन्य आर्थिक साधनांच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि परतावा देणारी मानली जाते. यासाठी गोल्ड किंवा गोल्ड इटीएफ हा चांगला परतावा मानला जातो. गुंतवणूक ई-गोल्डच्या नावावर होत असली, तरी अजूनही त्यासाठी 70 ते 80 टक्के मालमत्ता भौतिक रूपातूनच ठेवावी लागते. त्यामुळेदेखील किमतीत वाढ होताना दिसते. अर्थात, जागतिक द़ृष्टिकोन पाहिला, तर ट्रम्प यांच्या शुल्कवाढीचा झटका जगाला बसत आहे; मात्र जागतिक बाजार या स्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी अमेरिकी अर्थव्यवस्थादेखील अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था डी-डॉलरायजेशनच्या मार्गावर असून लोकांचा आर्थिक गुंतवणूक प्रणाली आणि चलनावरचा विश्वास कमी होत आहे. अशावेळी ते सोन्याकडे वळत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात सोन्याच्या किमतीत खूप घट होण्याची शक्यता कमीच आहे.