

डॉ. जयदेवी पवार
आधुनिक भारतीय साहित्यातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आणि प्रतिभावंत साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे लेखन अद्वितीय होते. नेहरू विचारसरणीचे आणि डाव्या विचारसरणीला विरोध करणारे असल्याने सरकारी पुरस्कारांची थाप फारशी त्यांच्या पाठीवर पडली नाही; पण प्रस्थापित, राज्यपुरस्कृत व्यवस्थेला झुकवून घेण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या साहित्यनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले. कालांतराने त्याच साहित्याने त्या व्यवस्थेलाच उत्तर दिले. वाचकांच्या उदंड प्रेमाने आणि आदराने त्यांचे नाव सर्वोच्च स्थानी पोहोचले.
भारतीय साहित्य परंपरेचे सौंदर्य, तिची व्यापकता आणि तिचा अनंतकाळ टिकणारा तेजोमय प्रवास हा केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक पातळीवरही अद्वितीय मानला जातो. या वैभवशाली व समृद्ध साहित्य परंपरेत एक सूत्र कायम राहिले, ते म्हणजे काव्य वा साहित्य याचे मूल्य कोणत्याही राजकीय-सामाजिक विचारसरणीवर नव्हे, तर केवळ गुणवत्तेवर ठरतेे. म्हणूनच वाल्मीकी, व्यास, कालिदास यांसारख्या ऋषितुल्य कवींना भारतीय परंपरेने युगानुयुगे सर्वोच्च मान दिला. भारतीय सौंदर्यशास्त्र सांगते की, खर्याअर्थाने साहित्य हे केवळ भाषेचे कौशल्य नसते, तर ते अंतःकरणातील तत्त्वज्ञानाचे, मानवी भावनांचे कलात्मक प्रकटीकरण असते. या परिप्रेक्ष्यातून आधुनिक भारतीय साहित्यातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आणि प्रतिभावंत साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे लेखन अद्वितीय होते. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे मानवी जीवनातील मूलभूत भावना, आनंद, दुःख, करुणा, लोभ, ईर्ष्या, करुणाभाव यांचे ते कलात्मक चित्रण करत असत. भारतीय तत्त्वज्ञानाची आणि सांस्कृतिक परंपरेची त्यांना असलेली गहन जाण यामुळे त्यांच्या कादंबर्यांतील पात्रे नेहमीच भारतीय भूमीत रुजलेली दिसतात. बालपणापासूनच ग्रामीण तसेच शहरी जीवनाचे त्यांनी जवळून अनुभव घेतले असल्याने त्यांच्या कादंबर्यांतील व्यक्तिमत्त्वे अतिशय जिवंत आणि वास्तविक वाटतात.
स्वातंत्र्योत्तर काळात विसाव्या शतकापर्यंत प्रादेशिक साहित्यांतून विविध साहित्यिक पुढे आले. तेलगु व कन्नड साहित्यात द. वि. गुंडप्पा, मास्ति वेंकटेश अय्यंगार, कुवेम्पू यांसारख्या दिग्गजांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली. या प्रवाहाचे प्रतीक म्हणजे डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे नाव आदराने घेतले जाते. जवळपास चार दशकांहून अधिक काळ ते कन्नड भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय कादंबरीकार या स्थानावर अढळ राहिले. स्वातंत्र्यानंतरच्या नेहरूकालीन वातावरणाने भारतीय साहित्य परंपरेत अहिंसा, धर्मनिरपेक्षता, साम्यवाद या नव्या घोषवाक्यांना जास्त महत्त्व मिळू लागले. विद्यापीठे, साहित्य संस्था, सरकारी पुरस्कार यावर याच विचारसरणीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. साहित्याला सामाजिक जबाबदारी नावाची नवी चौकट घालण्यात आली. त्यामुळे लेखकाने मानवी भावनांचे शुद्ध कलात्मक विश्लेषण केले आहे की नाही, यापेक्षा त्याने राजकीय अजेंड्याला पूरक किती सेवा केली, हा विचार प्राधान्यत्वाने केला जाऊ लागला; पण या चौकटीला शरण न जाणारे जे मोजके साहित्यिक होते. त्यामध्ये डॉ. एस. एल. भैरप्पांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी कुठल्याही पक्षीय वा विचारसरणीच्या चौकटीला न जुमानता परंपरेचे आदर्श, भारतीय तत्त्वज्ञानाची भव्य पार्श्वभूमी आणि मानवी मनाचे जटिल दर्शन यांना केंद्रस्थानी ठेवत आपली साहित्यसेवा सुरू ठेवली.
भैरप्पांचा जन्म कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील संतशिवरळू या छोट्याशा खेड्यात अतिशय गरीब कुटुंबात झाला. बालवयातच आईने त्यांना कुमारव्यासन भारत व जैमिनी भारत यांसारखी कन्नडातील महाभारत प्रेरित काव्यकृती ऐकवल्या होत्या. दुर्दैवाने प्लेगसारख्या साथरोगाने त्यांच्या आईसह दोन भाऊ व एक बहीण हिरावून घेतली. परिणामी, लहानपणी भैरप्पांना उदरनिर्वाहासाठी बाजारात किरकोळ वस्तू विकणे, उपाहारगृहात काम करणे, घरोघरी जाऊन धूपकाड्या विकणे अशा प्रकारची कामे करावी लागली. अशा असंख्य कष्टातून ते पुढे आले; पण शिक्षणाची ओढ कायम होती. पुण्यात, मुंबईत, हुबळीत जिथे मिळेल तिथे पार्टटाईम कामे करून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. तत्त्वज्ञान विषयातील त्यांना असलेले आकर्षण त्यांच्या आत्मकथेत (भित्ती) स्पष्ट दिसते. मृत्यूचा प्रश्न मला सतत छळत असे. त्याचे उत्तर शोधण्यासाठी मी तत्त्वज्ञान निवडले, असे ते लिहितात. त्यांनी पदवी, पदव्युत्तर शिक्षणात सुवर्णपदक मिळवले आणि पुढे पीएच.डी. मिळवली. ‘सत्य आणि सौंदर्य’ या विषयावर त्यांनी केलेले प्रबंध हे त्यांच्या सौंदर्यशास्त्राच्या गहन जाणिवेची साक्ष देतात. कन्नड ही त्यांची अभिव्यक्तीची भाषा असली, तरी त्यांचा वाचकवर्ग संपूर्ण देशभर पसरलेला आहे. मराठीत गेल्या दशकभरात ते लोकप्रिय कादंबरीकार म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदीतही ते अव्वल पाच बेस्टसेलर लेखकांमध्ये गणले जातात.
भैरप्पांच्या कादंबर्यांवर अनेक परिसंवाद झाले आहेत. त्यांच्या लिखाणावर असंख्य समीक्षणात्मक ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांचा अभ्यास हा स्वतंत्र साहित्यशाखा बनला आहे. कर्नाटकातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या पुस्तकांचा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश आहे. त्यांच्या लिखाणावर आजवर वीसहून अधिक पीएच.डी. प्रबंध लिहिले गेले आहेत. आजपर्यंत त्यांनी 24 कादंबर्या लिहिल्या आहेत. याशिवाय चार समीक्षणपर ग्रंथ, तसेच सौंदर्यशास्त्र, सामाजिक प्रश्न आणि संस्कृतीवरील पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या जवळजवळ सर्वच कादंबर्या प्रमुख भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत, तर सहा कादंबर्या इंग्रजीत उपलब्ध आहेत.
डॉ. भैरप्पांनी हुबळीत व्याख्याता असताना ‘धर्मश्री’ (1961) ही पहिली कादंबरी लिहिली होती. ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या हिंदू धर्मावरील टीकेला प्रत्युत्तर म्हणून ही कादंबरी उभी राहिली. त्यानंतर 1965 मध्ये प्रकाशित झालेली वंशवृक्ष ही त्यांची पहिली खर्याअर्थाने लक्षवेधी कादंबरी ठरली. विशेष म्हणजे, त्यांनी ही कादंबरी 31 दिवसांत लिहिली; पण दोन वर्षे ती बाजूला ठेवून नंतर सखोल पुनर्लेखन करून प्रकाशित केली. यातून साहित्यनिर्मितीतील त्यांचा काटेकोरपणा दिसून येतो. पुढे ‘गृहभंग’, तात्त्विक कादंबरी ‘पर्व’, ‘दातू’, ‘मंद्र’, ‘सार्थ’, ‘आवरण’, ‘तंतु’, ‘साक्षी’ अशा दोन दशकांहून अधिक कालखंड व्यापणार्या 20 पेक्षा जास्त कादंबर्यांतून भैरप्पांनी भारतीय साहित्य विश्व समृद्ध केले. त्यांच्या प्रत्येक कादंबरीचा विषय भिन्न आहे, म्हणून त्यांना एका चौकटीत बसवणे अशक्य आहे. ‘दातू’ या कादंबरीला केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. ‘पर्व’ ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी तब्बल साडेसहा वर्षे महाभारतकालीन जीवनविषयक ग्रंथांचा अभ्यास केला होता.
डॉ. भैरप्पा यांची कलेबद्दलची द़ृष्टी अतिशय प्रगल्भ होती. बालपणापासूनच त्यांना प्रवासाची विलक्षण आवड होती. जगभर त्यांनी भ्रमंती केली. ध्रुव प्रदेशांतील हिमनद्या, अमेझॉनची अरण्ये, आफ्रिकेचे वाळवंट, युरोप व अमेरिकेची गजबजलेली नगरे अशा विविध ठिकाणी त्यांनी पाऊल ठेवले. आल्प्स, रॉकी, अँडीज आणि फुजी यांसारख्या पर्वतरांगांत पायपीट केली आहे. ते ज्या भूमीला, संस्कृतीला स्पर्श करत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मगच कादंबरी रंगवत. त्यामुळे त्यांची कथाभूमी अतिशय वास्तववादी असायची. त्यांच्या कादंबर्यांत तत्त्वज्ञानाची, इतिहासाची, समाजशास्त्राची, मानसशास्त्राची इतकी खोल उतरंड दिसून यायची की, त्या एखाद्या प्रबंधाप्रमाणे भासत. ‘पर्व’ ही महाभारताची वास्तववादी पुनर्कथन, ‘वंशवृक्ष’ ही बदलत्या समाजातील मूल्य संघर्षाची कथा, ‘मंद्र’ ही संगीताच्या माध्यमातून मानवी भावनांचे चिंतन करणारी, तर ‘दातू’ ही जातिसंस्थेच्या गुंतागुंतीचे दर्शन घडवणारी कादंबरी. यातून त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचा सखोलपणा, व्यापकता, जाण आणि विविधता लक्षात येते. डॉ. भैरप्पांच्या ‘आवरण’ कादंबरीने तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या पोकळ संकल्पना उघड्या पाडल्या.
प्रतिभावंत, शब्दप्रभू आणि प्रगल्भ सामाजिक जाणिवा असूनही ते नेहरू विचारसरणीचे आणि डाव्या विचारसरणीला विरोध करणारे असल्याने सरकारी पुरस्कारांची थाप त्यांच्या पाठीवर पडली नाही. डॉ. भैरप्पांना एकदा एनसीईआरटीतर्फे शालेय अभ्यासक्रमाच्या रचनेचे काम सोपवण्यात आले; परंतु तेथील डाव्या विचारसरणीचे इतके प्राबल्य होते की, अखेरीस त्यांना त्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही. प्रस्थापित, राज्यपुरस्कृत व्यवस्थेला झुकवून घेण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या साहित्यनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले. कालांतराने त्याच साहित्याने त्या व्यवस्थेलाच उत्तर दिले. वाचकांच्या उदंड प्रेमाने आणि आदराने त्यांचे नाव सर्वोच्च स्थानी पोहोचले. ‘आवरण’ या कादंबरीच्या तीन महिन्यांत 15 आवृत्त्या निघाल्या होत्या. आजही त्यांच्या जुन्या-नव्या सर्व कादंबर्यांचे सतत पुनर्मुद्रण होत असत. त्यांच्या मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत अनुवादांनाही मोठा प्रतिसाद मिळतो. त्यांच्या लेखनावर अनेकदा हिंदुत्ववादी असा शिक्का मारला गेला असला, तरी साहित्यिक निकषांवर त्यांच्या लेखनाचे मूल्यमापन केल्याशिवाय त्यांची उंची ज्ञात होणार नाही. भारतीय साहित्य परंपरेत जे आदर्श वाल्मीकी, व्यास, कालिदास यांनी घालून दिले, तेच आदर्श विसाव्या-एकविसाव्या शतकात भैरप्पांनी जपले. म्हणूनच ते केवळ कन्नडेतले कादंबरीकार न राहता भारतीय साहित्य परंपरतील लखलखता नंदादीप ठरतात.