

मराठी विज्ञान लिखाणाला वैभवाप्रत पोहोचविणारे महान विज्ञानतपस्वी डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन हे विज्ञानविश्वात पोकळी निर्माण करणारे आहे. नारळीकर सरांच्या अंगी कोणते गुण नव्हते? प्रज्ञा आणि प्रतिभा, ज्ञानोपासना आणि ज्ञानपीपासू, ध्येयवाद आणि विज्ञाननिष्ठा, निगर्वी वृत्ती आणि पारदर्शक स्वभाव, नम्रता आणि ऋजुता या सार्यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या ठायी आढळत असे. ते स्वभावाने लीन आणि प्रसिद्धीपराङ्मुख असले, तरी ज्याप्रमाणे पिकलेल्या फणसाचा वास, ढगामागून जाणार्या विमानाचा आवाज, वाळवंटातील वाळूवर पडलेला चंद्रप्रकाश कुणी आवरू शकत नाही. तद्वतच डॉ. नारळीकरांची कीर्ती कुणी रोखू शकले नाही आणि येणार्या पिढ्यांमध्येही त्यांचे विज्ञान साहित्य मौलिक मार्गदर्शन करत राहील.
ख्यातकीर्त खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन हे समस्त विज्ञानप्रेमींसाठी आणि विज्ञानविश्वासाठी अतीव वेदनादायी आहे. एका महान वैज्ञानिकाला आपण यामुळे कायमचे मुकलो आहोत. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात विपुल प्रमाणात विज्ञान साहित्य निर्माण होत आहे व दिग्गज मंडळींची मांदियाळी या साहित्याला मायबोली मराठीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हिरिरीने प्रयत्न करत आहेत. त्यापैकी डॉ. नारळीकर आघाडीचे लेखक होते. प्रारंभीच्या काळात मराठी विज्ञान साहित्याची उपेक्षा होण्यामागची तीन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे, विज्ञान हा अवघड विषय आहे, हा समज आणि विज्ञान साहित्याच्या समीक्षेचे शिवधनुष्य आपल्याला पेलणार नाही असा गैरसमज समीक्षकांनी करून घेतला होता. दुसरे म्हणजे, मराठीतले सुरुवातीचे विज्ञान साहित्य हे परभृत होते आणि संपूर्ण नावीन्यामुळे प्रकाशक-संपादकांचे त्याकडे लक्ष गेले नाही. तिसरे कारण, विज्ञान साहित्यात अन्य साहित्य प्रवाहाप्रमाणे अवतीभवतीच्या वास्तवाचे चित्रण नसते, तर उद्याचे, परवाचे असते. विज्ञान कथा तर आज अस्तित्वात असलेल्या विज्ञानाचे भविष्यातील प्रक्षेपण असते.
या कारणास्तव विज्ञान साहित्य प्रारंभीच्या काळात वाचकांपर्यंत नीट पोहोचले नाही; पण डॉ नारळीकर यांनी आपल्या संशोधन कार्यातून उसंत काढून समाजातील सर्वसामान्य माणसात विज्ञान प्रसार करण्याच्या ‘मिशन’पोटी 1974 पासून विपुल अशी साहित्य निर्मिती केली. त्यात महितीपूर्ण विज्ञान लेख, विज्ञान कथा नि कादंबर्या, आत्मचरित्र इ.चा समावेश आहे. ‘यक्षाची देणगी’, ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’, ‘खगोलशास्त्राचे विश्व’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘विज्ञानाची गरुडझेप’, ‘टाईम मशिनची किमया’, ‘व्हायरस’, ‘अभयारण्य’, ‘सृष्टी विज्ञान गाथा’ (संपादन), ‘आकाशाशी जडले नाते’, ‘गणित आणि विज्ञान - युगायुगांची जुगलबंदी’, ‘वैज्ञानिक आणि समाज’, ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘पोस्टकार्डातून विज्ञान’, ‘चार नगरीतले माझे विश्व’ ही त्यांची सारी पुस्तके लोकप्रिय ठरली. त्यांची साहित्यसंपदा इंग्रजी-मराठी नि हिंदी भाषेत आहे. त्यांच्या साहित्याचे रशियन, चिनी, पॉलिश, इटालियन, फ्रेंच, स्पॅनिश, ग्रीक, जपानी तसेच हिंदी, कानडी, तेलगू, बंगाली भाषांत अनुवाद झाले आहेत. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, सूक्ष्म अवलोकन नि तीव्र आकलन या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या लिखाणाला एक वेगळीच झालर प्राप्त झाली. मराठी विज्ञान लिखाणाला वैभवाप्रत पोहोचविणार्या या विज्ञान तपस्वीचे ‘दशकातला लेखक’ म्हणून कौतुक झाले.
विज्ञानाचा प्रसार या कळकळीमुळे डॉ. नारळीकर अन्य होतकरू विज्ञान लेखकांना शाबासकी देऊन कौतुक करत असत; मात्र विज्ञान लिखाणाला परविज्ञानाचा मुलामा देऊ नये, असेही खडसावत. विज्ञान हा बाऊ करण्यासारखा नाही, तर आनंद घेण्यासारखा प्रांत आहे आणि त्या आनंदाची तुलना इतर कोणत्याही आनंदाशी करता येणार नाही, ही त्यांची जीवननिष्ठा होती. तरुण, होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दिशा दाखविण्याचे कार्य ते सातत्याने करत आले. या विज्ञानयुगात समज आणि विज्ञान यांच्यात सुसंवाद असणे महत्त्वाचे आहे व त्यासाठी विज्ञानाची घोडदौड आपल्याला पचविता आली पाहिजे. त्यासाठी विज्ञानाचे फायदे-तोटे समजून घेणे आवश्यक आहे. विज्ञान साहित्य त्याबाबतीत हातभार लावू शकते. विज्ञानात न सुटलेल्या प्रश्नांचे डॉ. नारळीकर यांना सतत आकर्षण वाटत आले. त्या प्रश्नांना आव्हान समजून, त्यांची उकल करताना त्यांच्या हातून काहीतरी रचनात्मक होत राहावे, हा त्यांचा ध्यास राहिला. वक्तशीरपणा आणि वेळेचे उत्तम नियोजन यामुळे ते आपले संशोधन, शिकवणे आणि ‘आयुका’सारख्या आंतरस्तरीय कीर्तीच्या संशोधन संस्थेचे व्यवस्थापन करून लिखाण करायला वेळ काढू शकले. ते ज्ञानपिपासू होते. शांत स्वभावाचे असले, तरी ते अकार्यक्षमतेवर चिडत असत. त्यांच्या नर्मविनोदी स्वभावाची झलक त्यांच्या लिखाण-व्याख्यानातून अनुभवला मिळत असे.
एकदा ते वसईला व्याख्यानासाठी आले होते व विषय होता, ‘अंतराळातील आश्चर्ये’. ख्रिस्ती धर्मपीठाने 350 वर्षांनंतर गॅलिलिओ या खगोलविंदाच्या कार्याची चौकशी करून 1992 मध्ये क्षमा मागितली होती. त्याचा उल्लेख करीत ते म्हणाले होते, ‘आजच्या काळात चौकशीसाठी समिती नेमली जाते आणि तिचा निकाल जाहीर होतो, हेच मुळी आश्चर्य आहे.’ त्यांच्या या मिश्कील वक्तव्याने श्रोत्यात हास्याची हळुवार लाट पसरली होती. नारळीकर सरांच्या अंगी कोणते गुण नव्हते? प्रज्ञा आणि प्रतिभा, ज्ञानोपासना आणि ज्ञानपीपासू, ध्येयवाद आणि विज्ञाननिष्ठा, निगर्वी वृत्ती आणि पारदर्शक स्वभाव, नम्रता आणि ऋजुता या सार्यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या ठायी आढळत असे. ते स्वभावाने लीन आणि प्रसिद्धीपराङ्मुख असले, तरी ज्याप्रमाणे पिकलेल्या फणसाचा वास, ढगामागून जाणार्या विमानाचा आवाज, वाळवंटातील वाळूवर पडलेला चंद्रप्रकाश कुणी आवरू शकत नाही. तद्वतच डॉ. नारळीकरांची कीर्ती कुणी रोखू शकले नाही आणि येणार्या पिढ्यांमध्येही त्यांचे विज्ञान साहित्य मौलिक मार्गदर्शन करत राहील.