Diwali Festival | महातेजाचा महाउत्सव

Diwali Festival |
Diwali Festival | महातेजाचा महाउत्सव
Published on: 
Updated on: 

पं. विजयशास्त्री जोशी

अज्ञानाचा अंधार ज्ञानाने, निराशेचे मळभ आशेने आणि द्वेषाचा अंधःकार प्रेमाने दूर करण्याची प्रेरणा दीपोत्सवातून मिळते. भौतिक समृद्धीच्या मागे धावताना माणसाने आपली माणुसकी, संस्कार आणि नात्यांची ऊब गमावू नये, याची आठवण दिवाळी करून देते. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने खरी दिवाळी ही ज्ञानप्रकाशाची आहे. कारण, अंतःकरणात प्रज्वलित झालेला ज्ञानदीप आयुष्यभर मार्गदर्शन करीत राहतो. येत्या गुरुवारपासून (दि. ५ नोव्हेंबर) होणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने...

भारतीय संस्कृतीच्या आणि उत्सवांच्या समृद्ध परंपरेत दिवाळीला अनन्यसाधारण स्थान आहे. दिवाळीचे आगमन होताच अवघ्या जनजीवनाला एक विलक्षण चैतन्य प्राप्त होते. घराघरांत सुरू होणारी स्वच्छता, अंगणात रेखाटल्या जाणार्‍या रांगोळ्या, दाराबाहेर लटकणारे आकाशकंदील, पणत्यांचा मंद प्रकाश, फराळाचा सुगंध आणि आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी यांतून मिळणारी आनंदानुभूती भौतिक सुखांपेक्षा कैक पटींनी वेगळी असते. दीपोत्सवाला हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. प्रकाश आणि अंधार, ज्ञान आणि अज्ञान, सदाचार आणि दुष्प्रवृत्ती यांच्यातील संघर्षाचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. मानवी जीवनात आशा, समाधान, समृद्धी आणि सद्‌भावना यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उत्सव भारतीय समाजाच्या सांस्कृतिक जाणिवांचा अविभाज्य भाग बनला आहे.

ज्ञानेश्वरीतील पंधराव्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, 'सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥' संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिवाळीच्या प्रकाशाला ज्ञानाची विलक्षण उपमा दिली आहे. पूर्व दिशेला सूर्य उगवला की, अवघे विश्व उजळून निघते. त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश माणसाच्या अंतःकरणात उतरला की, अज्ञानाचा अंधार दूर होतो. शब्दांना अर्थाचे, विचारांना विवेकाचे आणि जीवनाला आत्मबोधाचे तेज प्राप्त होते. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने खरी दिवाळी ही अशा ज्ञानप्रकाशाची आहे. घराच्या अंगणात लावलेले दिवे काही काळाने शांत होतात; परंतु अंतःकरणात प्रज्वलित झालेला ज्ञानदीप आयुष्यभर मार्गदर्शन करीत राहतो, असे याचे सार आहे.

दिवाळी या शब्दाची उत्पत्ती ‘दीपावली’ या संस्कृत शब्दापासून झाली. दीपांची आवली म्हणजे दिव्यांची रांग, असा त्याचा अर्थ. अंधारलेल्या परिसरात लावलेली एक छोटीशी पणतीही सभोवताल प्रकाशमान करते. या साध्या कृतीत भारतीय तत्त्वज्ञानातील एक गहन आशय सामावलेला आहे. अज्ञानाचा अंधार ज्ञानाने, निराशेचा अंधार आशेने आणि द्वेषाचा अंधार प्रेमाने दूर करण्याची प्रेरणा दीपोत्सवातून मिळते. भारतीय चिंतन परंपरेतील ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना याच भावनेचे दर्शन घडविते. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची ही प्रार्थना मानवी जीवनाच्या आध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीची आकांक्षा व्यक्त करणारी आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रज्वलित होणारा प्रत्येक दिवा मांगल्य, विवेक आणि सद्‌भावनेचे प्रतीक ठरतो.

दिवाळीशी जोडलेल्या अनेक पौराणिक कथा लोकश्रृत आहेत. रामायण परंपरेनुसार प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून सीता व लक्ष्मणासह अयोध्येत परतले. त्यांच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्यावासीयांनी दीप प्रज्वलित केले. सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर झालेला विजय हा याचा भावार्थ आहे. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या अत्याचारातून लोकांची मुक्तता केल्याची कथा नरकचतुर्दशीशी जोडलेली आहे. भारतीय कृषी संस्कृतीशीही दिवाळीचे घनिष्ठ नाते आहे. पावसाळ्याची सांगता होत असताना आणि खरीप हंगामातील पिके घरात येण्याच्या काळात दिवाळी साजरी होते. शेतकर्‍याच्या कष्टाला आलेले फळ, धान्याने भरलेली कोठारे आणि नव्या आर्थिक व्यवहारांची सुरुवात यांमुळे या सणाला समृद्धीचे महत्त्व प्राप्त झाले. व्यापारी समाजात लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने नवीन हिशेब वह्या सुरू करण्याची परंपरा आहे. लक्ष्मीपूजनातील समृद्धीची संकल्पना आर्थिक संपन्नतेबरोबरच कौटुंबिक समाधान, आरोग्य, ज्ञान आणि सौहार्द यांनाही महत्त्व देते.

दिवाळीच्या उत्सवातील प्रत्येक दिवसाला स्वतंत्र सांस्कृतिक अर्थ आहे. वसुबारसेला गोमातेविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरीपूजन आणि आयुरारोग्यासाठी मंगलकामना केली जाते. नरकचतुर्दशीच्या पहाटे अभ्यंगस्नान करण्याची परंपरा शरीरशुद्धी आणि प्रसन्नतेशी जोडलेली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांत केली जाणारी लक्ष्मीमातेची पूजा सुखसमृद्धीचा पाया आहे. बलिप्रतिपदेला बळीराजाच्या स्मरणाबरोबरच नव्या वर्षाच्या स्वागताची भावना व्यक्त होते. बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचे बंध घट्ट करणारी भाऊबीज कुटुंबव्यवस्थेला आणि समाजाला बळकटी देणारा आहे. या सर्व परंपरांमधून जिव्हाळा, परस्परांविषयीचा आदर आणि नातेसंबंधांचे महत्त्व प्रकट होते.

उटण्याचा सुगंध, सुगंधी तेल, नवीन वस्त्रे आणि पारंपरिक फराळ यांमुळे दिवाळीच्या वातावरणाला प्रसन्नता लाभते. चकली, करंजी, लाडू, अनारसे, चिवडा आणि शंकरपाळे यांसारख्या पदार्थांच्या तयारीत रमताना कौटुंबिक हेवेदावे बाजूला पडतात, तर मुलांनी तयार केलेले मातीचे किल्ले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणार्‍या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि त्यांच्या शूर मावळ्यांचे स्मरण करून देतात. दिवाळीचा सांस्कृतिक विस्तार हिंदू परंपरेपुरता मर्यादित राहिलेला नाही. जैन धर्मात भगवान महावीरांच्या निर्वाणाचे स्मरण या काळात केले जाते. शीख परंपरेतील बंदी छोड दिवस हा गुरू हरगोबिंद यांच्या मुक्ततेशी संबंधित आहे. परंपरांचा ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ वेगवेगळा असला, तरी प्रकाश, मुक्ती आणि मांगल्याच्या भावनांमुळे त्यांच्यात सांस्कृतिक जवळीक निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील विविधतेचा आदर आणि सहअस्तित्वाची भावना अशा उत्सवांमधून अधिक दृढ होते.

आज दीपोत्सवाची परंपरा भारताच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार गेली आहे. नेपाळ, श्रीलंका, मॉरिशस, फिजी, मलेशिया, सिंगापूर, ब्रिटन, अमेरिका आणि इतर अनेक देशांत भारतीय वंशाचे नागरिक दीपोत्सव उत्साहाने साजरा करतात. विविध देशांतील सार्वजनिक ठिकाणी दीपप्रज्वलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक उत्सव आयोजित केले जातात. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी दिवाळी ही आपल्या मातृभूमीशी, भाषेशी आणि संस्कृतीशी नाते जपण्याची संधी असते. त्याच वेळी इतर समाजघटकांना भारतीय परंपरांची ओळख करून देण्याचे कार्यही या उत्सवातून घडते.

काळाच्या ओघात दिवाळीच्या स्वरूपात अनेक बदल झाले आहेत. पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर विद्युत रोषणाई आली, घरगुती फराळाबरोबर तयार पदार्थांची बाजारपेठ विस्तारली आणि शुभेच्छापत्रांची जागा आधुनिक संदेशव्यवस्थेने घेतली. बदलाची प्रक्रिया निरंतर चालणारी असल्याने दीपावली त्याला अपवाद असणे अपेक्षित नाहीच; पण या उत्सवाचे मूळ सौंदर्य जपण्याची जबाबदारी प्रत्येक पिढीवर आहे. अनावश्यक खर्च, दिखाऊपणा, ध्वनी आणि वायू प्रदूषण यांमुळे सणातील प्रसन्नता कमी होऊ नये, याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. पर्यावरणपूरक सजावट, मातीच्या पणत्यांचा वापर, स्थानिक कारागिरांच्या वस्तूंना प्राधान्य आणि गरजू कुटुंबांच्या आनंदात सहभागी होणे यांमधून दिवाळीचे सामाजिक महत्त्व अधिक वाढू शकते.

दिवाळीचा खरा आनंद माणसामाणसांतील स्नेहभावनेत सामावलेला आहे. लखलखत्या दिव्याइतकेच मनातील सद्‌भावनेला महत्त्व आहे. घरातील ज्येष्ठांचा आदर, लहान मुलांवरील प्रेम, शेजार्‍यांशी जिव्हाळा आणि समाजातील वंचितांविषयीची संवेदनशीलता या मूल्यांची जपणूक करण्यानेच या उत्सवाला अर्थ प्राप्त होणार आहे. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्याची वृत्ती ही भारतीय सण परंपरेची खरी शिकवणूक आहे. भौतिक समृद्धीच्या मागे धावताना माणसाने आपली माणुसकी, संस्कार आणि नात्यांची ऊब गमावू नये, याची आठवण दिवाळी करून देते. भारतीय संस्कृतीने प्रकाशाला ज्ञानाचे, पावित्र्याचे आणि आशेचे प्रतीक मानले आहे. दिवाळीच्या असंख्य दिव्यांतून व्यक्त होणारा आशावाद शतकानुशतके मानवी जीवनाला प्रेरणा देत आला आहे. काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीही बदलल्या; परंतु प्रकाशाची, तेजाची, चैतन्याची असीम ओढ कायम राहिली. मनातील अज्ञान, अहंकार, मत्सर आणि कटुता दूर करून विवेक, करुणा, प्रेम आणि सदाचार यांचा प्रकाश पसरविण्यातच दीपोत्सवाचे सार्थक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.