

विवेक कुलकर्णी
अपनी चाल में वो दम रखते हैं, कि शतरंज क्या हम जिंदगी भी जीत लेते हैं, हे तंतोतंत लागू होतं ते नागपूरची कन्या दिव्या देशमुखला! 64 काळ्या-पांढर्या घरांचे जग... जिथे प्रत्येक चाल पुढच्या अनेक शक्यतांना जन्म देते, जिथे संयम, बुद्धिमत्ता आणि धैर्याची कसोटी लागते. याच जगात, जिद्दी दिव्याने आपल्या बुद्धीच्या बळावर असा काही ’शह’ दिला की, यामुळे ती एकाच वेळी चौसष्ठ घरांची सम्राज्ञी बनली, विश्वजेती ठरली आणि भारताची नवी ग्रँडमास्टरही बनली.
एखादे प्यादे जेव्हा आपल्यापासून सातव्या घरात पोहोचते, त्यावेळी ते प्यादे रहात नाही, अगदी वजीरासारखे बुद्धिबळाच्या पटावरील सर्वात ताकदवान मोहरा बनतं. सातव्या घरात पोहोचल्यानंतर मिळणारी असामी ताकद हा केवळ बुद्धिबळातील एक नियम न राहता अनेक स्त्रियांच्या आयुष्याचीही व्याख्या आहे. अशाच एका ‘प्याद्याचं’ ‘राणी’ होणं नुकतंच आपल्या डोळ्यांसमोर घडलं. तिचे नाव अर्थातच... दिव्या देशमुख.
दिव्याचा जन्म 2005 चा. वयाच्या पाचव्या वर्षी घरच्या घरी खेळता खेळता बुद्धिबळाची ओळख झाली. सुरुवातीला छोट्या स्थानिक स्पर्धा, मग राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जिद्दीने खेळ सुरूच राहिला. बालपणातच शिस्त, संयम आणि चिकाटीचा वारसा तिला लाभला. दिव्याच्या घरातील वातावरण अभ्यासकेंद्रित होतं; पण तिच्या आई-वडिलांनी तिच्या बुद्धिबळाच्या आवडीला प्रोत्साहन दिलं. तिच्या आईने तर अनेकदा तिला सरावासाठी सहकार्य करताना आपल्या कारकीर्दीत अनेक त्याग केले. कधी कधी ‘किंग’सुद्धा सुरक्षित नसतो, पण ‘प्याद्याला’ समोर धाडणं हे मोठं साहस असतं. दिव्या तसंच प्यादं ठरली - वेळोवेळी स्वतःला पुढे ढकलत राहिली, मार्गक्रमण करत राहिली. तिचा आत्मविश्वासच तिचा ‘राणी’ होण्याचा आधार बनला. प्रत्येक यशस्वी खेळाडूच्या मागे अयशस्वी क्षणांची मालिका असते. दिव्यालाही अनेकदा अपयश स्वीकारावं लागलं. आर्थिक मर्यादा, स्पर्धांमध्ये सतत प्रवास, मानसिक थकवा आणि शिक्षणातील तडजोड या सार्यांना तिने धैर्याने तोंड दिलं.
या प्रवासात तिला प्रेरणा मिळाली ती भारताच्या इतर महान खेळाडूंकडून. जेव्हा ती मानसिकदृष्ट्या थकून जायची, तेव्हा ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘मेरी कोम’ या चित्रपटांमधील गाणी तिच्यात एक नवी ऊर्जा भरायची. त्या गाण्यांमधील जिद्द, हार न मानण्याची वृत्ती आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ तिला तिच्या ध्येयाची आठवण करून द्यायची. जणू काही मिल्खा सिंगचा वेग आणि मेरी कोमचा पंच तिच्या चालींमध्ये उतरत असे!
बुद्धिबळाच्या पटावर राणी सर्वात शक्तिशाली असते. ती कोणत्याही दिशेने, कितीही घरे जाऊ शकते. आज दिव्या त्या पटावरची राणी बनली आहे. तिने सिद्ध केले आहे, की प्रतिभा आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तुम्ही खेळाचे नियम स्वत:च्या बाजूने झुकवू शकता. अर्थात, दिव्याचा हा विजय एका रात्रीत मिळालेला नाही. यामागे वर्षानुवर्षांची तपश्चर्या आहे. लहान वयातच या खेळाची गोडी लागल्यानंतर तिने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. दिवसाचे अनेक तास बुद्धिबळाच्या पटावर सराव करणे, नवनवीन डावपेच शिकणे, जगभरातील महान खेळाडूंचे सामने अभ्यासणे हा तिचा दिनक्रम बनला होता. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे तिने केलेल्या अथक परिश्रमाचे फळ आज तिला मिळाले आहे.
आजची तरुणी केवळ पुस्तकी शिक्षणात नव्हे तर खेळाच्या माध्यमातूनही यशस्वी होऊ शकते, हे दिव्याने दाखवून दिलं.तिचं साधं, हसतमुख व्यक्तिमत्त्व, समजूतदारपणा आणि चाणाक्ष बुद्धिमत्ता सार्यांना प्रेरणा देणारे आहेत. ती आजच्या मुलींना एक संदेश देते - तुम्हाला जर स्वतःवर विश्वास आहे, तर कोणतीही स्पर्धा फारशी मोठी नाही. या स्पर्धेत कोनेरू हम्पीसारख्या दिग्गज, अनुभवी ग्रँडमास्टरचे आव्हान मोडीत काढणे सहजसोपे अजिबात नव्हते. खरंतर हम्पीचा अनुभव दांडगा. तिने अनेक मातब्बरांना यापूर्वी पराभवाचे डोस दिलेले. त्यातही आई असणे ही जबाबदारी आणि खेळातील स्पर्धा यांचा तोल साधणं फार मोठं आव्हान असतं. हम्पीने ते सक्षमपणे निभावलेलं. पण, निर्णायक क्षणी खेळ उंचावण्यात दिव्या यशस्वी झाली आणि विजयश्रीने तिच्या गळ्यात यशाची माळ घातली. दिव्याने हम्पीबद्दल सतत आदर बाळगलेला. ती म्हणते, कोनेरुसारख्या खेळाडूंनीच आम्हाला दिशा दाखवली.
आज भारताला दिव्या देशमुखसारख्या खेळाडूंची गरज आहे - जी समोरचं आव्हान ओळखते, त्याचं विश्लेषण करते आणि योग्य वेळ साधून ‘चेकमेट’ करते. तिचं यश म्हणजे फक्त पदकं नाहीत, ते आहे यशस्वी विचार, जिद्द आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचं मूर्तिमंत उदाहरण. शेवटी एक सुविचार आठवतो - प्यादा जर स्वतःवर विश्वास ठेवतो, तर तोच सातव्या रांगेत पोहोचत एक दिवस वजीर बनतो. दिव्याने हेच सोदाहरण सिद्ध केलंय!
बुद्धिबळाच्या गंभीर वातावरणातही दिव्याची स्वतःची एक वेगळी शैली आहे. तिच्या कारकीर्दीचे एक अनोखे वैशिष्ट्य असे, की ज्या ज्यावेळी तिला टायब्रेकर खेळावा लागला, त्या-त्यावेळी तिने तिचा ‘लकी’ गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला आणि त्या त्या प्रत्येक वेळी ती जिंकण्यात, यश खेचून आणण्यात यशस्वी झाली. यंदाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक फायनलमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली. सामना टायब्रेकरमध्ये गेला, दिव्याने तो लकी गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला आणि यशश्रीही खेचून आणली!