

योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी अलीकडेच बोलताना 2024 मध्ये 13 लाख तरुण शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे आणि त्यामुळे 6 अब्ज डॉलरचे परकीय चलनही त्यांच्यापाठोपाठ देशाबाहेर गेल्याचे सांगितले. उपराष्ट्रपती म्हणाले की, मुलांना परदेशात जाण्याच्या नव्या आजाराने ग्रासले आहे. शिक्षणासाठी बाहेर जाणे हा एक आजार असेल, तर मग आपल्या देशातील असंख्य नेते, प्रतिष्ठित मंडळी, श्रीमंत या सर्वांच्या मुलांना हा आजार झालाय, असे समजायचे का? तो आज नाही, तर अनेक दशकांपासून आहे. अभ्यासू मुलांनाच नाही, तर बेकायदा काम करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून अमेरिका आणि युरोपात घुसखोरी करणार्या हजारो तरुणांनादेखील आहे. परदेशात जाण्याला आजार म्हणत असाल, तर तो रोग आला कोठून, कसा निर्माण झाला?
मथळा वाचून तुम्हाला एखादा गंभीर आजार किंवा रोगाविषयी लेख असेल, असे वाटू शकते. मात्र, इथेच तुमची गल्लत होऊ शकते. अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी एका ठिकाणी बोलताना देशाबाहेर जाण्याचा तरुणांना ‘आजार’ झाला असल्याचे मत मांडले. अर्थात, तरुणाई देशाबाहेर का जात आहे? कशामुळे देश सोडण्याची वेळ आली? यामागची प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात. श्रीमंत देश वगळले तर सर्वच विकसनशील देशांत ‘ब्रेन ड्रेन’ अखंड सुरू असते; पण भारतात परिस्थिती अशीच राहिली तर हा आजार ‘महासाथी’चे रूप धारण करू शकतो.
भारत हा तरुण देश पूर्वी होता, आता आहे की नाही ठाऊक नाही. कारण, 2011 नंतर जनगणनाच झालेली नाही. म्हणून त्याविषयी निश्चित सांगता येत नाही. तूर्त तरुणांची संख्या तर खूप आहे. तरुणांना काम हवे आणि पैसाही हवा आहे. या ओढीने तरुणांची धडपड सुरू आहे. प्रत्येक जण पैसा कमावण्याचा विचार करत आहे. सर्वांना काहीना काहीतरी करून दाखवायचे आहे. खूप स्वप्ने आहेत आणि प्रसिद्धीही मिळवण्याची इच्छा आहे. या बळावर सर्वांची पळापळ सुरू आहे. असे कोणतेच शहर नाही की, तेथे खेड्यापाड्यातून, तांड्यावरून आलेल्या तरुणांची गर्दी दिसणार नाही. उत्तर प्रदेश, बिहारचे लोक तर राज्याच्या राजधानीपासून ते दिल्ली, मुंबई, चेन्नईपर्यंत मजल मारत आहेत. पंजाब, हरियाणावाल्यांनी तर आणखीच डोके लावले आहे. ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने युरोप, कॅनडा, अमेरिकेत बस्तान हलविण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहेत. एकुणातच सर्वांनाच कोठे ना कोठे जायचे आहे. यापैकी काहींना कामही मिळाले. काहींनी चांगले काम मिळण्याच्या हेतूने अभ्यासही सुरू केला. जे काहीच करू शकत नाहीत, कोठेच मेळ बसण्याची शक्यता दिसत नाही, असे तरुण ‘काही तरी करूया’ या विचाराने लखनौ, पटणा यासारख्या शहरात मोमो विकत आहेत किंवा रिक्षा चालवत आहेत. अशा नव्या तरुणांच्या लाटेतही काही जण चुकीच्या मार्गाने जात आहेत. तुरुंगात बसून टोळीचे सूत्र सांभाळणार्या लोकांकडे भरती होऊन ते अधिक पैसा कमावण्याचा विचार करत आहेत. याउपरही ज्यांना अशा उचापती करू नये, असे वाटत असते म्हणजे एखाद्या टोळीत सामील व्हायचे नाही किंवा कॅनडा, मुंबई काहीही नको अशी मुले मात्र विद्यापीठातून पदव्या घेऊन सरकारी नोकरीसाठी परीक्षा देण्याची तयारी करत आहेत आणि ऑर्डरची वाट पाहत आहेत. या आधारे ते आपल्या पालकांचे स्वप्न जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातही सरकारी नोकरीच्या आशेवर जगणार्या तरुणांच्या अपेक्षांचा सूर्य अस्ताकडे जात असल्याचेही दिसत आहे. सरकारी नोकरीत बढती मिळणे तर दूरच, ती टिकली तरी खूप. नव्या सहस्रकात जन्मलेल्या तरुणांना एव्हाना या कठीण वास्तवाचे आकलनही झाले असेल.
देशाच्या ‘नायकां’चे सत्य सर्वांनाच कळून चुकले आहे; मात्र त्यावर चर्चा कमी होताना दिसते. कदाचित एखाद्याने भाष्य केले किंवा लेखन केले तरी सरकार काय बोलणार? मग उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी किमान देशाच्या तरुणांचे चित्र तरी मांडले आणि त्यांनी 2024 मध्ये 13 लाख तरुण शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे सांगितले. एवढ्या संख्येने तरुण देशाबाहेर गेल्याने 6 अब्ज डॉलरचे परकी चलनही त्यांच्यापाठोपाठ देशाबाहेर गेले आहे. उपराष्ट्रपती म्हणाले की, मुलांना परदेशात जाण्याच्या नव्या आजाराने ग्रासले आहे. आता या मतावर कोण बोलणार? शिक्षणासाठी बाहेर जाणे हा एक आजार असेल, तर मग आपल्या देशातील असंख्य नेते, प्रतिष्ठित मंडळी, श्रीमंत या सर्वांच्या मुलांना हा आजार झालाय, असे समजायचे का? तो आज नाही तर अनेक दशकांपासून आहे. हा आजार केवळ अभ्यासू मुलांनाच नाही, तर बेकायदा काम करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून अमेरिका आणि युरोपात घुसखोरी करणार्या हजारो तरुणांनादेखील आहे. परदेशात जाण्याला आजार म्हणत असाल, तर तो रोग आला कोठून, कसा निर्माण झाला? एवढा मोठा देश, शिक्षणासाठी असंख्य महाविद्यालये, विद्यापीठे, स्वयंरोजगाराच्या असंख्य योजना, नोकर्यांचा भडिमार सर्वकाही असताना हा आजार आपल्याकडे का फैलावला? अर्थात त्याचे उत्तर लपविण्यासारखे नाही. ते सर्वांनाच ठाऊक आहे; पण याबाबत जाबही विचारण्यात काहीच अर्थ नाही. कारण, हा आजार केवळ आपल्याकडेच नाही तर अनेक देशांतदेखील आहे. बांगला देशचे उदाहरण घ्या. तेथील तरुण युरोप, अमेरिकेत जात आहेत आणि ज्यांना ते शक्य नाही ते भारतात येऊन भंगार विकण्याचे किंवा कचरा उचलण्याचे काम करत आहेत. दुसरा शेजारचा देश नेपाळचीदेखील हीच गत आहे. तेथील तरुणदेखील उझबेकिस्तानपासून मेक्सिको, अमेरिकेपर्यंत धडकत आहेत. परंतु, गरीब आणि पैशाची जुळवाजुळव न करू शकणारे तरुण भारतातील रेस्टॉरंटमध्ये पुलाव तयार करत आहेत. हा ‘आजार’ आपल्याप्रमाणेच अन्य देशांतही पसरलेला आहे. श्रीमंत देशांतील तरुणांत हा आजार नाहीये. मात्र, दुसर्या देशांचे ‘आजारी’ तरुण तेथे वेगळाच ‘आजार’ पसरवत आहेत. म्हणून तेथील दरवाजेही आता फार काळ खुले राहणार नाहीत.
दीडशे कोटी लोकसंख्या असणार्या आपल्या देशातील आणखी एक ‘शक्ती’ आंध्र प्रदेशातून आली. प्रगत विचारांचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी एक घोषणा केली ती म्हणजे ‘अधिकाधिक मुले जन्माला घाला, आम्ही प्रोत्साहन देऊ.’ कारण, राज्यातील तरुणांची संख्या कमी होत असल्याचे आणि ज्येष्ठांचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. राज्यातील तरुणांची कमतरता निर्माण होण्याचे कारण म्हणजे स्थानिक तरुणांचे अन्य राज्यांत किंवा परदेशात स्थलांतर होय. वास्तविक, नायडू त्यांच्या राज्यातील तरुण कोठे गेले हे सांगत जरी नसले, तरी ते थोडेच उत्तर प्रदेश, बिहार किंवा दिल्लीत गेले असतील. खरे म्हणजे इस्रायलपासून अमेरिकेपर्यंत तेलुगू भाषिकांची संख्या विपुल आहे. हैदराबाद येथे व्हिसा मंजुरीसाठी दररोज गर्दी होते. नायडूंचे आवाहन गंभीर आहे आणि गोंधळ निर्माण करणारे आहे. गेल्या पाच दशकांत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात मुले जन्माला घालण्याचे आवाहन सत्तापदावरील व्यक्तीने केल्याचे ऐकिवात आले आहे. कामाची टंचाई नसलेल्या, उद्योगांची चणचण नसलेल्या आंध्रासारख्या राज्यात अशा प्रकारची स्थिती निर्माण होणे आश्चर्यकारक आहे. हा ट्रेंड ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता कालांतराने त्याला गंभीर वळण मिळू शकते आणि याचे असाध्य रोगात रूपांतर होण्याचे स्पष्ट दिसत आहे. हा आजार महासाथीचे रूप धारण करण्यास वेळ लागणार नाही. असे घडले तर काय होईल? कुशल आणि पात्र तर तरुण मंडळी तरतील; पण उर्वरित लोकांचे काय होणार?
एक कटुसत्य सांगता येईल. दुर्दैवाने, आपल्याकडे गर्दी खूप आहे आणि कुशल लोक जाहिराती देऊनही मिळत नाहीत. आपल्याकडे असंख्य प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे असून, तितक्याच प्रमाणात पदव्या आणि कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र मिळवणारे तरुणही दिसतात. परंतु, ते किती उपयुक्त आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे; मग या तरुणांचे काय होणार? मनात असंख्य प्रश्न आहेत, त्यावर समाधानकारक उत्तर मिळत नाहीये. तरुणांची चिंता करणारे मध्यमवयीन आणि ज्येष्ठ आता या ‘आजारा’वर काही उपचार शोधू शकतील का? आणि शोधले तरी त्यावर कितपत विश्वास ठेवला जाईल? हादेखील प्रश्न आहे. उलट शंका अधिक उपस्थित केल्या जातील. यानिमित्ताने एका जुन्या म्हणीची आठवण काढू. ‘उम्मीद पे दुनिया कायम है’ तेव्हा आपणही ठेवूया उम्मीद ! पुढचे पुढे...