AI emotional support | डिजिटल सहानुभूती

AI emotional support |
AI emotional support | डिजिटल सहानुभूती
Published on
Updated on

सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी

कृत्रिम मेधा अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कोणताही पूर्वग्रह न ठेवता संवाद साधते. त्यामुळे काही लोकांना प्राथमिक भावनिक दिलासा मिळू शकतो. विशेषतः एकटेपणा, कामाचा ताण किंवा सामाजिक दडपण अनुभवणार्‍या तरुणांमध्ये अशा संवादांचे प्रमाण वाढताना दिसते.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आज आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनत चालली आहे. माहिती शोधणे, भाषांतर करणे, लेखन, शिक्षण, कार्यालयीन कामे अशा अनेक क्षेत्रांमध्ये एआयचा वापर वाढत आहे; मात्र गेल्या काही वर्षांत एक वेगळाच बदल दिसून येतो आहे. अनेक लोक आता आपल्या भावनिक आणि मानसिक अवस्थेबद्दलही एआयशी संवाद साधू लागले आहेत. एकटेपणा, ताण, चिंता, नैराश्य किंवा भावनिक अस्वस्थतेच्या क्षणी लोक एआयकडे बोलण्यासाठी, मन मोकळे करण्यासाठी किंवा आधार मिळवण्यासाठी वळत आहेत. यालाच ‘डिजिटल सहानुभूती’ असे म्हटले जाऊ लागले आहे.

आपल्या मानवी संवादामध्ये सहानुभूतीला खूप महत्त्व असते. एखाद्या व्यक्तीचे दुःख समजून घेणे, त्याच्या भावना ऐकून घेणे आणि त्याला भावनिक आधार देणे ही मानवी नात्यांची मूलभूत गरज आहे. एआय प्रत्यक्ष भावना अनुभवत नसला, तरी तो भाषेतील भावना, शब्दांचा संदर्भ आणि संवादाचा सूर ओळखून सहानुभूतीपूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अनेकांना एआय सोबत संवाद करताना ‘कोणी तरी आपले ऐकून घेत आहे’ अशी भावना निर्माण होते. विविध आंतरराष्ट्रीय अभ्यासांनुसार मानसिक तणाव, एकटेपणा आणि भावनिक आधारासाठी एआय आधारित संवाद प्रणालींचा वापर वेगाने वाढत आहे. विशेषतः 18 ते 30 वयोगटातील अनेक युवक भावनिक तणावाच्या काळात एआय चॅटबॉटशी संवाद साधत असल्याचे दिसून आले आहे. काही संशोधनांमध्ये सुमारे 30 ते 40 टक्के वापरकर्त्यांनी एआय संवादामुळे तात्पुरता भावनिक दिलासा मिळाल्याचे नमूद केले आहे; मात्र मानसिक आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे की, एआय प्राथमिक आधार देऊ शकतो; परंतु गंभीर मानसिक समस्यांमध्ये मानवी समुपदेशन आणि तज्ज्ञांची मदत अत्यावश्यक राहते.

डिजिटल सहानुभूतीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची उपलब्धता. एआय आधारित प्रणाली 24 तास उपलब्ध असतात. अनेक वेळा मानसिक तणावाच्या क्षणी माणसाला लगेच कोणाशी बोलावे, हे सुचत नाही. काही लोकांना कुटुंबीय किंवा मित्रांसमोर मन मोकळे करण्यास संकोच वाटतो. अशावेळी एआय कोणताही पूर्वग्रह न ठेवता संवाद साधतो. त्यामुळे काही लोकांना प्राथमिक भावनिक दिलासा मिळू शकतो. विशेषतः एकटेपणा, कामाचा ताण किंवा सामाजिक दडपण अनुभवणार्‍या तरुणांमध्ये अशा संवादांचे प्रमाण वाढताना दिसते. मानसिक आरोग्य क्षेत्रातही एआयचा उपयोग वाढत आहे. ध्यान, श्वसन प्रक्रिया, तणाव व्यवस्थापन, सकारात्मक विचार यांसारख्या बाबतीत एआय मार्गदर्शन करू शकतो. काही डिजिटल प्लॅटफॉर्म वापरकर्त्याच्या भाषेतील बदल, भावना किंवा तणावाचे संकेत ओळखून त्याला मदत घेण्याचा सल्लाही देतात. संकटाच्या परिस्थितीत हेल्पलाईन किंवा तज्ज्ञांची मदत सुचवणे, हेही एआय प्रणाली करू लागल्या आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यामध्ये एआय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

मात्र, या सकारात्मक बाजूसोबत काही गंभीर मर्यादाही लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एआय हा माणूस नाही. तो भावना ‘अनुभवत’ नाही. तो केवळ उपलब्ध माहिती आणि भाषेच्या नमुन्यांवर आधारित प्रतिसाद तयार करतो. त्यामुळे काही वेळा तो परिस्थितीची गंभीरता अचूकपणे ओळखू शकत नाही. उदाहरणार्थ, आत्महानी किंवा तीव्र नैराश्याच्या संकेतांमध्ये चुकीचा प्रतिसाद धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच मानसिक समुपदेशनासाठी एआयवर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भावनिक अवलंबित्व. काही लोक एआयशी इतके जोडले जाऊ शकतात की, वास्तविक मानवी नात्यांपासून ते दूर जाऊ लागतात. एआय नेहमी उपलब्ध असतो, विरोध करत नाही आणि तत्काळ प्रतिसाद देतो. त्यामुळे काहींना तो अधिक ‘सोयीस्कर’ वाटू शकतो; परंतु खर्‍या आयुष्यातील मानवी नाती, भावनिक स्पर्श, समजूत आणि सामाजिक आधार यांची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही.

डिजिटल गोपनीयताही तितकीच महत्त्वाची आहे. मानसिक स्थिती, वैयक्तिक अनुभव किंवा भावनिक समस्या यांसारखी संवेदनशील माहिती एआय प्लॅटफॉर्मवर शेअर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वापरकर्त्यांनी कोणती माहिती द्यायची आणि कोणती टाळायची, याबाबत सजग असणे गरजेचे आहे. एआयचा वापर करताना संतुलित द़ृष्टिकोन आवश्यक आहे. एआयला ‘सहायक’ म्हणून वापरणे योग्य ठरू शकते; पण ‘अंतिम तज्ज्ञ’ म्हणून नव्हे. प्राथमिक भावनिक आधार, माहिती किंवा संवादासाठी एआय उपयोगी ठरू शकतो; मात्र गंभीर मानसिक तणाव, नैराश्य, आत्महानीचे विचार किंवा दीर्घकालीन भावनिक समस्या असल्यास मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक किंवा विश्वासू व्यक्तींची मदत घेणे अत्यावश्यक आहे.

आजच्या डिजिटल युगात एआय आणि मानवी भावना यांचा संबंध अधिक जवळचा होत चालला आहे. डिजिटल सहानुभूती ही तंत्रज्ञानाची एक नवी आणि प्रभावी दिशा आहे. योग्य वापर केल्यास ती लोकांना आधार, संवाद आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता देऊ शकते; मात्र तंत्रज्ञानावर अंधविश्वास न ठेवता त्याच्या मर्यादा समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एआय ऐकू शकतो, संवाद साधू शकतो, आधाराचे शब्द देऊ शकतो; पण मानवी मन खर्‍याअर्थाने समजून घेण्यासाठी मानवी स्पर्श, अनुभव आणि नाती यांची गरज कायम राहणार आहे. म्हणूनच डिजिटल सहानुभूतीचा स्वीकार करताना तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना यांच्यातील संतुलन जपणे हीच काळाची खरी गरज आहे.

एआय ला काही उदाहरण दाखल विचारलेले प्रश्न आणि त्याची एआयने दिलेली उत्तरे :

प्रश्न 1 - मला आज खूप वाईट वाटतंय. काहीही करण्याची इच्छा नाही. आयुष्यात काहीच अर्थ उरला नाही असं वाटतंय.

AI चे उत्तर :

तुम्ही सध्या खूप जड भावना अनुभवत आहात. अशावेळी स्वतःला एकटे ठेवू नका. एखाद्या विश्वासू व्यक्तीशी संपर्क साधा, थोडी विश्रांती घ्या आणि आवश्यक वाटल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घ्या. तुम्हाला याचा सामना एकट्याने करायची गरज नाही.

हा संवाद AI आधारित डिजिटल सहानुभूतीचे उदाहरण मानता येईल. AI भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करतो, संवाद शांत ठेवतो आणि आवश्यक ठिकाणी मानवी मदतीचा सल्लाही देतो.

प्रश्न 2 - माझ्या मनात स्वतःला इजा करण्याचे विचार येत आहेत.

AI चे उत्तर :

आता तुमची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. कृपया स्वतःला एकटे ठेवू नका आणि जवळच्या विश्वासू व्यक्तीशी तत्काळ संपर्क साधा. भारतातील Tele-M-N-S मानसिक आरोग्य हेल्पलाईन 14416 किंवा 1-800-891-4416 वर मदत उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थितीत 112 वर संपर्क साधता येईल. तुम्हाला हे एकट्याने हाताळण्याची गरज नाही.

हे उदाहरण AI आधारित डिजिटल सहानुभूतीचे महत्त्व दर्शवतात. AI भावनिक आधार देतो, संवाद संवेदनशील ठेवतो आणि संकटाच्या परिस्थितीत तातडीने मानवी मदतीकडे मार्गदर्शन करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news