Delhi Hostel Collapse | वसतिगृहे की मृत्यूचे कोंडवाडे?

Delhi Hostel Collapse |
Delhi Hostel Collapse | वसतिगृहे की मृत्यूचे कोंडवाडे?
Published on
Updated on

डॉ. सुकृत खांडेकर

वसतिगृहे हे पैसे कमविण्याचे अनेकांचे मोठे साधन बनले आहे. खासगी वसतिगृहे चालविणाऱ्यांची एक लॉबी बनली आहे. त्याकडे प्रशासन, पोलीस, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे मुळीच लक्ष नसेल, तर दिल्लीतील सत्यनिकेतनसारखी दुर्घटना घडल्यावर उत्तरदायित्व कुणाचे?

नवी दिल्लीतील पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या विद्यार्थी वसतिगृहाची इमारत अचानक कोसळली आणि सात विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. दहापेक्षा अधिक विद्यार्थी जखमी झाले. देशाच्या राजधानीत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांत किंवा महाविद्यालयांच्या वसतिगृहांमधे पुरेशी सोय होऊ शकत नाही. गेल्या कित्येक वर्षांत विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहांची संख्या गरजेनुसार वाढलेली नाही. मोठमोठ्या शहरात जाती आणि समाजानुसार वसतिगृहे उभारली गेली. मग, त्या शहरात बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी राहायचे कुठे? कुणीही हौस म्हणून वसतिगृहात राहत नाहीत. खासगी वसतिगृहांची भरमसाट भाडी परवडत नाहीत, तरीही आपल्या मुला-मुलींनी शहरात जाऊन चांगले शिक्षण घ्यावे, यासाठी पालक पोटाला चिमटा काढून पाल्यांच्या शिक्षणाचा व वसतिगृहांचा खर्च करीत असतात. मग, खासगी किंवा अनधिकृत वा बेकायदा वसतिगृहांवर नियंत्रण कुणाचे असते? जिथे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असेल व जिथे सुरक्षिततेचा गंधही नसेल तिथे विद्यार्थ्यांनी कोणाच्या भरवशावर त्या खोल्यांमध्ये राहायचे? वसतिगृहे हे पैसे कमविण्याचे अनेकांचे मोठे साधन बनले आहे. खासगी वसतिगृहे चालविणाऱ्यांची एक लॉबी बनली आहे. त्याकडे प्रशासन, पोलीस, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे मुळीच लक्ष नसेल, तर दिल्लीतील सत्यनिकेतनसारखी दुर्घटना घडल्यावर उत्तरदायित्व कुणाचे?

दक्षिण दिल्लीत दिल्ली विद्यापीठाजवळ असलेल्या सत्यनिकेतन इमारतीत मोठ्या संख्येने विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून राहतात. विद्यापीठाला जवळ राहण्याची सोय म्हणून सत्यनिकेतनमध्ये विद्यार्थी राहण्यासाठी पसंती देतात. सत्यनिकेतन हे काही आदर्श वसतिगृह नाही. तिथे पेईंग गेस्ट म्हणून सोयीसुविधा मुबलक आहेत असेही नाही. दिल्ली विद्यापीठापासून कमी अंतरावर सत्यनिकेतन आहे म्हणून विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून पंसती देतात. दिल्लीमध्ये विद्यापीठे आणि महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. दरवर्षी देशातील अन्य राज्यांतून मोठ्या संख्येने दिल्लीत शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात. दिल्लीत दीड लाखाहून अधिक विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून विविध खासगी वसतिगृहात राहत असावेत. दिल्ली विद्यापीठातील वीस महाविद्यालयांत मिळून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात पाच हजार जागा आहेत. लाखोंच्या संख्येने विद्यार्थी दरवर्षी शिक्षणासाठी दिल्लीत येतात, त्यांना राहण्यासाठी खासगी वस.तिगृहाचाच आधार घ्यावा लागतो. पेईंग गेस्ट म्हणून खोली शोधावी लागते.

उत्तर दिल्ली व दक्षिण दिल्ली भागातील विद्यापीठ व महाविद्यालयांजवळ असलेल्या सत्यनिकेतन, मुखर्जीनगर, विजयनगर, हडसन लेन, कमलानगर, शक्तीनगर येथील वसतिगृहांमध्ये पेईंग गेस्ट म्हणून जागा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी असते. एका खोलीसाठी दरमहा पंधरा ते वीस हजार भाडे आकारले जाते. शिवाय तीन महिन्यांचे भाडे हे एजंटला कमिशन म्हणून द्यावे लागते. खोलीतील सोयीसुविधांनुसार भाडे वाढत जाते. पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या विद्यार्थ्याला सुरक्षित वाटले पाहिजे. त्या इमारतीची स्थिती कशी आहे? वीज, पाणी यांची सेवा कशी आहे? स्वच्छता व सुरक्षितता व आजुबाजूचे वातावरण यालाही महत्त्व आहे.

डीडीए कॉलेज, भारती कॉलेज, इंटरनॅशनल स्टुडंट्स‌ हाऊस फॉर वूमेन, डीयू प्रशासनाचे अंडर ग्रॅज्युएट होस्टेल फॉर गर्ल्स, शहीद सुखदेव कॉलेज, श्री गुरू गोविंद सिंह कॉलेज, शहीद राजगुरू कॉलेज, केशव महाविद्यालय, महाराजा अग्रसेन कॉलेज, एसजीटीबी खालसा कॉलेज, दौलतराम कॉलेज, हंसराज कॉलेज, हिंदू कॉलेज, लेडी इरविन कॉलेज, मिरांडा हाऊस अशा अनेक कॉलेजेसची नावे देता येतील की, तेथे वसतिगृहांची व्यवस्था आहे. दरवर्षी ८० हजार विद्यार्थी पदवी प्राप्त करून बाहेर पडतात. दिल्ली विद्यापीठात पहिल्या तीन वर्षांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ४० हजार आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी संख्या ३ लाख २० हजार आहे. अन्य राज्यांतून दिल्लीत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त आहे. खासगी वसतिगृहात राहण्यासाठी पेईंग गेस्टला पंधरा ते वीस हजार भाडे या हिशेबाने पेईंग गेस्टचा बाजार किती मोठा आहे, याची कल्पना येते.

सत्यनिकेतन ही पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, तेव्हा रविवारची दुपार असल्याने अनेक विद्यार्थी आपल्या खोलीत होते. जे सुट्टीचा दिवस म्हणून बाहेर गेले होते, ते बचावले; मात्र या दुर्घटनेत सात जणांचा मृत्य झाला. दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाने व सुरक्षा दलाने बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचवले. सत्यनिकेतनच्या दुर्घटनेनंतर दिल्ली महानगर परिषदेने युद्ध पातळीवर जुन्या तसेच बेकायदा इमारतींची पाहणी सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाने सत्यनिकेतन दुर्घटनेला दिल्ली महानगर परिषद जबाबदार असल्याचे म्हटले, तसेच सरकारलाही आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असा इशारा दिला.

सत्यनिकेतनची पाच मजली इमारत कोसळली तेव्हा तिच्या दुरुस्तीचे काम चालू होते. तळघरात काम चालू असताना तेथील तुळईचे खांब हटवले असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तळघरात पाणी पुरेसे मिळत नव्हते व तेथे असलेल्या दुकानांनाही पाण्याची समस्या भेडसावत होती, ती दूर करण्यासाठी तळघरात तोडफोड चालू होती. सत्यनिकेतनमध्ये तिनशे खोल्या (घरे) आहेत. पैकी १७० खोल्यांचा वापर पेईंग गेस्ट ठेवण्यासाठी करण्यात येत होता. सत्यनिकेतची ७५ वर्षे वयाच्या मालकीण उर्मिला गुप्ता, त्यांचे ८१ वर्षांचे पती हरिराम, ५२ वर्षांचा मुलगा महेश यांना पोलिसांनी अटक केली आहे. पीजी ऑपरेटर व दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. आज अटकेत असलेले काही दिवसांनी जामिनावर बाहेर येतील, कोर्ट-कचेरीमध्ये कित्येक वर्षे जातील; पण दिल्लीमध्ये करिअर करण्यासाठी आलेल्या सात विद्यार्थ्यांचे सत्यनिकेतनने प्राण घेतले, ते परत कसे येतील? दिल्ली महानगर परिषदेचे साऊथ झोनचे उपायुक्त राकेश कुमार व चार इंजिनिअर्सना निलंबित करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये पंचाहत्तर लाख घरे आहेत. पैकी १. ७५ लाख घरांकडेच मान्यताप्राप्त लेआऊट प्लॅन असेल, तर यापेक्षा चिंताजनक काय असू शकते? दिल्ली व केंद्रात सरकार कोणाचेही असले, तरी दिल्लीतील अनधिकृत बांधकामे कोणालाच थोपवता आली नाहीत. यापुढे अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवले जातील, असा इशारा आता दिल्ली सरकारने दिला आहे.

दिल्लीबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी लवकर खोली मिळावी एवढीच अपेक्षा असते. इमारत मान्यताप्राप्त आहे की नाही, सुरक्षितता व अग्निसुरक्षा आहे की नाही, खोलीत किती विद्यार्थी असणार आहेत याची काहीच कल्पना नसते. वायफायची व्यवस्था असेल, तर भाडे जास्त असते. अशा इमारतीत तळघराचा वापर बिनधास्त चालू असतो. त्याला परवाना आहे का, हे कुणाला ठाऊक नसते. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का, हेही ठाऊक नसते. विद्यार्थी भाडे देतात; पण भाडेकरू नसतात. त्यांच्याकडे मालक व एजंट निव्वळ ग्राहक म्हणून बघतात; पण विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणून काहीच हक्क नसतात. विद्यार्थ्यांची वसतिगृहे ही मृत्युगोल आहेत की कोंडवाडे, अशी त्यांची अवस्था आहे.

पेईंग गेस्टचा बाजार

विद्यार्थ्यांना पेईंग गेस्ट म्हणून खोली मिळवून देणाऱ्या एजंटांचा दिल्लीत सुळसुळाट आहे. परराज्यातून दिल्लीत आलेल्या विद्यार्थ्यांची किंवा त्यांच्या पालकांच्या दिल्लीत ओ‌‌ळखी नसतात. मग, विद्यार्थ्यांना खोली मिळवून देणारे एजंट त्यांना भेटतात. दिल्लीत पेईंग गेस्ट हा मोठा बाजार बनला आहे. पेईंग गेस्ट बाजारात दरवर्षी होणारी आर्थिक उलाढाल ही साडेपाच हजार कोटी असावी असा एक अंदाज आहे; पण एवढी बेकायदेशीर उलाढाल राजधानी दिल्लीत होत असून राज्य व केंद्र सरकार ढिम्म आहे. त्यात कोण कोण गुंतले आहेत, कोण कोण फसवणूक करून पैसे कमावत आहेत, खोली मिळवून देताना विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे कोण आहेत, पेईंग गेस्टचा एवढा मोठा बाजार वर्षानुवर्षे मोकाट कसा, या प्रश्नांची उत्तरे आजवर तरी कधीच मिळाली नाहीत. महाविद्यालयांत पहिल्या वर्षाला दरवर्षी दिल्लीत ७० हजार विद्यार्थी नव्याने प्रवेश घेत असतात. त्यामुळे पेईंग गेस्टचा बाजार न संपणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news