तुकोबांची तपोभूमी

देहू गाव जगद्गुरू संत तुकारामांचे पवित्र स्थान
dehu village holy place of sant tukaram
तुकोबांची तपोभूमीPudhari File Photo
Published on
Updated on
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

पुणे जिल्ह्यातील देहू गाव जगद्गुरू संत तुकारामांचे पवित्र स्थान. या देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर तुकोबांनी अभंग निर्मिती केली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती’ असे सांगणार्‍या तुकोबांचे चिंतन स्थळ म्हणजे भंडारा डोंगर! किंबहुना हा भंडारा डोंगर म्हणजे ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ असे सांगणार्‍या जगद्गुरू संतशेष्ठ श्रीमंत शिरोमणी तुकोबाराय यांची तपोभूमी... अशा या ऐश्वर्यसंपन्न डोंगराचा आता कायापालट होत आहे. आज (दि. 16 मार्च) संत तुकाराम बीज. त्यानिमित्ताने...

भंडारा डोंगराच्या नावाबाबत एक आख्यायिका आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज एकदा मावळ प्रांतातून जात असताना भंडारा डोंगराच्या पायथ्याला आले होते. संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी ते डोंगरावर गेले. त्यांच्यासोबत शेकडो मावळे होते. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. छत्रपतींना समोर पाहताच संत तुकाराम महाराजांनी त्यांना जेवणाचा आग्रह केला. संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी दोघांना पुरेल एवढीच शिदोरी आणली होती; परंतु चमत्कार असा झाला की, त्या शिदोरीतील भाकरी छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्व मावळ्यांनी घेऊनही शिदोरी संपली नाही. मावळे खाऊन तृप्त झाले. तेव्हापासून या डोंगराला ‘भंडारा डोंगर’ असे नाव पडले.

दुसरी कथा भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांनी सांगितली. ‘छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांना सोने-मोती, दागदागिन्यांचा नजराणा पाठवला होता. पण तुकोबारायांनी तो नाकारला. ते साधनेसाठी भंडारा डोंगरावर निघाले होते. त्यांनी डोंगराकडे बोट दाखवले. म्हणाले, ‘तो पाहा, माझ्याकडे सोन्याचा संपूर्ण डोंगरच आहे. मला सोने-नाण्याची काय कमी?’ तुकोबारायांनी दाखवल्याप्रमाणे मावळ्यांना खरोखरच ‘झळझळीत सोनसळा’ असलेल्या भंडार्‍याचे दर्शन झाले. या कथेतील भावार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ म्हणणार्‍या तुकोबांचे बहुमोल विचार यातून समजतात. संत नामदेव महाराज तुकोबारायांच्या स्वप्नात आले होते. ‘मी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती. ती आता तू पूर्ण कर’ असे सोबत आलेल्या पांडुरंगाच्या साक्षीने नामदेवरायांनी तुकोबारायांना सांगितले. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून भंडारा डोंगरावर तुकोबाराय अभंगरचना करीत बसले. एक-एक अभंग सुवर्णाच्या मोलाचा. त्यातील दैवी शब्दांनी भंडार्‍यावरच्या मातीचा कण न् कण पुलकित झाला. तृप्त झाला. समृद्ध झाला. सोन्याचा झाला. त्या अर्थाने मानवी मने समृद्ध-ऐश्वर्यसंपन्न करणार्‍या तुकोबारायांच्या अभंगवाणीचा हा डोंगर साक्षीदार. म्हणून हा भंडारा डोंगर सोन्याच्या मोलाचा. सुवर्णपर्वत!

माघ शुद्ध दशमीच्या गुरुवारी गुरुपदेश झाल्याचे स्वतः जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या माघ शुद्ध दशमीला वारकरी संप्रदायामध्ये अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. यानिमित्त भंडारा डोंगरावर होणार्‍या अखंड हरिनाम सोहळ्यास हजारो भाविक हजेरी लावतात. या वर्षीच्या अखंड हरिनाम सोहळ्याला ह. भ. प. यशोधन महाराज साखरे, ह.भ.प. अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, ह.भ.प. सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. श्रीगुरू एकनाथ आबा वासकर महाराज, ह.भ.प. वारकरीरत्न ज्ञानेश्वर माऊली कदम, ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर या कीर्तनकारांनी आपली कीर्तनसेवा सादर केली. तसेच यावेळी ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या विजेत्या, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सौ. सन्मिताताई शिंदे यांचा ‘तुका आकाशा एवढा’ हा संगीतमय कार्यक्रम, तसेच डॉ. भावार्थ देखणे यांचा ‘बहुरूपी भारुड’ हा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमात श्री. अवधूत गांधी, श्राी. अभय नवले, पांडुरंग पवार अशी महाराष्ट्रातील नामवंत गायक- वादक मंडळी सहभागी झाली होती.

भामचंद्रप्रमाणेच भंडारा आणि घोरवडेश्वर डोंगर तुकाराम महाराजांच्या कवित्वाची प्रेरणास्थळे होती. ज्या शांत वातावरणातील समाधीने महाराजांना निर्गुण निराकार विठ्ठलाची भेट झाली, साक्षात्कार होऊन जेथे काव्य सुचले, जन्मले ते काव्य ज्यांनी पहिल्यांदा अनुभवले, किंबहुना या काव्याच्या जन्माचे स्रोत, साक्षीदार होण्याचे पहिले भाग्य जर कोणाला लाभले असेल तर त्याचे नाव आहे भंडारा. भामचंद्र अर्थात भामगिरी पर्वत आणि घोरवडेश्वर. महाराजांना काव्याची प्रेरणा देणारीच ही स्थळे आहेत. या डोंगराचे ऐतिहासिक महत्त्व विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि पालखी मार्ग विकास आराखडा राबविताना सर्वप्रथम देहू ते भंडारा डोंगर रस्ता प्रशस्त बांधला. डोंगरावर मंदिरापर्यंत चारचाकी वाहने जातात. डोंगरावर संत तुकाराम महाराजांचे मंदिर असून येथे विठ्ठल-रखुमाई, गणेशमूर्ती आणि शिवलिंग आहे. विविध राज्यांतून आलेले भाविक या निसर्गरम्य परिसरात मनोभावे पारायण करत आत्मानंदाची अनुभूती घेतात. गाथा पारायण सोहळ्यात सहभागी होणार्‍या भाविकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था श्री विठ्ठल-रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने केली जाते. मावळ, मुळशी, खेड, हवेली तालुक्यांतील अनेक गावांतील मंडळी डोंगरावर भाविकांसाठी भाकरी पोहोचवतात. याच पवित्र भूमीवर तुकाराम महाराजांनी परमात्मा पांडुरंगाशी संवाद साधला. तुकोबारायांच्या पत्नी जिजाऊ यांच्या पायात रुतलेला काटा साक्षात पांडुरंगाने काढला आणि विश्वरूप दर्शन दिले.

भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर बांधण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू झाले आहे. त्याबाबत माहिती देताना बाळासाहेब काशीद पाटील आणि गजानन शेलार यांनी सांगितले की, गुजरातमधील जगप्रसिद्ध अक्षरधाम मंदिर डोळ्यांसमोर ठेवून त्या धर्तीवर संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. मंदिराची लांबी 179 फूट, उंची 87 फूट आणि रुंदी 193 फूट असेल. मंदिराला तीन भव्य कळस असतील. तब्बल 14 दरवाजे आणि 6 खिडक्या असतील. मंदिराचा कळस सुमारे 96 फूट ते 87 फूट आकाराचा असेल. मंदिराचा घुमट 34 फूट बाय 34 फूट असेल. गर्भगृहे 13.5 बाय 13.5 फूट आकाराची असतील. मंदिराला एकूण पाच गर्भगृहे आहेत. मंदिराची बैठक 9 फूट असेल. मंदिरात मुख्य जागेवर विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. या मूर्ती पाहण्यात मग्न असणारी संत तुकारामांची मूर्ती त्या समोरच बसविण्यात येणार आहे. मंदिराच्या मंडप आणि भिंतीवर कोरीव काम केलेले असेल. छतावरदेखील सुंदर असे नक्षीकाम पाहायला मिळणार आहे. मंदिराच्या बाहेरील खांब चौरसाकृती आणि आतील खांब अष्टकोनाकृती असेल. त्यावर 800 ते 900 वैष्णवांच्या मूर्तीचे कोरीव काम केलेले असेल. मंदिराच्या समोर उजवीकडे आणि डावीकडे शृंगार चौक असतील. संत तुकाराम महाराजांनी ज्या वृक्षाखाली बसून गाथा लिहिली, तो नांदुरकीचा वृक्षदेखील मंदिराच्या बाहेरील भागात मंदिराचाच एक घटक म्हणून असणार आहे.

या भव्य मंदिराचा प्रकल्प अंदाजे 150 कोटींचा आहे. त्यासाठी शासनाची कोणतीही मदत घेतलेली नसून, केवळ दानशूर भक्तांच्या सहाय्यातूनच तो पूर्णत्वास जाणार आहे. सध्या मंदिराचे चौथर्‍यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. ज्यांनी या भव्य-दिव्य मंदिर उभारण्याच्या कामाचा ध्यास घेतला आहे, ते गजानन बापू शेलार मंदिर उभारण्याच्या संकल्पनेबाबत माहिती देताना म्हणतात, श्री स्वामिनारायण मंदिर संस्थानचा आदर्श आमच्या डोळ्यांसमोर आहे. 180 वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थानची देश-विदेशात जवळपास साडेअकराशे मंदिरे, शंभर महाविद्यालये, शंभर हॉस्पिटल्स आणि चौदाशे कॅम्पस आहेत. संस्थानात भगवे वेशधारी बाराशे संत आहेत, ज्यांनी सात वर्षे प्रशिक्षण घेतलेले असते. माझ्या मनात विचार आला, सातशे वर्षांची परंपरा लाभलेल्या वारकरी संप्रदायाचे असे एखादे भव्य मंदिर का असू नये? त्यातूनच मग भंडार्‍यावरील मंदिराबाबत विचार सुरू झाला. आम्ही निरपेक्ष भावनेने मंदिराचा संकल्प सोडला. देशभरातील मंदिरे प्रत्यक्ष पाहून त्यातील सर्वोत्तम जे आहे, ते भंडार्‍यावरील मंदिर प्रकल्पात आणण्याचे माझे स्वप्न आहे... एवढेच नव्हे तर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मंदिर करण्याचे आमचे स्वप्न आहे! एकूणच एक भव्य-दिव्य स्वप्न प्रत्यक्षात साकारले जाणार आहे, त्याची सार्‍यांनाच उत्कंठा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news