

प्रसाद पाटील
किंग चार्ल्स यांनी आपले धाकटे बंधू अँड्र्यू यांच्याकडून ‘प्रिन्स’ हा किताब, त्यांच्याकडे असलेल्या सर्व शाही उपाध्या आणि राजघराण्यातील विशेष मान-सन्मान परत घेतले असून त्यांच्या आलिशान ‘रॉयल लॉज’ या निवासस्थानापासून त्यांना बेदखल केले आहे. अँड्र्यू यांनी केलेल्या कथित गैरवर्तनांचे आणि त्यांच्या नावाभोवती वर्षानुवर्षे जमलेल्या संशयांच्या सावटाचे हे नैसर्गिक, पण अत्यंत कठोर फलित आहे.
ब्रिटनच्या राजघराण्यास जगभरात प्रतिष्ठा आहे. परंपरा, प्रथा, कुटुंब याबाबत लोकांच्या मनात कायम उत्सुकता असते. जगावर राज्य करणार्या या राजघराण्याच्या प्रतिष्ठेला, सन्मानाला अलीकडच्या काळात एका प्रकरणाने गालबोट लागले. परिणामी, एका राजकुमाराची मानद पदवी काढून घेण्याचा निर्णय आला. या नाट्यमय घडामोडींनी युरोपीय राजसत्तेच्या परंपरेला, आधुनिक लोकशाहीला आणि सार्वजनिक जीवनातील नैतिक जबाबदार्यांना नव्याने प्रश्न विचारले आहेत.
एका लैंगिक शोषण प्रकरणात नाव आल्यानंतर ब्रिटनचे राजकुमार (प्रिन्स) अँड्र्यू यांची किंग चार्ल्स तिसरे यांनी त्याची मानद पदवी आणि रॉयल व्यवस्था काढून घेतली. पीडित व्हर्जिनिया गिऊफ्रेने केलेले आरोप आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व जेफ्री एपिस्टिनशी मैत्री असल्याने ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. शेवटी चार्ल्स यांनी राजेशाहीची मर्यादा अबाधित ठेवण्यासाठी अँड्र्यू यांची मानद पदवी काढून घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी, आता प्रिन्स अँड्र्यू ड्यूक ऑफ यॉर्क आता ब्रिटनचे राजकुमार म्हणून ओळखले जाणार नाहीत. प्रिन्स अँड्र्यू हे किंग चार्ल्स तृतीय यांंचे लहान बंधू आहेत.
प्रिन्स अँड्र्यू यांचे नाव एका बलात्कार प्रकरणात उघड झाले असून त्यांना विंडसर येथील रॉयल निवासस्थान तातडीने सोडण्याचे फर्मान काढण्यात आले. त्यांच्यावर पीडित व्हर्जिनिया गिऊफ्रे नावाच्या किशोरवयीन मुलीचे शोषण केल्याचा आरोप आहे. सहा महिन्यांपूर्वी गिऊफ्रे हिने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर जगासमोर आलेले तिचे पुस्तक ‘नो बडीज गर्ल’ यात अँड्र्यू यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यांनी 2022 मध्ये गिऊफ्रे यांच्या समवेत कोट्यवधी डॉलरचा करार करत लैंगिक शोषणाचे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. शिवाय अत्याचार प्रकरणातील कुख्यात आरोपी, अमेरिकी अब्जाधीश जेफ्री एपिस्टिनशीदेखील त्याची मैत्री होती. या मैत्रीमुळे 65 वर्षीय अँड्र्यूवर आरोपाच्या फैरी झाडल्या आणि त्यांना पदावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे ते आता अँड्र्यू माऊंटबेटन विंडसर नावाने ओळखले जातील.
व्हर्जिनिया गिऊफ्रे हिने आपल्या पुस्तकात म्हटले की, 2001 मध्ये जेव्हा मी 7 वर्षांची होते, तेव्हा प्रिन्स अँड्र्यूने माझे लैंगिक शोषण केले. तिच्या मते, अँड्र्यू यांच्यासह अनेकांनी तिचे शोषण केले. गिऊफ्रेने यावर्षी एप्रिल महिन्यात आत्महत्या केली. गिऊफ्रे हिचे पुस्तक आल्यानंतर त्यात उल्लेख केलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाने वातावरण तापले. किंग चार्ल्स यांनी तातडीने कारवाई केली आणि त्यांना रॉयल निवासस्थान सोडण्याचे आदेश दिले; मात्र त्यांच्या दोन मुली रॉयल पॅलेसमध्येच राहतील आणि त्यांची पदवी ‘जैसे थे’ असेल.
अँड्र्यू हे महाराणी एलिझाबेथ यांचे द्वितीय चिरंजीव असून त्यांना प्रिन्स अँड्र्यू ड्यूक ऑफ यॉर्क नावाने ओळखले जाते. ब्रिटनमध्ये राजेशाहीची अस्मिता म्हणून ओळखल्या जाणार्या रॉयल निवासस्थानात तीस खोल्या आहेत. या ठिकाणी त्यांची आई महाराणी एलिझाबेथ यांची आई (क्विन मदर) यांचे वास्तव्य असायचे. 2002 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर हे निवासस्थान प्रिन्स अँड्र्यू यांनी 75 वर्षांच्या भाडेकरारावर घेतले. ते 2003 मध्ये तेथे राहण्यासाठी आले आणि 2025 मध्ये त्यांना हे निवासस्थान सोडावे लागले आहे. किंग चार्ल्स तृतीय यांचे वय आता 76 आहे. त्यांच्या आरोग्याच्या कुरबुरी देखील सुरू आहेत. ब्रिटनचे शाही कुटुंब मर्यादाप्रधान म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या घराण्यावर, निवासस्थानावर कोणतेही आरोप होणार नाहीत, याची ते खबरदारी घेतात आणि ही शतकानुशतके परंपरा राहिलेली आहे; पण आता अँड्र्यू प्रकरणाने राजघराण्याला काही प्रमाणात धक्का लागल्याचे बोलले जात आहे.
गिऊफ्रे हिच्या आरोपाबाबत बोलताना काही जणांच्या मते, हा वाद मिटवण्यासाठी त्यांनी गिऊफ्रेला पंधरा हजार डॉलर दिले होते आणि हे काम परस्पर सहमतीने झाले होते, असा दावा केला. एकंदरीतच गिऊफ्रे हिच्या पुस्तकाने खळबळ उडवून दिली आहे. तिने म्हटल्यानुसार, तिचा वापर करण्यात आला. कधी अमूक व्यक्तीशी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली जायची, तर कधी तमूक व्यक्तीशी संबंध ठेवण्यास भाग पाडले जायचे. एकप्रकारे लोकांची शारीरिक भूक भागविण्यासाठी मला ठेवले होते, असे तिने पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे काही जण अँड्र्यू यांच्यावर कारवाईची वाट पाहत होते. त्यांच्या प्रतिष्ठेला आणखी एक धक्का लागण्याचे कारण म्हणजे अँड्र्यू यांची अमेरिकी अब्जाधीश जेफ्री एपिस्टीनशी असणारी मैत्री. तो अल्पवयीन मुलींची देहविक्री करणारा दलाल म्हणून ओळखला जात असे. त्याच्याशी मैत्री ठेवल्याने राजघराण्याची अब्रू वेशीवर टांगल्याचे बोलले गेले. तूर्त बर्किंगहॅम पॅलेसच्या या निर्णयाने लोकांना दिलासा मिळाला आहे. एकुणातच राजघराण्यावरच्या कलंकामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.
अँड्र्यू यांनी मात्र आरोप नाकारले आहेत. स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी एक सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे लढत राहू, असे म्हटले आहे; मात्र ब्रिटिश जनता अँड्र्यू यांच्या स्पष्टीकरणाने समाधानी नाहीत. ब्रिटनमधील शाही घराणे हे देशावरचे ओझे असल्याचे अजूनही काही जण म्हणतात. अर्थात, ब्रिटनचा वारसा जपला पाहिजे, असेही काहींचे म्हणणे आहे. अँड्र्यू यांना अँड्र्यू माऊंटबेटन विंडसर असे म्हटले जाईल आणि ही पदवी त्यांचे शाही कुटुंबाशी असणारे नाते सांगेल. सॅड्रिघम इस्टेटमध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली आहे. त्यांचा खर्च किंग चार्ल्स स्वत:च उचलतील. एका माहितीनुसार, अँड्र्यू यांची पूर्वाश्रमीची पत्नी सारा यांनी देखील रॉयल निवासस्थान सोडले आहे. त्यांनी ‘डचेस ऑफ यॉक’ ही पदवी परत केली आहे आणि त्यांनी माहेरचे आडनाव फर्ग्युसन वापरण्यास सुरुवात केली आहे. किंग यांनी पंतप्रधान स्टार्मर आणि सरकारला या निर्णयाची माहिती दिली. त्यांनीदेखील कारवाईला परवानगी दिली आहे.
रॉयल निवासस्थानात राहणारे प्रिन्स अँड्र्यू यांच्या खर्चाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. ड्यूक ऑफ यॉर्क हे एवढ्या आलिशान महालाचा खर्च कसा वहन करतात? राजघराण्यातील संपत्तीतून किती जणांचे संसार चालतात, असे प्रश्न उपस्थित केले गेले; पण अधिक खोलवर गेल्यास त्यांचे अब्जाधीश मित्र जेफ्री यांनी मदत केल्याचे उघड झाले असून जेफ्री याच्यावर ब्रिटिश मुलींची तस्करी केल्याचा आरोप आहे. या कारणामुळे बर्किंगहॅम पॅलेसवर कारवाईसाठी दबाव वाढत चालला होता. अर्थात, ब्रिटिश राजघराण्यात नेहमीच कलह सुरू असतो. किंग चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स हॅरी यांनी आपल्या पुस्तकात एक खळबजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, स्वत: आणि त्यांच्या बंधूंना त्यांच्या वडिलांनी चार्ल्स यांनी कॅमिला यांच्याशी विवाह करू नये, असे वाटत होते. हॅरी आणि त्यांचा मोठा भाऊ प्रिन्सेस डायनाचे चिरंजीव आहेत. राजकुमारी डायना यांचा मोटार अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजघराणे वादाच्या भोवर्यात सापडले होते.
प्रिन्स हॅरी यांनी स्पॅनिश भाषेत पुस्तक लिहिले असून त्यात हॅरी आणि त्यांचा भाऊ विल्यम यांच्यात असणार्या ताणतणावाचा उल्लेख केला आहे. ब्रिटनच्या राजघराण्यात वाद सुरू असतात आणि त्याच्या बातम्याही प्रसिद्ध होत राहतात; मात्र राजा किंवा राणी यांच्या विरोधात निदर्शने करण्यास परवानगी नाही. या कारणामुळे कुटुंबाप्रति जनतेत असणारा असंतोष कधीच समोर येत नाही. राजघराण्याला विरोध केल्यास शांतता भंग केल्याच्या आरोपावरून अटक केली जाते; परंतु व्हर्जिनिया गिऊफ्रेने दि. 25 एप्रिल 2025 रोजी आत्महत्या केली. तिच्या पुस्तकात अँड्र्यू याच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. या पुस्तकामुळे खळबळ उडाली; पण राजघराण्याची अस्मिता वाचविण्यासाठी किंग चार्ल्स यांना कारवाईचे पाऊल उचलावे लागले.