Dashavatar | दशावतार विकास-विध्वंसाचे द्वंद्व

dashavatar-development-versus-destruction
Dashavatar | दशावतार विकास-विध्वंसाचे द्वंद्वPudhari File Photo
Published on
Updated on

उत्तमराव निर्मळ, सिनेक्षेत्राचे अभ्यासक

भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर बोट ठेवणारे अनेक चित्रपट आले; मात्र ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे वेगळे स्थान पटकावले आहे. पौराणिक अवतारांचा आधार घेत वर्तमानातील भ्रष्ट व्यवस्था, अन्याय्य विकासाची संकल्पना आणि निसर्ग विनाशाचे भयावह वास्तव उलगडून दाखवणारा हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता न राहता विचारप्रवृत्त करणारा ठरतो.

ओशन आर्ट हाऊसनिर्मित ‘दशावतार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने तिकीट खिडकीवर अक्षरशः धमाका उडवून दिला. या चित्रपटाने पहिल्या 3 दिवसांतच जगभरात 5.22 कोटींचा गल्ला जमावल्याचे पाहायला मिळाले. ‘दशावतार’ रीलिज झाल्यावर ‘बागी 4’, ‘मिराय’ या अन्य बॉलीवूड, साऊथ चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असणार्‍या दिलीप प्रभावळकर यांनी वयाच्या 81 व्या वर्षीही हृदयस्पर्शी, कसदार आणि दमदार अभिनय सादर केला आहे. त्यांच्या चेहर्‍यावरचे निरागस हास्य, संवादफेक, भूमिकेतले बारकावे आणि रसिकांना खिळवून ठेवण्याची ताकद अजूनही तितकीच लाजवाब आहे, हे या चित्रपटाने पुन्हा एकदा ठळक केले आहे. नैसर्गिक सहजता, विनोदबुद्धी, भावनिक ताकद, भावमुद्रा, सूक्ष्म निरीक्षण, संयमित, सहजसुंदर हृदयाला भिडणारा अभिनय आणि बहुआयामी भूमिका साकारण्याची क्षमता ही प्रभावळकरांची विशेषता आहे. त्यांच्या डोळ्यांमध्ये आणि चेहर्‍याच्या स्नायूंमध्ये प्रचंड अभिव्यक्ती शक्ती आहे. राग, दु:ख, विमनस्कता किंवा आनंद कुठलीही भावना ते थोडक्यात आणि प्रभावीपणे दाखवतात. त्यांचा विनोद कधीही कृत्रिम नसतो, तर तो प्रसंगानुरूप उत्स्फूर्त असतो. ‘दशावतार’मध्ये तर आख्खा सिनेमा त्यांनी खाल्लाय!! सिद्धार्थ मेमन व प्रियदर्शिनी इंदलकर, तसेच महेश मांजरेकर, भरत जाधव, रवी काळे, अभिनय बेर्डे या कलाकारांनी त्यांच्या छोट्या-मोठ्या भूमिकेत खास ठसा उमटविला आहे. लेखकाचे हृदयस्पर्शी संवाद, दिग्दर्शकाची कलाद़ृष्टी, छायाचित्रकाराची पारखी नजर, कथेला साजेसे पार्श्वसंगीत, कथा ओघवती राहील असे संकलन तसेच इतर सर्व तांत्रिक बाजू यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांवर दमदार छाप उमटवण्यात यश मिळवले आहे.

मुळात हा चित्रपट केवळ पौराणिक अवतारांची माहिती दाखवणारा चित्रपट नसून या अवतारांच्या माध्यमातून सांप्रतकाळच्या असामाजिक तत्त्वांचे उघडेनागडे बिभत्स स्वरूप निर्भीडपणे दाखवणारा आहे. कायदा हातात घेणे हा न्यायविसंगत चुकीचा मार्ग असल्याचे ज्ञान पाजळणार्‍याला कथानायक बाबुली मेस्त्री (दिलीप प्रभावळकर) थेट सुनावतात की, न्यायाच्या मार्गावर चुकीची माणसे बसल्यामुळे न्यायी माणसांना चुकीचाच मार्ग घ्यावा लागतो. यापेक्षा किती कठोर शब्दांत भ्रष्ट व्यवस्थेचे धिंडवडे काढावेत! गावात खाण खोदून जमिनीचे पोट फाडायचे अन् त्यावर आपले पोट भरायचे हे तत्त्वज्ञान बाबुली मेस्त्रीच्या जीवनतत्त्वात बसत नाही. नितांत सुंदर कोकण आणि माणसातल्या माणुसकीला साद घालणारी साधीसुधी माणसं अन्यायाविरुद्ध त्वेषाने लढताना कोकणच्या लाल मातीपेक्षाही जास्त लाल होतात. परंपरा, धार्मिक चालीरीती, कला, जल, जमीन, जंगल आणि देवधर्म यावर निस्सीम प्रेम करणारी आणि त्यात रमणारी ही भावनाप्रधान आरस्पानी माणसं ही कोकणी लहेजाइतकीच गोड आहेत.

जिथे हे कथानक घडते आहे, त्या कोकणवासीयांना जल, जमीन आणि जंगल हे जीव की प्राण आहेत. त्याच्या संरक्षणासाठी ते जीवावर उदार होणार; परंतु जंगलसंपत्तीचे संरक्षण करणारा मुजोर, नादान, लालची आणि भ्रष्ट सरकारी अधिकारी (वाडेकर) आणि ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ची (सरकारच्या सोयीनुसार) जबाबदारी असलेली भ्रष्ट आणि कर्तव्यकसूर करणारी पोलीस यंत्रणा संगनमत करून वरपर्यंत हात पोहोचलेल्या धनाढ्य, हावरट आणि बेपर्वा घमेंडी खाणमालकाबरोबर (सरमळकर) भ्रष्ट युती करते. हा खाणमालक गावातील स्थानिक पुढारी असलेल्या तांडेलला पैशाची लालूच दाखवून आपलेसे करून घेतो. ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ म्हणतात तोच हा प्रकार. विकला गेलेला हा गावपुढारी तांडेल गावकर्‍यांना विकासाच्या नावाखाली खोट्यानाट्या थापा मारून शांत करतो. तांडेल बाबुली मेस्त्रीच्या एकुलत्या मुलाला (माधव) खाणमालकाकडे विशिष्ट हेतू मनात ठेवून नोकरी देतो. बाबुली मिस्त्रीला आपला भाग उद्ध्वस्त करू पाहणार्‍या खाणमालकाकडे मुलाने नोकरी करू नये, असे मनोमन वाटते; पण मुंबईला दूर कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा गावात सुरू होत असलेल्या खाणीत केली, तर जवळ राहील ही भावना. सरकार दरबारी आर्थिक पोहोच असलेला खाणमालक मौल्यवान धातूच्या शोधासाठी भूमिपुत्रांच्या जंगल-जमिनीवर स्फोटके लावून हा भाग उद्ध्वस्त करू पाहतो. जागृत ग्रामदैवत कातळेश्वराच्या खाली असलेल्या जमिनीत कोबाल्टसारखा मौल्यवान धातू असल्याने ते ठिकाण स्फोटके लावून उडवण्याचे ठरते; परंतु हे बाबुली मेस्त्रीच्या मुलाला समजते आणि हे बिंग फुटू नये म्हणून खाणमालकाची माणसे त्याचा खून करून प्रेमभंगामुळे त्याने आत्महत्या केल्याचे भासवतात. खाणमालकाने पैसे देऊन मिंधे केलेली पोलीस यंत्रणाही यात सहभागी होते; परंतु भूमिपुत्राचा प्रतिनिधी असलेला हाडाचा कलाकार आणि मातीशी इमान असलेला दशावतारी कलावंत बाबुली मेस्त्री ग्रामदैवत असलेल्या कातळेश्वराच्या आशीर्वादाने दशावतारातील मत्स्य, वराह, नरसिंहसारख्या विविध अवताराच्या रूपांत त्या एकेकाचा खात्मा करतो.

खरे तर ‘दशावतार’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांनी कोकणात खदखदत असलेल्या तसेच अन्य ठिकाणी अशाच स्वरूपाच्या विषयावर कठोर भाष्य केले आहे. हा मुद्दा जितका ज्वलंत आहे तितकाच तो राजकीय द़ृष्ट्याही संवेदनशील आहे. अशा प्रकरणात मायबाप सरकार हे पडद्यामागचे सूत्रधार असतात. पडद्यापुढे लढायला त्यांचे शिलेदार असतात. राजकीय सूत्रधारांसाठी विकासाची व्याख्या आपमतलबी आणि खिसेभरू असते. ‘विकास छटाकभर अन् आमदनी किलोभर’ अशी यांची तर्‍हा असते. कोकणातील नाणार रिफायनरी, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प अशा मोठमोठ्या प्रकल्पांविरोधात कोकणवासीयांनी संघर्ष केला आहे. त्याचे मर्म हेच आहे. हे मर्म जाणून त्याच्या वर्मावर हातोडा मारण्याचे काम या चित्रपटाने केले आहे. कोकणाला विकास हवा आहे म्हणून त्या विकासाच्या नावाखाली मामुली नोकर्‍यांचे आमिष आणि फुटकळ भरपाई देऊन कोकणचे पारंपरिक वैभव आणि सर्वस्व असलेल्या जल, जमीन आणि जंगलाचा विध्वंस करायचा, हा कुठला न्याय, असा सवाल हा चित्रपट उपस्थित करतो.

कोकणवासीयांना तिथल्या वनस्पती आणि जैविक विविधतेने समृद्ध असलेल्या निसर्गाचा, पर्यावरणाचा आणि विशेषतः तिथल्या भूमिपुत्रांचा विनाश नको आहे. बहुतेक वेळा गावाचा सरपंच, पोलीसपाटील, वन अधिकारी, स्थानिक राजकीय नेते या सगळ्यांना हाताशी धरून गावकर्‍यांना अंधारात ठेवत अशा प्रकल्पांना वाट मोकळी करून दिली जाते. याला अपवाद असतीलही. नाही असे नाही; पण अत्यंत कमी. तांडेलसारखे गावातील स्थानिक पुढारी त्यांच्या नेत्याच्या गुप्तसुचनेवरून गावात येऊ घातलेल्या धनदांडग्या उद्योगपतीची गरजेपेक्षा जास्त वारेमाप भलावण करू लागले की, आपण समाजावे, तो आणि त्याचा नेता विकला गेलाय. आज सरसकट सर्वत्र हा प्रकार सुरू आहे. विकास प्रकल्पाची चाहूल याच चौकडीला सर्वात आधी लागते आणि त्यांची व्यूहरचना सुरू होते. सामाजिक कार्यात आवश्यक असलेली विश्वासार्हता, पारदर्शकता, निःस्पृहता, निःपक्षता, प्रामाणिकपणा, साधनशुचिता, नैतिकता तथाकथित समाजसेवकांनी गमावल्यामुळे विश्वास तरी कुणावर ठेवावा, हा यक्षप्रश्न सर्वसामान्यांपुढे आहे. त्यामुळे या तथाकथित मेवाप्रेमी धंदेवाईक सेवेकर्‍यांना वगळून सर्वसामान्य जनतेने पुढे सरसावले पाहिजे. संघटित जनशक्तीपुढे भल्याभल्यांना पळताभुई थोडी होते. इतिहास याचा साक्षीदार आहे. हा महत्त्वाचा मौलिक संदेश या चित्रपटातून आपल्याला मिळतो. आपल्यासमोर अन्याय्य घटना घडत आहेत, याची जाणीव होऊनही त्याकडे आपण कानाडोळा करत राहिलो, तर विनाश अटळ आहे. गावकर्‍यांनी एकत्र येऊन अशा अन्यायाविरोधात आवाज उठवला, तर निश्चितपणे योग्य तो निकाल मिळू शकतो, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न बाबुलीसारख्या मनस्वी कलाकाराच्या गोष्टीच्या माध्यमातून निर्माते - लेखक - दिग्दर्शक यांनी या चित्रपटात केला आहे.

‘दशावतार’ या लोककलेचे कोकणची भूमी आणि माणसं यांचेबरोबर घट्ट नातं आहे. दशावतारातील लोकसंगीत, भव्यता, कथासूत्र, उत्स्फूर्त आणि संवादी लोकसहभाग खास असतो. दशावतारातील पौराणिक प्रसंग सादर करणे हे कसलेल्या कलाकाराचे काम असते. त्या कार्यक्रमाची भव्य-दिव्यता कला साकारणार्‍यांच्या अभिनयात असते. तोच त्या पात्राला जिवंत करतो. त्या क्षणी तो ते पात्र जगत असतो. दशावतारात देहभान हरपून कधी हनुमान, कधी धृतराष्ट्र, तर कधी सावित्रीच्या सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्यासाठी आलेल्या यमाची व्यक्तिरेखा साकारणारा कोणी एक बाबुली मेस्त्री (दिलीप प्रभावळकर) हा असाच उत्तम अवलिया दशावतारी कलावंत. दशावतार म्हणजे त्याची केवळ आन- बान- शानच नव्हे, तर ध्यास आणि श्वास. तो अक्षरशः वास्तव जीवनात त्या पात्रांची मूल्ये जगतो. दशावतार हा त्याचा आत्मा असून त्याच्या जगण्याचा तो एकमेव मार्ग आहे. दशावतारातील पात्रांची जीवनमूल्ये हीच मेस्त्रींची जीवनमूल्ये झाली आहेत. द्वैतभाव संपून अद्वैत्वभाव निर्माण झाला आहे. वाढत्या वयामुळे बाबुलीने दशावतार सोडावा, ही त्याच्या मुलाची इच्छा असली, तरी बाबुलीचे मन ते सहजपणे मान्य करायला तयार होत नाही. मुलाला नोकरी लागल्यावर महाशिवरात्रीला शेवटचा दशावतार करेन, असे बाबुली मेस्त्रीने मुलाला वचन दिले; परंतु ज्या नियतीचा अंदाज भल्याभल्यांनाही आला नाही, त्या नियतीच्या मनात भलतेच काहीतरी होते.

‘दशावतार’ चित्रपटात कथा विषयाला अनुरूप अशी मांडणी केली आहे. कोकणातील हिरवेगार, घनदाट, निबीड जंगल, कातळेश्वरासारखी खडकावरील कातळशिल्पे, अडव्या-तिडव्या अरुंद निसरड्या पायवाटा, झुळझुळ पाण्याचे ओहळ, पशुपक्ष्यांचे चिरपरिचित आवाज, नदी-नाले, डोंगरझाडी, मंदिरे, टुमदार कौलारू घरे, नारळी-पोफळीची ताडमाड वनराई, रानफुलांची मनमोहक हिरवीकंच हिरवाई, काजव्यांचे उडणारे नयनरम्य ताटवे, रातकिड्यांची भयावह लयबद्ध किरकीर, गावकर्‍यांची वर्दळ यांचे सर्वांगसुंदर मनमोहक दर्शन चित्रपटात घडते. या पार्श्वभूमीवर यावर वरवंटा फिरवू पाहणारी खाणमालकाची खाण, स्फोटके, कर्णकर्कश आवाजाची अवजड मशिनरी पाहून हृदयाची धडधड वाढते आणि मन विषण्ण होते. निर्माते - लेखक - दिग्दर्शक यांनी या दोन्हींची बेमालूम गुंफण करून जनतेपर्यंत जो संदेश देणे अभिप्रेत होते, तो सफाईदारपणे पोहोचवला आहे. कोकणातील घनदाट जंगलात अनुभवायला मिळणारी गुढता, पशुपक्षी, धीरगंभीर व भीतीदायक शांतता, पावलाचे हळुवार आवाज, छोटे-मोठे इतर आवाज आणि त्याबरोबर होणार्‍या हालचाली या चित्रपटात प्रभावीपणे टिपल्या आहेत. परिपूर्ण तांत्रिक मांडणी करताना दिग्दर्शकाने विशेष लक्ष दिल्याचे प्रत्येक प्रसंगात जाणवते. निसर्ग जसा आहे तसा उभा करण्यात छायाचित्रकाराने कुठेही कसर ठेवली नाही. संकलन करताना कथा न रेंगाळता प्रवाही राहील याची दक्षता घेतली. प्रकाशयोजना, ध्वनी, पार्श्वसंगीत यांचे यथोचित नियोजन केले आहे. या सर्वांच्या सुरेख संगमातून दशावतार खूपच देखणा झालाय यात शंका नाही. कथेच्या मागणीनुसार काही मालवणी संवादही आहेत आणि त्या संवादामुळे चित्रपट पाहताना कोकणबरोबर एक आगळीवेगळे नाते कधी जोडले जाते, हे समजतही नाही.

कुणाचा धर्मावर, देवावर विश्वास असेल किंवा नसेलही; पण नियतीवर तर ठेवावाच लागेल. नियती कुणालाच सोडत नाही. धर्म आणि अधर्म यांचा संघर्ष पुरातन काळापासून चालू आहे. जगात जेव्हा जेव्हा वाईटाचा उदय होतो, तेव्हा तेव्हा चांगल्याचे प्रतिनाम असलेला चिरपरिचित देव नेहमीच त्या वाईटाचा नाश करण्यासाठी कुणाच्या तरी माध्यमातून अवतार घेतो; पण संकटकाळी मदतीसाठी जो कुणी धावून येतो, तो त्याक्षणी देवरूपच असतो. आजच्या काळात अधर्मावर धार्मिकतेच्या विजयाची ही यशस्वी कहाणी आहे आणि ती सुजाण आमजनतेच्या पसंतीला उतरणे स्वाभाविक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news