

विनिता शाह
पर्यटनासाठी प्रसिद्ध असणार्या इंडोनेशिया देशामध्ये अलीकडील काळात एक अत्यंत विचित्र आणि वादग्रस्त सामाजिक प्रथा वाढीस लागली आहे. या प्रवाहाला ‘प्लेजर मॅरेज’ किंवा ‘मुताह निकाह’ असे म्हटले जाते. यानुसार गरीब कुटुंबांतील काही युवती परदेशी पुरुष पर्यटकांशी अल्पकाळासाठी म्हणजेच 10 ते 15 दिवसांसाठी विवाह करतात. ‘मुताह निकाह’ सध्या इराण, इराक, लेबनॉन, सीरिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील काही शियाबहुल भागांमध्ये प्रचलित आहे. काय आहे हा नवा ट्रेंड?
इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश मानला जातो; पण एकेकाळी तिथे हिंदू राजे राज्य करीत होते आणि जनतेचाही बहुतांश भाग हिंदू धर्मीय होता. पुढे काळ बदलला. इस्लामचा प्रसार झाला आणि आज तो एक प्रमुख मुस्लीम राष्ट्र म्हणून ओळखला जातो; परंतु सध्या या देशात एक अत्यंत विचित्र आणि वादग्रस्त सामाजिक प्रथा वाढीस लागली आहे, जिला ‘आनंद विवाह’ किंवा ‘मुताह निकाह’ असे म्हटले जाते.
या प्रथेनुसार, गरीब कुटुंबातील काही युवती परदेशी पुरुष पर्यटकांशी अल्पकाळासाठी म्हणजेच 10 ते 15 दिवसांसाठी विवाह करतात. हा विवाह केवळ तात्पुरत्या कालावधीसाठी केला जातो आणि त्या बदल्यात महिलांना काही रक्कम दिली जाते. त्या काही दिवस त्या पुरुषाच्या पत्नीप्रमाणे राहतात. त्याला घरगुती व शारीरिक सेवा देतात आणि नंतर पर्यटक निघून गेल्यावर विवाह समाप्त होतो. दोघांमधील संबंध पूर्णपणे तोडले जातात आणि पुढे त्या महिला दुसर्या पुरुषाशी पुन्हा असा विवाह करू शकतात. ‘मुताह निकाह’ ही इस्लामच्या शिया पंथातून आलेला एक धार्मिक संकल्पना आहे. अरबी शब्द ‘मुताह’ म्हणजे आनंद. या विवाहाचा उद्देश काही काळासाठी सहजीवनाचा करार मानला जातो. याला तात्पुरता विवाह असेही म्हणतात. यात पुरुषाला स्त्रीला निश्चित रक्कम द्यावी लागते आणि त्या कालावधीत दोघांचे वैवाहिक नाते वैध मानले जाते; मात्र कालावधी संपल्यावर हा विवाह आपोआप संपतो.
पश्चिम इंडोनेशियातील पुंकाक हे पर्वतीय पर्यटनस्थळ या प्रथेसाठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे. इथे मध्यपूर्वेतील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि स्थानिक एजन्सीमार्फत या विवाहांची व्यवस्था केली जाते. एजंट या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावतात आणि व्यवहारातील मोठा हिस्सा स्वतःकडे ठेवतात. या उद्योगातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही काही प्रमाणात चालना मिळते; पण महिलांच्या सुरक्षिततेवर आणि सन्मानावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ‘लॉस एंजिल्स टाईम्स’ने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, अनेक महिलांनी आर्थिक गरजेपोटी हा मार्ग स्वीकारला आहे. काहींचे म्हणणे आहे की, दुसरे कोणतेही काम केल्यास त्यांना फार कमी मजुरी मिळते. त्यामुळे त्यांना कुटुंब चालवण्यासाठी हा मार्ग निवडावा लागतो. एका इंडोनेशियन महिलेने सांगितले की, तिने 13 वर्षांच्या वयात पहिल्यांदा असा विवाह केला आणि नंतर 15 हून अधिक वेळा विविध देशांतून आलेल्या पर्यटकांशी तात्पुरते विवाह केले.
इस्लाममध्ये या प्रथेवर मतभेद आहेत. शिया संप्रदायात ती काहीअंशी मान्य असली, तरी सुन्नी संप्रदाय ती पूर्णपणे हराम मानतो. अनेक विद्वान आणि धार्मिक नेते याला वेश्यावृत्तीचा धार्मिक मुखवटा असे म्हणतात. इंडोनेशियातील विवाह कायद्यांनुसारही असा तात्पुरता विवाह वैध नाही. त्यामुळे कोणी असे विवाह करीत असेल, तर ते कायद्याने गुन्हा मानले जाते आणि त्यासाठी दंड व तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ‘मुताह निकाह’ सध्या ईराण, इराक, लेबनॉन, सीरिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील काही शियाबहुल भागांमध्ये प्रचलित आहे. ईराणमध्ये याला ‘सिगेह’ असे म्हणतात आणि तेथे ते कायदेशीरद़ृष्ट्या मान्य आहे; परंतु इतर देशांत त्याविषयी तीव्र विरोध आणि सामाजिक नापसंती आढळते.
या प्रकारच्या विवाहातून महिलांचे शोषण, लैंगिक अत्याचार आणि मानसिक त्रास यांची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ज्या महिलांना थोडी आर्थिक सवलत मिळते, त्या काही काळाने हे काम सोडून देतात आणि आपले सामान्य आयुष्य पुन्हा सुरू करतात; परंतु बहुतेक महिलांसाठी हा चक्रव्यूह बनतो, ज्यातून बाहेर पडणे कठीण होते. इंडोनेशिया सरकारने या प्रथेला थांबवण्यासाठी कायदेशीर उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही धार्मिक संघटनांनीही या प्रथेला अनैतिक ठरवले आहे, तरीही गरिबी, बेरोजगारी आणि पर्यटनावर अवलंबून अर्थव्यवस्था या तीन घटकांमुळे ‘आनंद विवाह’ हा प्रकार आजही काही भागांत चालू आहे.
या संपूर्ण प्रथेकडे पाहताना हे स्पष्ट होते की, ही सामाजिक विकृती धार्मिक संकल्पनेच्या आवरणाखाली लपलेली आहे. ती महिलांच्या सन्मानावर, सामाजिक मूल्यांवर आणि कायद्यावर मोठा प्रश्न उपस्थित करते. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी अशा प्रथांना विरोध करणे आणि महिलांना सुरक्षित व सन्मानजनक पर्याय उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. इंडोनेशियातील ‘मुताह निकाह’ आता फक्त एक सामाजिक प्रथा नसून काही प्रमाणात उद्योगाच्या रूपात विकसित झाला आहे. अनेक रिसॉर्टस् आणि एजन्सीज या माध्यमातून परदेशी पर्यटकांना स्थानिक महिलांशी संपर्क करून देतात. एका एजंटच्या माध्यमातून महिन्यात 20 ते 25 तात्पुरते विवाह घडवले जातात. प्रत्येक विवाहात ठरावीक शुल्क आकारले जाते आणि त्या पैशातील मोठा हिस्सा एजंटकडे राहतो. या प्रक्रियेत महिलांना फारच कमी रक्कम मिळते. त्यामुळे हा व्यवहार आर्थिकद़ृष्ट्या शोषणात्मक ठरतो.
काही महिलांनी सांगितले की, त्यांनी या विवाहांमधून मिळणार्या पैशाने घरभाडे, आजारी नातेवाईकांचा खर्च किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली; पण बहुतेकांना समाजात अपमान आणि गुप्ततेत जगावे लागते. या विवाहांचे स्वरूप इतके तात्पुरते असते की, अनेकदा महिला आणि पुरुष यांच्यात कोणतेही भावनिक नाते तयार होत नाही. विवाह संपल्यावर दोघे परत भेटतही नाहीत. त्यामुळे अनेक महिला मानसिक तणाव आणि आत्मग्लानीत जगतात. धार्मिक द़ृष्टीनेही हा मुद्दा वादग्रस्त आहे. काही इस्लामी विद्वानांचा दावा आहे की, मुताह निकाहास प्रारंभीच्या काळात युद्धप्रसंगी सैनिकांसाठी तात्पुरता उपाय म्हणून परवानगी देण्यात आली होती; परंतु नंतर त्याला बंदी घालण्यात आली. आज मात्र काही ठिकाणी त्याचा व्यापारी स्वरूपात वापर केला जात आहे, जे मूळ धार्मिक भावनेच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे इंडोनेशिया आणि इतर देशांमध्येही या प्रथेविरुद्ध सामाजिक आणि धार्मिक पातळीवर विरोधाचा आवाज अधिक तीव्र होत आहे.