Rising temperature | आक्रोश जळत्या पृथ्वीचा

Rising temperature Earth impact
Rising temperature | आक्रोश जळत्या पृथ्वीचा
Published on
Updated on

श्रीराम ग. पचिंद्रे

भारतीय नागरी संरक्षण महासंचालनालयाने एक धोक्याची सूचना जाहीर केल्याची बातमी विविध समाजमाध्यमांवर फिरत आहे. दि. 29 एप्रिल ते 12 मे दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कोणत्याही व्यक्तीने (उघड्या आकाशाखाली) बाहेर जाऊ नये. कारण, तापमान 45 ते 55 अंशांपर्यंत जाऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 47 ते 55 अंशादरम्यान वाढणारे तापमान आणि पुढील काही दिवसांत क्युम्युलस ढगांच्या उपस्थितीमुळे बहुतांश भागात उष्ण व दमट वातावरण निर्माण होईल, असं सांगून नागरिकांनी कशाकशाचं पालन करावं, याबाबत अनेक सूचना महासंचालनालयानं केल्या आहेत. त्या सूचनांकडे आपल्याला जायचं नाही. ही परिस्थिती का निर्माण झाली, याचा शोध घ्यायचा आहे.

या उन्हाळ्यात देशातील मोठ्या शहरांचं तापमान म्हणजे उन्हाची होळीच आहे. अकोला 40, नागपूर 46, नवी दिल्ली 40, मुंबई 33 (दमट), पुणे 37, हैदराबाद 44, कोलकाता 32, छत्रपती संभाजीनगर 40, जळगाव- नाशिक 41, कोल्हापूर 37 अंश सेल्सिअस असं तापमान सध्या आहे. ही होळी का व्हायला लागलीय?

गेल्याच वर्षीची गोष्ट. हैदराबादध्ये कांचा गाचीबोवली येथील हैदराबाद विद्यापीठाला लागून असलेल्या भूमीत एक फार मोठा माहिती- तंत्रज्ञान प्रकल्प आकाराला यायचा होता. तो 400 एकर जागेत उभा राहणार होता; पण 400 एकर जागेतील घनदाट अरण्य हा मोठा अडथळा होता; पण अरण्याचा अडथळा बाजूला सारणं तर अगदीच सोपं. आपल्या देशात काही करायचं झालं, तर पहिली कुर्‍हाड हाणली जाते ती झाडांवर! कारण, झाडांचा आक्रोश मानवाला ऐकू येत नाही आणि अरण्यवासी पशू-पक्ष्यांचा आक्रोश दाबून टाकायला राक्षसी यंत्रांचे आणि यंत्रणांचे मालक असणार्‍या मानवाला सहज जमतं. 400 एकर भूमीवरील वृक्षतोडीचा आरंभ करायला यंत्रणेनं वार चांगला निवडला... शुक्रवार संध्याकाळ! पुढचे दोन दिवस न्यायालयाला सुट्टी होती. त्या रात्री आणि पुढील दोन दिवसांत दहा हजारांहून अधिक झाडांची कत्तल झाली. नंतर सर्वोच्च न्यायालयानं वृक्षतोडीला स्थगिती आणली, तोवर असंख्य प्राणी, पक्षी उघड्यावर पडले. माणसाचं घर पाडलं, तर तो गप्प राहतो का? पण, पशू-पक्षी मात्र आक्रंदन करून त्यांच्या वेदना मांडतात त्या मूक असतात. हे मुके जीव पृथ्वीतलावर पहिल्यांदा आले आणि मानव सर्वात शेवटी आला. राजकारण, धर्म, जात, गट, पंथ यासाठी लढणारे लाखो लोक आहेत; पण निसर्गाचे आक्रंदन ऐकून कळवळणारे फार थोडे आहेत. राक्षसी शक्तीने निसर्ग नष्ट केला जातो; पण माणूस मूक राहतो. हैदराबादच्या अरण्यात सातशेहून जास्त फुलझाडांची प्रकार, सस्तन प्राण्यांच्या दहा प्रजाती, पंधरा प्रकारचे सरीसृप, दोनशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. हे मोरांचे मूलस्थान आहे. हे अरण्य कोणाचं, यावरही वाद झाले; पण कोणाच्याही मालकीचे असले, तरी ते तोडावे असा त्याचा अर्थ होत नाही.

सरकारला निसर्गदत्त अरण्ये नष्ट करून युरोपसारखी चकाचक शहरे करायची आहेत; पण भारतासारख्या उष्ण देशाला सिमेंट आणि काचेच्या इमारती घातक आहेत. युरोपात निसर्गाचा समतोल राखून प्रगती केली जाते. युरोपात आणि जपानमध्येही झाडे तोडत नाहीत. ती व्यवस्थित उपटून काढून त्याची अन्यत्र जवळच पुनर्लागवड केली जाते. युरोपातील घनदाट अरण्ये, योग्य पद्धतीची शहरी उद्याने, उपवने, पदपथ हे आपल्या राज्यकर्त्यांना दिसत नाही. भारत हा विकासाचा असमतोल आणि वातावरण बदलाचा फटका सोसणार्‍या पहिल्या पाच देशांपैकी एक आहे. आपल्या प्रत्येक उन्हाळ्यात उष्णतेचा उच्चांक गाठला जातो आणि पावसाळ्यात महापुराचे थैमान माजते. घनदाट अरण्याची कत्तल हा कोणत्याही प्रकल्पाची उभारणी करण्याचा एकमेव उपाय आहे का? रात्री-अपरात्री वृक्षांची कत्तल केली जाते. अवैध झोपडपट्ट्यांची उभारणी करणारे जमीन तस्कर रातोरात निर्माण होतात. हैदराबादमधील 2,300 एकर भूमीचे व्यापारी उपयोजितेसाठी आधीच शोषण करण्यात आले आहे; पण निसर्ग जेव्हा रुद्रावतार धारण करतो, तेव्हा कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाही. उष्णतेच्या लाटा, भूकंप, भूस्खलन, हिमखंडांचं कोसळणं असे अनर्थ घडतात.

ईशान्य भारतात हसदेवमध्ये 1 लाख 27 हजार झाडांची कत्तल पोलिस संरक्षणात करण्यात आली. हत्ती-गेंडे यासारखे मोठे प्राणी शहरात आले. ही जमीन बलाढ्य उद्योगपतींनी गिळंकृत केली. सार्वजनिक हरित क्षेत्रात वृक्षतोड करणं हा मानवी हत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ताजमहालाच्या परिसरातील 454 वृक्षांची अवैधरीत्या कत्तल करणार्‍याला प्रत्येक झाडामागे एक लाख रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. असं करताना ‘हरित क्षेत्र निर्माण करायला शंभर वर्षे लागतात’ असं मत न्यायालयानं नोंदवलेलं आहे.

अगदी अलीकडील विध्वंसाकडे आपण एक द़ृष्टिक्षेप टाकू. पुण्यात गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी 529 मोठी झाडं तोडण्यात आली. त्यातली उंबराची 325 वर्षं वय आणि वडाची 200 वर्षं वयाची झाडं होती. नाशिकला कुंभमेळ्याच्या कारणावरून रस्त्याकडेची 1,825 झाडं तोडली गेली. त्यातली असंख्य झाडं 250 वर्षे वयाची होती. गडचिरोलीत खाण प्रकल्पासाठी 1 लाख 23 हजार झाडांची कत्तल झाली. हा सारा परिसर साग आणि बांबूचा होता. या तोडलेल्या झाडांची भरपाई केली जाणार आहे; पण कुठं? तर हजार किलोमीटर अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यातील जंगलात. तोडली गेलेली झाडं 250 वर्षं वयाची आणि लावली जाणारी झाडं पाच वर्षे वयाची. आहे कुठं ताळमेळ? उत्तराखंडमध्ये रस्ता बांधणीसाठी 7 हजार आणि बंगळूरमध्ये 19 हजार झाडांची कत्तल!

मध्यंतरी महाराष्ट्राच्या एका धडाडीच्या वनमंत्र्यांनी 33 कोटी झाडं लावण्याचा संकल्प घोषित केला होता; पण प्रत्यक्षात काय झालं? घोषित करण्यात आलेली ती झाडं कुणी लावली? कुठं लावली? कधी लावली? कुठं गेली ती सगळी झाडं? उद्योगपती आणि राज्यकर्त्यांना जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी कोळसा, खनिजे, इंधन ही सगळी साधनं आपल्या मुठीत ठेवायची आहेत. त्यासाठी पहिला बळी दिला जातो तो अरण्याचा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news