Cristiano Ronaldo Retirement : अलविदा रोनाल्डो

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निवृत्तीने फुटबॉलविश्वातील एका अविस्मरणीय पर्वावर पडदा

Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoPudhari
Published on: 
Updated on: 
विवेक कुलकर्णी

चेंडूवर ताबा मिळवताच प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीला हादरवणारा वेग, हवेत उंच झेप घेत चेंडूला अचूक दिशा देणारे डोके आणि गोल झाल्यानंतर दोन्ही हात पसरून केलेले ते खास सेलिब्रेशन... हे दृश्य आता पुन्हा पाहायला मिळणार नाही. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निवृत्तीने फुटबॉलविश्वातील एका अविस्मरणीय पर्वावर पडदा पडला.

तेवीस वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द, २३४ सामने, १४६ गोल आणि विक्रमांची अक्षरशः लयलूट... पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्‍याची कारकीर्द तमाम फुटबॉल चाहत्‍यांच्‍या नजरेसमोर तरळल्‍याशिवाय राहिली नाही.

मुळात काही खेळाडू मैदानावर उतरतात, काही सामने जिंकतात, काही विजेतेपदे मिळवतात; पण काही खेळाडू संपूर्ण खेळाची व्याख्याच बदलून टाकतात. ख्रिस्तियानो रोनाल्डो हे याच शेवटच्या वर्गातील नाव. पोर्तुगालच्या एका छोट्याशा बेटावरून सुरू झालेला त्याचा प्रवास जागतिक फुटबॉलच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचला. वेग, ताकद, अफाट गोलक्षमता, कमालीची मेहनत आणि जिंकण्याची अतृप्त भूक या गुणांच्या जोरावर त्याने फुटबॉलविश्वावर दोन दशकांहून अधिक काळ कसे अधिराज्य गाजवले, हे निव्‍वळ लक्षवेधी.

२० ऑगस्ट २००३ रोजी कझाकस्तानविरुद्धच्या सामन्यातून रोनाल्डोने पोर्तुगालच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. त्यावेळी तो अवघ्या १८ वर्षांचा होता. पायातील चेंडूवरची पकड, बचावपटूंना चकवण्याची शैली आणि गोल करण्याची क्षमता लक्षवेधी होती. मात्र, भविष्यात हा खेळाडू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्व विक्रमांना गवसणी घालेल, याची कल्पना कदाचित त्यालाही नसेल. अवघ्या २३ वर्षांच्या प्रवासात त्याने २३४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि तब्बल १४६ गोल नोंदवले. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून त्याने निवृत्ती घेतली. दुसऱ्या क्रमांकावरील लिओनेल मेस्सीच्या नावावर २०८ सामने आणि १२६ गोल आहेत. ही आकडेवारीच रोनाल्डोच्या सातत्याची आणि वर्चस्वाची साक्ष देते. विशेष म्हणजे, २००४ ते २०२६ अशी सलग २३ वर्षे त्याने पोर्तुगालसाठी किमान एक गोल केला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये हा विश्वविक्रम आहे.

सहा विश्वचषक, सहा वेळा गोल!

रोनाल्डोच्या कारकिर्दीतील सर्वांत अविश्वसनीय विक्रम म्हणजे सहा फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करण्याचा पराक्रम. २००६ मध्ये जर्मनीत झालेल्या विश्वचषकापासून २०२६ पर्यंतच्या प्रत्येक स्पर्धेत त्याने गोल केला. फुटबॉलच्या इतिहासात सहा वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा तो पहिलाच खेळाडू. मेस्सीनेही सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला; मात्र सहाही स्पर्धांमध्ये गोल करण्याची कामगिरी केवळ रोनाल्डोच्या नावावर राहिली. या सहा स्पर्धांमध्ये त्याने एकूण ११ गोल केले. वयाच्या ४१ व्या वर्षीही विश्वचषकात गोल करण्याची त्याची क्षमता थक्क करणारी होती. बाद फेरीत गोल करणारा विश्वचषक इतिहासातील सर्वांत वयस्कर खेळाडू होण्याचाही मान त्याने मिळवला.

युरो अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक १४ गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. फ्रान्सचा महान फुटबॉलपटू मिशेल प्लातिनी नऊ गोलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. युरो स्पर्धेत सर्वाधिक ३० सामने खेळण्याचाही विक्रम रोनाल्डोने केला. त्याने २००४, २००८, २०१२, २०१६, २०२० आणि २०२४ अशा सहा युरो स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे, २०१६ मध्ये त्याने पोर्तुगालला युरोपियन अजिंक्यपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यात दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले, तरी बाहेरून संघाला मार्गदर्शन करत त्याने नेतृत्वाची वेगळी छाप पाडली.

रोनाल्डोची गोल करण्याची क्षमता केवळ मोठ्या स्पर्धांपुरती मर्यादित नव्हती. पोर्तुगालकडून त्याने १० वेळा हॅट्‌ट्रिक नोंदवली. युरोपियन फुटबॉलपटूंमध्ये हा सर्वोच्च आकडा आहे. मात्र, प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात निर्माण होणारी त्याची दहशत, निर्णायक क्षणी गोल करण्याची हातोटी आणि कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकण्याची जिद्द यामुळे तो वेगळा ठरला. त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सातत्य. वयाच्या तिशीनंतर अनेक फुटबॉलपटूंची कामगिरी घसरू लागते. मात्र, रोनाल्डोने स्वतःला अधिकाधिक तंदुरुस्त ठेवत वयाच्या चाळिशीतही जागतिक फुटबॉलमध्ये आपले स्थान कायम राखले. २०२६ च्या विश्वचषकातही त्याने गोल नोंदवला. पोर्तुगालला बाद फेरीत स्पेनकडून पराभव पत्‍करावा लागला; पण रोनाल्डोने सहा विश्वचषकांमध्ये गोल करण्याचा ऐतिहासिक पराक्रम याच स्पर्धेत पूर्ण केला.

रोनाल्डोची कारकीर्द केवळ गोल, सामने आणि विक्रमांच्या आकड्यांमध्ये मोजता येणार नाही. त्याच्या यशामागे असलेली मेहनत, शिस्त आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ही त्याची खरी ओळख आहे. मैदानावर कितीही मोठा प्रतिस्पर्धी असला, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी शेवटपर्यंत हार न मानण्याची वृत्ती त्याने दाखवून दिली. पोर्तुगालला २०१६ मध्ये युरो अजिंक्यपद आणि २०१९ व २०२५ मध्ये नेशन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे राहिले.

आता मैदानावर सात क्रमांकाची जर्सी घालून धावणारा रोनाल्डो दिसणार नाही. त्याच्या गोलनंतरचा तो खास जल्लोष, हवेत घेतलेली उंच झेप आणि 'सीआर७'चा गजरही कदाचित पुन्हा अनुभवायला मिळणार नाही. मात्र, चाहत्यांच्या आठवणींतून हे क्षण कधीच पुसले जाणार नाहीत. रोनाल्डोने केवळ विक्रम केले नाहीत, तर विक्रमांचा अर्थच बदलून टाकला. कारकीर्द संपते, विक्रम मागे राहतात; पण काही खेळाडूंचा प्रभाव पिढ्यान्‌पिढ्या कायम राहतो. रोनाल्डो त्यापैकीच एक. मैदानावरचा त्याचा प्रवास थांबला; पण फुटबॉल इतिहासातील त्याचे स्थान अढळ राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.