

शहाजी शिंदे,संगणक प्रणालीतज्ज्ञ
यूट्यूबसारख्या जागतिक व्यासपीठावर दररोज लाखो नव्या व्हिडीओंची निर्मिती होत असताना त्या आशयाचा दर्जा, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा स्पर्श या बाबी अधिक महत्त्वाच्या बनल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर तयार होणार्या फसव्या, पुनरावृत्ती असलेल्या आणि सर्जनशीलतेपासून दूर गेलेल्या कंटेंटचा सुळसुळाट वाढत आहे. त्यामुळे यूट्यूबने आता आपल्या धोरणांत मोठा आणि स्पष्ट बदल केला आहे.
आजच्या डिजिटल युगात माहितीचे स्वरूप, त्याचा वेग, पोहोच आणि परिणाम हे सर्वच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) अधीन होत चालले आहेत. याचाच परिपाक म्हणून इंटरनेटवरील अनेक प्लॅटफॉर्मवर विशेषतः यूट्यूबसारख्या भव्य व्हिडीओ माध्यमावर एक नव्या प्रकारचा धोका निर्माण झाला आहे एआय स्लॉपचा.
‘एआय स्लॉप’ म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने मोठ्या प्रमाणावर जलद गतीने आणि बहुतेक वेळा कोणतीही सर्जनशीलता किंवा वैयक्तिक योगदान न देता तयार केलेला दर्जाहीन, पुनरावृत्ती असणारा आणि पोकळ आशय असलेला कंटेंट. कोणतीही व्यक्ती नसणारे, फक्त मजकुरावर आधारित व्हिडीओ, टेक्स्ट टू स्पीचच्या वापराने केलेले भाष्य, स्टॉक फोटो, जुन्या व्हिडीओ क्लिप्स किंवा इतरांचे आधीचे व्हिडीओ वापरून तयार केलेली द़ृश्ये यांचा यात समावेश होतो. यामध्ये कोणताही नवीन विचार, सर्जनशीलता किंवा वैयक्तिक निरीक्षण नसते. अशा व्हिडीओंना डिजिटल कचरा, मेकॅनिकल कंटेंट म्हटले जाते. हा कंटेंट बर्याचदा स्पॅमसद़ृश वाटतो. उदाहरणार्थ, ‘10 रहस्यमय ठिकाणं’ असा व्हिडीओ अपलोड करताना त्यात फक्त इंटरनेटवरून घेतलेला मजकूर, एआयजनीत आवाज आणि काही असंबंधित फोटो वापरले जातात.
गेल्या अनेक वर्षांपासून यूट्यूबने ‘यूट्यूब पार्टनर प्रोग्रॅम’ (वाईपीपी) अंतर्गत ओरिजिनल किंवा सर्जनशील नसलेल्या अशा व्हिडीओंच्या मॉनिटायजेशनवर बंधने घातली आहेत; मात्र 15 जुलै 2025 पासून हे धोरण अधिक तीव्रपणे आणि सुस्पष्टतेने लागू करण्यात येणार आहे. नवीन धोरणांनुसार, जे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येतात, फुटकळ आशयाचे असतात, पुनरावृत्तीत्तीपूर्ण स्वरूपाचे असतात किंवा अस्सलतेचा समावेश नसतानाही केवळ एआयद्वारे बनवलेले असतात, असे व्हिडीओ आता स्पष्टपणे अपात्र ठरणार आहेत. यूट्यूबचे संपादकीय प्रमुख आणि क्रिएटर लायझन रेने रिची यांनी म्हटलं आहे की, ही कोणतीही मोठी क्रांती नसून काळानुसार कराव्या लागणार्या बदलांपैकीआवश्यक सुधारणा आहे. प्रेक्षकांना खूपदा स्पॅम वाटणारा कंटेंट आता अधिक काटेकोरपणे ओळखला जाणार असून यामुळे यूट्यूबच्या धोरणांना एक प्रकारचा कालसुसंगत चेहरा दिला जाणार आहे.
माहितीच्या स्फोटाच्या काळात आज एखादा व्हिडीओ पाहताना आपण त्याचा स्रोत, तात्त्विक गाभा किंवा आशयाची सत्यता तपासतच नाही. अनेकदा अशा प्रकारचे व्हिडीओ अल्गोरिदमच्या साहाय्याने आपोआप सुचवले जातात. त्यांना लाखो व्ह्यूज असतात. यामध्ये एखादा सुप्रसिद्ध चेहरा एआयच्या साहाय्याने बोलताना दिसतो आणि आपण प्रेक्षक त्यावर विश्वास ठेवतात. हीच खरी यूट्यूबच्या नव्या धोरणांची गरज आहे. कारण, आज एआयवर आधारित कंटेंट केवळ मनोरंजन किंवा माहितीपर राहिलेला नाही, तर तो प्रपोगंडा, अफवा आणि दिशाभूल यासाठी वापरला जातोय. काही चॅनेल्स फक्त एआय संगीत अपलोड करून लाखो सबस्क्रायबर मिळवत आहेत. काही जण एखाद्या चालू घडामोडीवर बनावट एआय व्हिडीओ बनवून प्रेक्षकांच्या भावनांशी खेळ करत आहेत.
यूट्यूब या नव्या धोरणांमुळे खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, सर्जनशीलता म्हणजे काय? हे केवळ वेगळं बोलणं किंवा दाखवणं नसून, त्यामागे अनुभव, विचार, वैयक्तिक सादरीकरण आणि मानवी द़ृष्टिकोन असतो. एआय ते देऊ शकत नाही. हेच यूट्यूब स्पष्ट करत आहे. तुमचं म्हणणं तुमचंच असावं, तुमच्या शैलीत असावं. नव्या धोरणांमुळे रिअॅक्शन व्हिडीओ किंवा इतर सर्जनशील प्रकारांवर गदा येणार नाही, याचीही यूट्यूबने स्पष्टपणे ग्वाही दिली आहे. ते वैयक्तिक द़ृष्टिकोनातून आणि प्रामाणिकपणे सादर केले असतील, तर ते नक्कीच मुद्रीकरणास पात्र ठरणार.
यूट्यूबच्या या धोरणबदलाकडे केवळ एक ‘तांत्रिक अद्ययावत’ म्हणून पाहणे चुकीचं ठरेल. ही एक सांस्कृतिक पुनर्बांधणी आहे. आपल्या डिजिटल समाजाने यापुढे काय पाहावं, काय ऐकावं आणि काय पचवावं, यावरचे नियंत्रण आपण ठरवायचे आहे की एआय?
जगभरातील यूट्यूब क्रिएटर्ससाठी हा इशारा आहे, केवळ व्ह्यूजसाठी कंटेंट बनवू नका, तर आपली एक शैली, एक विचार, एक ओळख निर्माण करा. कारण, शेवटी कृत्रिमतेचा जगात सच्चेपणालाच खरी किंमत असते. यूट्यूबचा हा निर्णय या दिशेने एक स्वागतार्ह पाऊल आहे. यूट्यूबच्या या पावलामुळे ‘कंटेंट क्रिएशन’ या शब्दाचा खरा अर्थ पुन्हा अधोरेखित होतो. केवळ काही तासांत एआयच्या साहाय्याने बनवलेला किंवा इंटरनेटवरून गोळा करून रचलेला मजकूर हा खर्याअर्थाने सर्जनशील मानता येत नाही. त्यामुळे भविष्यात यूट्यूबसारख्या व्यासपीठांवर कंटेंट निर्मिती हा केवळ व्यावसायिक हेतू किंवा कमाईचे साधन न राहता, तो एक सर्जनशील आणि मानवी अनुभव ठरेल, याची अपेक्षा आहे.
आज बहुतांश तरुण पिढी केवळ व्ह्यूज, फॉलोअर्स आणि कमाई याच्या मागे लागून सर्जनशीलतेचा बगल देत आहे. या नव्या धोरणामुळे अशा लोकांना थोडा धक्का बसू शकतो; पण दीर्घकाळासाठी पाहता ही बाब प्रेक्षकांसाठी आणि क्रिएटर्ससाठी फायद्याचीच ठरणार आहे. अस्सल आशय हाच कोणत्याही माध्यमाच्या स्थैर्यासाठीचा आवश्यक घटक आहे. यूट्यूबच्या या निर्णयामुळे भविष्यात ‘क्लोन व्हिडिओज’, ‘एआयवर आधारित फेक न्यूज’ किंवा ‘मशिन जनरेटेड आवाजावर आधारित माहिती’ याला मोठा आळा बसेल. याचा फायदा केवळ प्रेक्षकांनाच होणार नाही, तर खर्याअर्थाने मेहनतीने आणि वैयक्तिक द़ृष्टिकोनातून सामग्री सादर करणार्या क्रिएटर्सनाही मिळेल.
या नव्या धोरणाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे, इंटरनेटवरील माहितीच्या विश्वासार्हतेत वाढ होईल. कारण, आजवर अनेक वेळा एआयने बनवलेल्या किंवा मिक्स-एडिट केलेल्या व्हिडीओंमुळे दिशाभूल झाली आहे. या पावलामुळे एक वेगळाच मापदंड तयार होईल की, डिजिटल जगतात केवळ ‘वास्तव’ टिकेल, कृत्रिमता नाही. सर्वसामान्य प्रेक्षक विशेषतः तरुण, यांना यामधून एक महत्त्वाचा धडा मिळतो. कोणताही कंटेंट पाहताना त्याची सत्यता, स्रोत आणि हेतू तपासणं अत्यावश्यक आहे. आज एआयने तयार केलेला कंटेंट आकर्षक वाटत असला, तरी त्यामागे कोणतीही वैयक्तिक जबाबदारी नसते. म्हणूनच यूट्यूबसारख्या व्यासपीठांनी हे पाऊल उचलणं ही काळाची गरज आहे.