‘गारवा यंत्रा’चा ‘ताप’

गारवा देणारे यंत्र पृथ्वीचे तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरतात
cooling-devices-increase-global-warming
‘गारवा यंत्रा’चा ‘ताप’Pudhari File Photo
Published on
Updated on
रंगनाथ कोकणे

एअर कंडिशनर हे वापरकर्त्याला गारवा देत असले, तरी प्रत्यक्षात पृथ्वीचे तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरतात, हे सिद्ध झाले आहे. तसेच, यामुळे विजेची मागणी वाढून त्याचा ताण पॉवरग्रीडवर पडत आहे. ‘आयईए’च्या मते, भारत आणि चीनसारख्या देशांत एसी युनिटस्ची संख्या वाढून ती 2.4 अब्जवर पोहोचली आहे. 2050 पर्यंत ती 5.6 अब्ज होऊ शकते. असे झाल्यास शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यात अडथळे येऊ शकतात.

गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वेगाने वर सरकत आहे. वातावरणातील उष्णता ही आरोग्य, कार्यक्षमता, अर्थव्यवस्था, तसेच आयुष्यावर विपरीत परिणाम करत असते. म्हणून वातावरणात समतोलपणा राहावा, यासाठी विविध साधनांचा वापर केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक साधनांऐवजी हवामान बदलात भर घालणार्‍या साधनांचाच वापर अधिक होत असल्याने परिस्थिती आणखीच चिघळत चालली आहे.

औद्योगिक काळापासूनच तापमानात दीड अंश सेल्सिअसने झालेली वाढ ही 2.3 अब्ज लोकांना भीषण उष्णतेच्या लाटेत ढकलणारी आहे. शास्त्रज्ञांच्या मते, आपण कार्बन उर्त्सजनात घट केली नाही, तर 2030 च्या दशकाची सुरुवात आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वातावरणाने होऊ शकते. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच दरवर्षी तापमानातील असमतोलपणामुळे आणि उष्णतेने सुमारे बारा हजार जणांचा मृत्यू होत असल्याची नोंद होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, ज्येष्ठ मंडळी उष्ण वार्‍याच्या किंवा उष्णतेच्या लाटेच्या संपर्कात येत असल्याने 2030 पर्यंत दरवर्षी मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या 38 हजारांपर्यंत वाढू शकते. या भीषण उन्हापासून वाचण्याचा एक सोपा उपाय आपल्याला बाजारात सहजपणे दिसतो आणि तो म्हणजे एसीची खरेदी. मात्र, हे गारवा देणारे यंत्र ग्लोबल वॉर्मिंग वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, हे सिद्ध झालेले आहे.

एसीमुळे नेमके काय घडते?

यामध्ये वापरले जाणारे हायड्रोफ्लोरोकार्बन्ससारखे रेफ्रिजरंटस् किंवा कुलिंग गॅसेस वातावरणासाठी फारच घातक ठरतात. हे वायू थेट वातावरणात गेल्यास त्यांच्या हरितगृह प्रभावाची क्षमता कार्बन डायऑक्साईडपेक्षा हजारो पटीने जास्त असते. नियमितपणे योग्य देखभाल न करता एसी वापरला गेला किंवा जुने एसी फेकून दिले तरी त्यातील हे रेफ्रिजरंटस् गळून हवेत मिसळू शकतात. त्यामुळे हवामान बदलाचे संकट अधिकच तीव्र होते. जेव्हा एकाच परिसरात शेकडो एसी चालू असतात, तेव्हा प्रत्येक एसी त्याच्या बाहेरील युनिटमधून गरम हवा बाहेर टाकतो. त्यामुळे आजूबाजूचं वातावरण आणखी उष्ण होतं. या प्रक्रियेला ‘अर्बन हीट आईसलँड इफेक्ट’ असे म्हणतात. म्हणजे शहरं ही त्यांच्या परिसराच्या तुलनेत अधिक गरम बनतात. हा प्रभाव नुसता उष्णताच वाढवत नाही, तर त्यामुळं पुन्हा एसीचा वापर वाढतो. असा हा विषारी चक्रव्यूह तयार होतो.

विजेच्या मागणीवर परिणाम

एसीमुळे विजेची मागणीही प्रचंड वाढत चालली आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या (आयईए) ताज्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये विजेची मागणी दशकाच्या सरासरीच्या मागणीच्या तुलनेत दुप्पट नोंदविली गेली. म्हणजेच गेल्या दहा वर्षांत विजेचा वापर दुप्पट झाला आहे. चांगली बाब म्हणजे, विजेच्या मागणीची पूर्तता करताना 48 टक्के विजेची गरज ही शाश्वत ऊर्जेतून पूर्ण केली. तरीही अजूनही बहुतांश विजेचे उत्पादन जीवाश्म इंधनातूनच होत असल्याचे दिसून येते. ‘आयईए’ने म्हटल्यानुसार, 2024 मध्ये जगातील दोन तृतीयांश वीज कोळशातून उपलब्ध झाली आणि कोळशातून मिळणार्‍या विजेत सुमारे एक टक्का वाढ झाली आहे. विजेच्या वाढत्या मागणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे एसीचा वाढता वापर.

जगभरात किती एसी वापरात आहेत?

‘अम्बर’ नामक ऊर्जेच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या एका थिंक टँकने जगातील सर्वाधिक विजेचा वापर होणार्‍या भारत, चीन आणि अमेरिका या देशांचे विश्लेषण करणारा एक अहवाल तयार केला आहे. यामध्येही एसीचा वापर वाढल्याच्या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे. मार्च 2025 च्या प्रारंभी जारी केलेल्या अहवालानुसार, भीषण उष्णतेमुळे एसीचा वापर हा विक्रमी पातळीवर पोहोचला असून, त्याचा ताण पॉवरग्रीडवर पडत आहे. ‘आयईए’च्या मते, भारत आणि चीनसारख्या देशांत तापमान, लोकसंख्या आणि उत्पन्न वाढल्याने एसी युनिटस्ची संख्या वाढली आहे. सध्या ही संख्या 2.4 अब्ज असून, ती 2050 पर्यंत वाढत 5.6 अब्ज होऊ शकते. एजन्सीच्या मते, एसीचा वापर नियंत्रित राहिला नाही, तर या शतकाच्या मध्यापर्यंत घर आणि कार्यालयांना थंड ठेवण्यासाठी विजेची मागणी तीन पटीने वाढू शकते.

‘कुल कॉएलिशन नेटवर्क’ या पर्यावरणपूरक थंडपणाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार्‍या संस्थेच्या जागतिक समन्वयक रियाही यांच्या मते, विजेची जादा मागणी ही ग्रीडवर अधिक दबाव टाकते आणि त्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यात अडथळे येऊ शकतात. त्या म्हणतात, 2050 पर्यंत अनेक देशांत केवळ खोली थंड ठेवण्यासाठी 30 ते 50 टक्के प्रमाणात वीज खर्च केली जाईल. सध्या ही सरासरी 15 टक्के आहे. अशावेळी ग्रीडवर वीजनिर्मितीसाठी एवढा दबाव वाढेल की, ते कालांतराने काम करणे बंदच करतील.

एसी यंत्रणा ही उष्ण वातावरण असलेल्या देशातील नागरिकांना गारवा देऊन आरामशीर राहण्यास आणि काम करण्यात मदत करते. म्हणून एअर कंडिशनिंग हे कोणत्याही देशाच्या समृद्ध आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते; पण बदलत्या काळानुसार गारवा यंत्रांना हवामान बदलास अनुकूल बनवले नाही, तर त्यांची वाढती संख्या मानवजातीला संकटात ढकलणारी ठरू शकते.

पर्यावरणपूरक उपाय कोणते?

रियाही यांच्या मते, आजघडीला घर थंड ठेवण्यासाठी उपलब्ध असणार्‍या पर्यायाबाबत लोकांना फारशी माहिती नाही आणि जागरूकतेचादेखील अभाव आहे. शिवाय, आर्थिक अडचणीमुळेदेखील नागरिक कमी उत्सर्जन करणारे रेफ्रिजरेटर आणि कमी वीज लागणारे एसी खरेदी करू शकत नाहीत. आपले घर थंड राहण्यासाठी एसी हा सर्वात चांगला उपाय आहे, असे नाही. यासाठी आपल्या शहराची आणि इमारतीची रचना खोली थंड कशी राहील, याद़ृष्टीने करायला हवी. तसे झाल्यास एसीसारख्या उपकरणांचा कमीत कमी वापर होईल. यासाठी खोली थंड ठेवणारी पर्यावरणपूरक उपकरणे बाजारात येणे गरजेचे आहे. प्रचंड उन्हापासून बचाव करण्यासाठी इमारतीच्या बाहेर शेडिंग, छतावर लहान बाग फुलविणे, सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंट लावणे असे काही उपाय आहेत. या उपायांमुळे खोली तापणार नाही. तसेच, शहरातील हिरवळ, तलाव क्षेत्र आणि वारे असणार्‍या भागांचादेखील तापमान स्थिर ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो. भारतात महिला हाऊसिंग ट्रस्ट ही संस्था एसीचा खर्च उचलू न शकणार्‍या आणि झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांसमवेत काम करत आहे. या संस्थेने कमी खर्चाच्या उपायांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये उष्णता रोखण्यासाठी पत्र्यांवर पांढरा रंग मारणे, सावली देण्यासाठी घरांजवळ झाडे लावणे, छतावर चटईचे आच्छादन करणे यासारख्या उष्णता शोषून घेणार्‍या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. या ट्रस्टचे संचालक बिजल ब्रह्मभट्ट यांच्या मते, छतावर सोलर रिफ्लेटिव्ह पेंटचा वापर केल्याने घरातील तापमान सहा अंशांपर्यंत कमी राहू शकते. त्यामुळे हा बदल एसी बसविण्यासारखाच आहे. त्यांच्या मते, या साधनांचा वापर केल्याने लोकांच्या जीवनशैलीत बरीच सुधारणा झाली आहे. तापमान कमी राहत असल्याने त्यांची आर्थिक उत्पादकता दीड ते दोन तासांनी वाढली आहे. पंख्यांचा वापर करत नसल्याने लोकांचे विजेचे बिल कमी झाले आहे.

वाळवंटात स्मार्ट बिल्डिंग डिझाईन

इजिप्तच्या वाळवंट असलेल्या भागात उन्हाळ्यात तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. वास्तविक, तेथेही उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जातात. यापैकीच एक स्मार्ट बिल्डिंग डिझाईनयुक्त असणार्‍या इमारतींची उभारणी करून उष्णतेचा मुकाबला करणे. इकोनसल्ट या ग्रीन बिल्डिंग फर्मच्या संस्थापक आणि आर्किटेक्ट सारा अल बतुती यांच्या मते, तांत्रिक तोडगा न काढता कंपनीने इमारतीतील तापमान किमान दहा अंशांपर्यंत कमी करण्यात यश मिळवले. इकोनसल्ट कंपनी पाच कोटी 80 लाख लोकसंख्या असलेल्या चार हजार गावांना अपग्रेड करण्यासाठी इजिप्त सरकारसमवेत काम करत आहे. या आधारावर उष्णतेचा सामना करण्यासाठी योजना हाती घेत आहे. असह्य उष्णतेचा मारा सहन करत असंख्य गावे आजही उभी आहेत. कारण, त्यांनी हजारो वर्षांपासून स्वत:ला परिस्थितीनुरूप सज्ज करणारे ज्ञान जोपासले आहे. अर्थात, या गोष्टी साध्य करताना वर्षानुवर्षे जोपासल्या जाणार्‍या पर्यावरणपूरक साधनांपैकी कोणता मार्ग उपयुक्त ठरेल, याचा सारासार विचार केला गेला आणि याप्रमाणे चांगल्या संकल्पना एकमेकांना जोडण्यात आल्या. त्यामुळे प्रत्येकवेळी नव्याने सुरुवात करावी लागत नाही, असे त्या म्हणतात. चुनखडीसारख्या दगडांचा वापर भिंतींच्या माध्यमातून हवा खेळती ठेवण्याचे काम करतो. इमारतीचा आरखडादेखील जमिनीपासून काही अंतर राखत तयार केला जातो आणि त्यामुळे जमिनीची उष्णता घरांपर्यंत पोहोचत नाही. घरी येणार्‍या मार्गावर सावली ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. रिफलेक्टिव्ह छत उभारून उष्णता रोखली जाते. तसेच, थेट उजेड आत येणार नाही, यासाठी तिरक्या खिडक्या आणि सावली देणार्‍या भिंतींची रचना केली आहे.

अल बतुतींच्या म्हणण्यानुसार, आर्किटेक्चर सेक्टरमध्ये नव्या कल्पनांची गरज आहे. या आधारावर इमारत बारा महिने थंड राहू शकेल. उष्णता जेवढी वाढेल, तेवढा उन्हाळ्याचा कार्यकाळ वाढेल आणि त्यामुळे लोकांकडून एसीचा अधिक वापर केला जाईल. म्हणून आपले निवासी क्षेत्र उष्णतेपासून दिलासा देणारे आहे की नाही, हादेखील प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे. अल बतुती म्हणतात, संयुक्त राष्ट्र हवामान बदलासंदर्भातील संमेलनातूनही तापमान कमी करण्याच्या अभियानात घरांची स्थितीदेखील लक्षात घेतली पाहिजे. घर थंड ठेवण्याचा मुद्दा हा एखाद्या अजेंड्याप्रमाणे असायला हवा. शाश्वत ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जेकडे ज्या रीतीने आपण पाहतो, त्याच द़ृष्टिकोनातून घराचा मुद्दा पाहिला पाहिजे. कारण, घरकुले, कार्यालये थंड ठेवणे हे आगामी काळातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी एसीचा वापर करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news