

पाकिस्तानच्या हस्तकांचे जाळे भारतात बर्याच ठिकाणी पसरलेले असून ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरू केलेल्या विशेष मोहिमेत पाकिस्तानी गुप्तचरांशी संबंधित लोकांना अटक करण्यात येत आहे. यावरून यूट्यूबर ज्योती मल्होत्राला झालेली अटक ही आपल्यासाठी एक उपलब्धी आहे. पाकिस्तानला भारतातील अंतर्गत घडामोडी, सैन्य नेतृत्व आणि सैनिकांचे मनोबल यासारख्या बाबतीत माहिती मिळवण्यासाठी अशा एजंटस्ची गरज असते. भारतात अशा एजंटस्विरुद्धची लढाई कायम राहणार असून, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्या मोबाईल व संवाद साधनांवर पाळत ठेवणे आवश्यक आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान पूर्णतः भेदरलेला असताना आणि भारताच्या दहशतवादविरोधी कठोर भूमिकेमुळे पाकव्याप्त काश्मीरसह अन्य भागांतील दहशतवाद्यांचेही धाबे दणाणलेले असतानाच ज्योती मल्होत्रा नामक यूट्यूबरसह जी काही प्रकरणे समोर आली आहेत, ती प्रचंड धक्कादायक आहेत. अर्थात, देशविरोधी तत्त्वे किंवा स्लीपर सेल्स ही काही नवी समस्या नाही. किंबहुना ती भारतातच नव्हे, तर जगातील सर्वच देशांसाठी आव्हान असते. भारतात तर प्राचीन काळापासून फितुरीचा इतिहास राहिला आहे. असे म्हटले जाते की, एक वेळ बाह्य किंवा प्रत्यक्ष शत्रूचा सामना करणे सोपे असते; परंतु अंतर्गत हितशत्रूंचा किंवा अप्रत्यक्ष राष्ट्रविरोधी तत्त्वांचा बंदोबस्त करणे कठीण असते.
यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानच्या नागरिकाशी सतत संपर्कात राहून संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्या तपासातून नित्य नव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यानुसार भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानी अधिकार्यांच्या संपर्कात राहून त्यांना माहिती देत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानला भारतातील अंतर्गत घडामोडी, आपले लष्करी अधिकारी आणि सैनिकांचे मनोबल यासारख्या गोष्टींबद्दल माहिती मिळवण्यासाठी अशा सिक्रेट एजंटस्ची गरज असते. त्यांना आपण स्लीपर सेल्स म्हणतो. कारण, ते रुढार्थाने अॅक्टिव्ह नसतात. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांचे वागणे-बोलणे, वावरणे असते; परंतु प्रत्यक्षात ते एका मिशनवर काम करत असतात. यासाठी त्यांचे पाकिस्तानात किंवा अन्य देशांत बसलेले आकाह त्यांना सूचना देत असतात. त्याबरहुकूम अशी राष्ट्रद्रोही तत्त्वे देशाच्या महत्त्वाच्या संस्थांमधील गोपनीय माहिती मिळवणे, यासाठी तेथील अधिकार्यांशी संपर्क-संबंध वाढवणे, त्यांना आमिषे देणे, पैसे देणे आणि मिळालेली माहिती आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे अशा प्रकारे कार्य करत असतात. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय ही गेली अनेक वर्षे अशा प्रकारे भारतात आपले स्लीपर सेल वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक स्लीपर सेलचा थेट संबंध आयएसआयशी नसतो. यामध्ये एक मोठी साखळी काम करत असते. ही साखळी शोधून काढणे आणि मोडीत काढणे हे तपास यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा यांच्यासाठी मोठे आव्हान असते. भारतात पाकिस्तान आणि चीनसाठी कार्यरत असलेल्या अशा सर्व स्लीपर सेल्सना पकडणे अत्यावश्यक आहे.
ज्योती मल्होत्रा ही एकटी पकडली गेलेली नसून तिच्या 11 हस्तकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व जण कशामुळे फसले, हे पाहणे महत्त्वाचे आहे. असे म्हटले जाते की, गुप्तहेर बनणे हा ‘सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन’ आहे; पण शत्रूने टाकलेल्या जाळ्यात असे लोक फसण्यामागे तीन डब्ल्यू कारणीभूत असतात. एक म्हणजे वूमन. एखाद्या सौंदर्यवान स्त्रीच्या आकर्षणातून अशा व्यक्ती फसत जातात. त्यानंतर त्यांचे फोटो काढले जातात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून राष्ट्रविरोधी कृत्ये घडवून घेतली जातात. दुसरा डब्ल्यू म्हणजे वाईन. दारू प्यायल्यानंतर अशा व्यक्तींकडून नको ती कृत्ये घडतात किंवा घडवून घेतली जातात. त्याचे व्हिडीओ-फोटो काढले जातात. त्याचा वापर करून पुन्हा ब्लॅकमेलिंग केले जाते. तिसरा डब्ल्यू आहे वेज. बहुतांश वेळा अमली पदार्थांच्या विळख्यात अडकून कफल्लक झालेले किंवा आर्थिक अडचणींनी खचलेले किंवा पैसा मिळवण्याची तीव्र लालसा असणारे लोक शत्रू राष्ट्रांकडून हेरले जातात आणि त्यानंतर त्यांचा पाय घसरत जातो व चुकीच्या मार्गाने भरकटत जाऊन या व्यक्ती स्वतःचे आणि राष्ट्राचे खूप मोठे नुकसान करून बसतात. थोडक्यात, पाकिस्तानसाठी किंवा अन्य कोणत्याही देशासाठी काम करणार्या गुप्तहेरांच्या तर्हा या वेगवेगळ्या असतात. अनेक स्मग्लर्सही स्मग्लिंगबरोबरच गुप्तहेराचेही काम करत असतात. खासकरून पंजाब सीमेवर ड्रग्ज आणण्याचे काम स्मग्लर्सच्या माध्यमातून केले जाते.
स्लीपर सेल्समध्ये सामावलेले लोक लष्करी तळ, संरक्षण यंत्रणा, शस्त्रास्त्रांची हालचाल, पोलीस यंत्रणा इत्यादीबद्दल माहिती गोळा करणे, दहशतवादी हल्ल्यांपूर्वीच्या तयारीत मदत करणे, स्फोटकांची वाहतूक, सुरक्षित आश्रयस्थाने उपलब्ध करून देणे, समाजमाध्यमांवर भारतविरोधी प्रचार करणारे बनावट व्हिडीओ प्रसारित करणे, अफवा पसरवणे, धार्मिक द्वेष पसरवणारे संदेश देणे यासारखी कार्ये छुप्या मार्गाने करत असतात.
1993 चे मुंबई बॉम्बस्फोट, 2006 मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट, 2008 चा मुंबईवरील हल्ला या सर्वांमध्ये स्लीपर सेल्सचा सहभाग ठळकपणे समोर आला होता. आपल्याला कल्पना आहे की, कुठल्याही वेळी आपले 350 ते 400 मच्छिमार पाकिस्तानच्या कैदेत असतात. अनेक मच्छिमारांना प्रचंड मारझोड करून, वेदना देऊन त्यांना पाकिस्तानसाठी काम करण्यास भाग पाडले जाते. 26/11 ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील आयएनएस कुबेरचा नाविक दोन वेळा पाकिस्तानच्या कैदेत होता. कसाबसह दहा दहशतवादी जेव्हा मुंबईमध्ये येण्यासाठी निघाले तेव्हा मध्य समुद्रामध्ये आयएनएस कुबेर त्यांना भेटली आणि या बोटीचा वापर करून ते कुलाव्याजवळ पोहोचले. त्यांनी नंतर कुबेरच्या मालकाला मारून टाकले आणि त्यांनी मुंबईमध्ये दहशतवादाचा कहर घडवून आणला. ज्योती मल्होत्राचा विचार करता तिचे लहानपण कठीण होते, तिची आई खूप वर्षांपूर्वी गेली होती, वडिलांचे लक्ष नव्हते. नंतरच्या काळात तिने स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले. तिचे 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स निर्माण झाले. इन्स्टाग्रामवर तिचे 4 लाख फॉलोअर्स होते. ती पाकिस्तानच्या वकिलातीमध्ये जाऊ लागली आणि त्यांच्याशी मैत्री करून पाकिस्तानच्या जाळ्यात ज्योती ओढली गेली. यादरम्यान तिने पाकिस्तानला खूप प्रकारची माहिती दिली. तिचे सर्वांत मोठे काम इन्फ्ल्युएन्सरचे होते.
तिने पहलगामच्या हल्ल्यानंतर एक यूट्यूब व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये या हल्ल्याचा दोष तिने भारताला देण्याचा प्रयत्न केला होता. पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या पर्यटकांचा मुद्दा उचलून धरत तिने भारताची सुरक्षाव्यवस्था कशी बेगडी आहे, कुचकामी आहे, त्यांना आपल्या पर्यटकांचे रक्षण करता आले नाही, त्यांचा निष्काळजीपणा कसा आहे, या अनुषंगाने तिने हा व्हिडिओ बनवला. यामध्ये कुठेही पाकिस्तानचा उल्लेख केला नाही. पाकिस्तानचे दहशतवादी आले, त्यांनी हिंदू लोकांना मारले याबाबत कसलेही भाष्य तिने केले नाही. सोशल मीडियातील इन्फ्ल्यूएन्सरचा त्यांच्या फॉलोअर्सवर प्रभाव पडतोच; पण बाहेरच्या मीडियावरही त्याचा प्रभाव पडतो. सध्याचा वेस्टर्न मीडिया हा पाकिस्तानच्या नॅरेटिव्हवर अधिक विश्वास ठेवणारा आहे. थोडक्यात, त्यांना भारतविरोधी बातम्या, माहिती यामध्ये अधिक स्वारस्य असते. त्यामुळे पश्चिमी माध्यमातील प्रतिनिधी पाकिस्तानला अथवा तेथील दहशतवाद्यांना दोष न देता भारताला सल्ले देताना दिसतात. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे भारताने मुकाट्याने हल्ले सहन केले पाहिजेत अशी त्यांची भूमिका असते. अशांना ज्योतीसारख्या इन्फ्ल्युएन्सरमुळे मूठभर मांस अधिक चढते. यामध्ये अमेरिका, युरोपसह चीनमधील माध्यमांचाही समावेश आहे.
आपल्यात आणि अशा एजंटांमध्ये ही एक सातत्याने चालणारी लढाई आहे. आपल्याला हे पाहिलेच पाहिजे की, संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे आणि त्यांच्या मोबाईल व संवाद साधनांवर नजर ठेवली जात आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशविरोधी प्रवृत्तींचे उघड होणे हे धक्कादायक आहे. केवळ पैशाच्या आणि ऐशोआरामाच्या लालसेपोटी काही लोक देशाची सुरक्षा आणि सामान्य जनतेचे जीवन धोक्यात घालतात, हे अत्यंत चिंताजनक आहे. देशाच्या अंतर्गत अशा शत्रूंचे अस्तित्व अत्यंत धोकादायक आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याच्या आरोपाखाली हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील काही व्यक्तींना अटक करण्यात आली असून, या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ही परिस्थिती देशाच्या सुरक्षेसाठी एक गंभीर आव्हान असून, आपल्याला आता आपली कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे. हे लोक केवळ गुप्त माहितीची पाळत ठेवत नव्हते, तर भारतविरोधी प्रचारातही सक्रिय होते. हे केवळ देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेलाच नव्हे, तर सामाजिक ऐक्यालाही धोका पोहोचवू शकतात. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राकडून चालवली जाणारी ही गुप्त यंत्रणा, भारताच्या सामाजिक, आर्थिक व राष्ट्रीय सुरक्षेच्या रचनेला आतून खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत असते.
ज्योती मल्होत्राच्या बरोबरीने उत्तर प्रदेशातील शहजाद आणि नौमान इलाही यांच्यावरही असेच आरोप आहेत. पंजाबमधील मलेरकोटला येथील दोन व्यक्तींनाही जासूसीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता या आरोपींना पाकिस्तानात थेट लष्करी किंवा संरक्षणविषयक माहितीपर्यंत पोहोच होती का, की ती माहिती त्यांनी कोणत्यातरी उच्च पदावरील व्यक्तीकडून मिळवली होती, हे तपास यंत्रणांनी हे शोधणे आवश्यक आहे. पुढील चौकशीतून भारतविरोधातील मोठ्या कटकारस्थानांचे पुरावे मिळू शकतात; पण देशविरोधी शक्तींच्या हातात हात मिसळून देशाला संकटात टाकणारा हा प्रकार निश्चितच चिंताजनक आहे. पैशांमुळे किंवा भौतिक-इंद्रिय सुखसोयींसाठी देशद्रोह करणे हा जघन्य नैतिक व कायदेशीर अपराध आहे. गोपनीय माहिती शत्रूच्या हाती जाणे म्हणजे देशाच्या संरक्षणाची बिनतोड भिंत उद्ध्वस्त करणे आहे.
शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की, ज्योती मल्होत्रा हे हिमनगाचे टोक आहे. राष्ट्रघातकी जाळ्याचा केवळ एक छोटासा भाग आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी, माध्यमांनी आणि जनतेने एकत्र येऊन अशा देशविरोधी घटकांना उघडकीस आणले पाहिजे. अलीकडील काळातील हेरगिरीचे प्रकार पाहता सोशल मीडिया, टेलिग्राम, व्हॉटस्अॅप यासारख्या प्लॅटफॉर्मवर नजर ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती द्यावी, यासाठी विश्वासार्ह व्यवस्था उभारली गेली पाहिजे. सरकारी नोकरी, संरक्षण संस्था, संचार माध्यम यामध्ये काम करणार्यांचे पार्श्वविवरण अधिक काटेकोरपणे तपासले जावे.
बदलत्या काळात प्रत्यक्ष युद्धांच्या बरोबरीने इन्फर्मेेशन वॉरफेअर महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे आयएसआयच्या माहिती युद्धाच्या कुटील यंत्रणेला सडेतोड प्रत्युत्तर देणे ही काळाची गरज आहे. जाता जाता शेवटचा एक मुद्दा मांडावासा वाटतो, तो म्हणजे, आपल्याकडे काही राजकीय पुढार्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने किती लढाऊ विमाने गमावली, अशा प्रकारचे प्रश्न विचारणे चुकीचे आहे. कारण, असे कोणतेही नुकसान सार्वजनिकरीत्या जाहीर केले जाता कामा नये. कारण, त्यामुळे पाकिस्तानला त्यांनी वापरलेली अँटिएअरक्राफ्ट सिस्टम प्रभावी ठरली, याची माहिती मिळते. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात भर पडते. सबब अशा गोष्टी जाहीर केल्या जाता कामा नयेत.