

योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक
‘कॉक्रोच जनता पार्टी’चा जन्म कोणत्याही वैचारिक चळवळीतून झालेला नाही. ती संताप, अपमान आणि डिजिटल संस्कृतीच्या मिश्रणातून निर्माण झाली आहे. बेरोजगारी, परीक्षा घोटाळे, आर्थिक दबाव आणि राजकीय चर्चांबद्दल वाढत चाललेली निराशा यामुळे अस्वस्थ झालेल्या तरुणांच्या एका वर्गाने अचानक ‘कॉक्रोच’ या शब्दालाच स्वतःची ओळख बनवली.
भारतातील राजकारण आता संसद, सभा आणि निवडणूक प्रचारापुरते मर्यादित न राहता मोबाईलच्या पडद्यावर उतरले आहे. रिल्स, मीम्स, हॅशटॅग्ज आणि उपरोधिक व्हिडीओंच्या स्वरूपात ते नव्या पिढीसमोर उभे राहत आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हे या बदलत्या राजकारणाचे कदाचित सर्वात नवे आणि विचित्र उदाहरण मानावे लागेल. पहिल्या नजरेत हा केवळ एक विनोद, एक इंटरनेट ट्रेंड किंवा काही बेरोजगार तरुणांचा उपहास वाटू शकतो; परंतु त्याकडे केवळ हसण्यावारी नेऊन पाहिले, तर ती गंभीर चूक ठरू शकते. कारण, अनेक मोठे राजकीय विस्फोट सुरुवातीला विनोद, व्यंग्य आणि उपहासाच्या रूपातच जन्माला आलेले आहेत, असे इतिहास सांगतो.
‘कॉक्रोच जनता पार्टी’चा जन्म कोणत्याही वैचारिक चळवळीतून झालेला नाही. ती संताप, अपमान आणि डिजिटल संस्कृतीच्या मिश्रणातून निर्माण झाली आहे. बेरोजगारी, परीक्षा घोटाळे, आर्थिक दबाव आणि राजकीय चर्चांबद्दल वाढत चाललेली निराशा यामुळे अस्वस्थ झालेल्या तरुणांच्या एका वर्गाने अचानक ‘कॉक्रोच’ या शब्दालाच स्वतःची ओळख बनवली. जो शब्द अपमानासाठी वापरला गेला, त्यालाच प्रतिकाराचे प्रतीक बनवण्यात आले. हीच या प्रवाहाची सर्वात मोठी मानसिक ताकद आहे. सामाजिक माध्यमांच्या अल्गोरिदमने या प्रवाहाला अक्षरशः आग लावली. इन्स्टाग्राम रिल्स, मीम पेजेस आणि व्हायरल व्हिडीओंनी काहीच दिवसांत त्याला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवले. पारंपरिक राजकीय पक्ष ज्या डिजिटल आधारासाठी अनेक वर्षे घालवतात, तो प्रभाव ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने इंटरनेटच्या अराजक ऊर्जेच्या बळावर काही दिवसांत मिळवला. या प्रवाहाची भाषा पारंपरिक राजकारणासारखी नाही. येथे भाषणांपेक्षा उपरोध अधिक आहे. जाहीरनाम्यांपेक्षा मीम्स अधिक आहेत. संघटनात्मक रचनेपेक्षा भावनिक डिजिटल उद्रेक अधिक आहे; मात्र ही केवळ भारताची कथा नाही. गेल्या काही वर्षांत दक्षिण आशियात घडलेल्या घटनांकडे बारकाईने पाहिले, तर एक समान धागा स्पष्टपणे दिसतो. नेपाळ, बांगला देश आणि श्रीलंका या तिन्ही देशांमध्ये सामाजमाध्यमांवर उभ्या राहिलेल्या युवक चळवळींनी अचानक राजकीय व्यवस्थेलाच आव्हान दिले.
बांगला देशात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुवातीला आरक्षणविरोधी स्वरूपाचे होते; पण हळूहळू ते सरकारविरोधी जनआंदोलनात परिवर्तित झाले. तिथेही तरुणांनी व्यंगचित्रे, मीम्स, पोस्टर्स, रॅप संगीत, डिजिटल कला आणि व्हायरल घोषणांचा वापर शस्त्रासारखा केला. सरकारने आंदोलनकर्त्यांना ‘राजाकार’ म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विद्यार्थ्यांनी त्याच शब्दाला प्रतिकाराची ओळख बनवली. भारतात ‘कॉक्रोच’ या शब्दाभोवती तयार होत असलेले मानसशास्त्रही याच प्रकारचे आहे.
अपमानाचे प्रतिकारात रूपांतर
श्रीलंकेतील ‘अरगलया’ आंदोलनाने सामाजिक माध्यमांतून निर्माण होणारी डिजिटल अस्वस्थता रस्त्यावर कशी उतरू शकते, हे जगाला दाखवून दिले. ‘गो गोटा गो’सारख्या घोषणा आधी इंटरनेटवर ट्रेंड झाल्या आणि नंतर थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचल्या. नेपाळमध्येही टिक-टॉक आणि इन्स्टाग्रामवर आधारित राजकीय संघटनांनी पारंपरिक सत्ताव्यवस्थेविरोधात मोठा असंतोष निर्माण केला. या तिन्ही देशांमधून मिळणारा सर्वात मोठा धडा असा की, जेव्हा युवकांना असे वाटू लागते की, त्यांचे ऐकून घेणारे कोणीच नाही, तेव्हा ते स्वतःची नवी भाषा निर्माण करतात आणि आज त्या नव्या भाषेचे नाव आहे मीम, व्यंग्य, डिजिटल टोमणे आणि इंटरनेट आधारित प्रतिकार.
भारतात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ अजूनही प्रामुख्याने डिजिटल उपरोधाचे आंदोलन आहे; पण त्याकडे केवळ हास्यास्पद प्रकार म्हणून पाहणे ही गंभीर चूक ठरू शकते. कारण, हा प्रवाह प्रत्यक्षात एका मानसिकतेचे लक्षण आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण व्यवस्था आणि राजकारणापासून भावनिकद़ृष्ट्या दूर जाऊ लागतात. त्यांच्यासाठी राजकारण ही गंभीर संस्था न राहता तमाशात त्याचे रूपांतर होते. यामध्ये उपहास हेच सर्वात प्रभावी अस्त्र बनते.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, अशी डिजिटल राजकीय संस्कृती अत्यंत वेगाने भावनिक ध्रुवीकरण निर्माण करते. येथे तथ्यांपेक्षा तत्काळ भावनिक प्रतिक्रिया अधिक प्रभावी ठरते. अल्गोरिदम अशाच आशयाला पुढे आणतात, जे संताप निर्माण करतात, उपहास घडवतात आणि लोकांना सतत उत्तेजित अवस्थेत ठेवतात. हळूहळू ही प्रक्रिया लोकशाहीतील गंभीर चर्चेलाच पोकळ बनवू शकते. म्हणून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ निवडणूक लढवेल की नाही, हा प्रश्न नाही. खरा प्रश्न असा आहे की, अशी मानसिकता निर्माणच का होत आहे? आणि त्यावर उपाय काय असू शकतो?
सर्वात पहिले म्हणजे युवकांच्या वास्तविक प्रश्नांना गांभीर्याने ऐकले जाणे आवश्यक आहे. बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील भ्रष्टाचार, संधींचा अभाव आणि वाढती आर्थिक असुरक्षितता हे केवळ सांख्यिकीय विषय नाहीत. हीच त्या भावनिक स्फोटाची जमीन असते. व्यवस्था या समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी केवळ प्रचारात गुंतून राहिली, तर डिजिटल विद्रोह अपरिहार्य ठरतो. दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांनी हे समजून घेतले पाहिजे की, आजचा युवक केवळ भाषणांनी प्रभावित होत नाही. त्याला पारदर्शकता, संवेदनशीलता आणि संवाद हवा असतो. राजकारण केवळ प्रचार यंत्रणेत बदलले, तर त्याच्या विरोधात मीम राजकारण उभे राहणे स्वाभाविक आहे.
तिसरी गरज म्हणजे, समाजमाध्यमांवरील असंतोष केवळ दडपशाहीने नियंत्रित करण्याची चूक सरकारांनी टाळली पाहिजे. नेपाळ, बांगला देश आणि श्रीलंकेतील अनुभव सांगतात की, इंटरनेट बंद करणे, खाती रोखणे किंवा केवळ देखरेख वाढवणे हा कायमस्वरूपी उपाय ठरत नाही. अनेकदा त्यामुळे संताप आणखी वाढतो. लोकशाहीत संवाद, पारदर्शकता आणि विश्वास हीच अधिक प्रभावी साधने ठरतात. चौथी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे समाजाने व्यंग आणि अराजकता यांमधील फरक समजून घेतला पाहिजे. लोकशाहीत व्यंग आवश्यक असते. सत्तेवर हसणे हादेखील लोकशाही संस्कृतीचाच भाग आहे; पण जर संपूर्ण राजकीय चर्चा केवळ मीम्स आणि उपहासापुरती मर्यादित झाली, तर गंभीर राष्ट्रीय प्रश्नसुद्धा मनोरंजनात बदलतात. कोणत्याही लोकशाहीसाठी ही स्थिती धोकादायक असते.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ कदाचित काही महिन्यांनंतर कमकुवत ट्रेंड ठरेल. कदाचित ती पूर्णपणे अद़ृश्यही होईल; पण ती ज्या मानसिक अस्वस्थतेचे प्रतीक आहे, ती इतक्या सहज संपणार नाही. ती स्वतःकडे दुर्लक्ष झाल्याची, असुरक्षिततेची आणि न ऐकले जाण्याची भावना सतत छळत आहे अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आहे. इतिहास सांगतो की, जेव्हा एखादी पिढी आपल्या वेदनांना मीम्समध्ये व्यक्त करू लागते, तेव्हा पारंपरिक राजकीय रचना हळूहळू कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला केवळ इंटरनेटवरील विनोद म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. तो मोबाईलच्या पडद्यामधून बाहेर पडून लोकशाहीच्या दारावर ठोठावणारा एक गंभीर सामाजिक इशारा म्हणून वाचावा लागेल.