

डॉ. मंगेश कश्यप
सांडपाणी आणि कचरा हे पारंपरिक अर्थव्यवस्थेत समस्या म्हणून पाहिले जात होते; परंतु सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये त्याच घटकांना संसाधन म्हणून पाहिले जाते. वॉटर युटिलिटीज या द़ृष्टिकोनात मूलभूत बदल घडवून आणत आहेत.
आज सांडपाणी प्रक्रिया केंद्रे रिसोर्स रिकव्हरी फॅक्टरीज म्हणून विकसित होत आहेत, जिथे पाणी, पोषक द्रव्ये, ऊर्जा आणि इतर उपयुक्त घटक पुनर्प्राप्त केले जातात.
मटेरियल्स पाथवे : कचर्याचे मूल्यामध्ये रूपांतर सांडपाण्यातील स्लज (गाळ) पूर्वी कचरा मानला जात होता; मात्र आज तो एक मौल्यवान संसाधन आहे.
या स्लजमधून जैवखते तयार केली जातात, जी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. स्ट्रुवाईटसारखी खते फॉस्फरस आणि नायट्रोजन पुरवतात, जे मातीची सुपीकता वाढवतात.
बायोप्लास्टिक, सेल्युलोज आणि कागद यांसारख्या उत्पादनांची निर्मितीही सांडपाण्यातून शक्य आहे. काही ठिकाणी तर बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्यही तयार केले जाते.
सेंद्रिय कचर्यासोबत स्लजवर सहप्रक्रिया केल्यास बायोगॅस उत्पादन वाढते. यामुळे ऊर्जा निर्मिती अधिक कार्यक्षम होते.
तथापि, या प्रक्रियेसाठी बाजारपेठ, गुणवत्ता नियंत्रण आणि धोरणात्मक समर्थन आवश्यक आहे. पुनर्प्राप्त उत्पादनांना मान्यता मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एनर्जी पाथवे : ऊर्जानिर्मिती आणि स्वावलंबन
ऊर्जा खर्च हा वॉटर युटिलिटीजसाठी मोठा आर्थिक भार असतो; परंतु सांडपाण्यातील सेंद्रिय घटकांचा वापर करून ऊर्जा निर्माण करता येते.
अॅनारोबिक डाईजेशन प्रक्रियेद्वारे बायोगॅस तयार होतो. हा गॅस वीजनिर्मितीसाठी वापरता येतो. काही प्रगत प्रकल्पांमध्ये युटिलिटीज स्वतःच्या गरजा पूर्ण करून अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पुरवतात.
यामुळे ऊर्जा खर्च कमी होतो आणि कार्बन उत्सर्जनात घट होते. तसेच, नूतनीकरणक्षम ऊर्जा वापर वाढल्यामुळे हवामान बदलावर सकारात्मक परिणाम होतो.
ऊर्जा क्षेत्राशी भागीदारी केल्यास या प्रक्रियेला अधिक गती मिळते. यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्थिरता साध्य होते.
पाथवे जंक्शन्स : समन्वयाचे सामर्थ्य
वॉटर, मटेरियल्स आणि एनर्जी हे तिन्ही मार्ग एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यांचा समन्वय साधल्यास अधिक परिणामकारक प्रणाली तयार होते.
उदाहरणार्थ, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे ही ऊर्जा निर्मिती, खत उत्पादन आणि पाणी पुनर्वापर यांचे केंद्र बनू शकतात.
शेती क्षेत्राला पोषक द्रव्ययुक्त पाणी मिळते, शहरांना पाणी पुनर्वापराची सुविधा मिळते आणि उद्योगांना स्वस्त संसाधने उपलब्ध होतात.
नैसर्गिक परिसंस्थादेखील या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या पाणी शुद्धीकरण, पूर नियंत्रण आणि कार्बन शोषणात मदत करतात.
आव्हाने आणि संधी
या परिवर्तनामध्ये काही आव्हाने आहेत. नियम, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि सामाजिक स्वीकार; परंतु या आव्हानांवर मात केल्यास प्रचंड संधी निर्माण होऊ शकतात.
वॉटर युटिलिटीज नवीन व्यवसाय मॉडेल स्वीकारू शकतात. उदाहरणार्थ, वॉटर-अॅज-अ-सर्व्हिस किंवा रिसोर्स-अॅज-अ-सर्व्हिस. यामुळे त्यांना केवळ सेवा पुरवठादार न राहता मूल्य निर्माण करणार्या संस्था बनता येते.
सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये वॉटर युटिलिटीजची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्या कचर्याचे मूल्यामध्ये रूपांतर करतात, ऊर्जा निर्माण करतात आणि संसाधनांचा पुनर्वापर सुनिश्चित करतात.
या प्रक्रियेमुळे पर्यावरणीय संतुलन राखले जाते, आर्थिक लाभ मिळतो आणि सामाजिक कल्याण साध्य होते. भविष्यात वॉटर युटिलिटीज या शाश्वततेच्या केंद्रस्थानी राहतील. त्यांनी नवकल्पना, भागीदारी आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केला, तर त्या एक समृद्ध आणि शाश्वत समाज घडवण्यात निर्णायक भूमिका बजावतील. आपण स्वतःपासून सुरुवात केली, तर आपल्याला व आपल्या परिसरालासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. चला तर मग आपण कचर्यातून संसाधन घरगुती कंपोस्टिंग कसे करायचे ते अनुभवातून शिकूया!
कचर्यातून संसाधन - घरगुती कंपोस्टिंग प्रयोग
उद्दिष्ट : सेंद्रिय कचरा हा संसाधन आहे, हे अनुभवातून समजणे
कसे करावे :
एक प्लास्टिक/मातीचा डबा घ्या
त्यात ओला कचरा (भाजीचे साल, फळांचे अवशेष) टाका
त्यावर थोडी माती किंवा सुकी पाने टाका
दर 2-3 दिवसांनी हलके ढवळा
20-25 दिवसांत कंपोस्ट तयार होईल
शिकण्याचा मुद्दा :
सांडपाणी स्लजप्रमाणेच घरातील कचर्यापासूनही खत तयार होते.