kids Entertainment Decline | कोठे हरवले बालपट?

kids Entertainment Decline |
kids Entertainment Decline | कोठे हरवले बालपट?
Published on
Updated on

कावेरी गिरी

आजच्या डिजिटल युगात बालपणाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. एकेकाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत अंगणात, मैदानात किंवा गावाच्या रस्त्यांवर धावणारी मुले आता घराच्या चार भिंतींत मोबाईलच्या पडद्यावर रमलेली दिसतात. हातात चेंडू, सायकल किंवा पतंग नसून स्मार्ट फोन असतो. बदलत्या जीवनशैलीचा हा भाग असला, तरी या बदलामुळे बालपणातील अनेक रंग हरवत चालले आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा रंग म्हणजे ‘बालपट’. एकेकाळी मुलांसाठी खास बनणारे चित्रपट, त्यांच्यासाठी आयोजित होणारे सांस्कृतिक उपक्रम, जादूचे प्रयोग, शिबिरे, भटकंती आणि सामूहिक मनोरंजन आज दुर्मीळ होत चालले आहे. त्यामुळे 'बालपट हरवले कोठे?' हा प्रश्न आज गंभीरपणे विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्या बहुसंख्य शाळकरी मुले मैदानात खेळण्यापेक्षा मोबाईलवर खेळण्यात अधिक वेळ घालवतात. क्रिकेट, लगोरी, लपंडाव, खो-खो, कबड्डी यांसारखे पारंपरिक खेळ मुलांच्या जीवनातून जवळपास हद्दपार होत आहेत. त्याऐवजी मोबाईल गेम्स, व्हिडीओज आणि सोशल मीडियाचे आकर्षण वाढले आहे. मोबाईल हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा भाग असला, तरी त्याचा अतिरेक मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी घातक ठरू शकतो. सतत स्क्रीनसमोर बसल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते. डोळ्यांचे विकार, स्थूलपणा, एकाग्रतेचा अभाव, चिडचिडेपणा आणि सामाजिक संवादातील कमतरता यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. मैदानी खेळ मुलांना संघभावना, नेतृत्व, सहकार्य आणि पराभव स्वीकारण्याची मानसिकता शिकवतात; परंतु मोबाईल गेम्समध्ये हे अनुभव मिळत नाहीत.

उन्हाळी सुट्टीतील हरवलेले उपक्रम

पूर्वी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी आनंदाचा उत्सव असायचा. विविध ठिकाणी जादूचे प्रयोग, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, कथाकथन, वाचन शिबिरे, नाट्यप्रयोग, बालचित्रपट महोत्सव आणि भटकंती यांचे आयोजन केले जायचे. मुले उत्साहाने या उपक्रमांत सहभागी होत असत.

आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. अनेक ठिकाणी असे कार्यक्रम होत असले, तरी त्यातील मुलांची संख्या घटत आहे. जादूचे प्रयोग पाहण्यासाठी मुलांपेक्षा पालकांची गर्दी जास्त दिसते. कारण, मुलांचे लक्ष मोबाईल आणि इंटरनेटने वेधून घेतले आहे. एका क्लिकवर असंख्य व्हिडीओ उपलब्ध असल्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची उत्सुकता कमी होत चालली आहे. यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे, त्यांच्या कुतूहलाला दिशा देणारे आणि सामाजिक सहभाग वाढवणारे अनेक उपक्रम मागे पडत आहेत. बालपणाचा अनुभव केवळ स्क्रीनपुरता मर्यादित होत आहे.

बालपटांची घटती परंपरा

एक काळ असा होता की, मुलांसाठी खास चित्रपट तयार होत असत. या चित्रपटांमध्ये मनोरंजनाबरोबरच मूल्यशिक्षण, साहस, विज्ञान, मैत्री, निसर्गप्रेम आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम असायचा. अशा चित्रपटांमुळे मुलांना केवळ मनोरंजन मिळत नसे, तर त्यांच्या विचारविश्वालाही दिशा मिळत असे. आज चित्रपटसृष्टीत बालपटांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. काही चित्रपट तयार झाले, तरी त्यांना पुरेशी प्रसिद्धी किंवा चित्रपटगृहांमध्ये पुरेसा वेळ मिळत नाही. व्यापारी दृष्टिकोनातून मोठ्या बजेटचे आणि सर्व वयोगटांना आकर्षित करणारे चित्रपट अधिक फायदेशीर मानले जातात. परिणामी, बालप्रेक्षकांसाठी स्वतंत्र चित्रपटनिर्मिती कमी होत आहे.

यामागे आणखी एक कारण म्हणजे, प्रेक्षकांच्या सवयींमध्ये झालेला बदल. मुलांना चित्रपटगृहात नेण्याऐवजी पालक घरातच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट दाखवतात. त्यामुळे चित्रपटगृहात बालपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे. मागणी घटल्याने निर्मातेही अशा चित्रपटांकडे कमी वळतात.

सोशल मीडिया आणि ओटीटीचा प्रभाव

सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मने मनोरंजन क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे. कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी हवे ते पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे अनेक सकारात्मक संधी निर्माण झाल्या असल्या, तरी त्याचे काही दुष्परिणामही दिसून येतात. मुलांना सतत नवीन व्हिडीओ, गेम्स आणि मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध असल्याने त्यांची एकाग्रता कमी होत आहे. अल्पकालावधीतील मनोरंजनाची सवय लागल्यामुळे दीर्घ कथा, चित्रपट किंवा पुस्तकांकडे त्यांचा कल कमी होतो. अनेक वेळा मुलांच्या वयाला अयोग्य सामग्रीही त्यांच्या सहज उपलब्धतेत येते.

पूर्वी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे हा एक सामूहिक अनुभव असायचा. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत चित्रपट पाहताना संवाद घडायचा. आज मात्र प्रत्येक जण आपल्या मोबाईलच्या पडद्यावर स्वतंत्रपणे मनोरंजन करून घेत आहे. त्यामुळे सामाजिक संवाद आणि सामूहिक अनुभव कमी होत आहेत.

मोबाईल गेम्सचे वाढते दुष्परिणाम

सध्या मोबाईल गेम्सची संख्या प्रचंड वाढली आहे. काही गेम्स शैक्षणिक आणि बौद्धिक विकासाला मदत करणारे असले, तरी अनेक गेम्स मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम करतात. काही गेम्समध्ये हिंसा, आक्रमकता, सूड भावना किंवा धोकादायक आव्हाने दाखवली जातात. सतत अशाप्रकारच्या गेम्समध्ये गुंतल्यामुळे मुलांच्या वर्तनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. गेम जिंकण्याची किंवा विशिष्ट पातळी गाठण्याची स्पर्धा इतकी तीव्र असते की, अनेक मुले वास्तव जगापासून दूर जाऊ लागतात. गेम्सचे व्यसन ही आता जागतिक समस्या बनली आहे. काही मुले तासन्‌ तास गेम खेळत राहतात. अभ्यास, झोप, कुटुंबीयांशी संवाद आणि इतर छंद याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. पराभव झाल्यास चिडचिड, राग किंवा मानसिक अस्वस्थता वाढू शकते.

नैराश्य आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न

मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाचा अतिरेक मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. सतत आभासी जगात राहिल्यामुळे वास्तव जीवनातील संबंध कमकुवत होतात. मित्रांशी प्रत्यक्ष भेटी कमी होतात. एकटेपणा आणि भावनिक दुरावा वाढतो. काही गेम्स अत्यंत व्यसनाधीन स्वरूपाचे असतात. त्यात अपयश आल्यास किंवा गेममधील उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास मुलांमध्ये निराशा निर्माण होऊ शकते. अभ्यासात घट, आत्मविश्वास कमी होणे आणि नैराश्याची लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या डिजिटल सवयींकडे सजगपणे लक्ष देणे आवश्यक आहे. यासोबतच मुलांना मानसिक आधार, संवाद आणि सकारात्मक छंद उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे. खेळ, वाचन, संगीत, चित्रकला, नाट्यकला आणि भटकंती यांसारख्या उपक्रमांमुळे मुलांचे भावविश्व समृद्ध होते.

मोबाईलमुक्त बालपणाची गरज

आज 'मोबाईलमुक्त बालपण' ही केवळ संकल्पना नसून काळाची गरज बनली आहे. याचा अर्थ तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारण्याचा नाही, तर त्याचा संतुलित आणि मर्यादित वापर करण्याचा आहे. शाळा, पालक, सामाजिक संस्था आणि शासन यांनी मिळून मुलांसाठी पर्यायी मनोरंजन आणि विकासाच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. शाळांमध्ये मैदानी खेळांना प्रोत्साहन, वाचन संस्कृतीचा विकास, विज्ञान क्लब, कला उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम वाढवले पाहिजेत. पालकांनीही मुलांसोबत वेळ घालवणे, त्यांना बाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि स्क्रीन टाईमवर मर्यादा घालणे आवश्यक आहे. कुटुंबातील संवाद वाढविणे हीसुद्धा काळाची गरज आहे.

मुलांच्या मनोरंजनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार बालपटांची निर्मिती वाढणे गरजेचे आहे. बालपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून संस्कार, प्रेरणा आणि कल्पनाशक्ती विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. चित्रपट निर्माते, सांस्कृतिक संस्था आणि शासन यांनी बालपटनिर्मितीला प्रोत्साहन दिले पाहिजे. शाळांमध्ये आणि सांस्कृतिक केंद्रांमध्ये बालचित्रपट महोत्सव आयोजित केले जाऊ शकतात. मुलांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शन, चर्चासत्रे आणि चित्रपटविषयक उपक्रम घेतल्यास त्यांचा या माध्यमाकडे कल वाढू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news