changing social relationships | बदलते नाते, बदलती समाजरचना

changing social relationships
changing social relationships | बदलते नाते, बदलती समाजरचना
Published on
Updated on

कावेरी गिरी

परंपरेने भारतीय समाजात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची नाही, तर दोन कुटुंबांची, दोन पिढ्यांची जोड मानली जात होती. सहनशीलता, तडजोड आणि नाते निभावणे या मूल्यांना फार महत्त्व होते. आज मात्र विवाहाकडे पाहण्याची द़ृष्टी बदलत आहे. तो हळूहळू एका सामाजिक संस्थेपेक्षा भावनिक आणि वैयक्तिक समाधान देणारा करार बनतो आहे.

आजचे तरुण-तरुणी स्वतःच्या अपेक्षा, स्वप्ने, करिअर आणि मानसिक आरोग्य यांना अधिक महत्त्व देतात. नाते समाधान देत नसेल, तर ते टिकवून ठेवणे ही जबाबदारी वाटण्याऐवजी ओझे वाटू लागते. परिणामी, सहन करण्यापेक्षा बाहेर पडा हा पर्याय स्वीकारला जातो.

एक घर, दोन मौन

पुण्यातील एका मध्यमवर्गीय वसाहतीत राहणारे अनिरुद्ध आणि माधवी बाहेरून पाहता सुखी जोडपे होते. सकाळी दोघेही ऑफिसला, संध्याकाळी मुलाला शिकवण्या, आठवड्याच्या शेवटी मॉल किंवा नातेवाईकांकडे फेरी, सगळं अगदी ठरलेलं; पण त्या घरात एक गोष्ट वाढत होती, ‘मौन’. सुरुवातीला ते थकव्याचं होतं. मग, ते चिडचिडीत बदललं आणि हळूहळू ते दाट झालं. बोलायचं काय, हा प्रश्न दोघांच्याही मनात आला; पण कुणी विचारलंच नाही. वर्ष-दोन वर्षांत घटस्फोटाचा अर्ज दाखल झाला. न्यायालयात कारण लिहिलं होतं, ‘मतभेद’; पण प्रत्यक्षात ते होते न बोललेले शब्द, न व्यक्त झालेल्या अपेक्षा.

बदलती जीवनशैली आणि अपेक्षा

आजची जीवनशैली वेगवान आहे. नोकरीचे ताण, वेळेचा अभाव, आर्थिक चढ-उतार, सततची स्पर्धा या सगळ्याचा थेट परिणाम वैवाहिक नात्यावर होतो. पूर्वी एकाच कुटुंबात अनेक पिढ्या राहत असल्याने जबाबदार्‍या विभागल्या जायच्या. आजच्या विभक्त कुटुंबात नवरा-बायकोवर सर्व भार येतो.

यासोबतच अपेक्षाही वाढल्या आहेत. फक्त जबाबदार किंवा कुटुंबप्रेमी असावा इतके पुरेसे राहिलेले नाही. तो-ती समजूतदार, भावनाशील, आधुनिक आणि तरीही पारंपरिक सगळेच असावे, अशी अपेक्षा असते. या अपेक्षांचा ताळमेळ न बसल्यास मतभेद वाढतात.

आर्थिक स्वावलंबन : स्त्रीचा बदलता रोल

घटस्फोट वाढण्यामागे स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. पूर्वी अनेक स्त्रिया असमाधानी किंवा त्रस्त वैवाहिक नात्यात अडकून राहायच्या. कारण, आर्थिक अवलंबित्व होते. आज शिक्षण आणि नोकरीमुळे स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे.

हे स्वातंत्र्य चुकीचे नाही. उलट ते समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे; पण यामुळे नात्यातील सत्ता संतुलन बदलले आहे. काही पुरुषांना हा बदल स्वीकारणे कठीण जाते, तर काही स्त्रियांना पारंपरिक अपेक्षांमध्ये स्वतःला बसवणे अवघड वाटते. संवादाअभावी हे मतभेद टोकाला जातात.

संवादाचा अभाव : नात्यातील मोठा दुभंग

आज संवादाची साधने वाढली आहेत; पण प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे, ही शोकांतिका आहे. मोबाईल, सोशल मीडिया, ऑफिस मीटिंग्ज यामध्ये गुंतलेली जोडपी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलायला वेळ काढत नाहीत. लहान गैरसमज, न बोललेली

दुःखे, दडपलेला राग, हे सगळे हळूहळू नात्यात साचत जाते. वेळेत संवाद झाला नाही, तर प्रश्न वाढत जातात आणि एक दिवस नाते तुटण्याच्या टप्प्यावर येते. अनेक समुपदेशक सांगतात की, घटस्फोटाच्या टोकाला आलेली जोडपी आम्ही खूप आधीच एकमेकांपासून दुरावलो होतो, असे म्हणतात.

प्रेमविवाह आणि वास्तव

प्रेमविवाह केल्यामुळे घटस्फोट वाढतात, असा एक गैरसमज समाजात आहे. प्रत्यक्षात प्रेमविवाह असो वा ठरवलेला विवाह, दोन्ही प्रकारांत तुटणारी नाती दिसतात. फरक इतकाच की, प्रेमविवाहात अपेक्षा जास्त असतात. आपण एकमेकांना ओळखतो, या भावनेतून वास्तवातील बदल, जबाबदार्‍या आणि स्वभावातील दोष दुर्लक्षित राहतात. लग्नानंतर समोर येणारे आर्थिक प्रश्न, कुटुंबीयांचे हस्तक्षेप, पालकत्वाची जबाबदारी या सगळ्याचा सामना करण्यासाठी प्रेम पुरेसे नसते. परिपक्वता लागते.

मुलांवर होणारा परिणाम

घटस्फोटाचा सर्वात संवेदनशील परिणाम मुलांवर होतो. तुटलेले कुटुंब, पालकांमधील संघर्ष आणि असुरक्षितता याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होऊ शकतो; मात्र सतत भांडणार्‍या, तणावपूर्ण वातावरणातील घरात वाढण्यापेक्षा शांत, जरी वेगळ्या पालकांसोबत असलेले आयुष्य काही वेळा अधिक आरोग्यदायी ठरते. म्हणूनच प्रश्न घटस्फोटाचा नसून तो कसा हाताळला जातो याचा आहे. परस्पर सन्मान राखून, मुलांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून घेतलेले निर्णय कमी वेदनादायी ठरतात.

घटस्फोट म्हणजे अपयश?

घटस्फोट म्हणजे वैयक्तिक अपयश किंवा चारित्र्यदोष अशी धारणा अजूनही अनेकांच्या मनात आहे. प्रत्यक्षात तो अनेक वेळा चुकीच्या जुळणीचा, बदलत्या परिस्थितीचा किंवा न सुटलेल्या समस्यांचा परिणाम असतो. काही नाती टिकवणे हे धैर्य असते, तर काही नाती सोडणे हेही तितकेच धैर्याचे असते; मात्र हेही तितकेच खरे आहे की, सोपे वाटते म्हणून नातं तोडणे ही प्रवृत्ती वाढत असेल, तर त्यावर विचार व्हायला हवा. प्रत्येक मतभेद घटस्फोटापर्यंत नेण्याआधी संवाद, समुपदेशन आणि आत्मपरीक्षण आवश्यक आहे.

पुढचा मार्ग : नाती अधिक सुद़ृढ कशी होतील?

घटस्फोट रोखायचे असतील, तर केवळ कायदे किंवा सामाजिक दबाव पुरेसा नाही. गरज आहे ती विवाहपूर्व समुपदेशनाची, भावनिक साक्षरतेची, संवाद कौशल्यांची आणि परिपूर्ण नातं या भ्रमातून बाहेर पडण्याची. शाळा, महाविद्यालये आणि कुटुंबे सर्व पातळ्यांवर नात्यांविषयी वास्तववादी चर्चा व्हायला हव्यात.

घटस्फोटांचे वाढते पेव हे समाज बिघडल्याचे नव्हे, तर समाज बदलत असल्याचे लक्षण आहे. हा बदल स्वीकारताना आपण संवेदनशील, समजूतदार आणि जबाबदार असणे गरजेचे आहे. विवाह टिकवणे हे महत्त्वाचेच आहे; पण त्याहून महत्त्वाचे आहे ते दोन व्यक्तींचे मानसिक, भावनिक आणि मानवी स्वास्थ्य. शेवटी नातं टिकवण्याइतकेच नातं सन्मानाने सोडण्याचे भान समाजात विकसित झाले, तर घटस्फोट ही केवळ कायदेशीर प्रक्रिया न राहता एक परिपक्व सामाजिक निर्णय ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news