

चंद्राच्या पृष्ठभागाच्या सखोल अभ्यासासाठी केंद्र सरकारने चांद्रयान-5 या महत्त्वाकांक्षी मोहिमेला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प 2040 पर्यंत भारताच्या मानवयुक्त चंद्र मोहिमेच्या दिशेने एक मोठा टप्पा ठरणार आहे. चांद्रयान-5 मोहिमेच्या आधी चांद्रयान-4 प्रक्षेपित करण्यात येईल. चंद्राच्या पृष्ठभागावरील माती व खडकांचे नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम 2027 मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोेने गेल्या काही वर्षांत अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. चांद्रयान, मिशन आदित्य, मिशन मंगळ यांसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमांद्वारे भारताने अंतराळाच्या क्षेत्रात स्वतःचा अमीट ठसा उमटवला आहे आणि आपल्या संशोधकांची, शास्त्रज्ञांची अजोड क्षमता जागतिक स्तरावर सिद्ध केली आहे. इस्रोच्या चांद्रयान मोहिमांनी चंद्राविषयी अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व शोधण्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. या यशस्वी मोहिमांमुळे भारतीय तिरंगा अंतराळ क्षेत्रातही सन्मानाने फडकत आहे. आता इस्रोने चांद्रयान-5 मोहिमेची तयारी सुरू केली आहे.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बंगळूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अलीकडेच याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला मान्यता दिली आहे. या मोहिमेत जपान हा भारताचा सहकार्य देश असणार आहे. हा प्रकल्प 2040 पर्यंत भारताच्या मानवयुक्त चंद्र मोहिमेच्या दिशेने एक मोठा टप्पा ठरणार आहे. याखेरीज 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक प्रस्थापित करण्याच्या योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भारताला अंतराळ संशोधनात दीर्घकालीन प्रयोग करण्याची संधी मिळेल आणि जागतिक स्तरावर आपले स्थान अधिक बळकट करता येईल. भारताच्या चांद्रयान मोहिमांचा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास करणे हा आहे. चांद्रयान-5 ही मोहीम 2040 पर्यंत चंद्रावर मानव मिशन पाठवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.
चांद्रयान-5 मोहिमेआधी 2027 मध्ये चांद्रयान-4 मोहीम राबवण्यात येईल, ज्यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरून माती आणि खडकांचे नमुने गोळा करून पृथ्वीवर आणले जातील. भारताने 2008 मध्ये चांद्रयान-1 मिशन पूर्ण केले. चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक आणि खनिज घटक शोधणे, तसेच भू-स्थैतिक मॅपिंग करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यानंतर चांद्रयान-2 या मोहिमेअंतर्गत पाठवलेला हाय-रिझोल्यूशन कॅमेरा अजूनही चंद्राची छायाचित्रे पाठवत आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चा लँडर विक्रम याने चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंग केले. त्याचा रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करत आहे. या मोहिमेमध्ये केवळ 25 किलो वजनाचा प्रज्ञान रोव्हर नेण्यात आला होता. आता चांद्रयान-5 मध्ये 250 किलो वजनाचा अत्याधुनिक रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल. हा नवीन रोव्हर प्रज्ञानपेक्षा 10 पट अधिक शक्तिशाली असेल आणि मोठ्या प्रमाणात डेटा संकलित करेल. यामध्ये विशेषतः चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावरील पाण्याच्या अस्तित्वाचा शोध आणि त्याच्या संभाव्य उपयोगाची तपासणी केली जाईल. या मोहिमेत जपानची अंतराळ संशोधन संस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
चांद्रयान-4 मोहीम ही भारताच्या लूनर सॅम्पल रिटर्न मोहिमेचा एक भाग असेल. या मोहिमेअंतर्गत इस्रो चंद्राच्या मातीचे आणि खडकांचे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित करीत आहे. या मिशनमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरील खडक आणि मातीचे नमुने संकलित करणे, चंद्राच्या भूपृष्ठाची आणि खनिज संरचनेची सखोल माहिती मिळवणे, भविष्यातील मानवी मोहिमांसाठी संशोधन करणे, चंद्रावर पाण्याच्या उपलब्धतेचा अधिक सखोल अभ्यास करणे ही उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. चांद्रयान-4 मध्ये एक अत्याधुनिक लँडर आणि रोवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षित उतरवण्यात येणार आहे. यामधील सॅम्पल कलेक्शन सिस्टीम ही एक विशेष रोबोटिक प्रणाली चंद्राच्या जमिनीचे नमुने गोळा करेल आणि त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी एका उड्डाण यानात ठेवेल. चंद्रावरून पृथ्वीवर नमुने परत आणण्यासाठी एक खास यान तयार करण्यात येत आहे, जे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून सुरक्षितपणे लँडिंग करेल. 2,104 कोटींच्या या मोहिमेच्या माध्यमातून भारताच्या चंद्र संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे.
चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह असून, मानवाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी तो एक महत्त्वाचे संशोधन केंद्र ठरला आहे. गेल्या काही दशकांत, विविध देशांनी चांद्रमोहिमा राबवल्या आहेत. यामागील उद्देश वेगवेगळे असले तरी वैज्ञानिक संशोधन, संसाधनांचा शोध, भविष्यातील मानव वसाहतींसाठी तयारी आणि अंतराळ क्षेत्रातील प्रगती हे प्रमुख हेतू आहेत. चंद्र पृथ्वीच्या निर्मिती आणि अंतराळातील हालचाली समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर खडक, खनिजे आणि क्रेटर्सचा अभ्यास केल्याने सौरमालेच्या विकासाचा मागोवा घेता येणे शक्य होणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असलेले खडक आणि माती यांच्या आधारे पृथ्वीच्या उत्पत्तीच्या संशोधनावर नवा प्रकाश पडणार आहे. याखेरीज चंद्रावर वातावरण नसल्याने तेथे सूर्य आणि अंतराळातील किरणोत्सर्गाचा थेट परिणाम होतो. याचा अभ्यास करून अंतराळ प्रवासादरम्यान सुरक्षेची उपाययोजना ठरवता येणे शक्य होणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चंद्रावर हीलियम-3 सारखे दुर्मीळ संसाधन आढळले असून ते भविष्यात ऊर्जानिर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकते. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फरूपात पाणी आढळल्याने भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी ते उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. चंद्रावरील पाण्याचा साठा भविष्यात अंतराळ स्थानके उभारण्यासाठी आणि मानवाच्या दीर्घकाळाच्या वास्तव्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. याशिवाय चंद्राच्या मातीमध्ये दुर्मीळ खनिजे आणि धातू असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. यामुळे भविष्यकालीन खनिज उत्खननाची दारे उघडू शकतात. चंद्र हा भविष्यातील मंगळ आणि अधिक दूरच्या ग्रहांवरील मोहिमांसाठी एक मध्यवर्ती तळ ठरू शकतो. चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत अत्यल्प असल्यामुळे भविष्यात अंतराळ यानांचे प्रक्षेपण कमी इंधन वापरून करता येऊ शकते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधक दीर्घकालीन चाचण्यांसाठी चंद्रावर संशोधन केंद्र उभारण्याचा विचार करत आहेत. चंद्रावर दीर्घकाळ मानव वास्तव्यासाठी राहू शकेल का, याचा शोध सुरू आहे. यासाठी चंद्रावरील वातावरण, संसाधने आणि हवामान यांचा अभ्यास आवश्यक आहे. भविष्यात चंद्रावर तळ निर्माण करून मंगळ आणि अन्य ग्रहांवर प्रवास करणे सोपे ठरेल, असे संशोधकांना वाटते. यादृष्टीने चंद्रावर जैविक घटक, अन्न निर्मिती आणि वीज निर्मिती यांचे प्रयोग सुरू आहेत, जे भविष्यातील वसाहतींसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि जपान यांसारख्या देशांनी चांद्रमोहिमा राबवण्यास सुरुवात केली आहे. चीनने चंद्राच्या उलट्या बाजूचा अभ्यास करण्यासाठी यशस्वी चाचण्या केल्या आहेत. अमेरिका 2030 पर्यंत चंद्रावर मानववस्ती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे. येणार्या काळात जागतिक स्तरावरील अंतराळ संशोधनात भारताची भूमिका अधिक धवल होणार आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या मोहिमांमध्ये चांद्रयान-4, शुक्र ऑर्बिटर मिशन, भारतीय अंतराळ स्थानक आणि गगनयानच्या पुढील टप्प्यांचा समावेश आहे. शुक्र ऑर्बिटर मिशन मार्च 2028 मध्ये प्रक्षेपित होणार असून, यासाठी 1,236 कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. ही भारताची मंगळयाननंतरची दुसरी आंतरग्रहीय मोहीम असेल. या मोहिमेअंतर्गत शुक्राच्या पृष्ठभागाचा आणि वातावरणाचा सखोल अभ्यास केला जाईल. शास्त्रज्ञांचे लक्ष विशेषतः शुक्राच्या हवामान बदलांवर आणि तेथील वातावरणातील घडामोडींवर असेल. पृथ्वीप्रमाणेच शुक्र कधीकाळी जीवनास अनुकूल असावा. परंतु नंतर तो अत्यंत उष्ण ग्रह कसा झाला, याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेसाठी इस्रो उच्च तंत्रज्ञानयुक्त यान तयार करणार आहे. यामध्ये विविध उद्योग क्षेत्रांचा सहभाग असेल. त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास करताना इस्रोला मोठी आव्हाने येऊ शकतात. शुक्र ग्रहावर कार्बन डायऑक्साईडने भरलेले वातावरण आणि अत्यंत तीव्र उष्णता (सुमारे 470 अंश सेल्सिअस) असल्याने लोखंडही वितळू शकते. तसेच तिथे ज्वालामुखींच्या हालचाली सुरू असल्याची शक्यता असल्यामुळे मोहिमेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. पण चांद्रयान-3 आणि आदित्य एल 1 यांसारख्या मोहिमांच्या यशामुळे भारतीय अंतराळ संशोधकांचे मनोबल उंचावले असल्याने आगामी मोहिमा यशाचे नवे शिखर गाठतील, यात शंका नाही.