

दहावी परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. गेल्या काही वर्षांत या निकालामधील उत्तीर्णांची आकडेवारी थक्क करून जाते. 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवणार्यांची संख्या हल्ली एका लाखाच्या पार गेलेली दिसते. याबाबत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जातही असेल; पण मग राज्याच्या एमएचटीसीईटीमध्ये 200 पैकी 190 च्यावर गुण घेणारे केवळ 10 विद्यार्थी का असतात?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. यंदा दहावीसाठी 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 लाख 55 हजार 477 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीच्या निकालात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील जास्त आहेत. लातूर विभागात एकूण 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण प्राप्त केले आहेत, ज्यामुळे हा जिल्हा अव्वल ठरला आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये 40 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईचे दहावी-बारावीचे निकालही जाहीर झाले आहेत. यामध्ये दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णांची संख्या 93.66 टक्के आहे; तर बारावीतील एकूण उत्तीर्णांचे प्रमाण 88.39 टक्के आहे. सीबीएसईच्या बारावीतीली 1,11,544 विद्यार्थ्यांनी (6.59%) 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून 24,867 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. दहावीत 1,99,944 विद्यार्थ्यांनी (8.43%) 90 टक्क्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, तर 45,516 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये दहावीच्या परीक्षांचा महाराष्ट्रातील निकाल हा आश्चर्यचकित करणारा आणि भुवया उंचावायला लावणारा ठरत आहे. नव्वदपेक्षा अधिक टक्के मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात एक लाखांहून अधिक असल्याचे अलीकडच्या काळात दरवर्षी दिसून येत आहे; पण असे असताना राज्याच्या एमएच-सीईटीच्या परीक्षेत 200 पैकी 190 च्यावर गुण घेणारे केवळ 10-12 विद्यार्थी आणि 75 टक्के म्हणजे 150 गुण घेणारे केवळ अडीच-तीन हजार विद्यार्थीच का असतात? म्हणजेच साधारणतः 60 हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ 5 टक्के विद्यार्थ्यांना 150 ते 190 पेक्षा अधिक गुण मिळतात. ते पाहिले की प्रश्न पडतो, काय करायचं या दहावीच्या गुणवत्तेचं? सीईटीमध्ये अशी स्थिती असताना जेईईबाबत तर विचारच न केलेला बरा.
सीईटीमध्ये दीडशेपेक्षा जास्त गुण न मिळाल्यास या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी किती यातायात करावी लागते, हे आपण सर्वच जण जाणतो. जवळपास 95 टक्के विद्यार्थी जे या प्रक्रियेत मागे पडतात त्यांच्या पालकांनी दिवसाढवळ्या मेडिकल आणि आयआयटीची स्वप्न पाहिलेली असतात. ती स्वप्न विकणारा कार्पोरेट कोचिंगचा बाजार सदैव बहरलेला असतो. 3 ते 6 लाखांपर्यंत फी भरून पालक या बाजारात आपल्या पाल्यांना आणून सोडतात. पण पुढे काय? वास्तविक, दहावीच्या निकालातच मुलांची खरी क्षमता दिसली असती, तर अशी स्थिती निर्माण झालीच नसती. त्यामुळे मी माझ्या व्याख्यानातून सातत्याने सांगत असतो की, दहावीचे मार्क केवळ एक दिवसाचे पेढे वाटण्याचे आणि दिवसभराच्या आनंदानंतर विसरून जायचे मार्क्स आहेत. वाईट याचेच वाटते की, यात ग्रामीण भागातली मुले सर्वात जास्त भरडली जात आहेत. कारण, ते काहीतरी स्वप्नं घेऊन शहरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायला आपल्या तुटपुंज्या साधनांसह येतात आणि मोठ्या प्रमाणावर निराशा पदरी घेऊन जातात. वास्तवाचे भान सुटले की काय होते, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दहावीच्या निकालाचा फुगवटा.
दहावीचे मार्क चांगले मिळतात म्हणून आता छान वाटते; पण बारावीत यातील अनेकांची पूर्णतः वाट लागलेली असते. त्यावेळी त्यांना या खिरापतीची जाणीव होतेही; मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मी वास्तवाशी नाळ जोडून विचार करून एवढं सरळ आणि स्पष्ट बोलतोय. ज्याप्रमाणे फुगलेल्या मार्कांच्या फाजील आत्मविश्वासाने बारावीनंतर तोंडघशी पडलेला पालक पुढे तक्रार करत नाही तसेच धोरणकर्तेही. ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ प्रकारामुळे मार्कांच्या खिरापतीचं धोरण सरकारने बदलल्याशिवाय वास्तवाचं भान येणार नाही, हे मात्र नक्की!
आता तर फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या वाढलेली आहे. केवळ एमएचटी-सीईटी देणार्या दोन्ही ग्रुपच्या (पीसीएम आणि पीसीबी) विद्यार्थ्यांची संख्या साडेआठ लाखांच्या घरात गेलेली आहे; पण 200 पैकी 160 गुण घेणार्या विद्यार्थ्यांची ग्रुपनिहाय संख्या 40-45 हजारांपेक्षा जास्त नसते; पण दहावीत 90% पेक्षा जास्त गुण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या लाखापेक्षा जास्त. जेईई-मेन्समध्ये देखील 300 पैकी 200 पेक्षा जास्त गुण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत फार कमी असते.
नीटमध्ये देखील तोच प्रकार दिसतो. याचाच अर्थ, दहावीत मोठ्या प्रमाणावर खिरापत वाटल्यासारखे मार्क मिळतात; मात्र पुढे जाऊन बारावीनंतर प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची दांडी उडते, हे वास्तव आहे. ज्यांना दहावीत 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स असतात त्यांना प्रवेश परीक्षांमध्ये 50 टक्केदेखील गुण मिळत नाहीत, असे दिसून आले आहे. म्हणजे नीटमध्ये 360 गुण, जेईईमध्ये 150 गुण आणि एमएटी-सीईटीमध्ये 100 गुण मिळवणेदेखील विद्यार्थ्यांना अवघड जाते. पालकांच्या ते खास लक्षात येऊ नये म्हणून आता पर्सेंटाईल सिस्टीम सुरू झालेली आहे. त्यामध्ये तुलनात्मक स्कोअर दाखवला जात असल्याने कमी मार्क असताना देखील 90 पेक्षा जास्त पर्सेंटाईल दिसतात. इथेच अनेक पालक आणि विद्यार्थी फसतात. 97 पर्सेंटाईलपेक्षा कमी गुणांवर फारसे चांगले कॉलेज उपलब्ध होतच नाही. त्यामुळे पालकांनी पर्र्सेेंटेज आणि पर्सेंटाईल यातील फरक नीट समजून घेतला पाहिजे. अर्थात, विद्यार्थी संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे पर्सेंटाईल्स सिस्टीम अमलात आणावी लागली अन्यथा विद्यार्थ्यांचं इंटर-सी-मेरीट काढणं कठीण झालं असतं.
नीटमध्येदेखील मध्यंतरी अनेक विद्यार्थ्यांना भरभरून मार्क्स मिळाले होते. त्यामुळे कट ऑफ फार उंचीवर गेलेला होता. यावेळी तुलनात्मकरीत्या पेपर कठीण निघाल्याने थोड्या फार प्रमाणात का होईना या वाढलेल्या गुणांवर लगाम लागणार आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे वळणार्या विद्यार्थी संख्येवर देखील नक्कीच काही प्रमाणात परिणाम होणार आहे. त्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान व्हायचे थांबेल.
मुळातच दहावीच्या वेळी विद्यार्थ्यांना 60 ते 80 टक्क्यांपर्यंत थांबवता आलं, तर नको त्या नाहक अपेक्षा विद्यार्थी आणि पालक ठेवणार नाहीत आणि मृगजळाच्या मागे धावणार नाहीत; मात्र सरकारने तसे न केल्यास जो बाजार पुढे मांडलेला आहे, त्याच्यासाठी कच्चा माल निर्माण होतच राहील. बाजाराची जशी गरज आहे त्याप्रमाणे उपलब्ध विद्यार्थी संख्या मिळवून देण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे दहावीच्या पहिल्या सार्वजनिक परीक्षेमध्ये विद्यार्थी आणि पालकांना भरभरून त्यांच्या पदरात टाकलं, तर ते पुढील शिक्षण मोठ्या आशेने घेतील आणि त्यासाठी त्यांनी मिळवलेल्या कष्टाच्या पैशातून मोठ्या प्रमाणावर खर्चदेखील करतील. ज्यांना झेपू शकते ते सहजपणे ते करू शकतील; मात्र ज्यांना ते झेपणार नाही, ते प्रसंगी कर्ज काढून, प्रॉपर्टी विकून त्या रकमेची तजवीज करतील आणि इतरांच्या बरोबरीने फार फरफटत जातील. कारण, प्रत्येकाला आपल्या पाल्याच्या भवितव्याची काळजी असते आणि त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ते दाखवतात. त्यापैकी फार तर एक-दोन टक्के पालक व विद्यार्थी भविष्यात यशस्वी होतात. बाकी सर्वांच्या नशिबी खूप मोठ्या प्रमाणावर निराशा आलेली असते आणि झालेले कर्ज आयुष्यभर फेडत बसतात.
त्यामुळे पालकांनी खूप विचारांती निर्णय घ्यावा. आंधळे अनुकरण करू नये. कारण, शिक्षण पूर्ण करूनदेखील सध्या नोकरी सर्वांनाच मिळेल याची खात्री नाही. मिळाली तरी ती शाश्वत असेल, याबद्दल कोणीही सांगू शकणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या पाल्यांची आवड ज्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रातच त्यांना त्यांचं करिअर करू द्यावं. जेणेकरून ते योग्य ते कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या जीवनाचा गाडा उत्तमपणे पुढे हाकू शकतील अन्यथा डिग्री घेतलेल्या अनेक बेरोजगारांच्या फौजेत आपलीही मुलं जमा होतील, हे वास्तव लक्षात घ्यावे.